MahaGanapati Mandir

MahaGanapati Mandir
महागणपती मंदिर, वाई, महाराष्ट्र.

मनातलं

ज्या यशाने उन्माद येईल असं यश मला नको. ज्या यशाने इतरांच्या त्या यशातील वाट्याबद्दल कृतज्ञता मनात दाटून येईल आणि अधिक विनम्रता येईल ते खरं यश.

Showing posts with label थरार. Show all posts
Showing posts with label थरार. Show all posts

Sunday, April 5, 2020

राजस्थान बॉर्डरवर डिटेक्टीव्ह चिण्णूची रबाडगिरी - 12



20 डिसेंबर. सकाळी 10-10
पंतप्रधानांचे निवासस्थान
पंतप्रधानांच्या निवासस्थानी सर्वजण इडली-सांबराचा आनंद घेण्यात मश्गूल झाले होते. पण पंतप्रधान महारेणूजींच्या घशाखाली घास  उतरत नव्हता. तिकडे पाकिस्तानी पंतप्रधानांचा खून होणार आणि इकडे आपण इडली सांबर खायचं? खून व्हायला अवकाश होता, खून होणारे पंतप्रधान शत्रू देशाचे होते, पण तरीही खून होऊ नये म्हणून महान चिण्णू प्रयत्न करणार होता. तरी पण ... शेवटी भुजंगरावांना जवळ बोलावून त्यांच्या कानात ते कुजबुजले --
“यजुबिंदरसिंगजींना फोन करा. त्यांना तासाभरात बोलावून घ्या.”
“काय सांगू?”
“सांगू नका!!!” महारेणूजी भुजंगरावजींच्या कानात ओरडले. त्याबरोबर सगळे दचकले.  “माफ करा, तुमचं चालू द्या.” मग परत ते भुजंगरावजींच्या कानात कुजबुजले, “काहीऽहीऽऽ सांगू नका. फक्त म्हणावं, महत्त्वाचं, अर्जंट काम ... जेवायलाच या.”
“आज त्यांचा उपास ...” भुजंगरावजी.
“तुम्हाला बरीच माहिती -- पलीकडच्या खोलीतून फोन करा.”
“हॅलो?” भुजंगरावजींनी पलीकडच्या खोलीतून यजुबिंदरसिंगजींच्या घरी फोन केला. “नेने का?”
“नाही . मी लेले यजुबिंदरसिंगजींचा पीए. कोण भुजंगरावजी? ... अहो, नेनेंना तुम्हीच नाही का नेलंत पंतप्रधान साहेबांचे पीए म्हणून?”
“अं... हो. ... सिंगसाहेब? ...”- भुजंगजी.
“चर्चा! इतर विरोधी नेत्यांबरोबर. दुसरं काय ...” लेले.
“अर्जंट जोडून द्या!”  भुजंगजी.
“मीटींगमधे?”  लेले.
“होय! अर्जंट ... सिंगसाहेब का? साहेब, सिंगजी, मी भुजंग बोलतोय.”

