MahaGanapati Mandir

MahaGanapati Mandir
महागणपती मंदिर, वाई, महाराष्ट्र.

मनातलं

ज्या यशाने उन्माद येईल असं यश मला नको. ज्या यशाने इतरांच्या त्या यशातील वाट्याबद्दल कृतज्ञता मनात दाटून येईल आणि अधिक विनम्रता येईल ते खरं यश.

Tuesday, February 16, 2016

कृष्ण, अर्जुन, घोडे आणि मी

सकारात्मक विचारपद्धती - 1

कृष्ण, अर्जुन, घोडे आणि मी


महाभारतीय युद्धाच्या आधल्या दिवशी विमनस्क, ओढलेल्या आणि चिंतातूर चेहेर्‍याने कृष्ण माझ्याकडे आला. त्याचे डोळे भरून आले होते.  
काय झालं?
अरे डॉ. राजन प्रभुणे, मला वाचव!
आधी शांत हो पाहू! आणि मला नीट सांग, काय झालंय. मग पाहूया काय करता येईल ते.
मी मोठ्या संकटात सापडलोय.
शक्य ते सगळं मी करीन. आधी कळू तर दे काय झालंय ते!”
काय करावं, मला काहीच कळत नाहीये. सर्व दिशांनी अंधारून आलंय. काही दिसेनासं झालंय. माझे हातपाय गळून गेलेय्‌त, छातीत धडधडतंय आणि तोंडला कोरड पडलीये. प्रसंगाच्या जबाबदारीनं मी इतका दडपून गेलोय की माझं डोकंच बधीर झालंय.”  
ही तर अर्जुनाची अवस्था असायला पाहिजे. आणि उद्या ही त्याची वाक्यं असतील.” 
“पण ते उद्या. ही माझी आत्ताची अवस्था आहे.” 
शहाणे लोक ज्याला ’कींकर्तव्यमूढ’ म्हणतात तशी तुझी अवस्था झाली आहे. त्यालाच ’गलित गात्रे, लिब्बीण मेंदू लक्षणसमूह” किंवा थोडक्यात ’टेन्शन लक्षणसमूह’ म्हणतात.”   
काय म्हणतात ते नको. मी आता काय करू? प्लीज मला मदत कर.” आणि कृष्ण रडायला लागला.
शांत हो! शांत हो!! ... तू सारथी आहेस म्हणून तुला टेन्शन आलंय का?
अजीबात नाही. खरं तर सारथी म्हणून मला काहीच करायचं नाहीयै. अर्थात, युद्धात माझा स्वतःचा जीव वाचवण्याशिवाय. आणि युद्धनीतीप्रमाणे सारथ्याला मारणं निषिद्ध आहे. पण, तुला माहितीच आहे, हल्ली कुणाला नीतीची चाड आहे? ... पण, मला पुरेशी सुरक्षितता आहे. आणि घोडे तर उत्तमच आहेत.
त्यांना टेन्शन आहे का?
मुळीच नाही. का असेल? ते उच्च-प्रशिक्षित आणि तयारीचे आहेत. शिवाय तुझ्या ’तणाव नियंत्रण आणि नियमन प्रशिक्षण वर्गाला’ त्यांना पाठवण्याचीही खबरदारी मी घेतली होतीच. त्यातही त्यांनी उच्च प्रशिक्षण पूर्ण केलंय.”
हंऽऽऽ! … अशी काही शक्यता, कीऽ ... तू सारथी आहेस याचं त्यांना टेन्शन आलंय?”  
बास्‌ का, प्रभुण्या! ... पण .. ते त्यांचं काम चांगलं जाणतात. आणि कोणीही सोम्या-गोम्या सारथी असला तरी ते ते चांगलंच करतील.”
“हनुमानाला टेन्शन आहे का?”
“त्याला का?”
“तुझ्या रथ चालवण्यानं आपण झेंड्यावरून पडू ...”
“तुझं कैत्तरीच हं!”
“मी आपल्या सगळ्या शक्यता तपासून बघतोय.”
“तो जन्मापासून झाडाच्या फांद्यांच्या टोकावर बसत आलाय.”
मग प्रश्न काय आहे?”
उद्या कुरुक्षेत्रावर पोचताच अर्जुन युद्धाला सामोरा जाईल आणि तोही ’किंकर्तव्यमूढ’ किंवा तू काय म्हणालास ते, ’गलित गात्रे, लिब्बीण मेंदू लक्षणसमूहाने’ व्याकूळ होईल.”
युद्धपरीस्थितीत सर्वच जण होतात. आणि होणारच!
आणि त्यात नातेवाईक आणि आपल्या माणसांबरोबर युद्ध!
प्रत्येक युद्ध आपल्या स्वतःबरोबर, स्वतःच्या माणसांबरोबरच असतं.”
