19 डिसेंबर, दुपारी 04.05
चीफ ’ची’चे ऑफिस
“मे आय ---” चिण्णू.
“कम इन, कमिन !” चीफ.
“‘स्स्सर!!” चिण्णूने कडक सॅल्यूट ठोकला तेव्हा दचकून चीफ आणखी ताठ झाले.
“बस चिण्णू !” चीफने चिण्णूला प्रेमाने, नावाने हाक मारली. त्याचा अर्थ
यावेळची कामगिरी फार, म्हणजे फारच महत्वाची व धोकादायक असली पाहिजे हे चिण्णूने
झट्कन ओळखले. एखाद्या कामगिरीत चिण्णू नक्की मरणार असे चीफला वाटत असे तेव्हाच चीफ
त्याला प्रेमाने, नावाने हाक मारत असे. आत्तापर्यंतच्या अनेक अनुभवांवरुन हे
चिण्णूला माहीत होते. आणि तरी चिण्णू नवीन कामगिरीसाठी आज पुन्हा इथे जिवंत हजर
होता. म्हणजे तो किती ग्रेट असला पाहिजे.
“येस सर!” चिण्णू.
“तू वर्तमानपत्र वाचतोस?”
“होय सर.”
“मग सध्याची महत्त्वाची बातमी?”
“तपस्याचं ऋषिबरोबर लग्न झालं.”
“च्-च्-च्-च् ... चिण्णू, चिण्णू ऽ, बी सीरियस.”
“पण खरंच झालं सर! ... हां ! ती पाकिस्तानच्या पंतप्रधानांची भारत भेट! ... राजस्थानात
जैसलमेरजवळच्या ’लोंगेवाला’ आणि पाकिस्तानातील ’सैन वारी’ या
गावांमधे 29 डिसेंबर पासून भारत-पाकिस्तान दरम्यान ‘टांगा सवारी सेवा’ सुरु
होणार आहे. पाहिल्या सवारीतून पाकिस्तानचे पंतप्रधान भारताच्या पंतप्रधानांना भेटण्यासाठी
भारतात ...”
“पुरे, पुरे! मग तुझा अंदाज ?”
“सर -- मी सिगारेट पेटवू? म्हणजे विचार करायला ...”
“नको ! तुला माहितीयै मला वाससुध्दा ...”
“तुम्ही तेवढा चिरूट ओढायचा. आम्हाला साधी सिगारेट सुध्दा ...”
“मी तरी कुठे ओढतोय!? सिग्रेट ओढणं प्रकृतीला ...”
“तेच म्हणतो मी. त्यापेक्षा मला द्या. मी तरी ओढतो.”
“शटाप!”
“जरा इकडे तरी धरा. तेवढाच धूर नाकात जाईल आणि अंदाज करायला मेंदू तल्लख ...”
“शटाप!”
“राहिलं! ... त्यावेळी ते आपल्याला ’लोंगेवाला युद्ध-स्मारक’दर्शन
आणि रणगाडा राईडसाठी 35वा, चालू स्थितीतील, रणगाडा भेट देणार आहेत?”
“ चिण्णूऽऽऽ!!! बी सीरियस! आपलं डिपार्टमेंट कशासाठी आहे?”
“ खून?”
“येस”
“भारताचे पंतप्राधान?”
“नो”
“पाकिस्तानचे?”
“येस! -- हुशार आहेस. त्यासाठीच तुला
बोलावलं”
“म्हणजे मी करायचा?”
“मूर्खा! आपण नाही करायचा. आपल्याला तसं कितीही वाटत असलं तरीसुध्दा!!! ... ’जमात-ए-अतिरेकी’
ही संघटना तो करणार.”
“अरे वा ! छानच!! ... पण का? ती तर मुस्लिम अतिरेकी संघटना आहे. 1956 साली
काश्मीर बॉर्डरवर डोक्यात नारळ पडून मेलेल्या असित शेखच्या मुलानं ती चालू केली.
कारण असित शेखच्या फुटलेल्या डोक्याशेजारी फुटलेल्या नारळाबरोबर बॉंबचा गंजलेला
तुकडाही सापडला. तो हातात धरूनच त्यानं प्रतिज्ञा केली की ...”
“चिण्णू --”
“थोडक्यात सांगतो. मला पाठ आहे.”
“चिण्णू -- पुरे!”
“राहिलं”
“ती मुस्लिम संघटना असली तरी या पंतप्रधानांच्या विरोधी पक्षाच्या बाजूनं ती
आहे. या पंतप्रधानांचं टांगा चलावू धोरण त्यांना आवडत नाही. त्यांना क्षेपणास्त्राच्या
गतीनं जायचंय. आत्ताच्या पंतप्रधानांना मारल्यानं, त्यांना नको असलेले पंतप्रधान
मरतील हे एक, ते भारतात मेल्यानं आळ परस्पर भारतात येईल हे दुसरं आणि भारत-पाक
संबंध सुधारण्याच्या घोडदौडीला खीळ बसेल हे तिसरं. त्यामुळं भारत-पाक युद्ध सुरू
होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. त्यातून पुढं कदाचित ...”
“अणु-बॉंबचा वापर, जागतिक महायुध्द ... जगाचा विनाश! वॉऽऽऽ व ! एका गोळीत तीन
खून !” चिण्णूने शीळ वाजवली.
“गोळीनं नाही -- ही फाईल वाच.”
“एवढ्यात इतकी माहिती जमवून तुम्ही फाईलसुध्दा तयार केलीत? आपलं डिपार्टमेंट
इतकं कार्यक्षम कधीपासून झालं ?”
