MahaGanapati Mandir

MahaGanapati Mandir
महागणपती मंदिर, वाई, महाराष्ट्र.

मनातलं

ज्या यशाने उन्माद येईल असं यश मला नको. ज्या यशाने इतरांच्या त्या यशातील वाट्याबद्दल कृतज्ञता मनात दाटून येईल आणि अधिक विनम्रता येईल ते खरं यश.

Wednesday, April 29, 2020

गोष्ट मानवाची


गोष्ट मानवाची
सौ. सुलभा प्रभुणे

कोणे एके काळची कथा. एक सुंदर ग्रह होता. पृथ्वी नावाचा. निसर्गराजा तिथे राज्य करत होता. राज्यात प्राणी होते, पक्षी होते, झाडे-वेली नद्या-नाले, समुद्र देखील होते. सगळे कसे गुण्यागोविंदाने एकत्र नांदत होते. एकमेकांना मदत करत होते.
पण हल्ली निसर्गराजा कसल्यातरी चिंतेत सतत वावरत असे. शेवटी सृष्टी राणीने त्याला त्याचे कारण विचारले.
“माझी प्रजा सतत कंटाळलेली, दमलेली, आजारी दिसत आहे.” निसर्गराजा म्हणाला. “कोणीही कामचुकार नाही. सगळे जीव तोडून काम करत आहेत. पण कोणीच नीट काम करू शकत नाही. सगळेजणच भीतीच्या छायेत वावरत आहेत असं वाटतं.”
“कोणी असूर त्रास देत आहे का?सृष्टी राणीने विचारले.
“कोणताही असूर नाही, शत्रू नाही ... पण हल्ली माझ्या सगळ्याच प्रजाजनांकडून खूप तक्रारीही येऊ लागल्या आहेत.तो म्हणाला.
कसल्या तक्रारी महाराज?
“कोणालाही नीट काम करता येत नाही हीच तक्रार.” तो म्हणाला. खरं तर हे मला गेले कित्येक दिवस जाणवतं आहे. पण मला हस्तक्षेप करावा लागणार नाही असं मला वाटत होतं.
“पण हे सगळं का होत आहे हेही तुम्ही शोधलं असेलच ना?
“हो महाराणी. हा त्रास का होतोय आणि कोणामुळे होतोय हेही मला ठाऊक आहे.”
“मग कशाला एव्हढी चिंता? ज्याच्यामुळं त्रास होतोय त्याला समज द्या, शिक्षा करा म्हणजे झालं.”
 “ तोच तर माझ्यापुढचा प्रश्न आहे. ह्या सगळ्याला मानवच जबाबदार आहे असं आता मला स्पष्ट दिसू लागलं आहे. तो सगळ्याच प्रांतांत ढवळाढवळ करतो आहे. त्यामुळं सगळं संतुलनच बिघडत चाललं आहे. मुख्य म्हणजे, कोणावरच अन्याय न होता सर्वांना पोटभर मिळावं आणि सगळं विश्वच सुरळीत चालावं म्हणून आपण दोघांनी दिवसरात्र खपून जी अन्नसाखळी निर्माण केली होती, तीच तो उध्वस्त करत चालला आहे.  तो जणू आपणच निर्माता असल्यासारखा अनेक गोष्टी निर्माण करू लागला आहे. त्यालाही काहीच हरकत नाही. कारण खुद्द निर्मात्यांनीच त्याला ती ताकद दिली आहे. पण आपण काय निर्माण करतो आहोत हे त्याला कळत नाही, असं मला वाटू लागलंय. आणि या सगळ्या गोष्टींची माझ्या इतर प्रजेला तर अजिबात सवय नाही. त्यांना शांततेची आणि फक्त लहान आवाजांची सवय होती. पण आता हा मानव काय भयंकर मोठे आवाज करतो. त्याचे ते कारखाने, मोठमोठी यंत्रे, सुरुंग आणि फटाके ह्या सगळ्या आवाजांनी प्रजा अगदी भेदरून गेली आहे. शिवाय त्यांच्या त्या बेसुमार वाढणार्‍या वाहनांमुळे होणारा प्रचंड धूर आणि आवाज ह्याचं मी काय करू? त्याच्या घरांसाठी, कारखान्यांसाठी, रेल्वे, विमानतळ  यासाठी लागणार्‍या जमिनीसाठी तो माझ्या प्राण्यांची हक्काची जंगलं, झाडं, सगळंच; माझ्या इतर प्रजेची घरंच नष्ट करतोय. शिवाय त्यांची आपापसातील भांडणं, युद्धं आणि त्यांसाठी वापरली जाणारी आधुनिक शस्त्रास्त्रं! आता काय करावं हेच मला कळत नाही.”