20 डिसेंबर. सकाळी 10-10
प्रमुख विरोधी पक्ष नेते श्री यजुबिंदरसिंग यांचे निवासस्थान
बोंधू जॉमूनजी बोशांशी फोनवर झालेल्या बोलण्यासंबंधी यजुबिंदरसिंगजी सहकार्‍यांना माहिती देत होते. पंतप्रधानांच्या खूनाच्या शक्यतेने सगळेच हबकले होते.
“पण म्हणूनच, ही टांगाभेटीची कल्पना मूर्खपणाची आहे, असं आपण नाहीतरी ठासून सांगणारच होतो.” नवराणाजी.
“नवराणाजी, कल्पना करा, आपण ठासून सांगितलं, आणि पंतप्रधानांचा खून खरंच झाला …”  यजुबिंदरसिंगजी.
“‘तर आपल म्हणणंच सिध्द होणार!”   नवराणाजी.
“तर आपल्याला माहिती होतं हे सिध्द होणार! ... किंवा आपणच तो घडवून आणला, राजकीय स्वार्थासाठी ...” यजुबिंदरसिंगजी.
“ऑं!? असं आहे का?”
नवराणाजी व सगळेच गप्प झाले. तेवढ्यात ‘लोकविहार दलाचे ’ श्री. कन्नूयाजी यादव आले. नमस्कार चमत्कार झाले आणि कन्नूयाजी गाल फुगवून कोपर्‍यात बसून राहिले. सगळेच पुन्हा गप्प झाले.
“काय झालं कन्नूयाजी?” सत्यबिहारीजी.
“काय झालं कन्नूयाजी?” नवराणाजी.
“काही नाही ...”  गाल फुगवून कन्नूयाजी अखेर बोलले.
“मग का गप्प गप्प ...?”  यजुबिंदरसिंगजींनी विचारले.
“आपल्या शवपेटीवर 29 डिसेंबरला आणखी एक खिळा ठोकणार ते!” एकदम उभे राहात कन्नूयाजी किंचाळले. सगळे दचकून गप्प झाले.
“ऑं? तुम्ही ख्रिश्चन कधी झाला?” ‘निद्रा जागरण मंचाचे’ श्री. तोतारामजी बिट्टा आत येता येता म्हणाले.
“काय वेळ आलीयै आपल्यावर आणि तुम्हाला विनोद सुचतोय!” हातवारे करत कन्नूयाजी म्हणाले. “तुमच्या सरणावर आणखी एक लाकूड ठेवणार ते, असं म्हणूया?”
“कोण ते? कोण आमच्या जिवावर उठलंय? त्यांना आमच्या आधी वर पोचवूनच आम्ही अजून खाली हिंडतो आहोत.” तोतारामजी आवेशाने म्हणाले.
“म्हणजे? आत्ता तुमच्याही मनात हाच विचार आहे?” एकदम घाबरुन यजुबिंदरसिंगजींनी विचारले.
“आमच्या म्हणजे? आपल्या सगळ्यांच्याच मनांत हाच विचार आहे. आणि नुसत्या विचारावर थांबणारे आम्ही नाही. ‘जगा अथवा मरा, जगण्यासाठी मारा!’ असं गीतेमधे भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला सांगितलं तेच आमचे थोर नेते ‘नितजागृतमणी’ पुंडरिपुंजयजींनी आम्हाला सांगितलं. ’दुसर्‍याला मारल्याशिवाय आपल्याला जगता येत नसेल तर दुसर्‍याला मारलेच पाहिज’ हा निसर्गनियम आहे. प्रत्येक सच्च्या सैनिकाचे ते कर्तव्य आहे.”
“म्हणजे? तुमच्या सगळ्यांचं ठरलंसुध्दा आहे?” यजुबिंदरसिंगजी.
“तुम्हीही आमच्याबरोबरच आहात!” तोतारामजी.
“छे,छे!! आम्ही नाही! या असल्या कामात तुम्ही आम्हाला गृहीत धरु नका.” यजुबिंदरसिंगजी घाबरुन म्हणाले.
“तुम्ही नेहमीच आयत्या वेळी अशी कच खाता. आणि आम्हाला तोंडघशी पाडता.” कन्नूयाजी रुसून गाल फुगवून म्हणाले. “आणि मग नुसतं, ‘कॅय झॅलं कन्नूयॉजी, कॅय झॅलं कन्नूयॉजी’ असं म्हणून काय उपयोग?”
“अहो पण ... आत्ता काही कारण नाही ... आणि एकदम असं एखाद्याच्या जिवावर उठायचं म्हणजे” यजुबिंदरसिंगजी.
“आता तुम्हाला माघार घेता येणार नाही. त्यांची वेळ आलीय हेच कारण.”  तोतारामजी आवेशानं म्हणाले.
यजुबिंदरसिंगजींनी कपाळाला हात लावला. मग सत्यबिहारीजी आणि नवराणाजींकडे हताशपणे पाहात ते म्हणाले, “तुम्ही तरी काहीतरी बोला ...”
“आम्ही काय बोलणार?” सत्यबिहारीजी.
“तुमचं कशाबद्दल चाललंय, आम्हाला समजतच नाहीय” नवराणाजी.
“असं काय करताय? मगाशी बोंधू जॉमूनजी फोनवर काय सांगत होते?” यजुबिंदरसिंगजी.
“म्हणजे पंतप्रधानांचा खून?” सैय्यद काझीजी मधेच एकदम ओरडले.
“ऑं? काय ...?” कन्नूयाजी आणि तोतारामजी एकदम ओरडले.
तेवढयात फोनची बेल वाजली.

