साधारण एप्रीलमध्ये मला कळले की मी आजी होणार आहे. मग काय? माझा आनंद मनात, गगनात कुठेच मावेना. तो व्यक्त कसा करू? हेही कळेना. जोरजोरात ओरडावं, मोठमोठयानं हसावं, गावं, नाचावं असं वाटलं. पण मी पडले बाई! हे कसं काय़ करणार? आता काय करावं? शेवटी मी आपल्या ३०/४० मैत्रीणींना फोन केले, ५० नातेवाईकांना पत्रे लिहिली. असा मी
माझा आनंद व्यक्त केला. चौकात मोठा फ्लेक्स बोर्ड पण लावणार होते. पण तो नाही लावला. मला न ओळखणार्यांना माझ्या आनंदाचं काय?
आता आपला अमिताभ पण माझ्यासारखाच. त्यालाही नुकतचं कळलं की तो आजोबा होणार आहे. त्याला ही खूप आनंद झाला असणार. पण आता अमिताभ मोठा [अर्थात त्याला कोण ओळखत नाही?] तेव्हा त्याचा आनंद ही तितकाच मोठा. मी ही माझी आनंदाची बातमी मला ओळखणार्या लोकांपर्यंत पोहचवली.पण अमिताभला वाटले असणार की हा त्याचा खूप मोठा आनंद ज्या लोकांना तो ओळखत ही नाही, पण जे त्याला ओळखतात, त्यांच्यापर्यंतसुद्धा पोहचवावा.
मग त्यानं काय केलं? उचलला लॅपटॉप आणि टाकला ब्लॉग. त्याची पण ही बातमी वाचून मी परत एकदा खूष झाले. आपल्या घरातच आनंदाची बातमी असल्यासारखं वाटलं. त्याला जे ओळखतात, आपला मानतात, ते सर्वच खुष झाले असणार.
पण त्याही पेक्षा आणखी आनंदाची बातमी मला काल सकाळी कळली की ऐश्वर्याला मुलगा होणार की मुलगी? ह्यावर लोकांनी पैजा लावायला, पैसे लावायला सुरुवात केली. मला पुन्हा एकदा बेहद्द आनंद झाला. त्या प्रीत्यर्थ आता मात्र मी लगेच फ्लेक्स बोर्ड करायला टाकला. मी पण लगेच ह्या बातमीवर पैसे लावायाचे ठरविले.
पण आता आली पंचाईत. कारण ऐश्वर्याला मुलगा झाला की मुलगी हे कळायला तब्बल ५-६ महीने वाट पहावी लागणार, त्या नंतर पैसे मिळणार. शी! एवढा वेळ आहे कोणाजवळ? त्या पेक्षा झटपट पैसे देणारी आणखी एक आयडीया आहे माझ्या जवळ. ह्या पेक्षा ही जास्त भरवशाची आणि मुख्य म्हणजे खूप लवकर पैसे देणारी.
शेजारच्या गल्लीतील एक आजोबा गेले ६ महिने अंथरुणावर खितपत पडले आहेत.अगदी केव्हाही चौदाव्याचे लाडू खाण्याचा योग आहे. फार वाट मुळीच बघावी लागणार नाही. आज जातील का उद्या जातील? यावर पैसे लावले की लगेच परत मिळणार ह्याची खात्री आहे. आजोबांचे पैसे परत मिळाले की लगेच माझ्या मैत्रीणीची काकू केमोथेरपी घेत आहेच तिला आपण अजेंडावर आणू. पाठोपाठ आशाताईच्या सद्ध्या बर्याच टेस्टस सुरू आहेत असं कळलं आहे. बघते, त्यावर पैसे लावायला काही आशा, “hopes” आहेत का ते? नाही तर आपण नवा गडी शोधू त्यात काय एवढं? कोणाची व्यक्तिगत, खाजगी गोष्ट असली काय, आनंदाची बातमी काय किंवा दुःखाची काय, आपल्याला काय त्याचं? आपल्याला चघळायला बातमी मिळण्याशी आणि झटपट आणि भरपूर पैसे मिळण्याशी मतलब.
मग चला लवकर लवकर पैसे लावायला लागा. आपल्याला वेळ आहे कुठे वाया घालवायला?
waahh!!! zakas zalay. tu asha style madhe lihitis he mala mahit navat. (bolana mahit hot ;)he he )
ReplyDeletenice article, i liked the satire...
ReplyDelete