माणूस आणि चिमणी - ४
एक माणूस होता आणि एक चिऊ होती.
ती एकदम दिसेनाशी झाली.
भोवती भुर्रर्रर्र नाही, अंगणात चिवचिव नाही, घरटं बांधताना घरभर पडलेल्या काड्या नाहीत. घरटं बांधायला घरात जागाच नाही. आणि भिंतीवर आजी-आजोबा आणि देवांचे फोटोही नाहीत.
आता घरातल्या बाळाला चिऊची गोष्ट सांगताना दाखवायला चिऊच नाही.
ती त्याच्या आयुष्याचा भाग होती आणि त्याच्या अस्तित्वाचा लचका तोडल्यासारखी ती दिसेनाशी झाली.
हे कधीपासून झालं? आणि का?
ती मोकळी आणि स्वतंत्र पाखरं! त्यांना माणसानं हात का लावला?
त्याला खरंच काही माहीत नव्हतं, तो डोळेझाक करत होता का तो सोंग करत होता?
काहीच न कळण्याएवढा तो मूर्ख, मद्दड होता, का काही कळून घ्यायचेच नाही इतका तो बथ्थड आणि हेकट होता?
का कळूनही कळत नाहीसे दाखवणारा ढोंगी आणि स्वार्थी होता?
एक माणूस होता पण आता एक चिऊ नव्हतीच.
एक माणूस होता. पण एक चिऊ नव्हतीच.
आणि कशी असेल? घराभोवती अंगण नव्हतं, गॅलरीतल्या कुंडीत खुरटे गुलाब होते पण झाडं-झुडुपं नव्हती. घरात वळचणी, अडगळीच्या जागा, तसबीरी नव्हत्या. घरात चिमण्यांना टाकायला दाणेसुद्धा नव्हते. मॉलमधून आणलेली तयार आट्याची किंवा तयार पोळ्यांची पाकिटं होती. आणि मुख्य म्हणजे दाणे टाकायला छोटे हातही नव्हते.
काऊ कसेबसे कुठेतरी, काहीही खाऊन, राहिले होते. पण पोपट, मैना, बुलबुलही कुठे होते? आणि त्यांच्यासाठी झाडं, फळं, फुलंही कुठं होती? आणि लबाड कोल्हा, दुष्ट लांडगा, बाघोबा आणि जंगलचा राजा कुठं होते?
एक माणूस होता. तो आता आजोबा झाला.
नातीला घेऊन, टीव्हीपुढ्च्या खुर्चीवर बसून मॅगी खाताना तो तिला चिऊ-काऊच्या गोष्टी सांगे. आधी ती छान ऐकून घेई. मग एकदा तिनं “चिऊ म्हणजे काय? चिऊ कुठे?” म्हणून विचारलं. मग त्यानं त्या गोष्टी सांगणंच बंद केलं. तिनं विचारला नव्हता, पण तीन पिढ्यांच्या अनेक अपराधांचा जाब तिला देणं त्याला शक्य झालं नाही.

एक माणूस होता. पण भयाण, उजाड जगात तो एकटाच होता.
का तो पण नव्हता?
very nice... mala tuzya pratyek goshi vicharat padatat. parat ekada apali lifestyle check karavi ka asa prasha padato. but small and full of content ashi gosht zaliye.
ReplyDelete