“मग तुम्ही त्याला शिक्षा का करत नाही?”
“ ती निर्मात्यांची निर्मिती आहे. शिक्षा करण्याचा मला अधिकार नाही. मी राजा आहे. प्रजेचं भलं करणं, सांभाळणं हे माझं काम आहे. माझी सर्व ताकद वापरून मी  जंगलतोड, डोंगर पेटवणं यांवर पांघरूण घालण्यासाठी पाऊस पाडून गवताचं आच्छादन घालत राहिलो, नवीन झाडं वाढवत राहिलो. नद्यांचं पाणी शुद्ध करून देत राहिलो. धुरानं भरलेली हवा वारा-पावसानं, झाडांनी सोडलेल्या ऑक्सिजननं शुद्ध करत राहिलो. पण ह्या सगळ्याचा अतिरेक झालाय. क्षमेची पांघरुणं घालण्याच्या माझ्या क्षमतेचीही मर्यादा आता ओलांडली गेली आहे.” 
  “मग तुम्ही त्याच्याविरुध्द निर्मात्यांकडे तक्रार का करत नाही?”
  “त्याचीच तर मला भीती वाटते आहे. कारण मानव म्हणजे निर्मात्यांची सर्वोत्कृष्ट कलाकृती आहे. त्यांना त्याचा खूप अभिमान आहे. अर्थात तो सार्थही आहे. त्यांच्याइतकाच मलाही मानवाचा खूप अभिमान आहे. निर्मात्यांनी त्याच्या निर्मितीसाठी केलेले अथक प्रयत्न मी पाहिले आहेत. बुद्धी वापरून मानव माझे कष्ट कमी करेल, सर्वांना सुखी करण्याच्या कामात मला मदत करेल असं त्यांना वाटत होतं. त्यामुळं आता त्याच्या विरुध्द केलेली तक्रार कदाचित त्यांना आवडणार नाही..”
मग आता काय करणार? 
जे मी आत्तापर्यंत टाळत होतो तेच करावं लागणार असं दिसतं आहे. उद्या सकाळी मी निर्मात्यांकडं जाणार. खरं तर मी इथला राजा असल्यानं सर्व जबाबदारी माझी आहे. इथला कोणताही प्रश्न मीच सोडवला पाहिजे. पण रोज नद्यांची, झाडांची, प्राणी-पक्ष्यांची तब्येत जास्तजास्तच खालावत चालली आहे.  त्यांच्या किंकाळ्यांनी मला कित्येक रात्री झोप नाही. त्यामुळे आता निर्मात्यांकडे जाण्याशिवाय मला कोणताच उपाय दिसत नाही.
सकाळी लवकर उठून निसर्गराजा निर्मात्याकडे गेला. निर्माता आपल्या कार्यशाळेत नेहमीप्रमाणे नवनिर्मीतीच्या कार्यात गढून गेलेला होता. त्याचे ते गढून जाऊन काम करणे निसर्गराजाला नेहमीच भुरळ पाडत असे. कोणत्याही प्रकारे शांतताभंग होऊन त्याची समाधी भंग पावू नये म्हणून निसर्गराजा शांतपणे कोपर्‍यात उभा राहिला. पण निर्मात्याने त्याच्याकडे लगेच वळून पाहिले. त्याचे नेहमीचे अतिशय मोहक हसू त्याच्या चेहर्‍यावर होते.
