19 डिसेंबर 2007. दुपारी 03.50
13वा मजला: ’चीफचा मजला’ किंवा
‘डिटेक्टिव्ह नं-1’
चा मजला
मग, आणखी वरच्या मजल्यावर जाणारा जिना चढायला चिण्णूने सुरुवात केली. त्याच्या
जिना चढण्याच्या रुबाबातला एक शतांश तरी रुबाब आपल्यात यावा असा प्रयत्न करत
त्याचे तिघे सहाय्यक डिटेक्टिव्ह त्याच्या मागून जिना चढू लागले. चिण्णूच्या मागे
त्यांच्यापैकीच एकाची चिण्णूच्या जागी बढती होणार होती आणि त्यांच्या कामातील धोका
लक्षात घेता तो दिवस फार दूर असणार नव्हता.
परदेशातील इमारतींना, विशेषत: महत्त्वाची सरकारी कार्यालये, मंत्रालये, महत्त्वाच्या
व्यक्तींची निवासस्थाने असलेल्या इमारती, मोठी हॉटेले इत्यादींना 13 वा मजलाच
नसतो. पण इथे भारतात, विशेषत: ‘मध्यवर्ती आंतरराष्ट्रीय राजकीय खून अन्वेष्ण कार्यालयाचा’
13 वा मजला म्हणजे ‘चीफचा मजला’ म्हणून सर्व जगात प्रसिध्द होता.
तसेच तो ‘डिटेक्टिव्ह नं-1’ चा मजला म्हणूनही प्रसिध्द होता.
या मजल्यावर लिफ्ट थांबत नसे. 12 व्या मजल्यावरुन याच एकमेव जिन्यावरुन वर
यावे लागे. जिना संपताच उजवीकडे लांब पॅसेज होता आणि दुतर्फा ‘डी-1’ पदावरच्या दहा डिटेक्टिव्हांची
कार्यालये होती. तिथे या डिटेक्टिव्हांच्या हाताखालचा स्टाफ असे. बहुधा डी-1 पैकी
कोणीच कधी कार्यालयात सापडत नसत. कारण बाहेरचे, वरचे आणि मुख्यत: खालचे जग हेच
त्यांचे खरे कार्यालय होते.
पॅसेजच्या शेवटी एकच दार होते. त्यावर सध्याच्या पंतप्रधानांचा फोटो लावलेला
होता. खाली हिरव्या मखमली पाटीवर ‘चीफचे कार्यालय ’ असे पितळी अक्षरांत लिहिले
होते. हे बघून एखाद्दाला चीफच पंतप्रधान आहेत असे वाटत असे तर एखायला पंतप्रधानच
चीफ आहेत असे वाटत असे. अगदी अडाणी, सामान्य, आपल्यासारखा माणूस तिथे आला असता तर
त्याला कदाचित तो चीफचाच फोटो वाटला असता. पण या इथे अडाणी व सामान्य माणूस येऊच
शकत नसे.
चीफच्या ऑफिसच्या दाराबाहेर चिण्णूने ऐटीत सिगारेट शिलगावली व पेटती काडी
बेफिकीरीने, स्टायलीत खालच्या मखमली कार्पेटवर उडवली. असले बेफिकीर कृत्य तो इथे
करु शकत असे. कारण काडी कारपेटवर पडता पडता झडप घालून विझवण्यासाठी व कडेच्या थोटूक
पात्रात टाकण्यासाठी आता त्याच्या मागे त्याचे तीन सहाय्यक उभे होते. हा प्रकार त्याने
आता शिरल्यावर केला असता तर चीफच्या पर्सनल सेक्रेंटरीने त्याच्या चिप्पुट
श्रीमुखातच भडकावली असती.
चीफची पर्सनल सेक्रेंटरी कु. मानवी गोचिडे हे एक प्रस्थच होते. चिण्णू आलेला
आहे हे तिला घंटेच्या सूचनेमुळे समजलेच होते. घंटेची मूळ कल्पना तिचीच होती.