20 डिसेंबर. सकाळी 10-30
प्रमुख विरोधी पक्ष नेते श्री यजुबिंदरसिंग यांचे निवासस्थान
“हॅलो? मी भुजंग बोलतोय. सिंग साहेब का?” भुजंगजी.
“होय. नंतर भुजंगजी. मीटींग चाललीय, जरा वेळानं ...” यजुबिंदरसिंगजी.
“अर्जंट आहे. पंतप्रधानांचा खून ...”  भुजंगजी.
“काय? ... एवढयात झाला सुध्दा? अरे ...” यजुबिंदरसिंगजींनी कपाळाला हात लवला. त्यांना धसक्यानं बोलणंच सुचेना.
“होणार आहे.” भुजंगजी.
“‘तुम्ही कुठून बोलताय?”  यजुबिंदरसिंगजी.
“महारेणूजींच्याच घरातून. तुम्हाला अर्जंट बोलावलंय.” भुजंगजी.  
“काय इतक्यात ... मी तुम्हाला माझा माणूस समजत होतो.” यजुबिंदरसिंगजी.
“मी तुमचाच आहे. म्हणून तर महारेणूजींनी नको म्हटलं असतानाही मी तुम्हाला ही माहीती देतोय. म्हणजे भेटायला येताना तुम्ही तयारीत असाल.”
“आता कसली तयारी ऽऽ !? अरे,अरे...” यजुबिंदरसिंगजी.
“तुम्ही पंतप्रधान झाल्यावर मला ’मानव विकास’, निदान 'वन व प्राणी विकास खातं’तरी दिलं पाहिजे.”  भुजंगजी.
“अहो ... अहो ... हे तरी निदान तिथूनच बोलू नका.” यजुबिंदरसिंगजी.
“बारापर्यंत जेवायलाच बोलावलंय.” भुजंगजी.
“पण – मला – मी -- अशा परिस्थितीत मीच त्यांच्याबरोबर म्हणजे ... ”  यजुबिंदरसिंगजी.
“मी सांगितलंय त्यांना, तुमचा उपास असतो, म्हणून.”
फोन बंद झाला आणि यजुबिंदरसिंगजी कपाळाला हात लावून मट्कन खालीच बसले.
“काय झालं, कुणाचा फोन?”  नवराणाजी.
“पंतप्रधानांच्या घरून.” यजुबिंदरसिंगजी.
“काय” सर्वजण एकदमच ओरडले.  “त्यांना एवढयात समजलंसुध्दा?”

20 डिसेंबर. सकाळी 10-45
पंतप्रधानांचे निवासस्थान
यजुबिंदरसिंगजींना फोन करुन भुजंगरावजी वळताहेत तोच फोनची बेल वाजली. आपण फोन उचलावा का नाही असा विचार करत त्यांनी फोन उचललाच.
“हॅलो?”  भुजंगरावजी.
“हॅलो ऽऽ ” फोनवर नाजूक, स्टायलीत लांबवलेला, कमावलेला गोड आवाज आला आणि भुजंगरावजी एकदम सावध झाले. आवाज ‘हट्टपूर्तीकरा पार्टीच्या’ जयजगदीश्वरी देवींचा होता. आवाजाबरोबर इंपोर्टेड सेंटचा मादक भपकारा आल्याचाही त्यांना भास झाला आणि त्यांच्या अंगावर शहारा आला. ते काही बोलणार इतक्यात पलीकडच्या बैठकीच्या खोलीतून महारेणूजींनीही फोन घेतला.
“हॅलो? कोण बोलतोय?”  महारेणूजी.
“हॅलो मी ईऽश्वरीऽऽ जयजगदीश्वरीदेवी. महारेणूजी, आवाज ओळखला नाही?”
“हं.”  पट्कन तोडत महारेणूजी म्हणाले. “‘मी आतून फोन घेतो.”
भुजंगरावजींना काय करावे समजेना. इतक्यात महारेणूजी आत आले तेव्हा पट्कन भुजंगरावजींनी फोन त्यांच्यापुढे केला.
“हं, नेहमीप्रमाणे चोरुन ऐकत होता वाटतं?” फोनवर हात ठेवून महारेणूजींनी हसत विचारले. भुजंरावजींनी मनातल्या मनात दात ओठ खाल्ले.
“छे,छे! यजुबिंदरसिंगजींना फोन केला. तेवढ्यात पुन्हा बेल वाजली म्हणून फोन उचलला तोच तुम्ही ... ”  भुजंगरावजी.
“मग काय म्हणाले?” महारेणूजी.
“अं? कोण? -- हां हां, यजुबिंदरसिंगजी! येतायत.” भुजंगरावजी म्हणाले आणि पट्कन बाहेर पडले.
“हॅलो? आवाज ओळखला तर! तुमचा आवाज एकदा ऐकल्यावर कोण विसरेल?”  महारेणूजी फोनवर म्हणाले.
“पण तुम्ही मात्र सारखे विसरता, बाई “ जयजगदीश्वरीदेवी.
“तुम्ही मीटींगला आला नाहीत.”
“फार वाट पाहिलीत?” जयजगदीश्वरीदेवी.
“तुम्ही आमच्या मैत्रिण पक्ष. शिवाय ...”  महारेणूजी.
“मैत्रीण पक्ष म्हणता आणि आम्हाला विसरता. बरोबर नेत नाही.”
“कुठं?”  महारेणूजी.
“टांग्यातून टांगाभेटीला” जयजगदीश्वरीदेवी.
“टांग्यातून ते येणार. आपण फक्त स्वागत करायचं आणि भेटायचं. तुम्ही पण या ...” महारेणूजी.                                                                          
“इश्श्श्श्श!! मला नाही हं जमणार पाकिस्तानच्या पंतप्रधानांना मिठी मारुन भेटायला ...”  जयजगदीश्वरीदेवी. “आपण असं करु या का? आपण त्यांना भेटायला बग्गीतून जाऊ.”  
“अहो पण ...” महारेणूजी.
“एवढ्या मोठ्या देशाचे तुम्ही पंतप्रधान. ते टांग्यातून, तर मोठेपणा दाखवण्यासाठी तुम्ही बग्गीतूनच जायला पहिजे बाई!” जयजगदीश्वरीदेवी.
“पण ...”  महारेणूजी.
“शिवाय बग्गीत मला पण तुमच्या शेजारी बसता येईल.” जयजगदीश्वरीदेवी.
“पण बग्गीत ...”  महारेणूजी.
“तुमच्या मिसेस ना? त्या एका बाजूला बसतील, मी एका बाजूला बसेन. म्हणजे कौटुंबिक टच आला आणि मित्रपक्षांना बरोबर नेल्यासारखंही झालं. फार तर समोरच्या बाकावर यजुबिंदरसिंगजींना बसवा. ते आपल्याबरोबर आले आणि मी समोर असले की त्यांच्या विरोधाची धार पण कमी होईल.”  जयजगदीश्वरीदेवी.
“पण ... अहो ते ...”  महारेणूजी.
“मी त्यांना फोन केला म्हणजे लग्गेच ऐकतील ते!” जयजगदीश्वरीदेवी. आता पण बीण काही नाही. बग्गी आणि तुमच्या शेजारी मी, एवढं तर नक्की!”  
“पण ...”  महारेणूजी.
“मैत्रीण पक्ष म्हणता आणि ... एवढा हट्ट पुरवाच! नाहीतरी आमच्या पक्षाचं नावाच ’हट्टपूर्तीकरा पार्टी’ आहे !”  जयजगदीश्वरीदेवी म्हणाल्या आणि त्यावर महारेणूजी काही बोलण्याच्या आतच फोन बंद झाला. महारेणूजी अवाक होऊन बंद फोनकडे नुसते पाहात तसेच उभे राहिले.

