MahaGanapati Mandir

MahaGanapati Mandir
महागणपती मंदिर, वाई, महाराष्ट्र.

मनातलं

ज्या यशाने उन्माद येईल असं यश मला नको. ज्या यशाने इतरांच्या त्या यशातील वाट्याबद्दल कृतज्ञता मनात दाटून येईल आणि अधिक विनम्रता येईल ते खरं यश.

Sunday, March 15, 2020

राजस्थान बॉर्डरवर डिटेक्टीव्ह चिण्णूची रबाडगिरी - 8



20 डिसेंबर. पहाटे 02-37.

एअरफोर्स बेस क्र. 4
पहाटे दोन वाजून सदतीस मिनिटांनी चिण्णू एअरफोर्स बेस क्र. 4 च्या गेट क्र. 3 पाशी आला.
“मी 00.00 पासून (रात्री 12) मरणाच्या थंडीत कुडकुडत इथं वाट बघतोय!” परवलीच्या संवादाची देवघेव जेमतेम झाल्या झाल्या तो माणूस थडथडणार्‍या दातांच्या फटीतून खेरबट आवाजात चिण्णूवर खेकसला.
“आपण?” चिण्णूने शांतपणे विचारले.
“मी स्क्वाड्रन लीडर कर्नेलसिंग. आपण?”
चिण्णू कनीस हसला.
“सभ्य माणसा ऽऽ !!” अती संतापाने दडपलेल्या दडस आवाजात कर्नेलसिंग म्हणाला. “मी ‘लाल गांधिलमाशी’ ‘मिकूट BF-33-C’ विमानाचा पायलट आहे आणि या शांततेच्या काळात, तुझ्या एकट्यासाठी, हे मॅक-4 (ध्वनीच्या चौपट वेगाने जाणारे), जगातील सगळ्यात वेगवान विमान काशीला न्यायला मी रात्री बारापासून थंडीत कुडकुडत इथं उभा आहे. आणि तू मला नाव सुद्धा सांगायला तयार नाहीस?”
“सॉरी. टॉप सीक्रेट.” चिण्णू म्हणाला. “आणि सॉरी, तुम्हाला थांबायला लागल्याबद्दल. मी खूप वेळ एअरफोर्स बेस क्र. 3 च्या गेट क्र. 4 पाशी उभा होतो. चूक लक्षात आल्यावर तिथून इथपर्यंत चालत यायला लागलं. सॉरी!”
“तुम्ही कधी जेट विमानात बसला आहात?” कर्नेलसिंग.
“होय.” चिण्णू विनयानं म्हणाला.
“मग त्यापेक्षा हजारपट भयंकर असा हा नवीन अनुभव असेल.” काय एक एक लोक भेटतात आणि त्यांच्यासाठी काय काय करावे लागते, असा चेहेरा करुन, तशाच समजुतीच्या आवाजात कर्नेलसिंग म्हणाला. “आणि त्यातून जगला वाचलात तर अविस्मरणीय अनुभव असेल.”
“प्रत्येक अनुभव नवीनच असतो आणि जीवन म्हणजे, अशा दरवेळी नवीन, जीवघेण्या अनुभवांची मालिकाच असते.” थंडीने थडथडणार्‍या दातांतून चिण्णूने मन चिण्ण्ण्ण करणारे आणि अधिक गोठवणारे तत्त्वज्ञान गोठलेल्या शब्दांत विनाकारण फेकले आणि पायलटसारखा ड्रेस चढवला.
“ही पेटी आपल्याला नेता येणार नाही.” कर्नेलसिंग.
“त्यात धोकादायक काही नाही. आणि ती नेण्यासाठी तर आपल्याला काशीला जायचंय.” चिण्णू म्हणाला. तरीसुध्दा पायलटाने पेटीची क्ष-किरण तपासणी करायला लावलीच. (त्यात मांजराची हाडे कशी दिसली नाहीत किंवा दिसली असली तरी त्यांना त्याचा संशय कसा आला नाही हे चिण्णूला न सुटलेल्या रहस्यांपैकी एक आहे.)
“तरीसुद्धा ... जायलाच पाहिजे का? तुमच्या जीवाची मला काळजी वाटते.” कर्नेलसिंग खर्‍या काळजीने गंभीरपणे म्हणाला.
“मी चालवतो.” चिण्णू. “तुम्ही मागे बसा, म्हणजे तुम्हाला टेन्शन नको.”
यावर या वेड्या माणसाशी बोलण्यात अर्थ नाही हे कर्नेलसिंग समजून चुकला आणि विमानाकडे गेला.
पहाटे तीन वाजून दोन मिनिटांनी (03-02 वाजता) विमानाने सरळ वर, जवळजवळ उभे उड्डाण केले व दहा सेकंदात ताशी 3000 कि.मी. वेग गाठला. तो त्याचा फक्त पाऊण वेग होता.   
विमान बरोब्बर 03-19 वाजता, म्हणजे सतरा मिनिटांत, काशीच्या विमानतळावर उतरले. पेटी हातांत घट्ट धरून तिथेच चिण्णूने एक डुलकी काढली आणि सूर्य उगवायच्या आधी तो गंगेच्या काठावरील घाटावर पोचला.

