माणूस आणि “चिऊ” नावाची चिमणी
एक माणूस होता आणि एक चिमणी होती. तिचं नाव चिऊ. पहिल्यांदा चिऊ त्याला चिऊ-काऊच्या गोष्टीत भेटली.
तेव्हा तो अगदीच छोटं बाळ होता आणि ती जणू त्याची आईच होती.
ती पावसात वाहून न जाणारं मेणाचं घर त्याच्यासाठी बनवणारी, त्याला खाऊ-पिऊ घालणारी, नीटनेटकं टेवणारी, जपणारी, काळजी घेणारी, नेहमी दक्ष, अशी त्याची आई.
पण तेव्हा त्याला ते माहीत नव्हतं.
तेव्हा त्याला काहीच कळत नव्हतं.
एक माणूस होता आणि एक चिऊ होती.
ती त्याला अंगणात भेटली. चिऊ-चिऊऽऽ करणारी, उड्या मारत हिंडणारी, दाणे टिपणारी, भुर्रर्रर्रर्रर्रकन् उडून जाणारी, पुन्हा भुर्रर्रर्रर्रर्रकन् येणारी.
तेव्हा घराला अंगण होतं. अंगणाच्या पायरीवर, आजीच्या मांडीवर बसून, चिऊ-काऊची गोष्ट ऐकत, तो तेव्हा चिऊला दाणे टाकत असे. ते खायला ती जवळ येई. नवीन चालत्या, अडखळत्या पावलांनी तो तिला पकडायला धावला की ती पुन्हा भुर्रर्रर्रर्रर्रकन् उडून जाई. पुन्हा भुर्रर्रर्रर्रर्रकन् येई.
ती चिऊ-काऊच्या गोष्टीतून उतरून अंगणात आली आणि खरी झाली.
पण तेव्हा त्याला ते माहीत नव्हतं.
तेव्हा त्याला काहीच कळत नव्हतं.
एक माणूस होता आणि एक चिऊ होती.
मग ती दुसर्या गोष्टीत जाऊन बसली. आजोबांची आवडती, न संपणारी गोष्ट.
एक धान्याचं कोठार होत. त्यात अनेक माणसं दर वर्षी धान्य आणून टाकत.
कोठाराला एक छोटी खिडकी होती. तिच्यातून एक चिमणी येई, एक दाणा घेई आणि भुर्रर्रर्रर्रर्रकन् उडून जाई.
एका वेळी फक्त एकच चिमणी आणि दर वेळी फक्त एकच दाणा. तिच्या छोट्या चोचीत मावेल एवढा. तिचं छोटं पोट भरेल एवढा. अशा अनेक चिमण्या.
एक चिमणी येई, एक दाणा घेई आणि भुर्रर्रर्रर्रर्रकन् उडून जाई.
आणखी एक चिमणी येई, एक दाणा घेई आणि भुर्रर्रर्रर्रर्रकन् उडून जाई.
आणखी एक चिमणी येई, एक दाणा घेई आणि भुर्रर्रर्रर्रर्रकन् उडून जाई.
आणखी एक चिमणी येई, एक दाणा घेई आणि भुर्रर्रर्रर्रर्रकन् उडून जाई.
धान्याचं कोठार रिकामं होईपर्यंत नवीन वर्षाचं धान्य येऊन ते पुन्हा भरून जाई.
त्या गोष्टीत धान्याचं कोठार कधी रिकामं होत नसे आणि गोष्ट कधी संपत नसे.
आणि तोपर्यंत चिमण्यांना आणि माणसांनाही धान्य कधी कमी पडत नसे.
हे खूपच सुरक्षित आणि समाधानकारक होतं. त्यात एक आश्वासन होतं. चिमण्यांच्या उडण्याचा भुर्रर्रर्रर्रर्र आवाज येतो आहे तोपर्यंत कोठार रिकामं असणार नाही आणि कोणाला काही कधी कमी पडणार नाही अशी श्रद्धा त्यात होती.
पण हे त्याला तेव्हा माहीत नव्हतं.
तेव्हा त्याला काहीच कळत नव्हतं.
ती एक-एक गवताची काडी घेऊन यायची, खिडकीच्या गजावर बसून आत डोकावायची आणि मग घरात शिरायची.
अशी चिमणीची आणि चिमण्याची घरात भुर्रर्रर्रर्रर्र भुर्रर्रर्रर्रर्र चालू असायची.
त्यांनी घरात आजी-आजोबाच्या हार घातलेल्या फोटोंमागं घरटं बांधलं होतं. घरात घर.
तेव्हा भिंतींवर आजी-आजोबा, पणजी-पणजोबा आणि देव-देवतांचे खूप फोटो असायचे. त्यांच्या फोटोंमागे चिमण्यांच्या घरट्यांतले आणि त्यांच्या फोटोंतून बघणार्या प्रेमळ नजरांसमोर घरांतले संसार फुलायचे. घरभर चिमण्यांचा आणि मुलामुलींचा अखंड चिवचिवाट चालू असायचा.
त्यांतला एक मुलगा म्हणजे तो असायचा.
पण हे त्याला तेव्हा माहीत नव्हतं.
तेव्हा त्याला काहीच कळत नव्हतं.
Pharach chaan!!! He naveen pustak hoil "Navabodh katha"
ReplyDelete