आत्ता तत्त्वज्ञान नकोय! सर्व प्राणिमात्रांत एकच परमात्मा, म्हणजे मी, राहातो या अर्थी मीच माझ्याबरोबर सारखा लढत असतो, जगणं हेच जगण्याबरोबरचं युद्ध आहे, जीवो जीवस्य जीवनम्‌, हे तू मला सांगू नकोस. नाही! तत्त्वज्ञान मला उद्या युद्धभूमीवर काही उपयोगाचं नाही.
ठीकाय्‌! पण वाईट गोष्टींची अपेक्षा का करतोस? जरा सकारात्मक विचार कर!
नाही.”
का? हे शक्य आहे, की तुला वाटतं तशी अर्जुनाची प्रतिक्रिया नसेलही.
नाही.”
ओह्‍! ... उद्या तो या सगळ्या ’नातेवाईक आणि आपली माणसं’, ज्यांनी त्याला नेहमी त्रासच दिला, त्याचे हक्क डावलले, द्रौपदीची विटंबना केली, त्याचं सगळ आयुष्यच दुःखमय केलं, इतकंच नव्हे तर त्याला मारण्याचा सुद्धा अनेकदा प्रयत्न केला, त्यांना समोर पाहील. आणि त्याच्या लक्षात येईल, अखेर ती वेळ आली. हीच ती शेवटची सूडाची संधी.
नाही.”
त्याचा राग उफाळून येईल, ...
नाही.”
त्याची छाती फुगेल, बाहू आणि मांड्या फुरफुरू लागतील, ...
नाही.”
आणि तो त्याचा ’पांचजन्य’ शंख आवेशाने फुंकेल.”
नाही, नाही.”
होय! ... आणि त्याची समजूत काढण्याची वेळच तुझ्यावर येणार नाही.
नाही! नाही!! नाही!!! तो नक्कीच ’किंकर्तव्यमूढ’ होणार. मी अर्जुनाला जेवढं ओळखतो, आणि खूपच प्रदीर्घ काळ ओळखतो, त्यावरून माझी तशी खात्रीच आहे. युद्धाचा विचारही त्याला सहन होणार नाही आणि तो ’गलित गात्रे, लिब्बीण मेंदू लक्षणसमूहाने’ घायाळ होणारच.”
का? तो सर्वोत्तम, उच्च प्रशिक्षित आणि तयारीचा नाहीयै का? तुझ्या घोड्यांप्रमाणेच?
होऽ! पण त्यात फरक आहे. शेवटी घोडे ते घोडे आणि माणूस तो माणूस. आणि, वाईट वाटून घेऊ नकोस, पण, असं दिसतंय की तुझं ’तणाव नियंत्रण आणि नियमन प्रशिक्षण’ घोड्यांच्या बाबतीत जितकं उपयोगी आणि प्रभावी ठरतंय तितकं माणसांच्या बाबतीत नाही.” 
हंऽऽ! ... तू पण वाईट वाटून घेऊ नकोस, पण तू सारथी आहेस म्हणून तर अर्जुनाला टेन्शन आलेलं नाहीयै ना?
काही कारण नाही. ... शेवटी त्यानं मला निवडलंय. माझा प्रश्न आहे, उद्याच्या त्याच्या ’किंकर्तव्यमूढ’ अवस्थेत मी त्याला काय सांगू?
सांग त्याला, आता हे लोक तुझ्या बाजूला उभं राहाण्याऐवजी तुझ्या समोर उभे आहेत, तेही सशस्त्र, तुझ्याशी युद्ध करण्याच्या हेतूनं, म्हणजे ते काही आता तुझे आपले लोक नाहीत. ...” 
हं. बघतो.
आणि जर तू त्यांना मारलं नाहीस तर ते तुला नक्की मारतील.
मी प्रयत्न करतो.”
प्रयत्न नको, सांग त्याला!”
ओह्‍ ! ते नाही. माझा प्रश्न आहे, मलाच तसं ... ’गलित गात्रे, लिब्बीण मेंदू’ असं वाटत असताना मी त्याला कसं आणि काय सांगू?” 
असं काय! सकारात्मक विचार कर! सकारात्मक हो!! ... ओह्‍, पण हे सगळं मी तुला का सांगतोय? तू फक्त त्याला ’गीता’ सांग. त्यासाठीच तर तू ती निर्माण केलीयेस ना? तू ती निर्माण केलीयैस. आणि खूप कष्ट घेतलेय्‌स त्यासाठी, मला माहितीयै. आणि तू ती पाठ करून गेले काही दिवस म्हणण्याचा सराव पण करत होतास. फक्त याच दिवसासाठी. आणि तो दिवस आलाय्‌ऽऽ.
हो! पण हे सगळं अर्जुनाच्या बाबतीतही खरं आहे. तरीही त्याला ’गीता’ म्हणून दाखवायला माझी गरज पडतेच आहे ना!? ... ह्या प्रचंड जबाबदारीच्या ओझ्याखाली मी दडपून गेलोय. ... मी कृष्ण भगवान, विश्वनिर्माता आहे. अशा परीस्थितीतील जगातील सर्व ’किंकर्तव्यमूढ’ अर्जुनांसाठी मी ’गीता’ निर्माण केलीयै. पण माझ्यासाठी कोण ’गीता’ म्हणणार? मला स्वतःलाच पटलेलं नाही, पुरेसा विश्वास नाही आणि आत्मविश्वासही नाही. मग मी त्याला कसा आणि काय सल्ला देऊ?