20डिसेंबर. सकाळी 08-00
पंतप्रधानांचे निवासस्थान
नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनाच्या नैऋत्येला असलेल्या ब्लॉक एफ्. मधे, निरनिराळ्या राज्यांच्या भवनांच्या आणि निरनिराळ्या राष्ट्रांच्या वकिलातींच्या मधे, ‘5-बाबा फंदे मार्ग’ येथील वास्तू जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राच्या सध्याच्या पंतप्रधानांचे निवासस्थान आहे. पण ते अजून जगप्रसिध्द नाही. कारण निवासस्थानाचा घरगुतीपणा आणि खाजगीपणा टिकून राहिला पाहिजे असे सध्याचे पंतप्रधान डॉ. महारेणूजी अण्णास्वामी यांचे मत आहे. अति प्रशस्त पण एका साच्याचे सरकारी निवासस्थान नाकारुन त्यांनी हे निवास्थान स्वीकारले. त्याच्या पुढच्या छोट्या बागेत रोज पहाटे सहा ते साडेसहा आणि सायंकाळी सहा ते सात ते स्वत: राबताना दिसतात. म्हणजे जर त्या घरा भोवती दहा फूट उंचीची दगडी भिंत नसती तर ते दिसले असते. पण त्यांनी हे घर निवडल्याबरोबर सरकारने त्यांच्या सुरक्षिततेच्या कारणासाठी ही भिंत बांधली व बाजूला अर्धा किलोमीटर त्रिज्येच्या परिसरातील सर्व बंगले ताब्यात घेऊन तिथे पंतप्रधानांचे सल्लागार, कार्यालयातील अधिकारी, सहाय्यक, पर्सनल सेक्रेटरी व नोकरमंडळी यांची सोय केली. बागेत काम करताना ती उंच दगडी भिंत शेजारी बघून कितीतरी वेळा पंतप्रधानांना आपण सक्तमजुरीचे कैदी आहोत असे वाटे. पण सध्याच्या अतिरेकी काळात याला इलाज नाही. प्रचंड मोठ्या लोकशाही स्वतंत्र राष्ट्राचा पंतप्रधान असण्याची ती किंमत आहे.
निवासस्थानाच्या दारावर लाकडात कोरलेली गणपतीची सुरेख मूर्ती आहे आणि दार उघडताच प्रशस्त व्हरांड्याच्या समोरच्या भिंतीवर सहा फूट बाय चार फूट फ्रेममधे सुंदर देखाव्याचे चित्र आहे. ते त्यांच्या, कोलार सुवर्ण क्षेत्राजवळील ‘पातालकनकेश्वरम्‌’ या मूळ गावाजवळच्या वनराईतील ‘कनकेश्वराच्या’ जुन्या मंदिराचे आहे. कर्नाटक, आंध्र आणि तमिळनाडूच्या सीमेवरील हे मध्यवर्ती गाव असल्याने सध्याचे पंतप्रधान सर्व दक्षिण भारताचेच प्रतिनिधित्व करतात असे म्हटले तरी चालेल. अर्थात आता ते सर्व भारताचेच प्रतिनिधित्व करतात.
आतील प्रशस्त हॉलमधे साधे पण उपयुक्त, शिसवी लाकडी फर्निचर व बैठी आरामशीर बैठकीची व्यवस्था आहे. हॉलच्या लेमन - ऑफ व्हाईट रंगाला साजेसे मंद हिरवट पिवळट प्रसन्न रंगसंगतीचे पडदे व कुशनकव्हर्स आहेत. एका बाजूला भिंतभर कपाटात अनेक विषयांवरची अनेक पुस्तके आहेत. ती नुसती शोभेची नाहीत. कपाट उघडून ती बघितली तर ती अनेक वेळा वाचलेली आढळतील. पण आपण कशाला तिथे ते कपाट उघडून बघायला जाणार? आणि आपल्याला जाऊ तरी कोण देणार?
आज 20 डिसेंबरच्या सकाळी 8 वाजता तिथे नोकरांची गडबड चालू होती. कारण 9 वाजता पार्टीतील प्रमुख व विश्वासू नेत्यांबरोबर पंतप्रधानांची, 29 डिसेंबरच्या पाकीस्तानच्या पंतप्रधानांच्या भेटीसंदर्भात, महत्त्वाची बैठक होती.

