MahaGanapati Mandir

MahaGanapati Mandir
महागणपती मंदिर, वाई, महाराष्ट्र.

मनातलं

ज्या यशाने उन्माद येईल असं यश मला नको. ज्या यशाने इतरांच्या त्या यशातील वाट्याबद्दल कृतज्ञता मनात दाटून येईल आणि अधिक विनम्रता येईल ते खरं यश.

Sunday, October 27, 2019

राजस्थान बॉर्डरवर डिटेक्टीव्ह चिण्णूची रबाडगिरी - 1


Disclaimer: This literary work is made solely for reader’s entertainment and is a work of fiction. Names, characters, businesses, places events and incidents are either the Author’s imagination or used in a fictitious manner. Any resemblance to actual persons, living or dead, or actual events is purely coincidental.
Any written matter, dialogues, characters or events in this literary work are not intended to offend the sentiments of any individual, cast, community, race or religion or to denigrate any institution or person, living or dead. 
अस्वीकृती: ही कादंबरी म्हणजे एक काल्पनिक गोष्ट असून ती वाचकांच्या केवळ मनोरंजनासाठी लिहिली आहे. यातील नावे, पात्रे, व्यवसाय, जागा, घटना व प्रसंग लेखकाच्या कल्पनेतून निर्माण झाले आहेत किंवा काल्पनिकरीत्या वापरले आहेत. जिवंत अथवा मृत, प्रत्यक्ष व्यक्तीशी किंवा घटनांशी साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग आहे.
कोणतीही जिवंत किंवा मृत व्यक्ती, जात, समाज, जमात किंवा धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा अवमान-अनादर करण्याचा या कादंबरीतील लेखनाचा, संवादांचा, पात्रांचा किंवा घटनांचा उद्देश नाही.

भाग 1

19 डिसेंबर. दुपारी 03.30
मध्यवर्ती आंतरराष्ट्रीय राजकीय खून अन्वेषण व प्रतिबंध कार्यालय.

सेंट्रल इंटरनॅशनल पोलिटिकल मर्डर इन्व्हेस्टिगेशन अंड प्रिव्हेन्शन ऑफिस (CIPMIPO सी आय पी एमाय पी ओ – सिप्‌मिपो) अर्थात मध्यवर्ती आंतरराष्ट्रीय राजकीय खून अन्वेषण व प्रतिबंध कार्यालयाच्या पंचवीस मजली भव्य इमारतीच्या भव्य प्रवेशद्वारासमोर चिण्णू चिणमुणकर एक क्षणभर विचारमग्न मुद्रेने उभा राहिला. तो तिथल्या डी-1’ (स्पेशल चीफ डिटेक्टिव) श्रेणीच्या दहा डिटेक्टिव्हांपैकी सर्वांत हुशार व कार्यंक्षम होता. परंतु या कार्यालयात येण्याची वेळ त्याच्यावर क्वचितच येत असे. आणि त्यामुळे विचारमग्न होण्याची वेळही त्याच्यावर क्वचितच येत असे. तरीसुध्दा, प्रत्येक वेळी, प्रवेशद्वारासमोरच्या पंचवीस पायर्‍यांपैकी तळाच्या या पायरीवर, या जागी, तो न चुकता थांबता असे व क्षणभर विचारमग्न होत असे. पुढच्या पंचवीस पायर्‍या चढून प्रवेशद्वारापर्यंत पोचायचे या विचारानेच त्याला दम लागत असे.
आजही याच विचारात तो क्षणभर मग्न झाला व त्याला दम लागला. मग दोन श्वास जोरात ओढून त्याने निःश्वास टाकला आणि तो नेटाने एक एक पायरी चढू लागला. बरोबर सातव्या पायरीला तो नेहमीप्रमाणेच अडखळला व तोंडघशी पडता पडता त्याने स्वतःला कसेबसे सावरले. आपल्या चिप्पुट चेहर्‍यावर घसरणारी आपली रुबाबदार हॅट त्याने सावरली व लांबट वरवंटी डोक्यावर नीट बसवली. मग जमतील तितकी रुबाबदार पावले टाकत, एका पायाने लंगड्या, पँट घातलेल्या चित्याच्या तडफेने त्याने प्रवेशद्वार गाठले.
प्रवेशद्वारासमोरच्या आरश्यापुढे त्याने आपली जीभ शक्य तितकी बाहेर काढून दाखवली. आरश्यामागील इलेक्ट्रॉनिक ग्राहकाने त्याच्या जिभेवरील सर्व सूक्ष्म खड्डे-उंचवट्यांचे स्कॅनिंग करुन ती माहिती संगणकाकडे पाठवली. संगणकाने त्याचे विश्लेषण करुन त्याची ओळख पटवेपर्यंत समोरच्या आरशात त्याने एकदा आपली रुबाबदार हॅट न्याहाळली व त्याला समाधान वाटले. हॅट इतकाच आपला चेहेराही रुबाबदार असता तर आपल्याला जास्त समाधान वाटले असते असे त्याला वाटले. पण आपल्या चिप्पुट चेहेर्‍याची कसर तो नेहमी निरनिराळ्या प्रकारच्या रुबाबदार हॅट्स वापरुन भरून काढत असे.
संगणकाला ओळख पटल्यावर प्रवेशद्वारासमोरचा हिरवा दिवा लागला व त्याने आपल्याजवळचे चुंबकीय ओळखपत्र समोरच्या फटीत सरकवताच प्रवेशद्वार आपोआप उघडले. आतील प्रशस्त हॉलच्या डाव्या बाजूच्या बोळातून यू-5 नंबरच्या फास्ट लिफ्टपाशी तो पोचेपर्यंत त्याचे इलेक्ट्रॉनिक, क्ष-किरण आणि व्हीडिओ कॅमेर्‍यांनी परीक्षण केले व निरनिराळ्या मजल्यांवरील निरनिराळ्या संबंधित कचेर्‍यांत चिण्णू चिणमुणकर येत असल्याची सूचना देणारी घंटा वाजली.