Monday, March 30, 2020

राजस्थान बॉर्डरवर डिटेक्टीव्ह चिण्णूची रबाडगिरी - 11


20 डिसेंबर. सकाळी 09-00

प्रमुख विरोधी पक्ष नेते श्री यजुबिंदरसिंग यांचे निवासस्थान

20 डिसेंबरलाच सकाळी साडेनऊ वाजता प्रमुख विरोधी पक्ष नेते श्री यजुबिंदरसिंग यांच्या निवासस्थानी त्यांच्या ’विधर्म-पक्षी पक्षातील’ इतर नेते व इतर विरोधी पक्षांचे नेते यांची बैठक होती. इतर विरोधी पक्षांचे नेते येण्याआधी त्यांच्या पक्षातीलच श्री सत्यबिहारी वेदप्रकाश, श्री. नवराणाजी मुरलीश्वर, श्री.सैय्यद काझी व श्रीमती निर्गुणा चांगदेव या इतर नेत्यांबरोबर ते सकाळी नऊ पासूनच विचार विनिमय करत होते. सध्याच्या भारत-पाक पंतप्रधानांच्या आगामी भेटीसंदर्भात काय भूमिका घ्यावी यावर अजून एकदम होत नव्हते. ही घटना ‘चांगली’ म्हणावी तर ’आपल्या पक्षाला विरोधी पक्ष का म्हणावे? मित्रपक्षच का म्हणू नये?’ असा सत्यबिहारीजी वेदप्रकाशांचा मुद्दा होता. आणि तो खरा होता. आणि ही घटनाच अशी होती की ’तिला ’वाईट’ तर म्हणताच  येत नाही’ असे यजुबिंदरसिंगजींचे म्हणणे होते. ’आपल्या पक्षाच्या नेहमीच्या धोरणांशीही ही घटना सुसंगत असल्याने आपली पंचाईत होत आहे’ असे नवराणाजी मुरलीश्वरांना वाटत होते. आणि तेही खरे होतं. शिवाय ’काही महिन्यात सत्ताबदल झाल्यास (ती शक्यता कायमच असते) आपली आत्ताची भूमिका त्यावेळच्या भारत-पाक संबंधांच्या संदर्भात अडचणीची ठरू नये’ असेही सर्वांना वाटत होते आणि तेही खरे होते.
“खरं तर ही टांगा भेटीची मूळ कल्पना माझीच --” शेवटी लाजत लाजत यजुबिंदरसिंगजी म्हणाले.
“काय?” नवराणाजी व सत्यबिहारीजी.
“तुम्हाला म्हणून सांगतो ... आपण सगळे घरचेच आहोत म्हणून ... तुमच्याजवळच ठेवा ... काझीजींना माहिती आहे. ...”
यावर सत्यबिहारीजींनी आणि नवराणाजींनी एकमेकांकडे व नंतर सैयद काझीजींकडे पाहिले. काझीजी मान खाली घालून चुळबुळत बसून राहिले.
“तुम्ही - आत्ता - पाक पंतप्रधानांना - सांगितलंत? टांग्यातून – महारेणूजींना - भेटायला यायला?” शेवटी नवराजींनी अविश्वासाने विचारले.
“च्‍ - च्‍ - तसं नाही. ... खूऽप मागे, त्यावेळी राजारावजी पंतप्रधान होते” यजुबिंदरसिंगजी.
“हां हां !” काझीसकट सर्वांनीच सुस्कारे सोडले.
“त्यावेळी निवडणुका जवळ आल्या होत्या, विरोधकांना चेव चढला होता. ... काहीतरी नवीन शोधून काढणं भाग होतं. ... मी त्यावेळी तरुण होतो. राजकारणात शिरलो, तरी अजून स्वप्नंही पाहात होतो. ... तेव्हा मी ही कल्पना राजारावजींना सांगितली. - की तुम्ही ... थोडं माझं धाडसच ते ... की तुम्ही प्रगतीचं, भविष्याकडे नेणारं, पॉझीटीव्ह दृष्टिकोन असलेलं, ऐतिहासिक पाऊल टाकलयं, हे दाखवण्यासाठी भारत-पाकिस्तान दरम्यान बस सेवा चालू करा आणि बसमधून पाकिस्तानला जा ... एक राजकीय स्टंट, निवडणुकीसाठी. ... यावर विचार करण्याचं राजारावजींनी मला आश्वासनही दिलं होतं. पण सिक्यूरिटीवाल्यांनी माझं म्हणणं हाणून पाडलं. ... काय काझीजी?”