मला क्षमा करा. मी तुमच्या कामात व्यत्यय आणला. खरंतर मी तुमच्याकडं अतिशय नाईलाजानं आलो आहे.निसर्गराजा म्हणाला.
बस! अरे बस! तू का आला आहेस हे मला पूर्णपणे माहीत आहे. मी तुझी केव्हापासूनच वाट पहात होतो. पण तू खरंच अत्यंत कर्तव्यदक्ष राजा आहेस. त्यामुळं प्रजेच्या दुःखावर उपाय शोधण्याचा तू किती आटोकाट प्रयत्न करत होतास हे मी पाहातच होतो. त्यामुळे तू स्वतःला अजिबातच अपराधी वाटून घेऊ नकोस.
प्रभो, हे काय भयंकर संकट आलं आहे माझ्या प्रजेवर? काय बोलावं तेच मला कळत नाही महाराज.  मानव आपली सर्वोत्कृष्ट निर्मीती आहे. आपण त्याला अनेक अद्वितीय देणग्या दिलेल्या आहेत. त्यामुळं तो असं करणार नाही; किंवा त्याच्या हातून नकळत काही चुका झाल्याच तर तो इतर प्रजाजनांप्रमाणं त्यातून नक्की शिकेल, अधिक शहाणा होऊन त्याचा तो त्या दुरुस्त करेल असं मला मनोमन वाटत होतं.  पण आता माझ्या सहनशक्तीच्या पुढे गेल्यानं मला तुमच्याकडे यावं लागलं.”  निसर्गाचा आवाज एकदम कंप पावू लागला. त्याला पुढे बोलवेना.
शांत हो. निसर्गा, चूक माझीच आहे. तेव्हा उपायही मलाच करावा लागणार.
म्हणजे? मी नाही समजलो महाराज. चूक? आणि तीही आपल्याकडून? केवळ अशक्य!
आहे खरं तसं. जेव्हा मी संपूर्ण जगाची निर्मीती करत होतो तेव्हा प्राणी, पशू, पक्षी, झाडे, नद्या-नाले, समुद्र, सगळ्याच गोष्टी मला अगदी माझ्या मनाप्रमाणे निर्दोष तयार करता आल्या. पण जेव्हा मानवाची निर्मिती सुरु होती तेव्हा कसा कोण जाणे पण ह्या मानवात हावकिंवा लोभीपणानावाचा व्हायरस कधी शिरला ते मला देखील कळलंच नाही. तो काढण्याचे मी खूप आटोकाट प्रयत्न केले. पण दुर्दैवानं तो कधीच काढता आला नाही. आता त्या व्हायरसने जगभर थैमान घालणं सुरु केलं आहे. तो मानव त्याच्या प्रभावाखाली बेछूट वृक्षतोड करायला लागला, प्राण्यांची इतकंच काय माणसांचीही हत्या करायला लागला. आपला प्रदेश पुरेना, म्हणून इतरांचा प्रदेश खायला त्यानं सुरुवात केली. त्यासाठी  नाना युक्त्या तो वापरत आहे, संहारक युध्दं करत आहे.  हे सगळं त्या हावव्हायरसचा परिणाम. हा दिवस कधी ना कधी उगवणारच ह्याची मला खात्री होतीच. म्हणून तर मी कित्येक वर्षे त्यावर संशोधन करत होतो. तुझे सगळे प्रयत्न निष्फळ होणारच होते. पण ही परीस्थिती सुधारण्यासाठी तू तुझ्या परीनं प्रयत्न केलेस. म्हणून मला तुझं खूप कौतूक करायचं आहे.
हो महाराज! ते माझे कर्तव्यच आहे. पण तुम्ही मगाशी कसल्या संशोधनाचा उल्लेख केलात. या समस्येवर काही उपाय तुम्हाला सापडला आहे का? लवकर सांगा! मी ऐकायला अगदी उत्सुक आहे.
हो निसर्गा, आता मीच निर्माण केलेलं एक कोरोनानामक व्हायरसचं ब्रह्मास्त्र मी मानवावर सोडणार आहे.
