MahaGanapati Mandir

MahaGanapati Mandir
महागणपती मंदिर, वाई, महाराष्ट्र.

मनातलं

ज्या यशाने उन्माद येईल असं यश मला नको. ज्या यशाने इतरांच्या त्या यशातील वाट्याबद्दल कृतज्ञता मनात दाटून येईल आणि अधिक विनम्रता येईल ते खरं यश.

Showing posts with label माणूस. Show all posts
Showing posts with label माणूस. Show all posts

Wednesday, April 29, 2020

गोष्ट मानवाची


गोष्ट मानवाची
सौ. सुलभा प्रभुणे

कोणे एके काळची कथा. एक सुंदर ग्रह होता. पृथ्वी नावाचा. निसर्गराजा तिथे राज्य करत होता. राज्यात प्राणी होते, पक्षी होते, झाडे-वेली नद्या-नाले, समुद्र देखील होते. सगळे कसे गुण्यागोविंदाने एकत्र नांदत होते. एकमेकांना मदत करत होते.
पण हल्ली निसर्गराजा कसल्यातरी चिंतेत सतत वावरत असे. शेवटी सृष्टी राणीने त्याला त्याचे कारण विचारले.
“माझी प्रजा सतत कंटाळलेली, दमलेली, आजारी दिसत आहे.” निसर्गराजा म्हणाला. “कोणीही कामचुकार नाही. सगळे जीव तोडून काम करत आहेत. पण कोणीच नीट काम करू शकत नाही. सगळेजणच भीतीच्या छायेत वावरत आहेत असं वाटतं.”
“कोणी असूर त्रास देत आहे का?” सृष्टी राणीने विचारले.
“कोणताही असूर नाही, शत्रू नाही ... पण हल्ली माझ्या सगळ्याच प्रजाजनांकडून खूप तक्रारीही येऊ लागल्या आहेत.” तो म्हणाला.
“कसल्या तक्रारी महाराज?”
“कोणालाही नीट काम करता येत नाही हीच तक्रार.” तो म्हणाला. “खरं तर हे मला गेले कित्येक दिवस जाणवतं आहे. पण मला हस्तक्षेप करावा लागणार नाही असं मला वाटत होतं.
“पण हे सगळं का होत आहे हेही तुम्ही शोधलं असेलच ना?
“हो महाराणी. हा त्रास का होतोय आणि कोणामुळे होतोय हेही मला ठाऊक आहे.”
“मग कशाला एव्हढी चिंता? ज्याच्यामुळं त्रास होतोय त्याला समज द्या, शिक्षा करा म्हणजे झालं.”
 “ तोच तर माझ्यापुढचा प्रश्न आहे. ह्या सगळ्याला मानवच जबाबदार आहे असं आता मला स्पष्ट दिसू लागलं आहे. तो सगळ्याच प्रांतांत ढवळाढवळ करतो आहे. त्यामुळं सगळं संतुलनच बिघडत चाललं आहे. मुख्य म्हणजे, कोणावरच अन्याय न होता सर्वांना पोटभर मिळावं आणि सगळं विश्वच सुरळीत चालावं म्हणून आपण दोघांनी दिवसरात्र खपून जी अन्नसाखळी निर्माण केली होती, तीच तो उध्वस्त करत चालला आहे.  तो जणू आपणच निर्माता असल्यासारखा अनेक गोष्टी निर्माण करू लागला आहे. त्यालाही काहीच हरकत नाही. कारण खुद्द निर्मात्यांनीच त्याला ती ताकद दिली आहे. पण आपण काय निर्माण करतो आहोत हे त्याला कळत नाही, असं मला वाटू लागलंय. आणि या सगळ्या गोष्टींची माझ्या इतर प्रजेला तर अजिबात सवय नाही. त्यांना शांततेची आणि फक्त लहान आवाजांची सवय होती. पण आता हा मानव काय भयंकर मोठे आवाज करतो. त्याचे ते कारखाने, मोठमोठी यंत्रे, सुरुंग आणि फटाके ह्या सगळ्या आवाजांनी प्रजा अगदी भेदरून गेली आहे. शिवाय त्यांच्या त्या बेसुमार वाढणार्‍या वाहनांमुळे होणारा प्रचंड धूर आणि आवाज ह्याचं मी काय करू? त्याच्या घरांसाठी, कारखान्यांसाठी, रेल्वे, विमानतळ  यासाठी लागणार्‍या जमिनीसाठी तो माझ्या प्राण्यांची हक्काची जंगलं, झाडं, सगळंच; माझ्या इतर प्रजेची घरंच नष्ट करतोय. शिवाय त्यांची आपापसातील भांडणं, युद्धं आणि त्यांसाठी वापरली जाणारी आधुनिक शस्त्रास्त्रं! आता काय करावं हेच मला कळत नाही.”