त्यामुळे तिला तयारीला वेळ मिळत असे आणि त्यामुळे तिचे सर्व प्रकरण या सर्व एक
नंबरच्या डिटेक्टिव्हांनाही कधीच कळले नाही. घंटा वाजताच ती सिगारेट विझवत असे व
पंखा फुल ऑन करत असे. आपल्या टेबलवरचा सर्व प्रचंड पसारा ती झटक्यात टेबलक्लॅथसकट उचलत
असे व त्याचे गाठोडे बांधून शेजारच्या प्रसाधन कक्षात भिरकावून देत असे. खोलीभर
पसरलेल्या इतर सर्व सटरफटर वस्तू पायानेच ढकलून ती मोठ्या कपाटाखाली सरकवत असे. मग
टेबलावर नवा टेबलक्लॉथ टाकून त्यावर हिरवा, लाल व काळा असे तीन फोन ती मांडून ठेवत
असे. (त्यातील फक्त काळा फोन खरा चालू असे. इतर देखाव्याचे असत. पण हे चीफला
सुध्दा माहीत नव्हते.) मग टेबलावर, ‘अति महत्त्वाचे’ असे लिहिलेल्या दोनच फायली,
दोन कोरे कागद व तीन पेने (अर्थातच लाल, हिरवे व काळे) असलेला पेनस्टॅंड ती मांडत
असे. एकूण फक्त एवढेच काम ती खर्या चटपटीतपणे करत असे. मग ड्रेस नीटनेटका करून,
नाकावर चश्मा ओढून, टेबलामागे खुर्चीवर ती ताठ बसत असे, एक हात लाल फोनवर ठेवत असे
( नुकताच महत्त्वाचा फोन करुन फोन ठेवत असल्याप्रमाणे) व एका हातात लिहिण्याच्या
तयारीत उघडे पेन ठेवत असे. अशा वेळी, आत येणार्या डिटेक्टिव्हाला ती अती कार्यक्षम, अती स्मार्ट, कामात व्यग्र,
चटपटीत, करारी व कडक अशी खुर्चीवर बसून, मान उंचावलेल्या व चश्मा घातलेल्या
शहामृगासारखी दिसे.
चिण्णूने सिगारेटचा एक खोल झुरका घेतला. डाव्या हाताने स्टायलित धक्का मारुन
स्प्रिंगचे दार ढकलले व त्याचे ते रुबाबदार पाऊल आत टाकले. पण तो पुरा आत जायच्या
आतच स्प्रिंगचे दार मागे येऊन त्याच्या नाकावर व कपाळावर आदळले. असंख्य वेळा
चीफच्या ऑफिसमधे येऊन व लाख वेळा प्रॅक्टिस करुनही हे स्प्रिंगचे दार व आपले
रुबाबदार पाऊल यांच्यातले टायमिंग त्याला कधीच जमले नव्हते. आयुष्यात ही एकच गोष्ट
आपल्याला कधीच नीट जमली नाही (अशाही अर्थातच अनेक गोष्टी होत्या) ही एकच खंत
मरताना उरणार हे त्याला माहीत होते.
कपाळावर दार आपटल्याने नेहमीप्रमाणेच लिब्बीण चेहेर्याने व
रुबाबदारपणे लडखडत्या दुसर्या पावलाने चिण्णूने आत प्रवेश केला. डोळ्यांपुढच्या
काजव्यांच्या प्रकाशात त्याने कु. मानवी गोचिडेला पाहिले. तेव्हा ती नेहमीप्रमाणेच
अति कार्यक्षम, अति स्मार्ट, -- , (वगैरे वगैरे), चश्मा घातलेल्या शहामृगासारखी, अशी
चिण्णूला दिसली.
चिण्णूने स्वतःला सावरले व सिगारेटचा दुसरा व शेवटचा खोल झुरका घेतला.
“हाय स्वीट मानवी !” तिच्या तोंडावर सिगारेटचा धूर सोडत चिण्णू म्हणाला.
“चिण्णू ! सिगारेट विझव. नाहीतर थोबाड फोडीन. तुला माहितीयै मला सिगारेटचा वास
बिल्कुल आवडत नाही.”
“अगं -- पण -- मी -- मी आत्ताच --” चिण्णूने सिगारेट विझवली.
“जरा नीट वाग. वयाबरोबर पोरकटपणाच वाढतोय तुझा.” जरा मवाळ आवाजात मानवी
म्हणाली. “मी चीफला सांगून येते -- तू आलायस ते.”
ती तट्कन उठली व आतले स्प्रिंगचे दार झटक्यात उघडून ते पुन्हा मागे येण्याच्या
आत चीफच्या केबिनमधे दिसेनाशी झाली. एकदा तरी स्प्रिंगचे दार आपल्यासारखेच
तिच्याही थोबाडावर आदळावे म्हणून चिण्णूने कितीतरी वेळा गणपतीपुढे प्रार्थना केली
होती. पण गणपतीच्या काळी असे स्प्रिंगचे दरवाजे नव्हते म्हणून प्रार्थनेचा उपयोग
होत नाही अशी तो मनाची समजून करुन घेत असे. त्याची ही इच्छा आजही पुरी झाली नाही.
No comments:
Post a Comment