“शटाप! मी नाही. ही आजच पहाटे ई-मेलनं अतिरेक्यांनीच पाठवून दिली. म्हणून तर
आपल्याला कळलं. यात, ’पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा खून – संकल्पना, उद्देश, साहित्य,
मनुष्यबळ, प्रत्यक्ष कारवाई, खुनानंतरची परीस्थिती, परिणाम व फेर आढावा’ इथपर्यंत,
अगदी शेवटच्या तपशीलापर्यंत, माहिती त्यांनी दिली आहे.”
“अरे वा ! अखेर इतक्या वर्षांनंतर का होईना, हे लोक सुधारायला लागले तर!
पूर्वी आपल्यालाच सर्व शोधून काढायला लागायचं. पण मग -- इतकं सगळं त्यांनी ठरवलंच
आहे तर माझं काय काम?”
“तू तो खून होऊ न देण्याचा प्रयत्न करायचा. आणि जमल्यास अतिरेक्यांना
पकडून द्यायचंस.”
“अरेच्चा! ... खरंच की ! त्यासाठी तर आपलं डिपार्टमेंट आहे. मी समजत होतो, बरं
झालं. आणि खून परस्पर होतोय हे छानच आहे.”
“येड्या ऽऽ तसं नसतं. थोडं तरी आंतरराष्ट्रीय राजकारण, इथं काम करताना, एवढ्या
वर्षांत तुला समजायला हवं. ... तू ही फाईल वाच, प्लॅन नीट समजावून घे आणि तो हाणून
पाडण्याचा आपला प्लॅन तयार करुन मला भेट. हीच तुझ्याकडून माझी, आपल्या
पंतप्रधानांची, पाक पंतप्रधानांची व अतिरेक्यांचीही अपेक्षा आहे. दोन्ही
राष्ट्रांचं, जगाचं व अतिरेक्यांचही भवितव्य आम्ही विश्वासानं तुझ्या एकट्यावर
सोपवतो आहोत.”
“ठीक आहे. ... साधारण आठवडाभरात ...”
“आज तारीख कोणती?”
“19 डिसेंबर.”
“म्हणजे तू अभ्यास करून, प्लॅन आठवड्यानं तयार करणार, मग मला भेटणार, मऽऽऽग
तयारी करुन प्रत्यक्ष कामाला लागेपर्यंत दहा वेळा खून होऊन गेला असेल. उशीरात उशीर
26 डिसेंबरला अतिरेकी माझ्या हातात पाहिजेत. म्हणजे पुढील --”
“त्यांनी पकडण्याचा पत्ता कळवला आहे का?”
“चिण्णू!”
“हा अन्याय आहे. टांगा सवारी सेवा चालू होणार, त्यावेळी पाक-पंतप्रधान भारतात
येणार, त्यावेळी ते खून करण्याजोगे असणार, हे माहीत झाल्यापासून अतिरेक्यांना
तयारीला सहा महिने तरी मिळाले आणि मला फक्त सहा दिवस ?”
“मग किती?”
“भेट पुढं ढकलायला सांगा.”
“पंतप्रधानांना? तू डोक्यावर पडला काय?
आणि फक्त या दोन देशांचा प्रश्न नाही. ही ऐतिहासिक भेट होईल तेव्हा आकाशातून
हेलिकॉप्टरमधून या दोघांवर पुष्पवृष्टी करण्यासाठी अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स,
जर्मनी, रशिया व चीनचे प्रमुख येणार आहेत. आणि हा सोहळा बघण्यासाठी निरीक्षक
म्हणून यूनोचे अध्यक्ष या सर्वांवरुन विमानातून आकाशात घिरट्या घालणार आहेत.”
“हे मला माहीत नव्हतं.”
“ते उद्याच्या बातम्यांत प्रसिद्ध होईल. मुद्दा तो नाही. इतक्या सगळ्या बड्या
लोकांची गैरसोय करुन भेट पुढं ढकलता येणार नाही.”
“मग रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पाकिस्तानच्या पंतप्रधानांवर आणि त्यांच्या
प्रेता शेजारी गुडघे टेकून बसून कपाळावर हात आपटत आक्रोश करणार्या भारताच्या
पंतप्रधानांवर त्यांना पुष्पवृष्टी करायला सांगा.”
“चिण्णू ,चिण्ण्या, चिण्ण्ण्ण्याऽऽऽ, ...”
“जगाचं भवितव्य माझ्या एकट्यावर सोपवताना हा विचार तुम्ही करायला हवा होता.
आता का माझ्यावर चिडता?”
“ठीक आहे, ठीक आहे. मी प्रयत्न करीन.”
“कसून प्रयत्न करा. मला कमीत कमी तीन आठवडे तरी ... 10 जानेवारीच्या पुढे भेट
ठरवा.”
“अरे, हिंदु मुस्लिम पंचांगे बघून हा मुहूर्त काढला होता”
“खुनाचा?”
“बरं बाबा! मी करतो प्रयन. पण खात्री देत नाही. ... बेस्ट लक! ... तुला आणि
मला पण”
“आता सगळ्या जगालाच लक्ची जरूर आहे.”
चीफना या सगळ्याचे इतके टेन्शन आले की चिण्णू जाईपर्यंतही वाट न बघता त्यांनी
ड्रॉवरमधून व्हिस्कीची वाटली काढली व दोन मोठे घोट सरळ घशात ओतले.
No comments:
Post a Comment