“अं? - हो. ... हो!” काझीजी.
“अर्थात, काही वेळा सिक्यूरिटीवाल्यांचंही बरोबर असतं. राजारावजी त्यावेळी बसमधून पाकिस्तानात गेले असते तर कदाचित … कदाचित … आता वाटतं, ती कल्पनाच खरोखर पोरकट होती. किती धोका! आत्ताच पाहा ना! ते इतक्या लांब उघड्या टांग्यातून येणार, हे उघड्यावर, राजस्थान बॉर्डरवर त्यांना भेटायला जाणार …”
“मग ती मूळ कल्पना तुमचीच, म्हणजे आपलीच होती असं आपण जाहीर करु या का?” नवराणाजी एकदम म्हणाले. “आत्ताच्या सरकारने आपली कल्पना ढापली असं म्हणूया. सगळे डीटेल्स देऊ. म्हणजे श्रेय आपल्याला मिळेल. सगळं ठरलंच होतं, पण त्याच्या आत राजारावजी मॉरिशसला गेले, तिथं त्यांच्यावर खुनी हल्ला झाला आणि मग सिक्यूरिटीचं म्हणणं त्यांना पटून त्यांनी हा बेत रद्द केला, असं जाहीर करु. नाहीतरी आता कोण राजारावजींना वर विचारायला जाणार आहे?”
“राणाजी, राणाजी --” यजुबिंदरसिंगजी त्यांच्या उत्साहाला आवर घालत म्हणाले. “’ही कल्पनाच पोरकट, अव्यवहार्य आणि धोकादायक आहे’ असं आपण जाहीर करु या, असं मला म्हणायचं होतं.”
“चालेल. ... म्हणून आम्ही ती शहाणपणानं, दूरदृष्टींनं नाकारली, असंही म्हणू या. म्हणजे सध्याचं सरकार शहाणं नाही, त्याला दूरदृष्टी नाही, असं होईल.” नवराणाजी म्हणाले.
“एवढ्या मोठ्या दोन राष्ट्रांच्या प्रमुखांनी घोडा-घोडा खेळल्यासारखे पोरकट प्रकार करावे हे शोभणारं नाही.” यजुबिंदरसिंगजी.
“या काळात घोडागाडी म्हणजे प्रतिगामी, उलटे पाऊल, एकविसाव्या शतकाकडून अठराव्या शतकाकडे वाटचाल असं पण म्हणू या का?” श्रीमती निर्गुणा चांगदेव इतक्या वेळात पहिल्यांदाच बोलल्या.
“काही हरकत नाही.” त्या मानाने तरुण आणि महिला प्रतिनिधी असल्याने त्यांना प्रोत्साहन द्यावे म्हणून सत्यबिहारजी म्हणाले.
“आणि ’जातीयवादी, धर्मांध कृत्य’ ...” काझीजी.
“ते कसं काय?”  सत्यबिहारजींनी हे जरा अतीच वाटलं.
“जातीयवादी म्हणजे बघा ... हां! घोड्याची जात. सरंजामशाहीचं प्रतीक असणारा टांगा ओढणार्‍या घोड्याच्या जातीची पिळवणूक आणि शोषण ... आणि धर्मांध म्हणजे,  धर्मांध म्हणजे, ... ” काझीजी.
“पण टांग्यातून पाक पंतप्रधान येणार. ते इतके सच्चे धार्मिक मुसलमान असताना त्यांना धर्मांध म्हणता येणार नाही. आपले पंतप्रधान ...” सत्यबिहारजी.
“ही भेट म्हणजे परकीय कटाचा भाग म्हणता येईल. नाहीतरी सगळे मुख्य परकीय पुष्पवृष्टीला येणारच आहेत. ते वर दोर्‍या घेऊन बसलेत आणि खाली भारत-पाकिस्तानच्या पंतप्रधानांना बाहुल्यांसारखं खेळवतायत असं म्हणता येईल.”  नवराणाजी.
“हे समजा खरं असलं तरी असं जाहीर बोलता येणार नाही.” यजुबिंदरसिंगजी चुचकारत म्हणाले. “तेव्हा आपलं तरी ठरलं. ’पोरकट, अव्यवहार्य, धोकादायक, आणि प्रतिगामी!’ बास्! आता इतर विरोधकांनाही बोलावलयं, ते काय म्हणताहेत ते बघू. काय?”