“मग तुम्ही त्याला शिक्षा का करत नाही?”
“ ती निर्मात्यांची निर्मिती आहे. शिक्षा करण्याचा मला अधिकार नाही. मी राजा आहे. प्रजेचं भलं करणं, सांभाळणं हे माझं काम आहे. माझी सर्व ताकद वापरून मी  जंगलतोड, डोंगर पेटवणं यांवर पांघरूण घालण्यासाठी पाऊस पाडून गवताचं आच्छादन घालत राहिलो, नवीन झाडं वाढवत राहिलो. नद्यांचं पाणी शुद्ध करून देत राहिलो. धुरानं भरलेली हवा वारा-पावसानं, झाडांनी सोडलेल्या ऑक्सिजननं शुद्ध करत राहिलो. पण ह्या सगळ्याचा अतिरेक झालाय. क्षमेची पांघरुणं घालण्याच्या माझ्या क्षमतेचीही मर्यादा आता ओलांडली गेली आहे.” 
  “मग तुम्ही त्याच्याविरुध्द निर्मात्यांकडे तक्रार का करत नाही?”
  “त्याचीच तर मला भीती वाटते आहे. कारण मानव म्हणजे निर्मात्यांची सर्वोत्कृष्ट कलाकृती आहे. त्यांना त्याचा खूप अभिमान आहे. अर्थात तो सार्थही आहे. त्यांच्याइतकाच मलाही मानवाचा खूप अभिमान आहे. निर्मात्यांनी त्याच्या निर्मितीसाठी केलेले अथक प्रयत्न मी पाहिले आहेत. बुद्धी वापरून मानव माझे कष्ट कमी करेल, सर्वांना सुखी करण्याच्या कामात मला मदत करेल असं त्यांना वाटत होतं. त्यामुळं आता त्याच्या विरुध्द केलेली तक्रार कदाचित त्यांना आवडणार नाही..”
“ मग आता काय करणार?” 
“ जे मी आत्तापर्यंत टाळत होतो तेच करावं लागणार असं दिसतं आहे. उद्या सकाळी मी निर्मात्यांकडं जाणार. खरं तर मी इथला राजा असल्यानं सर्व जबाबदारी माझी आहे. इथला कोणताही प्रश्न मीच सोडवला पाहिजे. पण रोज नद्यांची, झाडांची, प्राणी-पक्ष्यांची तब्येत जास्तजास्तच खालावत चालली आहे.  त्यांच्या किंकाळ्यांनी मला कित्येक रात्री झोप नाही. त्यामुळे आता निर्मात्यांकडे जाण्याशिवाय मला कोणताच उपाय दिसत नाही.”
सकाळी लवकर उठून निसर्गराजा निर्मात्याकडे गेला. निर्माता आपल्या कार्यशाळेत नेहमीप्रमाणे नवनिर्मीतीच्या कार्यात गढून गेलेला होता. त्याचे ते गढून जाऊन काम करणे निसर्गराजाला नेहमीच भुरळ पाडत असे. कोणत्याही प्रकारे शांतताभंग होऊन त्याची समाधी भंग पावू नये म्हणून निसर्गराजा शांतपणे कोपर्‍यात उभा राहिला. पण निर्मात्याने त्याच्याकडे लगेच वळून पाहिले. त्याचे नेहमीचे अतिशय मोहक हसू त्याच्या चेहर्‍यावर होते.
“मला क्षमा करा. मी तुमच्या कामात व्यत्यय आणला. खरंतर मी तुमच्याकडं अतिशय नाईलाजानं आलो आहे.” निसर्गराजा म्हणाला.
“ बस! अरे बस! तू का आला आहेस हे मला पूर्णपणे माहीत आहे. मी तुझी केव्हापासूनच वाट पहात होतो. पण तू खरंच अत्यंत कर्तव्यदक्ष राजा आहेस. त्यामुळं प्रजेच्या दुःखावर उपाय शोधण्याचा तू किती आटोकाट प्रयत्न करत होतास हे मी पाहातच होतो. त्यामुळे तू स्वतःला अजिबातच अपराधी वाटून घेऊ नकोस.
