पं. भीमसेन जोशी
आपल्या आयुष्यातील अत्यंतिक आनंदाच्या क्षणांपैकी कित्येक क्षणांवर भीमसेनजींचा हक्क आहे. ते त्यांनी निर्माण केले आहेत. त्या क्षणांची आठवण आपल्याला आहे तोपर्यंत ते आपल्यातच आहेत. ते आपल्या आयुष्याचा भागच आहेत असं मला वाटतं.
या “सवाई गंधर्व महोत्सवाला” (डिसेंबर १०) मी गेलो असताना पं. शिवकुमारजींच्या संतूर-वादनाआधी ते आले व तो कार्यक्रम होईपर्यंत थांबले. मी त्यांना प्रत्यक्ष पाहू शकलो नाही (फक्त CCTV च्या पडद्यावर पाहिलं). पण तेवढा काळ संपूर्ण परिसराची भारलेली अवस्था मी अनुभवली. खुद्द पं. शिवकुमारजींनीही त्याच भारलेल्या अवस्थेत संतूरवादन केलं असावं असं वाटतं. तो सर्वच एक अविस्मरणीय अनुभव होता.
अगदी लहानपणी मी वडिलांबरोबर भीमसेनजींचा कार्यक्रम “शिवाजी मंदिरात” (पुण्यात होते) समक्ष पहिल्यांदा ऐकला. तेव्हा त्यांनी गायलेला मारुबिहाग माझ्या अजून कानांत व मनात आहे. त्यातील “रसिया हो ऽऽ ना जाऽऽ ...” या विलंबित ख्यालापेक्षा “तडपतऽ रैनऽ दिनऽ” ही द्रुत चीज मनात जास्त ठसली. त्याचं कारण त्या चीजेची ठेवण आणि त्यांची त्यावेळची जोषपूर्ण गायकी. खांदे घुसळून जोरकस तान घेताना खाली वाकून त्यांचं डोकं जमिनीला टेकायला आलं की भूकंप होतोय असं वाटायचं. “पियाबिन मोरा जिया तरसे” कळण्याइतका मी मोठा नव्हतो पण ते “पियाबिन तरसतायत” असं वाटण्याऐवजी त्या तडपण्याचा ते पियाला जाब विचाराहेत अशा आवेशात ते गायले हेच लक्षात आहे. त्याची आठवण याच (सवाई गंधर्व महोत्सव) कार्यक्रमात आनंदगंधर्व (श्री. आनंद भाटे) यांनी गायलेल्या मारुबिहागाने इतक्या वर्षांनी पुन्हा करून दिली.
नंतर जरा समजायला लगल्यावर त्यांचा (पुण्यात) “भारत गायन समाजात” झालेला एक कार्यक्रम ऐकायला मिळाला. त्यावेळी आमच्याकडे भावेबुवा (रामभाऊ भावे) आईला गाणं शिकवायला येत असत. (भावेबुवांबद्दल नंतर कव्हातरी.) तेही सवाई गंधर्वांचे शिष्य. त्यांच्यामुळे ह्या कार्यक्रमाला जाता आलं. कार्यक्रम संध्याकाळी सहा-सव्वासहाला सुरू झाला. कार्यक्रमाला फक्त ७०-८० लोक असतील. मी सात-आठ फुटांवरून त्यांना ऐकलं व पाहिलं. त्यांची जादू व त्यांच्या गाण्याची खरी ओळख तेव्हा पहिल्यांदा झाली. पूरिया-धनाश्री आणि “पाऽऽऽर कर अर्ज सुनो” ही खर्ज “नी”वर सम असलेली झपतालातली चीज आणि “पायलिया झंकार ऽऽ” ही द्रुत त्रितालातील चीज यांचीही पहिली ओळख हीच. त्या विशिष्ट वेळी ही ओळख भीमसेनजींनी करून दिली हे माझं भाग्य. चंद्रकांत कामतांनाही तेव्हा मी पहिल्यांदा पाहिलं. (नंतर भीमसेनजींचं गाणं म्हणजे तबल्याला चंद्रकांत कामत हे समीकरणच होतं.)