Sunday, March 1, 2020

राजस्थान बॉर्डरवर डिटेक्टीव्ह चिण्णूची रबाडगिरी - 7





19 डिसेंबर. संध्याकाळ
‘जमात-ए-अतिरेकी’चे तात्पुरते निवासस्थान
“बॉस! काम फत्ते!!’ उत्साहाने फुरफुरत आत येत ‘टोपी’ म्हणाला.
‘जमात-ए-अतिरेकी’ मधे तो ’बॉस’च्या खालोखाल होता. बेसबॉलची टोपी रात्रंदिवस त्याच्या डोक्यावर असल्यामुळे सगळे त्याला ‘टोपी’ म्हणत. त्याचे खरे नाव त्याच्या आई-वडिलांनाही माहीत नव्हते असे म्हणत. कारण खरं म्हणजे त्याचे आई-वडीलच कुणाला माहीत नव्हते. तो टोपी नेहमी उलटी घालत असे. पण तो उलट्या खोपडीचा आहे आणि उलट्या खोपडीवर सरळ टोपी घातल्याने टोपी उलटी दिसते, असे सगळे म्हणत. तो शार्प शूटर होता. त्याला प्रत्यक्ष शूटिंग करताना कोणी पाहिला नव्हता (कारण ते पाहायला समोरचा जिवंतच राहात नसे असे म्हणत.) पण त्याच्या जुन्या ढगळ पॅंटच्या खिशात नेहमी दोन रिव्हॉल्वर्स लोडेड व सेफ्टी कॅच मागे ओढून तयार असतात असेही म्हणत. एकट्याने किरकोळचोर्‍या करण्यापासून, पाकिटे मारण्यापासून, जबरी दरोडा घालण्यापासून, एखाद्दा गॅंगचा तात्पुरता मेंबर होऊन गॅंगवॉरमधे भाग घेण्यापासून, निरनिरळ्या अतिरेकी संघटनांचा (उदा. – गुजु-गीर लायन्स, बॉंगोली टॉयगोर्स, अफगाण माऊंटन गोट्स, येलो गेंडा आर्मी, फ्री आफ्री-कन लायन्स, अरबी घरीब्ज अ‍ॅंड अमीर्स, पॅलेस्टीनी वॉकर्स, ओल्ड अ‍ॅंग्री हंग्री ज्यूज्‌स, हिंदू सिंदू बंदू-दल, ब्लू मंकीज ऑफ अ‍ॅमेझॉन, वानर्राम-सेना, वगैरे ) सच्चा आणि कट्टर अनुयायी असण्यापर्यंत तो काहीही करत असे. त्या त्या वेळी त्या त्या अतिरेकी संघनेच्या रंगाप्रमाणे बहूधा त्याच्या मळक्या सदर्‍याचा रंग असे. सध्या तो हिरवट वाटेल असा होता. एक मात्र खरे की आणि त्याने टोपी काढली असती तर कोणीही त्याला ओळखले नसते व घाबरलेही नसते.
त्याच्या सहाय्यक ‘बंटा’ होता. डोके चालवण्यापेक्षा पाय चालवणे आणि बंदुक चालवण्यापेक्षा बंदुकीच्या दस्त्याने समोरच्याला ठोकणे त्याला अधिक आवडे. त्यामुळे ‘टोपी’ व ‘बंटा’ बरोबर असताना टोपीखालच्या भागाचा वापर नाईलाजाने टोपीलाच करावा लागे.
सोपवलेली कामगिरी फत्ते केल्याच्या फुरफुरणार्‍या आनंदात दोघे आत्ता बॉससमोर उभे होते. ‘बॉस,काम फत्ते!’ टोपी पुन्हा म्हणाला.
‘बॉस’ कंदिलाच्या मिणमिण प्रकाशात त्याच्या जुन्या स्टेनगनची वाकलेली नळी हातोडीने ठोकून ठोकून सरळ करण्यात गुंतला होता. वाकलेला खिळा सरळ करण्याइतके हे काम सोपे नव्हते.एका बाजूने ती सरळ करत आणली की दुसर्‍या पातळीत ती वाकडी होत होती. जरा जोरात ठोका मारला की तिथे चेपटत होती. प्रत्येक ठोक्याला तो पाकिस्तानी पंतप्रधानांच्या सुरक्षा दलाचा प्रमुख ’सकूर अली खान’ ऊर्फ ’शंकर अली’ला शिव्या घालत होता.
आज 19 डिसेंबर. खुनाचा प्लॅन तयार होता. प्लॅन प्रमाणे शंकर अली प्लॅनचा सूत्रधार ऊर्फ ’नं-1’ होता. प्लॅन प्रमाणे तो प्लॅन ‘सी आय पी एम आय पी ओ’ कडे पाठवल्यावर प्लॅन उलथवण्यासाठी डी-1-डी चिण्णू चिणमुणकर एव्हाना त्यांच्या मागावर सुटलाही असणार. प्लॅनप्रमाणे खुनाचा दिवस 10 दिवसांवर येऊन ठेपला होता. पण प्लॅन प्रमाणे व कबूल केल्याप्रमाणे ‘नं 1’ शंकर अलीने नवी शस्त्रास्त्रे, दारुगोळा व आर. डी. एक्स. पाठवले नव्हते. एवढी मोठी राजकीय हत्या, सबंध जगातल्या प्रमुख नेत्यांच्या साक्षीने करायची, ती काय जुन्या, चपट्या नळीच्या स्टेनगनने? का गंजक्या सुर्‍या आणि सुरुंगाच्या दारुने? चिडून दात ओठ खात बॉसने हातोडीचा ठोका जोरात मारला, तो घाव त्याच्या डाव्या अंगाठ्यावर बसला. कळवळून ‘हंऽऽ!’ असा दबका उद्‍गार काढून बॉसने अंगठा तोंडात घातला.
“चिण्णूच्या दारापुढे मांजर आडवी ठेवून आम्ही तिच्या ...” टोपी.
“ए ती काय ? तो बोका होता बॉस, ‘चंद्रू’!” – बंटा.
“आणि तिच्या उजव्या हातात खरमरीत चिठ्ठी लिहिली.”- टोपी
“चिण्णूचा चंद्रू ! तो मेला होता बॉस” बंटा.
