19 डिसेंबर, संध्याकाळ
दिल्लीच्या उपनगरातील चिण्णूचा फ्लॅट
बिल्डिंगच्या पायर्या चढता चढताच काहीतरी अशुभ घडल्याची चिण्णूला जाणीव झाली.
अशी जाणीव चिण्णूला नेहमी होत असे. कारण अशुभाच्या संगतीतच त्याला नेहमी वावरावे लागे.
तो ऑफिसमधून बाहेर पडला, बसने घरी आला, ड्रिंक्स घेत टिव्ही पाहात बसला आणि
मग जेवला; किंवा तो सकाळी उठला आणि चहा घेत त्याने वर्तमानपत्र वाचले, अशा घटना त्याच्या
आयुष्यात घडतच नसत.
आजही चीफच्या ऑफिसातून बाहेर पडल्यावर तीनदा बस बदलून व मधे दोनदा रिक्षा करुन
तो त्याच्या उपनगरातील फ्लॅटकडे आला. आपला पाठलाग होत असला पाहिजे असा त्याला संशय
होता. त्यासाठी एकदा तो विरुध्द बाजूला जाणर्या बसमधेही चढला. सुदैवानं तो संशय खोटा
ठरला.
त्याचा फ्लॅट चौथ्या मजल्यावर होता. लिफ्ट नेहमीप्रमाणे बंद होती. त्यासाठी शिव्या
सुध्दा न घालता तो जिना चढू लागला तेव्हा त्याला ते अचानक समजले. इतक्या वर्षांनंतर!
... आपण येताना इतक्या बस बदलल्या, नेहमी बदलतो, पण फ्लॅट तोच आहे. गेली दहा वर्षे.
बसमधे आपला पाठलाग करण्यात वेळ घालवण्याऐवजी दाराकडे पिस्तुल रोखून फ्लॅटमधे आपली वाट
पाहात बसणे सोपे होते. तो सावध झाला आणि त्याच क्षणी त्याला ती अशुभ घडल्याची
जाणीव झाली. धडधडत्या अंत:करणाने, सावध, पण रुबाबदार पावले टाकत, एक-एक पायरी चढत तो
फ्लॅटच्या दाराशी आला आणि त्याची पावले थबकली. ---
दारात त्याचे लाडके पांढरे मांजर मरुन पडले होते. त्याचे पिवळे निष्प्राण डोळे
उघडे होते, पाय ताठले होते, पोट फुगले होते आणि त्याच्या तोंडातून फेस आला होता. त्याच्यावर
विषप्रयोग झाला होता.
डोळ्यातले अश्रू थोपवत, आपल्या लाडक्या चंद्रूच्या पाठीवरुन अखेरचा हात फिरवायला
तो खाली वाकला तेव्हा चंद्रूच्या पुढच्या ताठलेल्या पायांखाली ठेवलेली चिठ्ठी त्याला
दिसली.
‘चिण्ण्ण्या, चिणम्या मुणमुणकरा – सावध! आम्ही काहीही करु शकतो. तुझ्या चंद्रू
मांजरड्याला मारण्यासाठी आम्ही आलो होतो. पण त्याआधीच ते काम महानगरपालिकेने केले होते.
कुत्र्यांसाठी टाकलेल्या विषारी गोळ्या चुकून खाऊन तुझे मांजरडे मेले -- जाऊ दे! पण
तरी ते तुझ्या दरात ठेवून आम्ही तुला सूचना देत आहोत. मांजराची महानगरपालिकेने लावली
तशी तुझी वाट लावायला आम्हाला वेळ लागणार नाही. सावध! -- खतरनाक अतिरेकी.’
धीरोदात्त पुरुषाप्रमाणे चिण्णूने अश्रू आवरले. त्याचे पिचमीच डोळे बारीक झाले.