याच सुमाराला एका कार्यक्रमात मी त्यांची “जो भजे हरीको सदा, वोही परमपद पाएगा” ही भैरवी ऐकली. सगळ्यांनाच ती नवीन होती. भीमसेनजींनीही बहुधा ती पहिल्यांदाच गायली होती. तोपर्यंत भैरवी म्हणजे भैरवी ठुमरी असा समज असावा. या भक्तीगीताने त्यांनी तो कायमचा पुसून टाकला. हळूहळू त्यांनी आम्हाला सुरांच्या ओंजळीत हलकेच अलगद उचलून परमपदाशी आणून सोडलं. तो एक अविस्मरणीय आनंदानुभव होता. ही भैरवी मी नंतर अनेकदा ऐकली.
नंतर “सवाई गंधर्व महोत्सवात” त्यांचं गाणं असंख्य वेळा ऐकलं. एक-दोन वेळा मुद्दाम मध्यरात्री बसून मालकंस, दरबारी गायले होते पण बहुधा शेवटी सकाळी बसत. (सकाळची नंतर-नंतर दुपार होत असे.) त्यामुळे ललत, रामकली, कोमल-रिषभ आसावरी आणि तोडीचे प्रकार. तोडी तर चार-पाच वेळा ऐकला. प्रत्येक वेळी वेगळा. पहाटे पाचला भक्ती, आळवणी आणि शांतीनं ओथंबलेला तोडी. तो संपतासंपता जणू परमेश्वराच्या कृपाप्रसादामुळे उजळलेल्या दिशा आणि दुपारी बाराला कडाक्याच्या थंडीत उन्हाच्या उबेबरोबरच चटकाही बसावा त्याप्रमाणे भक्तीबरोबर विरक्ती आणि आध्यात्मिक अनुभूतीची नशा (किंवा समाधी अवस्था?).
“अभंगवाणीच्या” अगदी सुरुवातीचा काही कार्यक्रमांपैकी एक केसरीवाड्यात (बहुधा गणपती-उत्सवाच्या काळात) झाला होता. तुडुंब गर्दीत एका कडेला पण त्याच्यापासून बारा-पंधरा फुटांवरून, उभं राहून मी तो ऐकला. त्यांच्या शास्त्रीय गायनापेक्षा तो वेगळाच अनुभव होता.
८ वर्षांपूर्वी (डिसेंबर २००२ साली) सुवर्णमहोत्सवी “सवाई गंधर्व महोत्सवात” त्यांचं गायन मी अगदी समोर बसून ऐकलं ते (मी प्रत्यक्ष ऐकलेलं) शेवटचं. त्यावेळी ते दिसायला थकलेले, कृश, कोणाचा तरी हात धरून सावकाश मंचावर आले व पाय खाली सोडून बसले. कसंतरीच वाटलं. पण त्यांनी गायला सुरुवात केली ती नेहमीच्या आवाजात. पण आताचं गाणं अथांग, गंभीर, दैवी. त्यात आक्रमकता, अभिनिवेश काही नाही. ते स्वयंभू, स्वयंसिद्ध, सिद्ध, तपस्वी. संगीताचे अनभिषिक्त सम्राट! ते सागरासारखे आणि आपण त्यात निर्भयपणे डुंबतोय कारण त्यांच्या स्वरलाटांवर त्यांनी आपल्याला अलगद उचलून धरलेलं. गाणं खूप गहन पण त्यांनी आपल्यापुढे सोपं करून, उलगडून दाखवलेलं. शिवाय हातांच्या हालचालींनी समजावूनही दिलेलं. त्यांच्या आयुष्यभराच्या तपश्चर्येचं फळ त्यांनी आपल्याला आपली लायकी नसताना दान केलेलं.
(याच कार्यक्रमात मी विलायतखॉंसाहेबांचं सतारवादन ऐकलं तेही शेवटचं. कारण त्यानंतर १३ मार्च २००४ रोजी ते गेले.)
यांतील बहुतेक सगळे अत्यंत अमूल्य कार्यक्रम मी फुकट ऐकले व पाहिले.
त्यांचं गाणं पाहणंही तितकंच महत्त्वाचं. त्यावेळी काही लोक गातानाच्या त्यांच्या हातवार्यांना नावे ठेवत. आत्ता त्यांनी आकाशातून दोन स्वर आणले, आता इकडून स्वर आणून तिकडे फेकले, आत्ता फुले खुडत असताना एकदम श्रोत्यांची कापाकापी चालू केली, वगैरे. पण त्या काळात त्यांच्या हातवार्यांमुळे मला गाणं जितकं समजलं तितकं इतर कशामुळेही नाही.