“चिठ्ठी वाचून चिण्णू जाम टरकला असेल. सारखा संडासात ये जा करत असेल. हंहः, हंहः, हंहः, हंहः!” हुंदके दिल्यासारखा हसत टोपी म्हणाला.
“बॉस, चंद्रू आधीच मेला होता. मला मारायलाच मिळालं नाही.” बंटा.
“महानगरपालिकेनंच आपलं काम सोपं केलं. कुत्रे मारण्याचं औषध खाऊन मेली ती.” टोपी
“कुत्र्यांनो, तुम्ही का नाही मेलात?” बॉस. (इथे कुत्र्यांचा अपमान करण्याचा हेतू नाही. फक्त बॉस काय म्हणाला ते लिहिले आहे.). “महानगरपालिका सुध्दा तुमच्यापेक्षा जास्त चांगलं काम करते.”
“आम्हाला काय माहीत !?” टोपी वरमून म्हणाला.
“आणि मांजराचं काय मधे मधे, तुम्ही चिण्णूला मारणार होतात ...” बॉस.
“चिण्णूच्या घराचं दारच आम्हाला उघडलं नाही. मग आम्ही आत दबा धरुन कसे बसणार? किंवा त्याच्या फ्रीजमधे स्फोटकं कशी भरणार?” टोपी. “पण असा जाम टरकवलाय त्याला ...”
“फुटा आता!” बॉस.
अशा परिस्थितीत डोक्यावर ताबा तरी कसा ठेवायचा? संतापाने डोकं फुटत असतानाच बॉसने तो अगदी गुप्त, फक्त इमर्जन्सीच्याच वेळी वापरायचा मोबाईल नंबर फिरवला.
“हॅलो ? नंबर वन ?” बॉस.
“बॉस, बॉस, ...” टोपी.
“हॅलो, शंकर अली खान?” बॉस.
“बॉस, शंकरअली म्हणजे ते प्रसिद्ध पिपाणी वादक...?” भलत्या वेळी भलतीकडेच डोकं चालवत बंटा म्हणाला.
“अरे! तुम्ही अजून इथंच? गेट आऊट!! मी इतका महत्त्वाचा गुप्त फोन करतोय, आणि तुम्ही -- गेट आऊट!” बॉस.
“बॉस, आता पुढची कामगिरी ...” टोपी.
“हॅलो? ... च्यायला, (पुढे चार अस्सल शिल्या) काय कटकट आहे. जा, गंजक्या चाकूनं मारामारीची प्राक्टिस करा, जाऽऽऽ ! ... हॅलो ! शंकर अली नंबर वन? ...” बॉस.
“बॉस नंबर वन पण पिपाणी वाजवतात?” बंटा.
“गेट आऊट !!!” बॉस किंचाळला.
“मूर्खा! मला फोन करतोस आणि ‘गेट आऊट’ म्हणतोस?” फोनवर शंकर अली.
“हॅलो! शंकर अली? सॉरी, तुम्हाला नाही -- हॅलो !” बॉस.
“मूर्खा! या नंबरवर का फोन केलास? मी सांगितलं होतं ना ...” शंकर अली.
“इमर्जन्सीच आहे! आज 19 तारीख आणि अजून स्टेनगन्स, ए के बी-57, रिव्हॉल्वर्स, आरडी एक्स तुम्ही पाठवणार होता, त्याचा पत्ता नाही ...” बॉस.
“मूर्खा, हरामखोरा, -- (दबक्या आवाजात) ही फोनवर बोलण्याची गोष्ट आहे का? मी इथं त्यांची सुरक्षा व्यवस्था पाहातोथ आणि तू, त्यांच्या खुनाची हत्यारं का पाठवली नाहीत, म्हणून फोनवर विचारतोस?” शंकर अली.
“कुणाचा फोन आहे. कुणाचा खून?” पाक पंतप्रधानांचा फोनवर लांबून आवाज आला.
“अं? मुलाचा फोन. तो, अं ऽ, टीव्ही गेममधलं विचारतोयं” शंकर अली.
“ते तुमच्या मुलाचं तुम्ही पाहा. इथं टीव्ही गेम चालू नाही. मला उद्याच्या उद्या शस्त्रास्त्रं हवीत ! तो चिण्ण्याही माझ्या मागे सुटलाय.” बॉस.
“तो आपल्या प्लॅनचाच भाग आहे.” शंकर अली.
“पण 19 तारखेल शस्त्रं पाठवायची असं पण प्लॅनमधे आहे.” बॉस. “उद्याच्या उद्या तरी शस्त्र पोचलीच पाहिजेत.”
“शस्त्र म्हणजे काय खेळणी आहेत? म्हणे उद्याच्या उद्या! आणि तुझी ती सुप्रसिध्द स्टेनगन कुठाय?” शंकर अली.
“घह हं घह्‍ घं हंघ्‍ ...” हुंदका देताना नरंड दाबल्यावर येतो तसा आवाज बॉसच्या घशातून आला.
“... उद्दा करतो व्यवस्था.” शंकर अली म्हणाला आणि फोन बंद झाला.
मगाशी हातोडीचा घाव अंगठयावर बसल्याने बॉसच्या मनाच्या जुन्या जखमेची खपली उचकटलीच होती, ती आता पुरी सुटून त्याच्या मनातून भळभळ रक्त वाहू लागले. सहा महिन्यांपूर्वी बांडुगच्या महाराजाच्या मुलाला किडनॅप करताना त्याने ती स्टेशगन वापरली होती. तेव्हा त्याच्या व्रात्य मुलाने त्याची नजर चुकवून, ती  हस्तगत करुन, तिची नळी दराच्या फटीत घाल-घालून, जमिनीवर आपटून, दहा ठिकाणी ती वाकवली होती. शेवटी बांडुगच्या महाराजांनीच दया येऊन, 25 कमांडोजचे पथक पाठवून, त्याचीच त्या पोराच्या तावडीतून सुटका केली होती. दु:ख, चीड, हताशपणामुळे बॉस रडकुंडीला आला. काय साली ही अवस्था! इथे खरे अतिरेकी आपण आहोत पण सगळे जगच आपल्याविरुद्ध अतिरेकी कारस्थाने करते आहे, असे त्याला वाटले. 