त्यानं काय होईल महाराज?
’हाव’ या व्हायरसचा प्रभाव कमी करण्यासाठी या दुसर्‍या ’मुकुटधारी’ व्हायरसचे अस्त्र.”
“त्यामुळे सगळं जग परत पूर्ववत होईल ना? का सगळी मानवजातच नष्ट होईल?
नाही तसं काहीच होणार नाही . पण करोनास्त्रामुळं संपूर्ण मानवजात पुढील काही महिने स्वतःला घरात कोंडून घेईल. त्यामुळं त्याची तुझ्या कामातली ढवळाढवळ कमी होईल. त्यात तुला बिघडलेल्या गोष्टी सुधारायला अवधी मिळेल. तुझे प्रजाजन खूप दमले आहेत. त्यांना थोड्या अंशी विश्रांती मिळेल. काही दिवस तरी ते शांतता अनुभवतील. काही दिवस तरी शुध्द मोकळी हवा अनुभवतील.  काही दिवसांच्या विश्रांतीनंतर ते परत जोमानं कामाला लागू शकतील. आणि बुद्धी वापरायला, विचार करायला आणि तोल सावरायला मानवालाही वेळ मिळेल.”
अहो, पण महाराज, त्यामुळे संपूर्ण जगात उलथापालथ नाही का होणार? आर्थिक घडीच विस्कटेल. प्रगतीला खीळ बसेल.”
हो! तुझं बरोबरच आहे. पण या काळात प्रगती म्हणजे नक्की काय, आपण कशाच्या मागं धावतोय याचा तो पुनर्विचार करू शकेल. गंभीर आजारावर कडू औषध अपरिहार्यच आहे त्याला काय करणार?
पण महाराज ह्याने तो हावनावाचा व्हायरस पूर्णपणे नष्ट होईल ना?
छे! छे! तो तसा कधीच नष्ट होणार नाही. तो जगाच्या अंतापर्यंत तसाच रहाणार.
अरे बापरे! मग काय हो करणार ? का हे असंच थोड्या थोड्या दिवसांनी ब्रह्मास्त्र सोडायचं? नका हो अशी क्रूर चेष्टा करू. ह्यावर दुसरा काही उपाय नाही का? मला सांगा, मी काय वाट्टेल ते करायला तयार आहे.
राजा इतका निराश होऊ नकोस. मानवाच्या निर्मितीच्या वेळी जसा हावव्हायरस शिरला तशाच मी त्याच वेळी त्याला इतरांना नाही दिल्या अशा अद्भूत शक्तीही दिल्या आहेत. त्या म्हणजे बुद्धिमत्ता, स्वतः विचार करून योग्य निर्णय घेण्याची क्षमता आणि अनुभवातून शिकून आपल्या चुका दुरुस्त करण्याचा प्रयत्न करणे. म्हणूनच मानव ही सर्वश्रेष्ठ निर्मिती आहे. पण सध्या ’हावे’पुढे बुद्धिमत्तेचा त्याला जरा विसर पडला आहे.
“पण धीर धर. तो यातून बाहेर पडेल तेव्हा अधिक शहाणा होऊन बाहेर पडेल अशी आपण दोघेही आशा करूया. तो सगळ्या गोष्टींचा गांभिर्यानं विचार करेल, आपलं नेमकं काय काय चुकलं हे तो शोधेल आणि स्वतःच्या बुद्धिसामर्थ्याच्या जोरावर यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधेल असं मला वाटतं. तशी माझी खात्रीच आहे!
 “ त्यामुळं आपण दोघेही थोडी वाट पाहूया.  ... खरंतर हे सगळं करायला आणखी पण एक कारण आहे.”
    “ कोणतं महाराज?”
    “ तो या लोभीपणमुळं तुझ्यापासूनही खूप दूर गेला आहे. त्यामुळं त्याला संयम, सुख, समाधान, शांती, सहकार्य या सगळ्याच महत्वाच्या गोष्टींचा विसर पडला आहे. भोवतालचे सर्व सुखात असतील तरच आपण सुखात राहू शकतो हेही तो विसरला आहे. पण मला खात्री आहे, तो ह्यातून बाहेर पडल्यावर जर पुन्हा तुझ्या सान्निध्यात आला तर तो नक्कीच तुझ्यासारख क्षमाशील, संयमी आणि उदार होईल आणि मग खूप प्रश्न सहजच सुटतील.”