रेकॉर्ड्स तर किती आणि किती वेळा ऐकल्या याची गणतीच नाही. रामकली, कोमल-रिषभ आसावरी, ललत, तोडी, मुलतानी, यमन, पूरिया, पूरिया-कल्याण, मारवा, दुर्गा, शुद्ध-कल्याण, छायानट, अभोगी, दरबारी, मियॉं-मल्हार, सूरमल्हार, इ. रेकॉर्ड्स मधल्या जागान्जागा पाठ आहेत. मनात केव्हाही असमाधान, खळबळ असेल तर त्यांची (कुठलीही) रेकॉर्ड लावावी व मन स्वच्छ, शांत करावं.
व्यवहारी जगात लडबडणार्या आपल्यासारख्या असमाधानी, अशांत, कोरड्या, अश्रद्ध जीवांना प्रेम-शृंगाराबरोबरच शांती, समाधान, भक्ती, समर्पण आणि विरक्ती यांसारख्या अनुभूतींपर्यंत भीमसेनजींनी (आणि त्यांच्यासारख्याच अनेक गायक, वादक, चित्रकार, शिल्पकार, नर्तक, लेखक यांनी) पोचवलं आणि माणूसपणाच्या जवळ आणलं.
आणि यांच्यापर्यंत आम्हाला आमच्या आई-वडिलांनी आणि काही शिक्षकांनी पोचवलं. यांच्यापर्यंत म्हणजे – भीमसेनजी, अमीरखॉंसाहेब, कुमारजी, जसराजजी, मल्लिकार्जुन, पन्नालाल घोष, अली अकबर खॉंसाहेब, पं. रविशंकर, विलायतखॉंसाहेब, पं. शिवकुमार आणि पु. ल., जी. ए., कुसुमाग्रज, ग्रेस, खानोलकर आणि उदयशंकर, बिरजूमहाराज आणि मायकेल एंजेलो, मूर, दिलवाडा मंदिरं, वेरूळ, ताजमहाल, अजिंठा आणि राजा रविवर्मा, हेब्बर, बेन्द्रे, सडवेलकर, गॉग, पिकासो, आणि ... ...
संस्कार म्हणजे शेवटी चांगलं काय ते समजणं आणि त्याच्या जवळ पोचण्याचा प्रयत्न करत राहाणं. आणि माणूसपणाच्या जवळ जाणं.
हे सर्व लोक आमच्यात, आमच्याबरोबर आहेत म्हणून आम्ही आहोत.
हे सर्व आमच्या आयुष्यातून काढलं तर मग आमच्यात काय उरलं?
khupach amazing zalay ha lekh. very very nice!!! actually don't hv words to express.
ReplyDeletemi tyana fakt ekdach live aikala aahe. savai madhech. ani mala kahihi technicalities kalat nahit. tari suddha tu mhanala ahes tasa bharavlela watavaran mi hi anubhavala aahe he ata bara vatatay. tyachi dhundi explain nahi karta yete.
malavika
From Milind (thro' Swamini's login)
ReplyDeleteWhile writing this, it must be for yourself and later you may have thought to share. If so, it must come in a good newspaper like Sakal. 'Sanskar' not only dissolves a person in humanity, but also brings him near to 'devatwa'. You know, I cried while reading your article for losing such a family member - because the nearness and dearness is all in our minds. Why people try to make this world materialistic and why they are always unhappy is an age old question. I always feel, why did I come in this world at wrong time ... suddenly a taaan of Bhimsenji comes from some distant radio floating on air waves and all such thoughts vanish because we are those fortunate ones who have actually heard and seen these great people just from a few feet away. We are also the lucky ones to have such wonderful parents who made this possible.
हे सर्व आमच्या आयुष्यातून काढलं तर मग आमच्यात काय उरलं?....that's the essence. after his demise, i have a strong feeling that i am not even capable of understanding his greatness. i am truly grateful to him and some others like him....because of whom some divine moments came my way.
ReplyDeletethanks sir for such a nice article.
Dear Dr.Rajan,
ReplyDeleteI am extremely delighted to read this Article and impressed to look one more Classical Sangit knowledge dimension of your personality. I am blessed with the life time association of person like yours. with respect. Kiran