किंचित पुढे आलेले दात आवळले गेले. वाळक्या झाडाच्या फांद्यांप्रमाणे हाताच्या मुठी
वळल्या व त्यात ती चिठ्ठी चुरगळली गेली. त्याच्या चिप्पुट चेहेर्यावर निश्चय दिसू
लागला. त्याच्या लांबट वरवंटी डोक्यात आता एकच विचार होता. -- आपल्यामुळे मांजर मेले आता त्याला
काशीला नेऊन त्याचे अंत्यसंस्कार करावे लागणार.
चिण्णू उठला. दरवाजाच्या अंगच्या कुलुपात किल्ली फिरवताच अतिरेक्यांनी लावलेल्या
बॉंबचा स्फोट होऊ शकेल त्याची पर्वा न करता त्याने किल्ली फिरवली. सायलेन्सर लावलेले,
सेफ्टी कॅच मागे ओढलेले पिस्तुल रोखून आतील अंधारात कोणी दबा धरुन बसले असेल असा विचारही
न करता बेदरकारपणे त्याने दरवाजा ढकलला व आतील अंधारात पाऊल टाकले.
मग त्याने दिवे लावले, पाक पंतप्रधानांच्या खुनाच्या कटाची माहिती असलेली फाईल बेफीकीरपणे हॉलमधल्या टीपॉयवर फेकली
व तो स्वंयपाकघरात गेला. ग्लासमधे तीन आईस क्यूब्ज टाकून त्यावर त्याने पाऊण ग्लास
चिल्ळ्ड पाणी ओतले व निम्मा ग्लास एका दमातच रिकामा केला.
बर्फा इतक्या थंड पाण्याचे ते घोट जीभ, घसा आणि छाती थंड करत त्याच्या पोटात शिरले
तेव्हा त्याला जरा बरे वाटले. अजून दोन घोट पोटात जाताच विचार करण्याइतका त्याचा मेंदू
स्वच्छ झाला. हल्ली त्याला आईस कोल्ड पाण्याइतकी इतर कशानेच किक् येत नसे. मग चिण्णूने
फोन उचलला आणि तो टॅप केला असेल याची जराही पर्वा न करता नंबर फिरवला.
“हॅलो? हॅलो ? एअरपोर्ट?”
चिण्णू
“हॅलोऽऽ? ऐकू येत नाही.” एअरर्पोर्टवरची रिसेप्शनिस्ट.
“हॅलो? एअरर्पोर्ट?” चिण्णू ओरडून.
“नाही, नाही ! इथं एनिमा पॉट मिळत नाही! ही काय हॉस्पिटल रुम सव्हिस नाही. काहीही
मागतात ...”
“हॅलो ? एअरर्पोर्ट? काशीला जाणारी एअरबस --”
“हा बस स्टॅंड नाही !”
“हॅलो! ए-अ-र-पो र्ट?” चिण्णू किंचाळला.
“ओरडू नका! कान फुटले नाहीत माझे!” रिसेप्शनिस्ट ओरडली. मग नेहमीच्या कमावलेल्या
मधाळ आवाजात म्हणाली, “हॅल्लो ! एअरर्पोर्ट. मी आपली काय सेवा करु शकते?”
“काशीला जाणांर विमान कधी मिळू शकेल?”
“आत्ताच सुटलं. आता दोन दिवसांनी --”
“मला तातडीनं जायचं होतं --”
“तुम्ही दहा मिनिटं आधी फोन केला असता तर हेच विमान थांबवलं असतं. आधीच ते 37 मिनिटं
लेट होतं आणि त्यात फक्त दोनच पॅसेंजर्स होते. तुमच्यासाठी ते अजून दोन तास थांबलं
असतं.”
“मला तातडीने --”
“मग तुम्ही रेल्वेने का नाही जात? किंवा काशी ऐवजी तुम्हाला जैसलमेरला जायचं असेल
तर अर्ध्या तासात विमान आहे. हल्ली सगळे लोक तिकडेच चालले आहेत. तुम्हाला माहितीच असेल
--”
चिण्णूने फोन ठेवला व ऑफिसचा नंबर फिरवला.