Sunday, January 12, 2020

राजस्थान बॉर्डरवर डिटेक्टीव्ह चिण्णूची रबाडगिरी - 6




19  डिसेंबर, संध्याकाळ
दिल्लीच्या उपनगरातील चिण्णूचा फ्लॅट
बिल्डिंगच्या पायर्‍या चढता चढताच काहीतरी अशुभ घडल्याची चिण्णूला जाणीव झाली. अशी जाणीव चिण्णूला नेहमी होत असे. कारण अशुभाच्या संगतीतच त्याला नेहमी वावरावे लागे. तो ऑफिसमधून बाहेर पडला, बसने घरी आला, ड्रिंक्स घेत टिव्ही पाहात बसला आणि मग जेवला; किंवा तो सकाळी उठला आणि चहा घेत त्याने वर्तमानपत्र वाचले, अशा घटना त्याच्या आयुष्यात घडतच नसत.
आजही चीफच्या ऑफिसातून बाहेर पडल्यावर तीनदा बस बदलून व मधे दोनदा रिक्षा करुन तो त्याच्या उपनगरातील फ्लॅटकडे आला. आपला पाठलाग होत असला पाहिजे असा त्याला संशय होता. त्यासाठी एकदा तो विरुध्द बाजूला जाणर्‍या बसमधेही चढला. सुदैवानं तो संशय खोटा ठरला.
त्याचा फ्लॅट चौथ्या मजल्यावर होता. लिफ्ट नेहमीप्रमाणे बंद होती. त्यासाठी शिव्या सुध्दा न घालता तो जिना चढू लागला तेव्हा त्याला ते अचानक समजले. इतक्या वर्षांनंतर! ... आपण येताना इतक्या बस बदलल्या, नेहमी बदलतो, पण फ्लॅट तोच आहे. गेली दहा वर्षे. बसमधे आपला पाठलाग करण्यात वेळ घालवण्याऐवजी दाराकडे पिस्तुल रोखून फ्लॅटमधे आपली वाट पाहात बसणे सोपे होते. तो सावध झाला आणि त्याच क्षणी त्याला ती अशुभ घडल्याची जाणीव झाली. धडधडत्या अंत:करणाने, सावध, पण रुबाबदार पावले टाकत, एक-एक पायरी चढत तो फ्लॅटच्या दाराशी आला आणि त्याची पावले थबकली. ---
दारात त्याचे लाडके पांढरे मांजर मरुन पडले होते. त्याचे पिवळे निष्प्राण डोळे उघडे होते, पाय ताठले होते, पोट फुगले होते आणि त्याच्या तोंडातून फेस आला होता. त्याच्यावर विषप्रयोग झाला होता.
डोळ्यातले अश्रू थोपवत, आपल्या लाडक्या चंद्रूच्या पाठीवरुन अखेरचा हात फिरवायला तो खाली वाकला तेव्हा चंद्रूच्या पुढच्या ताठलेल्या पायांखाली ठेवलेली चिठ्ठी त्याला दिसली. 
‘चिण्ण्ण्या, चिणम्या मुणमुणकरा – सावध! आम्ही काहीही करु शकतो. तुझ्या चंद्रू मांजरड्याला मारण्यासाठी आम्ही आलो होतो. पण त्याआधीच ते काम महानगरपालिकेने केले होते. कुत्र्यांसाठी टाकलेल्या विषारी गोळ्या चुकून खाऊन तुझे मांजरडे मेले -- जाऊ दे! पण तरी ते तुझ्या दरात ठेवून आम्ही तुला सूचना देत आहोत. मांजराची महानगरपालिकेने लावली तशी तुझी वाट लावायला आम्हाला वेळ लागणार नाही. सावध! -- खतरनाक अतिरेकी.’
धीरोदात्त पुरुषाप्रमाणे चिण्णूने अश्रू आवरले. त्याचे पिचमीच डोळे बारीक झाले. किंचित पुढे आलेले दात आवळले गेले. वाळक्या झाडाच्या फांद्यांप्रमाणे हाताच्या मुठी वळल्या व त्यात ती चिठ्ठी चुरगळली गेली. त्याच्या चिप्पुट चेहेर्‍यावर निश्चय दिसू लागला. त्याच्या लांबट वरवंटी डोक्यात आता एकच विचार होता. -- आपल्यामुळे मांजर मेले आता त्याला काशीला नेऊन त्याचे अंत्यसंस्कार करावे लागणार.
चिण्णू उठला. दरवाजाच्या अंगच्या कुलुपात किल्ली फिरवताच अतिरेक्यांनी लावलेल्या बॉंबचा स्फोट होऊ शकेल त्याची पर्वा न करता त्याने किल्ली फिरवली. सायलेन्सर लावलेले, सेफ्टी कॅच मागे ओढलेले पिस्तुल रोखून आतील अंधारात कोणी दबा धरुन बसले असेल असा विचारही न करता बेदरकारपणे त्याने दरवाजा ढकलला व आतील अंधारात पाऊल टाकले.
मग त्याने दिवे लावले, पाक पंतप्रधानांच्या खुनाच्या कटाची माहिती  असलेली फाईल बेफीकीरपणे हॉलमधल्या टीपॉयवर फेकली व तो स्वंयपाकघरात गेला. ग्लासमधे तीन आईस क्यूब्ज टाकून त्यावर त्याने पाऊण ग्लास चिल्ळ्ड पाणी ओतले व निम्मा ग्लास एका दमातच रिकामा केला.
बर्फा इतक्या थंड पाण्याचे ते घोट जीभ, घसा आणि छाती थंड करत त्याच्या पोटात शिरले तेव्हा त्याला जरा बरे वाटले. अजून दोन घोट पोटात जाताच विचार करण्याइतका त्याचा मेंदू स्वच्छ झाला. हल्ली त्याला आईस कोल्ड पाण्याइतकी इतर कशानेच किक्‌ येत नसे. मग चिण्णूने फोन उचलला आणि तो टॅप केला असेल याची जराही पर्वा न करता नंबर फिरवला.