अकराव्या मजल्यावरील सुरक्षा कक्षातील जवान तुस्त जेवण करून, पोटावरील पट्टे ढिले करून, ढेकर देत जरा आडवे होण्याचा विचार करत होते. घंटा ऐकताच शिव्या देत ते उठले व पोटावरील पट्टे आवळत लिफ्टकडे धावले. ते जेमतेम तिथे पोचेपर्यंतच लिफ्ट पोचली, तिचा दरवाजा उघडला व एकच अति रुबाबदार पाऊल पुढे टाकत चिण्णू त्यांच्यासमोर उभा राहिला. तिघा सुरक्षा जवानांनी धापा टाकतच त्याला सॅल्यूट केला. मग रीतीप्रमाणे त्यांनी त्याची संपूर्ण झडती घेतली. त्याचे सुप्रसिद्ध 0.9876, ’मोने-दाणी’ बनावटीचे TB-7-H-12, सात राऊंड्सचे, वाकड्या नळीचे सेमी-ऑटोमॅटिक रिव्हॉल्वर’; सन्नाटा-5’ हे बीन नळीचे, पाच राऊंड्सचे राऊंडेड बायकी पिस्तुल; विषारी सुया सोडणारे मृत्युलेख’ हे बॉलपेन व काखेखालील म्यानात बंदिस्त असणारा, दुधारी, निमुळता, अरुंद पात्याचा, 21 सेंमी ’गंजटोक’ हा गंजका सुरा या वस्तू काढून त्यांनी त्या शेजारच्या टेबलावर ओळीने मांडून ठेवल्या.
“’चीफ’ बहुतेक आपली वाटच पाहात असतील, सर ! ... स्पेशल चीफ डिटेक्टिव, डी-1-डी / D-1-D, कर्नल चिण्णू चिणमुणकर, सर !!” काहीतरी बोलायचे म्हणून त्यातील एक सुरक्षा जवान म्हणाला.
चिण्णूने आपल्या गंजक्या दुधारी सुर्‍यासारखी थंड नजर सुरक्षा जवानाकडे वळवली, “नुसतं ’महान चिण्णू’ म्हणत जा.” आपले प्रसिद्ध खदीर हास्य जवानांवर फेकून चिण्णू म्हणाला. मग आपल्या कातडी पट्ट्यातून पातळ, लवलवती, झाडाच्या सालीपासून बनवलेली, 32 सेंमी, ’सटपटीत’ ही सुरी काढून त्याने टेबलावरील इतर शस्त्रांशेजारी ठेवली.
“सॉरी सर -- सॉरी सर!” दुसरा जवान पुटपुटला. चिण्णू वाकला. आपल्या डाव्या पायाच्या मोज्यातून त्याने आणखी एक 5 सेंमी ’प्लॅकू’  हा प्लॅस्टिक चाकू टेबलावर ठेवला.
“सॉरी सर -- सर, हे इलेक्ट्रॉनिक व क्ष किरण कॅमेर्‍यावर दिसलं नव्हतं, सर – सॉरी सर!” तिसरा सुरक्षा जवान सटपटून पुटपुटला.
“म्हणून तर तुम्हाला इथं झडती घेण्यासाठी नेमलं आहे. कसली कामं करता रे येड्यांनो !” ओठांना मुरड घालत खदीड हसून चिण्णू म्हणाला व ते, जेवणाने बुद्धी आणखीनच मंद झालेले सुरक्षा जवान मठ्ठ्पणे त्याच्याकडे पहात असतानाच तो जिन्याकडे वळला.

No comments:

Post a Comment