MahaGanapati Mandir

MahaGanapati Mandir
महागणपती मंदिर, वाई, महाराष्ट्र.

मनातलं

ज्या यशाने उन्माद येईल असं यश मला नको. ज्या यशाने इतरांच्या त्या यशातील वाट्याबद्दल कृतज्ञता मनात दाटून येईल आणि अधिक विनम्रता येईल ते खरं यश.

Monday, March 7, 2011

माणूस आणि चिमणी - ३


माणूस आणि चिमणी - ३ 

एक माणूस आणि एक चिऊ.
ती त्याला कॉलेजमधे भेटली. नाचर्‍या डोळ्यांची, उडत्या केसांची, भरारत्या मनाची. सतत भिरभिरणारी, चिवचिवणारी. चिमणा-चिमणीच्या गोष्टीतली चिमणी.
आणि मग तो चिमणा? तिच्या अवतीभोवती भिरभिरणारा? ...त्यांनी मिळून घरटं बांधायचं?
चिमणीलाही तसंच वाटत होतं का?
ते त्याला माहीत नव्हतं. असा त्यानं कधी विचारच केला नव्हता.
त्याला काहीच कळत नव्हतं.

एक तो आणि एक ती.
ती चिऊ आणि तो ... काऊ?
ती बाळाला जपणरी, खाऊ घालणारी, नीटनेटकं ठेवणारी, वाढवणारी, ती सर्वांची (त्याची सुद्धा) काळजी घेणारी, घर सांभाळणारी.      
तो भटकणारा, उंडारणारा, घर शेणाचंही चालणारा. खा-खा खाणारा आणि सगळीकडे घाण करणारा. अवेळी दार ठोठवणारा. स्वतः काही न करता इतरांकडून अपेक्षा ठेवणारा.
त्यांची जोडी का जमली? कोणी जमवली?
पण खूपदा असंच असतं.
हे त्याला माहीत नव्हतं. तेव्हा त्याला काहीच कळत नव्हतं.
पण अशी गोष्ट नको असं त्याला वाटे.

एक तो आणि एक ती. तो चिमणा आणि ती चिमणी.
चिमणा म्हणाला, आपण दोघं घर बांधू. चिमणी म्हणाली, का? चिमणा म्हणाला, असंच. मग चिमणी म्हणाली, चालेल.
मग चिमण्यानं एक गवताची काडी आणली, चिमणीनं एक काडी आणली.
चिमणा म्हणाला, किती दमलीस, मी आणतो काड्या. चिमणी म्हणाली, किती दमलास, मी बांधते घरटं. दोघांनी मिळून एक घरटं बांधलं.
मग चिमण्यानं भुर्रर्रर्रकन्‌ जाऊन एक दाणा आणला, चिमणीनं भुर्रर्रर्रकन्‌ जाऊन एक दाणा आणला. चिमणा भुर्रर्रर्रकन्‌ जाऊन पाणी पिऊन आला, चिमणी भुर्रर्रर्रकन्‌ जाऊन पाणी पिऊन आली. दोघांनी भुर्रर्रर्रकन्‌ जाऊन आणखी एक-एक दाणा आणला. ते म्हणाले, हा आपल्या पिल्लांसाठी.

मग घरट्यात एक चिमणी चिमणी आली. तिला वाढवण्यात, तिच्यासाठी दाणे आणण्यात दिवस पुरेनासा झाला. तिला छोटे पंख फुटल्यावर ती घरभर उडत असे. दिवसभर तिचा अखंड चिवचिवाट चाले. तिच्यामुळे घर भरलेले असे. तिच्यामुळे घर घर असे. तिच्यामुळे सगळ्याला अर्थ असे. असे किती दिवस भरभर उलटले कळलेच नाही.
तिचे पंख मोठे झाले. तिची झेप मोठी झाली. घरटे तिला पुरेनासे झाले. तिला आकाशही पुरेनासे झाले. तिचा चिमणा दिसल्यावर ती त्याच्याबरोबर मोठ्या आकाशात उडून गेली.
ती घरट्यात असतानाही, नंतर उडून जाताना आणि उडून गेल्यावर जीव कासावीस झाला. आनंदानेही आणि काळजीनेही.
आता घरट्यात पुन्हा चिमणा-चिमणी. दिवसभरात कधीतरी तो म्हणे, चिव-चिव आणि त्यावर ती म्हणे चिव. मग कधीतरी ती म्हणे चिव-चिव आणि त्यावर तो म्हणे चिव.
कधीतरी चिमण्या चिमणीचा फोन येई. त्यावर तिचा चिवचिवाट सुरू झाला की वाटे ती पुन्हा घरभर फिरते आहे. घर भरले आहे.
या सगळ्याची आठवण देत चिऊ आपल भोवती भुर्रर्रर्रकन्‌  उडतच होती, चिवचिवतच होती. नेहमीची, ओळखीची, खूप सवयीची, आपल्या जगण्याचा भाग असलेली. 
पण हे त्याला तेव्हा माहीत नव्हतं.
आणि अजूनही त्याला कळत काहीच नव्हतं.

1 comment:

  1. :) mast aahe... adhi mala watal ki chote chiu anushka mag watal ki choti chiu mi. mag watal ki kadhitari sagalech choti chiu ani kadhitari saglech mothi chiu. :) very nice

    ReplyDelete