ओऽऽऽह्‌!!! ... पण, तुला कसं वाटतंय याचा संबंध नाही. तू समुपदेशक आणि सल्लागार आहेस. तू टेबलामागे आरामात आत्मविश्वासानं बसायचं आणि तुझे थरथरणारे पाय त्याला दिसणार नाहीत याची खबरदारी घ्यायची म्हणजे झालं ... जसं मी आत्ता करतोय्‌.”
तोच तर प्रश्न आहे ना! तिथे युद्धभूमीवर मोठ्ठा टेबलक्लॉथ घातलेलं टेबल मी कुठून आणू?.”
हंऽऽ हा प्रश्न आहे खरा. ... मला जरा विचार करू दे. ...
विचार नको करूस. सांग मला.”
होऽऽ! ... ... तुम्ही कुरुक्षेत्राच्या विस्तीर्ण प्रदेशावर असाल. आणि दोन्ही सैन्यांच्या मधे. जवळ कोणीच नाही. तेव्हा काय चाललंय ते कुणालाच कळणार नाही. अर्जुन रथातून खाली उतरेल आणि तुझ्या पायाशी गुडघे टेकून दिनवाण्या चेहेर्‍याने बसेल. तुझ्याकडे वर बघत. तेव्हा खाली तुझे थरथरणारे पाय त्याला दिसण्याचा प्रश्नच येत नाही. आणि असंही अशा गोष्टींकडे बघण्याच्या मनःस्थितीत तो नसेलच. ... आणि तिथे टेबल नसेल, पण तुला पीतांबर नेसण्याचा फायदा मिळेल. त्यात तुझे थरथरणारे पाय झाकले जातील. ... मग तू तुझी, नंतरच्या चित्रकारांनी प्रसिद्ध करून ठेवलेली, अर्धोन्मीलित सर्वज्ञानी नेत्रांनी अर्जुनाकडे मंदस्मित करून बघणारी मुद्रा आणि चतुर्भुज, रथाशेजारी उभा, उजवी तर्जनी उंचावलेली, सुदर्शनचक्रधारी, अशी पोझ घेऊन उभा राहाशील. फक्त थोडा बदल करूया. पायांतील अवसान गेल्यामुळे पडू नये म्हणून तुझ्या तिसर्‍या आणि चौथ्या हातांनी रथ घट्ट धर. ... मग पाच वेळा दीर्घ श्वास घे आणि मग ’गीता’ म्हणायला सुरुवात कर. ...”
हंऽऽ ... पण ... आणि जर मी ’गीताच’ विसरलो, माझ्या तोंडून शब्दच फुटेनासा झाला तर ... ?”
ओह्‌! प्रश्न आणि प्रश्न! ... असंही तिथे तू अर्जुनाला काय सांगतोय्‌स हे ऐकायला कोणीच नसेल. तेव्हा तू काहीही बडबडायला सुरुवात कर, त्यानं तुझा आत्मविश्वास वाढेल. मग त्यावेळी तुझ्या मनात येईल ते तू सांगायला सुरुवात कर, त्यानं त्याचा आत्मविश्वास वाढेल. सांग त्याला, आता जर तू उठून लगेच युद्धाला सुरुवात केलीस तर मी तुला लॉलीपॉप देईन, किंवा ... हे आईस्क्रीम मी तुला युद्धानंतर देणाराय, युद्ध लवकर संपवून लगेच आलास तर ते वितळायच्या आत तुला खाता येईल, किंवा ... असो. नंतर, खूप नंतर – अर्थात युद्धानंतर – गीता’ म्हणून तुला जे तत्त्वज्ञान सांगायचं आहे त्यात तू तुला हवी तेवढी भर घालू शकतोस, दुरुस्त्या करू शकतोस, पुन्हा लिहू शकतोस किंवा संस्करण करू शकतोस. ती शेवटी छापायला जाईपर्यत.”
ओह्‌! डॉ. प्रभुणे. तू मला आज वाचवलंस. मी तुझा -
नंतर.”
काय?”
आभार प्रदर्शन समारंभ!”  
ओह्‌! ठीकय. पण तरी आभार. मी तुझ्यासाठी काय करू?”
आता नाही. नंतर. युद्धानंतर! मला फक्त ’गीतेची’ एक प्रत दे. मी ती वाचीन आणि माझ्या मेंदूतले विस्कटलेले धागे जुळवीन आणि माझ्या हृदयाची धडधड आणि पायांची थरथर शांत करण्याचा प्रयत्न करीन.”  

1 comment:

  1. Jamlay Kaka!

    We actually don't know whether 'Geeta' that is shown to us today as told by Shrikrishna..was actually told before war! There is a possibility of someone later adding it.

    ReplyDelete