“ प्रभो, हे काय भयंकर संकट आलं आहे माझ्या प्रजेवर? काय बोलावं तेच मला कळत नाही महाराज.  मानव आपली सर्वोत्कृष्ट निर्मीती आहे. आपण त्याला अनेक अद्वितीय देणग्या दिलेल्या आहेत. त्यामुळं तो असं करणार नाही; किंवा त्याच्या हातून नकळत काही चुका झाल्याच तर तो इतर प्रजाजनांप्रमाणं त्यातून नक्की शिकेल, अधिक शहाणा होऊन त्याचा तो त्या दुरुस्त करेल असं मला मनोमन वाटत होतं.  पण आता माझ्या सहनशक्तीच्या पुढे गेल्यानं मला तुमच्याकडे यावं लागलं.”  निसर्गाचा आवाज एकदम कंप पावू लागला. त्याला पुढे बोलवेना.
“शांत हो. निसर्गा, चूक माझीच आहे. तेव्हा उपायही मलाच करावा लागणार.”
“म्हणजे? मी नाही समजलो महाराज. चूक? आणि तीही आपल्याकडून? केवळ अशक्य!”
“आहे खरं तसं. जेव्हा मी संपूर्ण जगाची निर्मीती करत होतो तेव्हा प्राणी, पशू, पक्षी, झाडे, नद्या-नाले, समुद्र, सगळ्याच गोष्टी मला अगदी माझ्या मनाप्रमाणे निर्दोष तयार करता आल्या. पण जेव्हा मानवाची निर्मिती सुरु होती तेव्हा कसा कोण जाणे पण ह्या मानवात ‘हाव’ किंवा ‘लोभीपणा’ नावाचा व्हायरस कधी शिरला ते मला देखील कळलंच नाही. तो काढण्याचे मी खूप आटोकाट प्रयत्न केले. पण दुर्दैवानं तो कधीच काढता आला नाही. आता त्या व्हायरसने जगभर थैमान घालणं सुरु केलं आहे. तो मानव त्याच्या प्रभावाखाली बेछूट वृक्षतोड करायला लागला, प्राण्यांची इतकंच काय माणसांचीही हत्या करायला लागला. आपला प्रदेश पुरेना, म्हणून इतरांचा प्रदेश खायला त्यानं सुरुवात केली. त्यासाठी  नाना युक्त्या तो वापरत आहे, संहारक युध्दं करत आहे.  हे सगळं त्या ‘हाव’ व्हायरसचा परिणाम. हा दिवस कधी ना कधी उगवणारच ह्याची मला खात्री होतीच. म्हणून तर मी कित्येक वर्षे त्यावर संशोधन करत होतो. तुझे सगळे प्रयत्न निष्फळ होणारच होते. पण ही परीस्थिती सुधारण्यासाठी तू तुझ्या परीनं प्रयत्न केलेस. म्हणून मला तुझं खूप कौतूक करायचं आहे”.
“हो महाराज! ते माझे कर्तव्यच आहे. पण तुम्ही मगाशी कसल्या संशोधनाचा उल्लेख केलात. या समस्येवर काही उपाय तुम्हाला सापडला आहे का? लवकर सांगा! मी ऐकायला अगदी उत्सुक आहे.”
“ हो निसर्गा, आता मीच निर्माण केलेलं एक ‘कोरोना’ नामक व्हायरसचं ब्रह्मास्त्र मी मानवावर सोडणार आहे.”
“ त्यानं काय होईल महाराज?”
’हाव’ या व्हायरसचा प्रभाव कमी करण्यासाठी या दुसर्‍या ’मुकुटधारी’ व्हायरसचे अस्त्र.”
“त्यामुळे सगळं जग परत पूर्ववत होईल ना? का सगळी मानवजातच नष्ट होईल? ”
“ नाही तसं काहीच होणार नाही . पण करोनास्त्रामुळं संपूर्ण मानवजात पुढील काही महिने स्वतःला घरात कोंडून घेईल. त्यामुळं त्याची तुझ्या कामातली ढवळाढवळ कमी होईल. त्यात तुला बिघडलेल्या गोष्टी सुधारायला अवधी मिळेल. तुझे प्रजाजन खूप दमले आहेत. त्यांना थोड्या अंशी विश्रांती मिळेल. काही दिवस तरी ते शांतता अनुभवतील. काही दिवस तरी शुध्द मोकळी हवा अनुभवतील.  काही दिवसांच्या विश्रांतीनंतर ते परत जोमानं कामाला लागू शकतील. आणि बुद्धी वापरायला, विचार करायला आणि तोल सावरायला मानवालाही वेळ मिळेल.”