एवढ्यात ‘समष्टीवादी पार्टीचे’  बोंधू जॉमूनजी बोश यांचा फोन आला. 
“ हॉं जी! हॅलो ...”  यजुबिंदरसिंगजी .
“नोमोश्कार! ऑमी जॉमून बोऽऽश ...”
“नोमोश्कार बोंधू जॉमूनजी ! बोला. येतात ना?”
“खूप मनात होतं. पण इकडे कलकत्त्यातच अडकून पडलोय. तिकडे शूटिंगची तयारी कुठपर्यंत आली?”
“काय? कसलं शूटिंग?” यजुबिंदरसिंगजी.
“हिंदी पिक्चर! यावेळी काश्मीरची आठवण काढत राजस्थानच्या लोकेशनवर ...” जॉमूनजी.
“हा: हा: हा: हा:!” यजुबिंदरसिंगजी.
“तुम्हाला बेस्टलक !” जॉमूनजी.
“का?” यजुबिंदरसिंगजी.
“तुम्ही पहिल्यांदाच व्हिलनचा रोल करणार --” जॉमूनजी.
यजुबिंदरसिंगजी एकदम गप्प झाले.
“पण व्हिलन दणक्यात झाला पाहिजे. पिक्चर संपताना लोकांना कळलं पाहिजे की व्हिलन जिंकला आणि व्हिलन, म्हणजे तुम्हीच, खरे हिरो ...” जॉमूनजी.
“तुमचं आपलं काहीतरीच. ... हातात तलवार नाही आणि तुम्ही लढायला सांगताय.” यजुबिंदरसिंगजी.
“पंतप्रधानांचा खून ...”  जॉमूनजी.
“काय?” यजुबिंदरसिंगजी एकदम ओरडले. “खरचं? कुठल्या?”
“’कुणाचाही होऊ शकतो! - होण्याची शक्यता आहे’, - असं म्हणा.”
“खरंच शक्यता आहे?”  यजुबिंदरसिंगजी.
“असं फक्त म्हणा ... असं म्हणतोय मी. कल्पना करा. किती धोका! किती गंभीर दूरगामी परिणाम! भेट ठरवून दोन्ही पंतप्रधान दोन महत्त्वाच्या राष्ट्रांच्या भवितव्यांना वेठीस धरतायत असं म्हणा.” जॉमूनजी.
“पण हे खरं का?” यजुबिंदरसिंगजी.
“असं काय करताय? ... फक्त शक्यता. किती आतंकवादी टोळ्या आणि अतिरेकी संघटना; किती विरोधी पक्ष आणि विरोधक; किती गुंतागुंतीचं आंतरराष्ट्रीय राजकारण; किती माथेफिरू; -- हे खुनाचं कुणाच्याही डोक्यात येऊं शकतं.” जॉमूनजी.
“माझ्या नाही बुवा आलं.” यजुबिंदरसिंगजी.
“सगळं जग तुमच्यासारखं सज्जन थोडंच आहे?”  जॉमूनजी.
“हंऽऽ ! पण ... मग हे तुम्हीच का म्हणत नाही.?” यजुबिंदरसिंगजी.
“तुम्ही प्रमुख विरोधी पक्ष नेते! तुमच्या म्हणण्याला किंमत आहे. तुमचं लोकांनाही पटेल. आम्ही म्हटलं तर आम्हीच खुनाचा प्लॅन केला आहे असं वाटायचं.” जॉमूनजी.
“बरं, बरं, बघतो. ...”  यजुबिंदरसिंगजी.
“बघू नका! जोरात म्हणा. तुमच्या हातात लढायला तलवार दिलीय. लढायचं का नाही, तुम्ही बघा ... अच्छा!”  फोन बंद झाला.

