अस्वीकृती (Disclaimer) - राजस्थान बॉर्डरवर डिटेक्टीव्ह चिण्णूची रबाडगिरी - 1
19 डिसेंबर 2007. दुपारी 03.40
19 डिसेंबर 2007. दुपारी 03.40
12वा मजला.
‘अन्वेषण व प्रतिबंध कार्यकारी विभाग’ ऊर्फ चीफ ’ची’च्या ऑफिसमधील स्टाफ चिण्णूच्या
आगमनासाठी तयारीतच बसला होता. खालच्या, अकराव्या मजल्यावरील सुरक्षा जवानांनी
झडतीत वेळ घालवल्याने या वरच्या ऑफिसमधील लोकांना तयार व्हायला नेहमीच जास्त वेळ
मिळत असे. त्यामुळे सर्वजण तरतरीत होऊन, चेहेर्यावर उत्साह आणून, ताठ बसून,
कार्यमग्न असण्याचा आव आणून, चिण्णूच्या आगमनाची वाटच पाहात होते. त्यांतील तिघी
तरुणींनी तेवढ्यात पर्समधल्या आरशात पाहून मेक-अप सारखा करून घेतला. दोन प्रौढ स्त्रियांनी
त्यांच्याकडे नापसंतीने पाहात आपले डाय केलेले केस नीट करुन घेतले व पदर सावरले.
स्टाफपैकी इतर दहा पुरुषांना चिण्णूचा हेवा वाटला. पण त्यांचाही तो हीरो होता. जिन्यावर
पावलांचा हलका दमदार आवाज आला आणि राजाच्या रुबाबात चिण्णूने प्रवेश केला.
चिण्णू -- महान चिण्णू चिणमुणकर --
सर्वांच्या ह्रदयाचे दोन ठोके जलद पडले. सर्वजण अतीव आदराने त्याच्याकडे
पाहात होते. फक्त ‘चिण्णू चिणमुणकर की ऽऽ -- जय!’ हे शब्द त्यांच्या तोंडातून
बाहेर पडले नाहीत, इतकेच. तो चिण्णू नावाचा, सहापूट तीन इंच उंचीचा, बारीक कमरेचा,
नाकतोड्यासारख्या हातापायांचा, बहात्तर किलो वजनाचा पुरुषोत्तम! त्याचा तो चिप्पुट
चेहेरा, लांबट वरवंटी डोके व ती सुप्रसिध्द रुबाबदार हॅट! शहरातील सर्वांत महागड्या
व कपडे बिघडवण्यात एक्सपर्ट असणार्या ‘कटर्स अॅंड स्टिचर्स’ टेलरिंग फर्म मधे
शिवलेला, किंचित बावळटपणा दाखवणारा त्याचा तो भारी, ढगळ सूट; गडद निळ्या रंगाचा,
गळ्यात बांधलेल्या दोरीसारखा दिसणारा, अगदी अरुंद, लांब, पॅंट मधे खोचलेला टाय;
लेटेस्ट फॅशनचे, एक ब्राऊन व एक ब्लॅक असे टोकदार बूट व किंचित लांडी पॅंट व बूट
यांच्यामधून डोकावणारे ऑफ-व्हाईट सुती मोजे! 26 जानेवारीला बहुतेक दर वर्षी विशेष शौर्यपदक
स्वीकारण्यासाठी तो येत असे तेव्हाच फक्त लोकांनी त्याला यूनिफॉर्ममधे बघितले
असेल. (अर्थात तेव्हा यूनिफॉर्ममधे तो चिण्णू म्हणून ओळखूच येत नसे.)
चिण्णूने प्रवेश केला आणि ओठांच्या डाव्या कोपर्यातून त्याचे ते सुप्रसिध्द ’कनीस’
हास्य त्याने सर्वांवर फेकले. मग गालाची हाडे वर आलेल्या आपल्या चिप्पुट चेहेर्यावरील
खोलगट गाल फुगवून शिट्टीवर जुनी लोकप्रिय धुन वाजवत (ही एकच धुन त्याला येत असे.)
व बोटांभोवती किल्लीची साखळी फिरवत तो सर्वांमधून हॉलच्या दुसर्या टोकच्या
दाराकडे गेला. जाता जाता त्याने इस्टेला फर्नांडिसकडे बघून डोळा मारला. त्याबरोबर
तिने ओठांचा ‘ओ’ केला व तिचे डोळे पांढरे झाले. निंजुळा नवाथेकडे त्याने फ्लाईंग
किस् फेकला तेव्हा त्या धक्क्याने ती खुर्चीवरुन कोलमडली. आशा खानच्या गालावर
त्याने चापटी मारली तेव्हा ती बेशुध्द पडली. मग त्याने, ‘यू नॉट्टी गर्ल’ असे
म्हणत मिसेस शिफा वर्मांचे नाक ओढले. त्यावर ‘निर्लज्ज मेला! चिण्णू तू अलीकडे
फारच चावटपणा करतोस हं. ह्यांना समजलं तर शूट करतील तुला!’ असं त्या म्हणाल्या.
तोपर्यंत, ‘हाय सेक्सी बेबी’ असे म्हणत चिण्णूने श्रीमती शायलिनीबाई संपकाळांचा गालगुच्चा
घेतला. त्यांनी खांद्दावरचा पदर आणखी घट्ट आवळून घेत शालीनतेने मान झुकवली व
‘चिण्ण्ण्ण्णू!’ असा नापसंतीचा उद्गागार काढला. पण चिण्णूने ’सेक्सी’ म्हटलेले
त्यांना आवडत असे व मिसेस वर्मांना ’गर्ल’ म्हटलेले आवडत असे हे सर्वांना माहीत
होते. शिवाय या ऑफिसमधे त्याला सर्व गुन्हे माफ होते. उद्या कदाचित तो जिवंत दिसणार
नाही आणि त्या ऑफिसच्या भिंतीवरील, देशासाठी प्राणार्पण करणार्या
डिटेक्टिव्हांच्या फोटोंच्या रांगेत त्याचा हळद, कुंकू, गंध लावलेला व
प्लॅस्टिकच्या फुलांचा हार घातलेला फोटो पाहावा लागेल हे सर्वांना माहीत होते.
हॉलच्या दुसर्या दाराजवळ तो पोचता पोचता त्याचे तीन ’डी-2’ श्रेणीचे
सहकारी त्याच्यासमोर आले आणि त्याला सॅल्यूट करुन रांगेत उभे राहीले.
“आज काय विशेष?” चिण्णूने सहज विचारले.
“आम्हाला कसलीही कुणकुण नाही.” डी-2-ए म्हणाला.
“कसला अंदाजही बांधता येत नाही.” डी-2-बी.
“म्हणजे अतीशय गंभीर आणि गुप्त असणार !” डी-2-सी.
“हं ऽऽऽऽऽऽऽ !” चिण्णूने
इतक्या खर्जातला व लांबवलेला ‘हंऽऽ’ केला की सर्वजण दचकले व यावेळचे प्रकरण फार,
म्हणजे फारच, म्हणजे फारच गंभीर असणार याची सर्वांनाच खात्री पटली.
How to make money off of gambling at gambling sites
ReplyDelete1.1 Introduction to gambling on Betway — When หาเงินออนไลน์ it comes to a sports betting site, it's all about the player's ability to win money. That's a big