“ अहो, पण महाराज, त्यामुळे संपूर्ण जगात उलथापालथ नाही का होणार? आर्थिक घडीच विस्कटेल. प्रगतीला खीळ बसेल.”
“ हो! तुझं बरोबरच आहे. पण या काळात प्रगती म्हणजे नक्की काय, आपण कशाच्या मागं धावतोय याचा तो पुनर्विचार करू शकेल. गंभीर आजारावर कडू औषध अपरिहार्यच आहे त्याला काय करणार?”
“ पण महाराज ह्याने तो ‘ हाव’ नावाचा व्हायरस पूर्णपणे नष्ट होईल ना?”
“छे! छे! तो तसा कधीच नष्ट होणार नाही. तो जगाच्या अंतापर्यंत तसाच रहाणार.”
“ अरे बापरे! मग काय हो करणार ? का हे असंच थोड्या थोड्या दिवसांनी ब्रह्मास्त्र सोडायचं? नका हो अशी क्रूर चेष्टा करू. ह्यावर दुसरा काही उपाय नाही का? मला सांगा, मी काय वाट्टेल ते करायला तयार आहे.”
“राजा इतका निराश होऊ नकोस. मानवाच्या निर्मितीच्या वेळी जसा ‘हाव’ व्हायरस शिरला तशाच मी त्याच वेळी त्याला इतरांना नाही दिल्या अशा अद्भूत शक्तीही दिल्या आहेत. त्या म्हणजे बुद्धिमत्ता, स्वतः विचार करून योग्य निर्णय घेण्याची क्षमता आणि अनुभवातून शिकून आपल्या चुका दुरुस्त करण्याचा प्रयत्न करणे. म्हणूनच मानव ही सर्वश्रेष्ठ निर्मिती आहे. पण सध्या ’हावे’पुढे बुद्धिमत्तेचा त्याला जरा विसर पडला आहे.
“पण धीर धर. तो यातून बाहेर पडेल तेव्हा अधिक शहाणा होऊन बाहेर पडेल अशी आपण दोघेही आशा करूया. तो सगळ्या गोष्टींचा गांभिर्यानं विचार करेल, आपलं नेमकं काय काय चुकलं हे तो शोधेल आणि स्वतःच्या बुद्धिसामर्थ्याच्या जोरावर यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधेल असं मला वाटतं. तशी माझी खात्रीच आहे!
 “ त्यामुळं आपण दोघेही थोडी वाट पाहूया.  ... खरंतर हे सगळं करायला आणखी पण एक कारण आहे.”
    “ कोणतं महाराज?”
    “ तो या लोभीपणमुळं तुझ्यापासूनही खूप दूर गेला आहे. त्यामुळं त्याला संयम, सुख, समाधान, शांती, सहकार्य या सगळ्याच महत्वाच्या गोष्टींचा विसर पडला आहे. भोवतालचे सर्व सुखात असतील तरच आपण सुखात राहू शकतो हेही तो विसरला आहे. पण मला खात्री आहे, तो ह्यातून बाहेर पडल्यावर जर पुन्हा तुझ्या सान्निध्यात आला तर तो नक्कीच तुझ्यासारख क्षमाशील, संयमी आणि उदार होईल आणि मग खूप प्रश्न सहजच सुटतील.”
“आणि असं नाही झालं तर काय?”
“तर काय, पुन्हा एकदा वेगळं ब्रह्मास्त्र वापरायचं. आपण तरी काय करणार? तो पर्यंत आपण दोघेही त्याची ’हाव’ कमी होवो आणि त्याला बुद्धी वापरून विचार करण्याची ताकद येवो’ अशी प्रार्थना करुया.”
“ चालेल देवा, मी मनापासून प्रार्थना करेन. तोपर्यंत माझी सगळी प्रजा सुखरूप राहू दे, असा आशीर्वाद तेव्हढा द्या.”
“ तथास्तु !” निर्माता प्रसन्न मुद्रेने म्हणाला.