Sunday, March 22, 2020

राजस्थान बॉर्डरवर डिटेक्टीव्ह चिण्णूची रबाडगिरी - 10


20डिसेंबर. सकाळी 08-00
पंतप्रधानांचे निवासस्थान
पंतप्रधन व मुख्य मंत्र्यांची मीटिंग - पुढे - - -


लेफ्टनंट्‍ जनरल नाना षटकर्णी आणि मेजर जनरल तात्या चिमोटे आत आले व सॅल्यूट करुन उभे राहीले.
“व्यत्यय आणल्याबद्दल माफ करा.” नाना षटकर्णी चाचरत म्हणाले. ‘टी.व्ही’ आणि वीजबोर्डामूळं व्यत्ययाची आम्हाला सवय आहे. पण व्यत्ययाचं कारण तितकचं महत्त्वाचं असू दे, हे लक्षात ठेवा.’ आप्पारावजी.
“होय, साहेबराव जी सर ..., मा. पंतप्रधानजी ...सर ...”
“बोला, बोला”  -  महारेणूजी.
“सर, ... पाकिस्तानचे पंतप्रधान टांग्यातून भारतात आल्यावर टांग्यातून उतरताच त्यांचा खून होणार आहे.” नाना षटकर्णी.
“काय? खून?” सर्वजण एकदम ओरडून म्हणाले.
“अशी इन्फर्मेशन आहे.” नाना.
“ई मेलनं त्यांच्या प्लॅनची फाईल आली. त्यांनीच पाठवली” तात्या चिमोटे.
“तुम्हाला कधी समजलं?” रणछोडजी.
“काल सकाळी” नाना.
“काय?” आप्पारावजी आणि रणछोडजी एकदमच ओरडले.
“आणि इतका वेळ?” आप्पारावजी गरजले.
“इन्फर्मेशनची खातरजमा ...” नाना.
“मग?” आप्पारावजी.
“केली. ...जी ... राव जी ...साहेब ... जी ... जी, खून होणार.” तात्या.
“काय?” सर्वजण पुन्हा दचकून एकदम ओरडले.
“नाही साहेबजी ... रावजी ... आता नाही होणार.” नाना.
“का?” आप्पारावजी.
“आपला तो चिण्णू ...” तात्या चिमोटे.
“ठीक आहे. आता मला नीट समजलं ...” आप्पारावजी सर्वांकडे पाहून म्हणाले. “तुम्ही सर्वांनी ऐकलचं खून होणार होता. पण आता होणार नाही.”
“पण का होणार नाही?” डिमंटोजी.
“मी म्हणतो, होऊ दे की! परस्पर कटकट मिटेल.” भुजंगजी मधेच म्हणाले. ते पुढेही काही म्हणणार होते,पण महारेणूजींनी त्यांच्याकडे पाहताच ते गप्प बसले.
“कटकट काय मिटेल? नवीन शंभर कटकटी चालू होतील.” महारेणूजी सर्वाकडे पाहात म्हणाले. “आपल्या देशात खून झाला की आपल्यावर शेकणार, विरोधकाचं फावणार. जगात नाचक्की होणार, इतकी वर्षं जमवत आणलेलं आंतरराष्ट्रीय राजकारण फिसकटणार ... छे,छे,छे!”
“शिवाय पाकिस्तानात नवे पंतप्रधान सत्तेवर येणार. हे निदान टांग्यातून भेटायला येत होते. ते भेटीला क्षेपणास्त्र पाठ्वतील.” रणछोडजी.
“मग आपणही पाठवू.” भुजंगजी.
“म्हणजे युध्द!!!” रणछोडजी.
“म्हणजे चौथं महायुध्द !कदाचित अणुयुध्द !!”-आप्पारावजी.       
“आपण तयार आहोत.” भुजंगजी.
“निम्मं जग बेचिराख होईल...” रणछोडजी डोक्याला हात लावुन म्हणाले.
“आपण तयार आहोत.” भुजंगजी.   
‘आणि उरलेलं तडफडत जगेल ... किंवा मरेल!” रणछोडजी कळवळुन म्हणाले .
“पण म्हणून आपण गप्प बसायचं?” भुजंगजी.
“पण मग काय करायचं?” आप्पारावजी, रणछोड्जी आणि डिमंटोजी एकदमच म्हणाले.
“आपला तो चिण्णू ...” तात्या चिमोटे मधेच म्हणाले.
“आपल्याला कसं वाचवायचं?” आप्पारावजी.
“आपला सुप्रसिध्द चिण्णू ...” तात्या.
“जगाला कसं वाचवायचं?” डिमंटोजी.
