19 डिसेंबर 2007. दुपारी 03.55
चीफ ’ची’चे ऑफिस
कु. मानवी चीफच्या केबिनमधे शिरली तेव्हा टेबलावर डोके टेकून, खुर्चीतल्या
खुर्चीत घसरुन वेडेवाकडे पसरलेले चीफ तिला दिसले. ती झट्कन पुढे झाली. त्यांचे गाल
टेबलावर ओघळले होते, डोळे अर्धवट उघडे होते व तोंडातून गळलेल्या लाळेचे टेबलावर
छोटेसे, 3.5 x 2.5 सेंमीचे थारोळे झाले होते. (मापे बरोबर होती. कारण कु. मानवीने ती
तप्तरतेने मोजली. अशा नको त्या गोष्टीत ती नेहमी अमानवी चटपटीतपणा दाखवत असे)
त्यांचा डावा हात टेबलावर पसरला होता व त्यात अर्धवट उघडे डिटेक्टिव कथांचे पुस्तक
धरलेले होते. उजवा हात टेबलाखाली दोन पायांमधे लोंबत होता. पोटाचा पट्टा ढिला केला
होता व त्यातून पोट बाहेर पडून लोंबत होते. दोन्ही तंगड्या दोन बाजूंना ढिलेपणाने पसरलेल्या
होत्या. -- एखादा अडाणी, सामान्य माणूस तिथे आला असता तर, पुस्तक वाचताना बेसावध
गाठून कोणीतरी चीफना गोळी घातली आहे व ते तात्काळ मरुन तिथे तसे पडले आहेत असे
त्याला वाटले असते. पण कु. मानवीला ते नेहमीचे दृश्य होते व ती सामान्य माणूस
नव्हती. शिवाय एखादा अडाणी, सामान्य माणूस तिथे येण्याची शक्यताही नव्हती.
कु. मानवीने तात्काळ कोटाच्या कॉलरला धरुन चीफला मागे खेचले, त्यांच्या लोंबत्या
गालांवर थपडा मारल्या व टेबलावरील ग्लासातील पाण्याचा सपकारा त्यांच्या तोंडावर
मारला.
“चीफ – चीफ -- जागे व्हा, जागे व्हा! ...”
“अं ... अं? ...”
“जागे व्हा! -- चिण्णू आलाय ...”
“कोण चिण्णू ? ...”
“आपला चिण्णू -- डी-1-डी ...” (गालांवर थपडा).
“डी-डी-डी- ... का? -- मी झोपतो ...”
“जागे व्हा.” (पाण्याचा दुसरा सपकारा.) “तुम्हीच बोलावलं होतं. उठा, उठा, (थपडा)
आज काय दिवसाच घेतली काय कोण जाणे. उठा! त्यानं तुम्हाला असं पाहिलं तर काय वाटेल
त्याला? -- मी आहे म्हणून, नाहीतर -- चिण्णू
आलाय!” शेवटचं वाक्य ती चीफच्या कानांत ओरडली.
“का?!”
“त्या पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा खून ...”
“झाला सुध्दा? इतक्यातच? आणि मला उठवलं नाहीस?” चीफ एकदम खडबडून जागे झाले व
मानवीवर खेकसले.
“अजून नाही झाला.” बोलता बोलता मानवीने टिशू पेपरने चीफची लाळ पुसली, ओला
झालेला चेहेरा पुसला व कपडे, सूट, टाय नीटनेटका केला. तोपर्यंत पोटावरचा पट्टा
आवळण्याइतके चीफ जागे झाले होते. मग मानवीने टेबल साफ केले, डिटेक्टिव्ह कादंबरी
ड्रॉवरमधे टाकली आणि दुसर्या ड्रॉवरमधला चिरुट काढून चीफसमोर ठेवला. “आत्ता फक्त
प्लॅन आलाय. त्यासाठी तुम्ही चिण्णूला बोलावलं होतंत -- तो आलाय ...”
“मी चिण्णूला -- पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा खून करायला बोलावलं होतं?” चीफनी
अविश्वासाने विचारले.
“असं काय करता चीफ? तुम्ही जागे झालात का नीट? हे गार पाणी घ्या. तुम्ही अन्वेषण
व प्रतिबंध विभागाचे प्रमुख आहात. आता हा चिरुट पेटवा म्हणजे मी चिण्णूला बोलावते.”
“तूच दे पेटवून. मला त्याचा वाससुध्दा सहन होत नाही?”
“नुस्ता हातात तरी स्टायलीत धरा! त्याशिवाय चीफ म्हणून रुबाब कसा वाटेल?”
चिरूट पेटवून मानवीने स्वतः दोन खोल झुरके घेतले आणि धूर खोलीत पसरवला. मग चिरूट चीफच्या
हातात देत मानवी म्हणाली. “आणि ताठ बसा. मधेच ढेपाळू नका.”
कु. मानवी सट्कन स्प्रिंगचे दार उघडून चीफच्या केबिनमधून बाहेर आली आणि तिने
चिण्णूला आत जायची खूण केली. चिण्णू तिच्या शेजारुन जाताना त्याच्या गळ्याजवळच्या
फटीतून तिने झट्कन शर्टच्या आत हात घातला.
“मानवी नंतर -- नंतर -- हे बघतायत ...”
“चिण्णू --” एखाद्या खोडकर मुलाला पकडावे तशी कु. मानवी म्हणाली आणि तिने
शर्टच्या आतून हात बाहेर काढला. तिच्या हातात चार सेंमी, धारदार, फोल्डिंगची कात्री
होती.
“मी काही चीफचा खून करायला आलो नाही.” चिण्णू तक्रारीच्या सुरात म्हणाला. मग
रुबाब न दाखवता हळूच स्प्रिंगचे दार उघडून, ते तसेच धरुन ठेवून तो आत शिरला व
पूर्ण शिरल्यावरच त्याने ते हलकेच सोडून दिले.
No comments:
Post a Comment