 “हॅलो? हॅलो ? एअरपोर्ट?” चिण्णू
“हॅलोऽऽ? ऐकू येत नाही.” एअरर्पोर्टवरची रिसेप्शनिस्ट.
“हॅलो? एअरर्पोर्ट?” चिण्णू ओरडून.
“नाही, नाही ! इथं एनिमा पॉट मिळत नाही! ही काय हॉस्पिटल रुम सव्हिस नाही. काहीही मागतात ...”
“हॅलो ? एअरर्पोर्ट? काशीला जाणारी एअरबस --”
“हा बस स्टॅंड नाही !”
“हॅलो! ए-अ-र-पो र्ट?” चिण्णू किंचाळला.
“ओरडू नका! कान फुटले नाहीत माझे!” रिसेप्शनिस्ट ओरडली. मग नेहमीच्या कमावलेल्या मधाळ आवाजात म्हणाली, “हॅल्लो ! एअरर्पोर्ट. मी आपली काय सेवा करु शकते?”
“काशीला जाणांर विमान कधी मिळू शकेल?”
“आत्ताच सुटलं. आता दोन दिवसांनी --”
“मला तातडीनं जायचं होतं --”
“तुम्ही दहा मिनिटं आधी फोन केला असता तर हेच विमान थांबवलं असतं. आधीच ते 37 मिनिटं लेट होतं आणि त्यात फक्त दोनच पॅसेंजर्स होते. तुमच्यासाठी ते अजून दोन तास थांबलं असतं.”
“मला तातडीने --”
“मग तुम्ही रेल्वेने का नाही जात? किंवा काशी ऐवजी तुम्हाला जैसलमेरला जायचं असेल तर अर्ध्या तासात विमान आहे. हल्ली सगळे लोक तिकडेच चालले आहेत. तुम्हाला माहितीच असेल --”
चिण्णूने फोन ठेवला व ऑफिसचा नंबर फिरवला.
“हॅलो? कोण?” चिण्णू.
“रॉंग नंबर !”
“मुर्खा मी चिण्णू बोलतोय.”
“सॅल्यूट सर, सॉरी चिण्णू सर, सॉरी डी-1-डी स्सर,मी डी-2-सी सर --”  
“पुरे! मला तातडीनं काशीला जायचंय. समजलं? अर्जंट!! इमर्जन्सी!!! कळलं? ती व्यवस्था कर! बी फास्ट अ‍ॅंड बी एफिशिअंट!!”
“येस्स्सर !!” फोन बंद झाला.
मग चिण्णूने उरलेले आईस कोल्ड पाणी एका घोटात संपवले आणि तो झटपट कामाला लागला. माळ्यावरुन जुने पुठ्ठ्याचे खोके काढून त्यात त्याने वर्तमानपत्राच्या रद्दीचे दोन थर घातले. मग एका जुन्या बनियचे खांद्याचे पट्टे एका बाजूने कापल्यावर बनियनच्या दोन बाजूंना दोन पट्ट्या तयार झाल्या. दुर्गंधीनाशक ‘डीओडोनालीनचे’ भरलेले पाकीट त्याला सुसज्ज बाथरुममधील कपाटात मिळाले. पाठीमागच्या बाल्कनीतील कापाटात सर्व प्रकारची घर-दुरुस्ती, सुतारकाम, प्लंबिंग, इलेक्ट्रिक फिटिंगची हत्यारे व इतर साहित्य होते. त्यातून त्याने दोन लांब वायर्सचे तुकडे घेतले. बाथरुममधील कपाटातील फर्स्ट-एड बॉक्स मधून त्याने कापसाचे पाच मोठे बोळ, अ‍ॅंटीसेप्टीक लोशन व चिमटा घेतला.
सर्व वस्तू मिळाल्याची खात्री झाल्यावर त्यातील काही घेऊन तो चंद्रूपाशी आला. जिन्याच्या जाळीच्या भोकातून नुकत्याच उगवलेल्या चंद्राचा प्रकाश चंद्रूवर पडला होता. एक एक कापसाचा बोळा अ‍ॅंटीसेप्टीक लोशनमधे बुडवून त्याने चिमट्याने तो जड अंत:करणाने चंद्रूच्या तोंडात, दोन्ही नाकपुड्यांत व दोन्ही कानांत खुपसला. मग चंद्रूला बनियनच्या पोकळीत ठेवून दोन्ही बाजूंना लोंबणार्‍या पट्ट्या  भोवती गुंडाळून त्याने एक बोचके तयार केले. मग आत येऊन हे बोचके त्याने पुठ्ठ्याच्या खोक्यात ठेवले. शेजारी, वास येऊ नये म्हणून, ‘डीओडोनालीनचे’ अख्खे पाकीट ठेवून, वर आणखी रद्दीचे थर घालून त्याने खोके बंद केले आणि वायर्सनी नीट बांधले.
त्याने हात धुतले व ते टॉवेलला पुसत असतानाच फोन वाजला.
“स्स्सर! रात्री बारा वाजता एअरफोर्स बेस क्र. 4 च्या तिसर्‍या दारासमोर तुम्हाला एकजण भेटेल. तुमचं वर्णन त्याच्यापाशी आहे. तो विचारेल, “किती वाजले” तुम्ही म्हणायचं, “रात्र झाली” तो म्हणेल, “इतक्यात?” तुम्ही म्हणायचं “सकाळच्या आत.” तो तुमची सोय करेल.
“गुड!” चिण्णू.
“स्स्स्सर! आणखी काही?”
“मी आल्यावर तुला फोन करेन. तोपर्यंत तुम्ही जय्यत तयारीत राहा”
“कशाच्या?”
“माझ्या अंत्ययात्रेच्या ! मूर्ख !!”
“येस्स्स्स्सर !” फोन बंद झाला.