“आणि असं नाही झालं तर काय?”
“तर काय, पुन्हा एकदा वेगळं ब्रह्मास्त्र वापरायचं. आपण तरी काय करणार? तो पर्यंत आपण दोघेही त्याची ’हाव’ कमी होवो आणि त्याला बुद्धी वापरून विचार करण्याची ताकद येवो’ अशी प्रार्थना करुया.
चालेल देवा, मी मनापासून प्रार्थना करेन. तोपर्यंत माझी सगळी प्रजा सुखरूप राहू दे, असा आशीर्वाद तेव्हढा द्या.
तथास्तु !निर्माता प्रसन्न मुद्रेने म्हणाला.

---      ---      ---      ---      ---

Sunday, April 5, 2020

राजस्थान बॉर्डरवर डिटेक्टीव्ह चिण्णूची रबाडगिरी - 12



20 डिसेंबर. सकाळी 10-10
पंतप्रधानांचे निवासस्थान
पंतप्रधानांच्या निवासस्थानी सर्वजण इडली-सांबराचा आनंद घेण्यात मश्गूल झाले होते. पण पंतप्रधान महारेणूजींच्या घशाखाली घास  उतरत नव्हता. तिकडे पाकिस्तानी पंतप्रधानांचा खून होणार आणि इकडे आपण इडली सांबर खायचं? खून व्हायला अवकाश होता, खून होणारे पंतप्रधान शत्रू देशाचे होते, पण तरीही खून होऊ नये म्हणून महान चिण्णू प्रयत्न करणार होता. तरी पण ... शेवटी भुजंगरावांना जवळ बोलावून त्यांच्या कानात ते कुजबुजले --
“यजुबिंदरसिंगजींना फोन करा. त्यांना तासाभरात बोलावून घ्या.”
“काय सांगू?”
“सांगू नका!!!” महारेणूजी भुजंगरावजींच्या कानात ओरडले. त्याबरोबर सगळे दचकले.  “माफ करा, तुमचं चालू द्या.” मग परत ते भुजंगरावजींच्या कानात कुजबुजले, “काहीऽहीऽऽ सांगू नका. फक्त म्हणावं, महत्त्वाचं, अर्जंट काम ... जेवायलाच या.”
“आज त्यांचा उपास ...” भुजंगरावजी.
“तुम्हाला बरीच माहिती -- पलीकडच्या खोलीतून फोन करा.”
“हॅलो?” भुजंगरावजींनी पलीकडच्या खोलीतून यजुबिंदरसिंगजींच्या घरी फोन केला. “नेने का?”
“नाही . मी लेले यजुबिंदरसिंगजींचा पीए. कोण भुजंगरावजी? ... अहो, नेनेंना तुम्हीच नाही का नेलंत पंतप्रधान साहेबांचे पीए म्हणून?”
“अं... हो. ... सिंगसाहेब? ...”- भुजंगजी.
“चर्चा! इतर विरोधी नेत्यांबरोबर. दुसरं काय ...” लेले.
“अर्जंट जोडून द्या!”  भुजंगजी.
“मीटींगमधे?”  लेले.
“होय! अर्जंट ... सिंगसाहेब का? साहेब, सिंगजी, मी भुजंग बोलतोय.”

20 डिसेंबर. सकाळी 10-10
प्रमुख विरोधी पक्ष नेते श्री यजुबिंदरसिंग यांचे निवासस्थान
बोंधू जॉमूनजी बोशांशी फोनवर झालेल्या बोलण्यासंबंधी यजुबिंदरसिंगजी सहकार्‍यांना माहिती देत होते. पंतप्रधानांच्या खूनाच्या शक्यतेने सगळेच हबकले होते.