“आपला तो जगप्रसिध्द चिण्ण्णू ...” तात्या.
“ही काय चिण्णू, चिण्ण्णू, चिण्ण्ण्णू भुणभुण लावलीय तात्या? आम्ही जगाला विनाशापासून वाचवायचा विचार करतोय, आणि तुमचं आपलं मेंदूला मुंग्या चावत असल्यासारखं सारखं चिण्णूऽ–चिण्णूऽ–चिण्णूऽऽ!” आप्पारावजी खेकसले.
“मी त्याला सांगितलयं ...” तात्या.
“काय? जगाला विनाशापासून वाचवायला? कुणाला?” आप्पारावजी.
“अं? हो! चिण्णूला ... म्हणजे  खून होऊ न द्यायला सांगितलंय.” तात्या.
“चिण्णू चिणमुणकर.” नाना.
“म्हणजे कोण?” डिमंटोजी.
“डी-1-डी.” तात्या
“पण म्हणजे कोण?” सर्व.
“जगातला सर्वात रबाड गुप्तहेर!” चीफ ‘ची’ ऊर्फ तात्या चिमोटे प्रथमच चिण्णूबद्दल इतकं बरं बोलले. “मी त्याला सांगितलंय म्हणजे ते होणारच! ... म्हणजे होणार नाही. म्हणजे खून होणार नाही आणि जग विनाशापासून वाचणार.”
“इतका विश्वास वाटतो तुम्हाला? तुमचं ऐकेल तो?” महारेणूजी.
“अर्थातच! तो माझा माणूस  आहे.” तात्या. ‘महान चिण्णू!’ ”
“या परीस्थितीतून बाहेर पडायला आपण आणखी काय करु शकतो?” महारेणूजी.
“काहीही नाही. फक्त मी त्याला आमच्या डिपार्टमेंटचा असिस्टंट देऊ शकतो.” नाना षट्कर्णी.
“मग ? ...” महारेणूजी.
“जगाचं भवितव्य आता फक्त चिण्णूच्या हाती.” तात्या.
“मग आता तुम्ही चिण्णूला सांगा.” महारेणूजी.
“मी सांगितलंय.” तात्या.
“मग आता तो काय करतोय?” महारेणूजी.
“मी इथं येण्यापूर्वी मला कळलं. तो तातडीनं ‘मिकूट BF-33-C’, ‘लाल गांधिलमाशीतून’ काशीला गेलाय.” तात्या.
“का?” महारेणूजी.
“तेच तर मला समजत नाहीय ...” तात्या.
“शोधा शोधा!” आप्पारावजी आणि रणछोडजी ओरडले.
“जगाचं भवितव्य त्याच्या हातात, आणि तो काशीला काय करतोय?” डिमंटोजी.
“शोधा! त्याच्या हालचाली आणि प्रयत्न आम्हाला समजले पाहिजेत. आम्हाला रिपोर्ट करा. अर्धा-अर्धा तासानं, 24 तास!” आप्पारावजी.
“24 तास?” तात्या.
‘होऽऽय! मी संडासात सुध्दा मोबाईल कानाशी धरुन बसणार आहे.” आप्पारावजी.
“येस्स्सर!” चीफ ‘ची’ तात्या.
“आम्ही सगळे नाही.” डिमंटोजी पट्कन म्हणाले. “तुम्ही ह्यांना कळवा. हे आम्हाला रोज एकदा सोयीस्कर वेळी कळवतील.”
“आता मी लगेच विरोधी पक्षनेते यजुबिंदरसिंगजींशी बोलणार आहे. ... आणि भेटीचा कार्यक्रम पार पडेपर्यंत रोज, याच वेळी, इथचं आपली मीटींग होईल.” मग महारेणूजींनी नोकरांना खूण केली तेव्हा त्यांनी ब्रेकफास्ट सर्व्ह करायला सुरुवात केली.
“पण रोज रोज नाष्ट्याला इडली नको हं!” रणछोडजी.
“इकडे आम्हाला जगाच्या विनाशाची काळजी लागलीय आणि तुम्हाला नाष्ट्याची चिंता.” डिमंटोजी.
“चिंता!! चीफ ‘ची’ चिमोटे चिण्णूला शोधा!!!” सर्वांना दिल्या जाणार्‍या इडली सांबारातून निघणार्‍या वाफांकडे आशाळभूतपणे पाहणार्‍या चीफ ‘ची’ कडे बघून महारेणूजी आयुष्यात पहिल्यांदाच किंचाळले. इतके जोरात किंचाळले की तात्यांना आणि इतरांनाही फक्त ‘ची-ची-ची-ची-ची ’ असा चित्कार ऐकू आला.