---      ---      ---      ---      ---

Friday, July 1, 2011

“अमिताभ-आजोबा” या सुलभाच्या लेखाच्या निमित्ताने –


तुझा राग योग्यच आहे आणि या लेखात तो चांगलाच व्यक्त झाला आहे.
हे वाचताना मला मला “प्रहार” सिनेमाची आठवण झाली. “अगर ये तुम्हारा बच्चा होता तो? वो देखो, तुम्हारा बच्चा सडकपर पैदा हुवा और पैदा होतेही मर गया” असं काहीतरी नाना रागाने म्हणतो, त्या प्रकाराने तुझाही राग व्यक्त झाला आहे.
अमिताभला सगळे ओळखतात, त्याच्यावर सगळे प्रेम करतात. तो जणू आपल्या कुटुंबाचाच भाग आहे असं सगळ्यांना वाटतं. (म्हणून तर आपण त्याला, नानाला, प्रेमाने अरे-तुरे म्हणतो.) याची जाणीव ठेऊन त्यानं आपली खाजगी गोष्ट आपल्याला सांगितली. स्वतःचा आनंद आपल्याबरोबर वाटला. या बातमीचं स्वागत आपणही चांगल्या प्रकारे करू, आपल्यालाही त्याच्याइतकाच आनंद होईल असं त्याला वाटलं असणार. तो स्वतः अत्यंत सुसंस्कृत असल्यानं याच सुसंस्कृतपणाची अपेक्षा त्यानं आपल्याकडून ठेवली असणार.
दुर्दैवानं आपण इतके सुसंस्कृत नाही, इतकेच नव्हे तर अशा गोष्टीवर सट्टा लावण्याइतके विकृत आहोत, हेच आपण दाखवून दिले. पाच हजार वर्षांच्या हिंदु संस्कृतीचा अभिमान सांगणारे आपण दुसर्‍याच्या आनंदात आनंद मानण्याइतकासुद्धा सुसंस्कृतपणा दाखवू शकत नाही.
सट्टा चालवणार्‍यांच्याबद्दल आपल्या काही अपेक्षा नाहीत व त्यांच्याबद्दल आपल्याला काही बोलायचेही नाही. पण लोक खेळत नसतील तर अशा गोष्टींवर कोण सट्टा चालवू शकेल?
अशा गोष्टींवर थोड्या पैशांसाठी सट्टा खेळणारे लाखो-करोडो विकृत लोक ज्या समाजात आहेत त्या समाजाबद्दल काय बोलायचे? आणि मुलगा-मुलगी बघून मुलींना गर्भावस्थेतच मारायचं या सार्वत्रिक महा-विकृत मानसिकतेपेक्षा व खुनी कृतीपेक्षा सट्टा खेळणं ही किरकोळ बाब आहे.
अशा समाजात, अशा काळात अमिताभला राहावे लागते व त्याच्या नातीला/नातवाला जन्म घ्यावा लागतो हे त्यांचं दुर्दैव.  

Tuesday, March 8, 2011

माणूस आणि चिमणी - ४

माणूस आणि चिमणी - ४


एक माणूस होता आणि एक चिऊ होती.
ती एकदम दिसेनाशी झाली.
भोवती भुर्रर्रर्र नाही, अंगणात चिवचिव नाही, घरटं बांधताना घरभर पडलेल्या काड्या नाहीत. घरटं बांधायला घरात जागाच नाही. आणि भिंतीवर आजी-आजोबा आणि देवांचे फोटोही नाहीत.
आता घरातल्या बाळाला चिऊची गोष्ट सांगताना दाखवायला चिऊच नाही.
ती त्याच्या आयुष्याचा भाग होती आणि त्याच्या अस्तित्वाचा लचका तोडल्यासारखी ती दिसेनाशी झाली.
हे कधीपासून झालं? आणि का?
ती मोकळी आणि स्वतंत्र पाखरं! त्यांना माणसानं हात का लावला?
त्याला खरंच काही माहीत नव्हतं, तो डोळेझाक करत होता का तो सोंग करत होता?
काहीच न कळण्याएवढा तो मूर्ख, मद्दड होता, का काही कळून घ्यायचेच नाही इतका तो बथ्थड आणि हेकट होता? 
का कळूनही कळत नाहीसे दाखवणारा ढोंगी आणि स्वार्थी होता?
एक माणूस होता पण आता एक चिऊ नव्हतीच.

एक माणूस होता. पण एक चिऊ नव्हतीच.
आणि कशी असेल? घराभोवती अंगण नव्हतं, गॅलरीतल्या कुंडीत खुरटे गुलाब होते पण झाडं-झुडुपं नव्हती. घरात वळचणी, अडगळीच्या जागा, तसबीरी नव्हत्या. घरात चिमण्यांना टाकायला दाणेसुद्धा नव्हते. मॉलमधून आणलेली तयार आट्याची किंवा तयार पोळ्यांची पाकिटं होती. आणि मुख्य म्हणजे दाणे टाकायला छोटे हातही नव्हते.
काऊ कसेबसे कुठेतरी, काहीही खाऊन, राहिले होते. पण पोपट, मैना, बुलबुलही कुठे होते? आणि त्यांच्यासाठी झाडं, फळं, फुलंही कुठं होती? आणि लबाड कोल्हा, दुष्ट लांडगा, बाघोबा आणि जंगलचा राजा कुठं होते?