“पण म्हणूनच, ही टांगाभेटीची कल्पना मूर्खपणाची आहे, असं आपण नाहीतरी ठासून सांगणारच होतो.” नवराणाजी.
“नवराणाजी, कल्पना करा, आपण ठासून सांगितलं, आणि पंतप्रधानांचा खून खरंच झाला यजुबिंदरसिंगजी.
“‘तर आपल म्हणणंच सिध्द होणार!”   नवराणाजी.
“तर आपल्याला माहिती होतं हे सिध्द होणार! ... किंवा आपणच तो घडवून आणला, राजकीय स्वार्थासाठी ...” यजुबिंदरसिंगजी.
“ऑं!? असं आहे का?”
नवराणाजी व सगळेच गप्प झाले. तेवढ्यात ‘लोकविहार दलाचे ’ श्री. कन्नूयाजी यादव आले. नमस्कार चमत्कार झाले आणि कन्नूयाजी गाल फुगवून कोपर्‍यात बसून राहिले. सगळेच पुन्हा गप्प झाले.
“काय झालं कन्नूयाजी?” सत्यबिहारीजी.
“काय झालं कन्नूयाजी?” नवराणाजी.
“काही नाही ...”  गाल फुगवून कन्नूयाजी अखेर बोलले.
“मग का गप्प गप्प ...?”  यजुबिंदरसिंगजींनी विचारले.
“आपल्या शवपेटीवर 29 डिसेंबरला आणखी एक खिळा ठोकणार ते!” एकदम उभे राहात कन्नूयाजी किंचाळले. सगळे दचकून गप्प झाले.
“ऑं? तुम्ही ख्रिश्चन कधी झाला?” ‘निद्रा जागरण मंचाचे’ श्री. तोतारामजी बिट्टा आत येता येता म्हणाले.
“काय वेळ आलीयै आपल्यावर आणि तुम्हाला विनोद सुचतोय!” हातवारे करत कन्नूयाजी म्हणाले. “तुमच्या सरणावर आणखी एक लाकूड ठेवणार ते, असं म्हणूया?”
“कोण ते? कोण आमच्या जिवावर उठलंय? त्यांना आमच्या आधी वर पोचवूनच आम्ही अजून खाली हिंडतो आहोत.” तोतारामजी आवेशाने म्हणाले.
“म्हणजे? आत्ता तुमच्याही मनात हाच विचार आहे?” एकदम घाबरुन यजुबिंदरसिंगजींनी विचारले.
“आमच्या म्हणजे? आपल्या सगळ्यांच्याच मनांत हाच विचार आहे. आणि नुसत्या विचारावर थांबणारे आम्ही नाही. ‘जगा अथवा मरा, जगण्यासाठी मारा!’ असं गीतेमधे भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला सांगितलं तेच आमचे थोर नेते ‘नितजागृतमणी’ पुंडरिपुंजयजींनी आम्हाला सांगितलं. दुसर्‍याला मारल्याशिवाय आपल्याला जगता येत नसेल तर दुसर्‍याला मारलेच पाहिज’ हा निसर्गनियम आहे. प्रत्येक सच्च्या सैनिकाचे ते कर्तव्य आहे.”
“म्हणजे? तुमच्या सगळ्यांचं ठरलंसुध्दा आहे?” यजुबिंदरसिंगजी.
“तुम्हीही आमच्याबरोबरच आहात!” तोतारामजी.
“छे,छे!! आम्ही नाही! या असल्या कामात तुम्ही आम्हाला गृहीत धरु नका.” यजुबिंदरसिंगजी घाबरुन म्हणाले.
तुम्ही नेहमीच आयत्या वेळी अशी कच खाता. आणि आम्हाला तोंडघशी पाडता.कन्नूयाजी रुसून गाल फुगवून म्हणाले.आणि मग नुसतं, ‘कॅय झॅलं कन्नूयॉजी, कॅय झॅलं कन्नूयॉजीअसं म्हणून काय उपयोग?
अहो पण ... आत्ता काही कारण नाही ... आणि एकदम असं एखाद्याच्या जिवावर उठायचं म्हणजेयजुबिंदरसिंगजी.