Sunday, December 22, 2019

राजस्थान बॉर्डरवर डिटेक्टीव्ह चिण्णूची रबाडगिरी - 5


19 डिसेंबर, दुपारी 04.05
चीफ ’ची’चे ऑफिस

“मे आय ---” चिण्णू.
“कम इन, कमिन !” चीफ.
“‘स्स्सर!!” चिण्णूने कडक सॅल्यूट ठोकला तेव्हा दचकून चीफ आणखी ताठ झाले.
“बस चिण्णू !” चीफने चिण्णूला प्रेमाने, नावाने हाक मारली. त्याचा अर्थ यावेळची कामगिरी फार, म्हणजे फारच महत्वाची व धोकादायक असली पाहिजे हे चिण्णूने झट्कन ओळखले. एखाद्या कामगिरीत चिण्णू नक्की मरणार असे चीफला वाटत असे तेव्हाच चीफ त्याला प्रेमाने, नावाने हाक मारत असे. आत्तापर्यंतच्या अनेक अनुभवांवरुन हे चिण्णूला माहीत होते. आणि तरी चिण्णू नवीन कामगिरीसाठी आज पुन्हा इथे जिवंत हजर होता. म्हणजे तो किती ग्रेट असला पाहिजे.
“येस सर!” चिण्णू.
“तू वर्तमानपत्र वाचतोस?”
“होय सर.”
“मग सध्याची महत्त्वाची बातमी?”
“तपस्याचं ऋषिबरोबर लग्न झालं.”
“च्‌-च्‌-च्‌-च्‌ ... चिण्णू, चिण्णू ऽ, बी सीरियस.”
“पण खरंच झालं सर! ... हां ! ती पाकिस्तानच्या पंतप्रधानांची भारत भेट! ... राजस्थानात जैसलमेरजवळच्या ’लोंगेवाला’ आणि पाकिस्तानातील ’सैन वारी’ या गावांमधे 29 डिसेंबर पासून भारत-पाकिस्तान दरम्यान ‘टांगा सवारी सेवा’ सुरु होणार आहे. पाहिल्या सवारीतून पाकिस्तानचे पंतप्रधान भारताच्या पंतप्रधानांना भेटण्यासाठी भारतात ...”
“पुरे, पुरे! मग तुझा अंदाज ?”
“सर -- मी सिगारेट पेटवू? म्हणजे विचार करायला ...”
“नको ! तुला माहितीयै मला वाससुध्दा ...”
“तुम्ही तेवढा चिरूट ओढायचा. आम्हाला साधी सिगारेट सुध्दा ...”
“मी तरी कुठे ओढतोय!? सिग्रेट ओढणं प्रकृतीला ...”
“तेच म्हणतो मी. त्यापेक्षा मला द्या. मी तरी ओढतो.”
“शटाप!”
“जरा इकडे तरी धरा. तेवढाच धूर नाकात जाईल आणि अंदाज करायला मेंदू तल्लख ...”
“शटाप!”
“राहिलं! ... त्यावेळी ते आपल्याला ’लोंगेवाला युद्ध-स्मारक’दर्शन आणि रणगाडा राईडसाठी 35वा, चालू स्थितीतील, रणगाडा भेट देणार आहेत?”
“ चिण्णूऽऽऽ!!! बी सीरियस! आपलं डिपार्टमेंट कशासाठी आहे?” 
“ खून?”
“येस”
“भारताचे पंतप्राधान?”
“नो”
“पाकिस्तानचे?”
“येस! --  हुशार आहेस. त्यासाठीच तुला बोलावलं”
“म्हणजे मी करायचा?” 
“मूर्खा! आपण नाही करायचा. आपल्याला तसं कितीही वाटत असलं तरीसुध्दा!!! ... ’जमात-ए-अतिरेकी’  ही संघटना तो करणार.”
“अरे वा ! छानच!! ... पण का? ती तर मुस्लिम अतिरेकी संघटना आहे. 1956 साली काश्मीर बॉर्डरवर डोक्यात नारळ पडून मेलेल्या असित शेखच्या मुलानं ती चालू केली. कारण असित शेखच्या फुटलेल्या डोक्याशेजारी फुटलेल्या नारळाबरोबर बॉंबचा गंजलेला तुकडाही सापडला. तो हातात धरूनच त्यानं प्रतिज्ञा केली की ...”
“चिण्णू --”
“थोडक्यात सांगतो. मला पाठ आहे.”
“चिण्णू -- पुरे!”
“राहिलं”
“ती मुस्लिम संघटना असली तरी या पंतप्रधानांच्या विरोधी पक्षाच्या बाजूनं ती आहे. या पंतप्रधानांचं टांगा चलावू धोरण त्यांना आवडत नाही. त्यांना क्षेपणास्त्राच्या गतीनं जायचंय. आत्ताच्या पंतप्रधानांना मारल्यानं, त्यांना नको असलेले पंतप्रधान मरतील हे एक, ते भारतात मेल्यानं आळ परस्पर भारतात येईल हे दुसरं आणि भारत-पाक संबंध सुधारण्याच्या घोडदौडीला खीळ बसेल हे तिसरं. त्यामुळं भारत-पाक युद्ध सुरू होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. त्यातून पुढं कदाचित ...”
“अणु-बॉंबचा वापर, जागतिक महायुध्द ... जगाचा विनाश! वॉऽऽऽ व ! एका गोळीत तीन खून !” चिण्णूने शीळ वाजवली.
“गोळीनं नाही -- ही फाईल वाच.”
“एवढ्यात इतकी माहिती जमवून तुम्ही फाईलसुध्दा तयार केलीत? आपलं डिपार्टमेंट इतकं कार्यक्षम कधीपासून झालं ?”