एक माणूस होता. तो आता आजोबा झाला.
नातीला घेऊन, टीव्हीपुढ्च्या खुर्चीवर बसून मॅगी खाताना तो तिला चिऊ-काऊच्या गोष्टी सांगे. आधी ती छान ऐकून घेई. मग एकदा तिनं “चिऊ म्हणजे काय? चिऊ कुठे?” म्हणून विचारलं. मग त्यानं त्या गोष्टी सांगणंच बंद केलं. तिनं विचारला नव्हता, पण तीन पिढ्यांच्या अनेक अपराधांचा जाब तिला देणं त्याला शक्य झालं नाही.
आता तो तिला माऊ-भूभूच्या गोष्टी सांगतो; टायगररमॅन, फाल्कनमॅन, स्पायडरमॅन, फ्रॉगमॅन, व्हेलमॅन, वेअरवुल्फ, वगैरेंची कॉमिक्स वाचून दाखवतो किंवा सुपरमॅन-मंकीमॅन, झोबो-टोबो- रोबोच्या करामतींनी तिला हसवायचा प्रयत्न करतो. काहीच नाही तर कार्टून नेटवर्क आहेच.

एक माणूस होता. पण भयाण, उजाड जगात तो एकटाच होता.
का तो पण नव्हता?

Monday, March 7, 2011

माणूस आणि चिमणी - ३


माणूस आणि चिमणी - ३ 

एक माणूस आणि एक चिऊ.
ती त्याला कॉलेजमधे भेटली. नाचर्‍या डोळ्यांची, उडत्या केसांची, भरारत्या मनाची. सतत भिरभिरणारी, चिवचिवणारी. चिमणा-चिमणीच्या गोष्टीतली चिमणी.
आणि मग तो चिमणा? तिच्या अवतीभोवती भिरभिरणारा? ...त्यांनी मिळून घरटं बांधायचं?
चिमणीलाही तसंच वाटत होतं का?
ते त्याला माहीत नव्हतं. असा त्यानं कधी विचारच केला नव्हता.
त्याला काहीच कळत नव्हतं.

एक तो आणि एक ती.
ती चिऊ आणि तो ... काऊ?
ती बाळाला जपणरी, खाऊ घालणारी, नीटनेटकं ठेवणारी, वाढवणारी, ती सर्वांची (त्याची सुद्धा) काळजी घेणारी, घर सांभाळणारी.      
तो भटकणारा, उंडारणारा, घर शेणाचंही चालणारा. खा-खा खाणारा आणि सगळीकडे घाण करणारा. अवेळी दार ठोठवणारा. स्वतः काही न करता इतरांकडून अपेक्षा ठेवणारा.
त्यांची जोडी का जमली? कोणी जमवली?
पण खूपदा असंच असतं.
हे त्याला माहीत नव्हतं. तेव्हा त्याला काहीच कळत नव्हतं.
पण अशी गोष्ट नको असं त्याला वाटे.

एक तो आणि एक ती. तो चिमणा आणि ती चिमणी.
चिमणा म्हणाला, आपण दोघं घर बांधू. चिमणी म्हणाली, का? चिमणा म्हणाला, असंच. मग चिमणी म्हणाली, चालेल.
मग चिमण्यानं एक गवताची काडी आणली, चिमणीनं एक काडी आणली.
चिमणा म्हणाला, किती दमलीस, मी आणतो काड्या. चिमणी म्हणाली, किती दमलास, मी बांधते घरटं. दोघांनी मिळून एक घरटं बांधलं.
मग चिमण्यानं भुर्रर्रर्रकन्‌ जाऊन एक दाणा आणला, चिमणीनं भुर्रर्रर्रकन्‌ जाऊन एक दाणा आणला. चिमणा भुर्रर्रर्रकन्‌ जाऊन पाणी पिऊन आला, चिमणी भुर्रर्रर्रकन्‌ जाऊन पाणी पिऊन आली. दोघांनी भुर्रर्रर्रकन्‌ जाऊन आणखी एक-एक दाणा आणला. ते म्हणाले, हा आपल्या पिल्लांसाठी.