आता तुम्हाला माघार घेता येणार नाही. त्यांची वेळ आलीय हेच कारण. तोतारामजी आवेशानं म्हणाले.
यजुबिंदरसिंगजींनी कपाळाला हात लावला. मग सत्यबिहारीजी आणि नवराणाजींकडे हताशपणे पाहात ते म्हणाले, “तुम्ही तरी काहीतरी बोला ...
आम्ही काय बोलणार?सत्यबिहारीजी.
तुमचं कशाबद्दल चाललंय, आम्हाला समजतच नाहीयनवराणाजी.
असं काय करताय? मगाशी बोंधू जॉमूनजी फोनवर काय सांगत होते?यजुबिंदरसिंगजी.
म्हणजे पंतप्रधानांचा खून?सैय्यद काझीजी मधेच एकदम ओरडले.
ऑं? काय ...?” कन्नूयाजी आणि तोतारामजी एकदम ओरडले.
तेवढयात फोनची बेल वाजली.

20 डिसेंबर. सकाळी 10-30
प्रमुख विरोधी पक्ष नेते श्री यजुबिंदरसिंग यांचे निवासस्थान
“हॅलो? मी भुजंग बोलतोय. सिंग साहेब का?” भुजंगजी.
“होय. नंतर भुजंगजी. मीटींग चाललीय, जरा वेळानं ...” यजुबिंदरसिंगजी.
“अर्जंट आहे. पंतप्रधानांचा खून ...”  भुजंगजी.
“काय? ... एवढयात झाला सुध्दा? अरे ...” यजुबिंदरसिंगजींनी कपाळाला हात लवला. त्यांना धसक्यानं बोलणंच सुचेना.
“होणार आहे.” भुजंगजी.
“‘तुम्ही कुठून बोलताय?”  यजुबिंदरसिंगजी.
“महारेणूजींच्याच घरातून. तुम्हाला अर्जंट बोलावलंय.” भुजंगजी.  
“काय इतक्यात ... मी तुम्हाला माझा माणूस समजत होतो.” यजुबिंदरसिंगजी.
“मी तुमचाच आहे. म्हणून तर महारेणूजींनी नको म्हटलं असतानाही मी तुम्हाला ही माहीती देतोय. म्हणजे भेटायला येताना तुम्ही तयारीत असाल.”
“आता कसली तयारी ऽऽ !? अरे,अरे...” यजुबिंदरसिंगजी.
“तुम्ही पंतप्रधान झाल्यावर मला ’मानव विकास’, निदान 'वन व प्राणी विकास खातं’तरी दिलं पाहिजे.”  भुजंगजी.
“अहो ... अहो ... हे तरी निदान तिथूनच बोलू नका.” यजुबिंदरसिंगजी.
“बारापर्यंत जेवायलाच बोलावलंय.” भुजंगजी.
“पण – मला – मी -- अशा परिस्थितीत मीच त्यांच्याबरोबर म्हणजे ... ”  यजुबिंदरसिंगजी.
“मी सांगितलंय त्यांना, तुमचा उपास असतो, म्हणून.”
फोन बंद झाला आणि यजुबिंदरसिंगजी कपाळाला हात लावून मट्कन खालीच बसले.
“काय झालं, कुणाचा फोन?”  नवराणाजी.
“पंतप्रधानांच्या घरून.” यजुबिंदरसिंगजी.
“काय” सर्वजण एकदमच ओरडले.  “त्यांना एवढयात समजलंसुध्दा?”

20 डिसेंबर. सकाळी 10-45
पंतप्रधानांचे निवासस्थान
यजुबिंदरसिंगजींना फोन करुन भुजंगरावजी वळताहेत तोच फोनची बेल वाजली. आपण फोन उचलावा का नाही असा विचार करत त्यांनी फोन उचललाच.
“हॅलो?”  भुजंगरावजी.
