माणूस आणि "चिऊ" नावाची चिमणी
एक माणूस होता आणि एक चिऊ होती.
एकदा घरातले फोटो साफसफाईला काढले. चिमणा-चिमणी उडून गेले. फोटोमागचे चिमणा-चिमणीचे घरटे खाली पडले. गवताच्या काड्या उसकटल्या. एक उडता न येणारे पिल्लू खाली पडले.
तो धावत पाणी घेऊन आला. कुणीतरी त्याला थांबवले.
माणसाचा हात लागला तर चिमण्या त्या पिल्लाला आपल्यात घेणार नाहीत. ते मरून जाईल.
हे ऐकून त्याला धक्का बसला. त्या त्याला आपल्यात का घेणार नाहीत?
पिल्लू त्याच्या डोळ्यांदेखत मेले. चिमण्याही त्याला वाचवू शकल्या नाहीत. नुसत्याच त्याच्याभोवती फडफडत, तडफडत राहिल्या. चिवचिवत राहिल्या. ते ऐकवत नव्हते.
एक घर उद्ध्वस्त झाले. ... म्हणजे काय? ... का? कुणामुळे?
तेव्हा त्याला ते माहीत नव्हते.
तेव्हा त्याला काहीच कळत नव्हते.
एक माणूस आणि एक चिऊ. त्याच्या सतत अवतीभोवती उडणारी, सतत चिवचिवणारी. कळायला लागल्यापासून खूप ओळखीची, सवयीची.
ती आणि इतर पाखरे. चिऊ, काऊ, राघू, मैना, बगळा, बुलबुल, ... ती मोकळी स्वतंत्र पाखरे.
त्यांना माणसाचा हात लागलेला चालत नाही. माणसाचा हात लागला की ...
त्याला धक्का बसला.
इतक्या ओळखीत इतका परकेपणा? इतका अविश्वास, इतकी भीती? ... का?
माणसाचा हात इतका वाईट आहे?
तेव्हा त्याला हे माहीत नव्हते.
तेव्हा त्याला काहीच कळत नव्हते.
photos khup mast aahet
ReplyDelete