मग घरट्यात एक चिमणी “चिमणी” आली. तिला वाढवण्यात, तिच्यासाठी दाणे आणण्यात दिवस पुरेनासा झाला. तिला छोटे पंख फुटल्यावर ती घरभर उडत असे. दिवसभर तिचा अखंड चिवचिवाट चाले. तिच्यामुळे घर भरलेले असे. तिच्यामुळे घर घर असे. तिच्यामुळे सगळ्याला अर्थ असे. असे किती दिवस भरभर उलटले कळलेच नाही.
तिचे पंख मोठे झाले. तिची झेप मोठी झाली. घरटे तिला पुरेनासे झाले. तिला आकाशही पुरेनासे झाले. तिचा चिमणा दिसल्यावर ती त्याच्याबरोबर मोठ्या आकाशात उडून गेली.
ती घरट्यात असतानाही, नंतर उडून जाताना आणि उडून गेल्यावर जीव कासावीस झाला. आनंदानेही आणि काळजीनेही.
आता घरट्यात पुन्हा चिमणा-चिमणी. दिवसभरात कधीतरी तो म्हणे, चिव-चिव आणि त्यावर ती म्हणे चिव. मग कधीतरी ती म्हणे चिव-चिव आणि त्यावर तो म्हणे चिव.
कधीतरी चिमण्या “चिमणीचा” फोन येई. त्यावर तिचा चिवचिवाट सुरू झाला की वाटे ती पुन्हा घरभर फिरते आहे. घर भरले आहे.
या सगळ्याची आठवण देत चिऊ आपल भोवती भुर्रर्रर्रकन्‌  उडतच होती, चिवचिवतच होती. नेहमीची, ओळखीची, खूप सवयीची, आपल्या जगण्याचा भाग असलेली. 
पण हे त्याला तेव्हा माहीत नव्हतं.
आणि अजूनही त्याला कळत काहीच नव्हतं.

Tuesday, March 1, 2011

माणूस आणि चिमणी - २


  
माणूस आणि "चिऊ" नावाची चिमणी
एक माणूस होता आणि एक चिऊ होती.
एकदा घरातले फोटो साफसफाईला काढले. चिमणा-चिमणी उडून गेले. फोटोमागचे चिमणा-चिमणीचे घरटे खाली पडले. गवताच्या काड्या उसकटल्या. एक उडता न येणारे पिल्लू खाली पडले.
तो धावत पाणी घेऊन आला. कुणीतरी त्याला थांबवले.
माणसाचा हात लागला तर चिमण्या त्या पिल्लाला आपल्यात घेणार नाहीत. ते मरून जाईल.
हे ऐकून त्याला धक्का बसला. त्या त्याला आपल्यात का घेणार नाहीत?
पिल्लू त्याच्या डोळ्यांदेखत मेले. चिमण्याही त्याला वाचवू शकल्या नाहीत. नुसत्याच त्याच्याभोवती फडफडत, तडफडत राहिल्या. चिवचिवत राहिल्या. ते ऐकवत नव्हते.
एक घर उद्ध्वस्त झाले. ... म्हणजे काय? ... का? कुणामुळे?
तेव्हा त्याला ते माहीत नव्हते.
तेव्हा त्याला काहीच कळत नव्हते.

एक माणूस आणि एक चिऊ. त्याच्या सतत अवतीभोवती उडणारी, सतत चिवचिवणारी. कळायला लागल्यापासून खूप ओळखीची, सवयीची.
ती आणि इतर पाखरे. चिऊ, काऊ, राघू, मैना, बगळा, बुलबुल, ... ती मोकळी स्वतंत्र पाखरे.
त्यांना माणसाचा हात लागलेला चालत नाही. माणसाचा हात लागला की ...
त्याला धक्का बसला.
इतक्या ओळखीत इतका परकेपणा? इतका अविश्वास, इतकी भीती? ... का?
माणसाचा हात इतका वाईट आहे?
तेव्हा त्याला हे माहीत नव्हते.
तेव्हा त्याला काहीच कळत नव्हते.

Monday, February 28, 2011

माणूस आणि चिमणी - १


माणूस आणि “चिऊ” नावाची चिमणी



एक माणूस होता आणि एक चिमणी होती. तिचं नाव चिऊ. पहिल्यांदा चिऊ त्याला चिऊ-काऊच्या गोष्टीत भेटली.
तेव्हा तो अगदीच छोटं बाळ होता आणि ती जणू त्याची आईच होती.
ती पावसात वाहून न जाणारं मेणाचं घर त्याच्यासाठी बनवणारी, त्याला खाऊ-पिऊ घालणारी, नीटनेटकं टेवणारी, जपणारी, काळजी घेणारी, नेहमी दक्ष, अशी त्याची आई.
पण तेव्हा त्याला ते माहीत नव्हतं.
तेव्हा त्याला काहीच कळत नव्हतं.
  