“शटाप! मी नाही. ही आजच पहाटे ई-मेलनं अतिरेक्यांनीच पाठवून दिली. म्हणून तर आपल्याला कळलं. यात, ’पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा खून – संकल्पना, उद्देश, साहित्य, मनुष्यबळ, प्रत्यक्ष कारवाई, खुनानंतरची परीस्थिती, परिणाम व फेर आढावा’ इथपर्यंत, अगदी शेवटच्या तपशीलापर्यंत, माहिती त्यांनी दिली आहे.”
“अरे वा ! अखेर इतक्या वर्षांनंतर का होईना, हे लोक सुधारायला लागले तर! पूर्वी आपल्यालाच सर्व शोधून काढायला लागायचं. पण मग -- इतकं सगळं त्यांनी ठरवलंच आहे तर माझं काय काम?”
“तू तो खून होऊ न देण्याचा प्रयत्न करायचा. आणि जमल्यास अतिरेक्यांना पकडून द्यायचंस.”
“अरेच्चा! ... खरंच की ! त्यासाठी तर आपलं डिपार्टमेंट आहे. मी समजत होतो, बरं झालं. आणि खून परस्पर होतोय हे छानच आहे.”
“येड्या ऽऽ तसं नसतं. थोडं तरी आंतरराष्ट्रीय राजकारण, इथं काम करताना, एवढ्या वर्षांत तुला समजायला हवं. ... तू ही फाईल वाच, प्लॅन नीट समजावून घे आणि तो हाणून पाडण्याचा आपला प्लॅन तयार करुन मला भेट. हीच तुझ्याकडून माझी, आपल्या पंतप्रधानांची, पाक पंतप्रधानांची व अतिरेक्यांचीही अपेक्षा आहे. दोन्ही राष्ट्रांचं, जगाचं व अतिरेक्यांचही भवितव्य आम्ही विश्वासानं तुझ्या एकट्यावर सोपवतो आहोत.”
“ठीक आहे. ... साधारण आठवडाभरात ...”
“आज तारीख कोणती?”
“19 डिसेंबर.”
“म्हणजे तू अभ्यास करून, प्लॅन आठवड्यानं तयार करणार, मग मला भेटणार, मऽऽऽग तयारी करुन प्रत्यक्ष कामाला लागेपर्यंत दहा वेळा खून होऊन गेला असेल. उशीरात उशीर 26 डिसेंबरला अतिरेकी माझ्या हातात पाहिजेत. म्हणजे पुढील --”
“त्यांनी पकडण्याचा पत्ता कळवला आहे का?”
“चिण्णू!”
“हा अन्याय आहे. टांगा सवारी सेवा चालू होणार, त्यावेळी पाक-पंतप्रधान भारतात येणार, त्यावेळी ते खून करण्याजोगे असणार, हे माहीत झाल्यापासून अतिरेक्यांना तयारीला सहा महिने तरी मिळाले आणि मला फक्त सहा दिवस ?”
“मग किती?”
“भेट पुढं ढकलायला सांगा.”  
 “पंतप्रधानांना? तू डोक्यावर पडला काय? आणि फक्त या दोन देशांचा प्रश्न नाही. ही ऐतिहासिक भेट होईल तेव्हा आकाशातून हेलिकॉप्टरमधून या दोघांवर पुष्पवृष्टी करण्यासाठी अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, रशिया व चीनचे प्रमुख येणार आहेत. आणि हा सोहळा बघण्यासाठी निरीक्षक म्हणून यूनोचे अध्यक्ष या सर्वांवरुन विमानातून आकाशात घिरट्या घालणार आहेत.”
“हे मला माहीत नव्हतं.”
“ते उद्याच्या बातम्यांत प्रसिद्ध होईल. मुद्दा तो नाही. इतक्या सगळ्या बड्या लोकांची गैरसोय करुन भेट पुढं ढकलता येणार नाही.”
“मग रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पाकिस्तानच्या पंतप्रधानांवर आणि त्यांच्या प्रेता शेजारी गुडघे टेकून बसून कपाळावर हात आपटत आक्रोश करणार्‍या भारताच्या पंतप्रधानांवर त्यांना पुष्पवृष्टी करायला सांगा.”
“चिण्णू ,चिण्ण्या, चिण्ण्ण्ण्याऽऽऽ, ...”
“जगाचं भवितव्य माझ्या एकट्यावर सोपवताना हा विचार तुम्ही करायला हवा होता. आता का माझ्यावर चिडता?”
“ठीक आहे, ठीक आहे. मी प्रयत्न करीन.”
“कसून प्रयत्न करा. मला कमीत कमी तीन आठवडे तरी ... 10 जानेवारीच्या पुढे भेट ठरवा.”
“अरे, हिंदु मुस्लिम पंचांगे बघून हा मुहूर्त काढला होता”
“खुनाचा?”
“बरं बाबा! मी करतो प्रयन. पण खात्री देत नाही. ... बेस्ट लक! ... तुला आणि मला पण”
“आता सगळ्या जगालाच लक्‌ची जरूर आहे.”
चीफना या सगळ्याचे इतके टेन्शन आले की चिण्णू जाईपर्यंतही वाट न बघता त्यांनी ड्रॉवरमधून व्हिस्कीची वाटली काढली व दोन मोठे घोट सरळ घशात ओतले.