“हॅलो? कोण?” चिण्णू.
“रॉंग नंबर !”
“मुर्खा मी चिण्णू बोलतोय.”
“सॅल्यूट सर, सॉरी चिण्णू सर, सॉरी डी-1-डी स्सर,मी डी-2-सी सर --”
“पुरे! मला तातडीनं काशीला जायचंय. समजलं? अर्जंट!! इमर्जन्सी!!! कळलं? ती व्यवस्था
कर! बी फास्ट अॅंड बी एफिशिअंट!!”
“येस्स्सर !!” फोन बंद झाला.
मग चिण्णूने उरलेले आईस कोल्ड पाणी एका घोटात संपवले आणि तो झटपट कामाला लागला.
माळ्यावरुन जुने पुठ्ठ्याचे खोके काढून त्यात त्याने वर्तमानपत्राच्या रद्दीचे दोन
थर घातले. मग एका जुन्या बनियचे खांद्याचे पट्टे एका बाजूने कापल्यावर बनियनच्या दोन
बाजूंना दोन पट्ट्या तयार झाल्या. दुर्गंधीनाशक ‘डीओडोनालीनचे’ भरलेले पाकीट त्याला
सुसज्ज बाथरुममधील कपाटात मिळाले. पाठीमागच्या बाल्कनीतील कापाटात सर्व प्रकारची घर-दुरुस्ती,
सुतारकाम, प्लंबिंग, इलेक्ट्रिक फिटिंगची हत्यारे व इतर साहित्य होते. त्यातून त्याने
दोन लांब वायर्सचे तुकडे घेतले. बाथरुममधील कपाटातील फर्स्ट-एड बॉक्स मधून त्याने कापसाचे
पाच मोठे बोळ, अॅंटीसेप्टीक लोशन व चिमटा घेतला.
सर्व वस्तू मिळाल्याची खात्री झाल्यावर त्यातील काही घेऊन तो चंद्रूपाशी आला. जिन्याच्या
जाळीच्या भोकातून नुकत्याच उगवलेल्या चंद्राचा प्रकाश चंद्रूवर पडला होता. एक एक कापसाचा
बोळा अॅंटीसेप्टीक लोशनमधे बुडवून त्याने चिमट्याने तो जड अंत:करणाने चंद्रूच्या तोंडात,
दोन्ही नाकपुड्यांत व दोन्ही कानांत खुपसला. मग चंद्रूला बनियनच्या पोकळीत ठेवून दोन्ही
बाजूंना लोंबणार्या पट्ट्या भोवती गुंडाळून
त्याने एक बोचके तयार केले. मग आत येऊन हे बोचके त्याने पुठ्ठ्याच्या खोक्यात ठेवले.
शेजारी, वास येऊ नये म्हणून, ‘डीओडोनालीनचे’ अख्खे पाकीट ठेवून, वर आणखी रद्दीचे थर
घालून त्याने खोके बंद केले आणि वायर्सनी नीट बांधले.
त्याने हात धुतले व ते टॉवेलला पुसत असतानाच फोन वाजला.
“स्स्सर! रात्री बारा वाजता एअरफोर्स बेस क्र. 4 च्या तिसर्या दारासमोर तुम्हाला
एकजण भेटेल. तुमचं वर्णन त्याच्यापाशी आहे. तो विचारेल, “किती वाजले” तुम्ही म्हणायचं,
“रात्र झाली” तो म्हणेल, “इतक्यात?” तुम्ही म्हणायचं “सकाळच्या आत.” तो तुमची सोय करेल.
“गुड!” चिण्णू.
“स्स्स्सर! आणखी काही?”
“मी आल्यावर तुला फोन करेन. तोपर्यंत तुम्ही जय्यत तयारीत राहा”
“कशाच्या?”
“माझ्या अंत्ययात्रेच्या ! मूर्ख !!”
“येस्स्स्स्सर !” फोन बंद झाला.