एक माणूस होता आणि एक चिऊ होती.
ती त्याला अंगणात भेटली. चिऊ-चिऊऽऽ करणारी, उड्या मारत हिंडणारी, दाणे टिपणारी, भुर्रर्रर्रर्रर्रकन्‌ उडून जाणारी, पुन्हा भुर्रर्रर्रर्रर्रकन्‌ येणारी.
तेव्हा घराला अंगण होतं. अंगणाच्या पायरीवर, आजीच्या मांडीवर बसून, चिऊ-काऊची गोष्ट ऐकत, तो तेव्हा चिऊला दाणे टाकत असे. ते खायला ती जवळ येई. नवीन चालत्या, अडखळत्या पावलांनी तो तिला पकडायला धावला की ती पुन्हा भुर्रर्रर्रर्रर्रकन्‌ उडून जाई. पुन्हा भुर्रर्रर्रर्रर्रकन्‌ येई.
ती चिऊ-काऊच्या गोष्टीतून उतरून अंगणात आली आणि खरी झाली.
पण तेव्हा त्याला ते माहीत नव्हतं.
तेव्हा त्याला काहीच कळत नव्हतं.

एक माणूस होता आणि एक चिऊ होती.
मग ती दुसर्‍या गोष्टीत जाऊन बसली. आजोबांची आवडती, न संपणारी गोष्ट.
एक धान्याचं कोठार होत. त्यात अनेक माणसं दर वर्षी धान्य आणून टाकत.
कोठाराला एक छोटी खिडकी होती. तिच्यातून एक चिमणी येई, एक दाणा घेई आणि भुर्रर्रर्रर्रर्रकन्‌ उडून जाई.
एका वेळी फक्त एकच चिमणी आणि दर वेळी फक्त एकच दाणा. तिच्या छोट्या चोचीत मावेल एवढा. तिचं छोटं पोट भरेल एवढा. अशा अनेक चिमण्या.
एक चिमणी येई, एक दाणा घेई आणि भुर्रर्रर्रर्रर्रकन्‌ उडून जाई.
आणखी एक चिमणी येई, एक दाणा घेई आणि भुर्रर्रर्रर्रर्रकन्‌ उडून जाई.
आणखी एक चिमणी येई, एक दाणा घेई आणि भुर्रर्रर्रर्रर्रकन्‌ उडून जाई.
आणखी एक चिमणी येई, एक दाणा घेई आणि भुर्रर्रर्रर्रर्रकन्‌ उडून जाई.
धान्याचं कोठार रिकामं होईपर्यंत नवीन वर्षाचं धान्य येऊन ते पुन्हा भरून जाई.
त्या गोष्टीत धान्याचं कोठार कधी रिकामं होत नसे आणि गोष्ट कधी संपत नसे.
आणि तोपर्यंत चिमण्यांना आणि माणसांनाही धान्य कधी कमी पडत नसे.
हे खूपच सुरक्षित आणि समाधानकारक होतं. त्यात एक आश्वासन होतं. चिमण्यांच्या उडण्याचा भुर्रर्रर्रर्रर्र आवाज येतो आहे तोपर्यंत कोठार रिकामं असणार नाही आणि कोणाला काही कधी कमी पडणार नाही अशी श्रद्धा त्यात होती.
पण हे त्याला तेव्हा माहीत नव्हतं.
तेव्हा त्याला काहीच कळत नव्हतं.

एक माणूस होता आणि एक चिऊ होती.
ती एक-एक गवताची काडी घेऊन यायची, खिडकीच्या गजावर बसून आत डोकावायची आणि मग घरात शिरायची.
अशी चिमणीची आणि चिमण्याची घरात भुर्रर्रर्रर्रर्र भुर्रर्रर्रर्रर्र चालू असायची.
त्यांनी घरात आजी-आजोबाच्या हार घातलेल्या फोटोंमागं घरटं बांधलं होतं. घरात घर. 
तेव्हा भिंतींवर आजी-आजोबा, पणजी-पणजोबा आणि देव-देवतांचे खूप फोटो असायचे. त्यांच्या फोटोंमागे चिमण्यांच्या घरट्यांतले आणि त्यांच्या फोटोंतून बघणार्‍या प्रेमळ नजरांसमोर घरांतले संसार फुलायचे. घरभर चिमण्यांचा आणि मुलामुलींचा अखंड चिवचिवाट चालू असायचा. 
त्यांतला एक मुलगा म्हणजे तो असायचा. 
पण हे त्याला तेव्हा माहीत नव्हतं.
तेव्हा त्याला काहीच कळत नव्हतं.