“हॅलो ऽऽ ” फोनवर नाजूक, स्टायलीत लांबवलेला, कमावलेला गोड आवाज आला आणि भुजंगरावजी एकदम सावध झाले. आवाज ‘हट्टपूर्तीकरा पार्टीच्या’ जयजगदीश्वरी देवींचा होता. आवाजाबरोबर इंपोर्टेड सेंटचा मादक भपकारा आल्याचाही त्यांना भास झाला आणि त्यांच्या अंगावर शहारा आला. ते काही बोलणार इतक्यात पलीकडच्या बैठकीच्या खोलीतून महारेणूजींनीही फोन घेतला.
“हॅलो? कोण बोलतोय?”  महारेणूजी.
“हॅलो मी ईऽश्वरीऽऽ जयजगदीश्वरीदेवी. महारेणूजी, आवाज ओळखला नाही?”
“हं.”  पट्कन तोडत महारेणूजी म्हणाले. “‘मी आतून फोन घेतो.”
भुजंगरावजींना काय करावे समजेना. इतक्यात महारेणूजी आत आले तेव्हा पट्कन भुजंगरावजींनी फोन त्यांच्यापुढे केला.
“हं, नेहमीप्रमाणे चोरुन ऐकत होता वाटतं?” फोनवर हात ठेवून महारेणूजींनी हसत विचारले. भुजंरावजींनी मनातल्या मनात दात ओठ खाल्ले.
“छे,छे! यजुबिंदरसिंगजींना फोन केला. तेवढ्यात पुन्हा बेल वाजली म्हणून फोन उचलला तोच तुम्ही ... ”  भुजंगरावजी.
“मग काय म्हणाले?” महारेणूजी.
“अं? कोण? -- हां हां, यजुबिंदरसिंगजी! येतायत.” भुजंगरावजी म्हणाले आणि पट्कन बाहेर पडले.
हॅलो? आवाज ओळखला तर! तुमचा आवाज एकदा ऐकल्यावर कोण विसरेल? महारेणूजी फोनवर म्हणाले.
पण तुम्ही मात्र सारखे विसरता, बाई जयजगदीश्वरीदेवी.
“तुम्ही मीटींगला आला नाहीत.”
“फार वाट पाहिलीत?” जयजगदीश्वरीदेवी.
“तुम्ही आमच्या मैत्रिण पक्ष. शिवाय ...”  महारेणूजी.
“मैत्रीण पक्ष म्हणता आणि आम्हाला विसरता. बरोबर नेत नाही.”
“कुठं?”  महारेणूजी.
“टांग्यातून टांगाभेटीला” जयजगदीश्वरीदेवी.
“टांग्यातून ते येणार. आपण फक्त स्वागत करायचं आणि भेटायचं. तुम्ही पण या ...” महारेणूजी.                                                                          
“इश्श्श्श्श!! मला नाही हं जमणार पाकिस्तानच्या पंतप्रधानांना मिठी मारुन भेटायला ...”  जयजगदीश्वरीदेवी. “आपण असं करु या का? आपण त्यांना भेटायला बग्गीतून जाऊ.”  
“अहो पण ...” महारेणूजी.
“एवढ्या मोठ्या देशाचे तुम्ही पंतप्रधान. ते टांग्यातून, तर मोठेपणा दाखवण्यासाठी तुम्ही बग्गीतूनच जायला पहिजे बाई!” जयजगदीश्वरीदेवी.
“पण ...”  महारेणूजी.
“शिवाय बग्गीत मला पण तुमच्या शेजारी बसता येईल.” जयजगदीश्वरीदेवी.
“पण बग्गीत ...”  महारेणूजी.
“तुमच्या मिसेस ना? त्या एका बाजूला बसतील, मी एका बाजूला बसेन. म्हणजे कौटुंबिक टच आला आणि मित्रपक्षांना बरोबर नेल्यासारखंही झालं. फार तर समोरच्या बाकावर यजुबिंदरसिंगजींना बसवा. ते आपल्याबरोबर आले आणि मी समोर असले की त्यांच्या विरोधाची धार पण कमी होईल.”  जयजगदीश्वरीदेवी.
“पण ... अहो ते ...”  महारेणूजी.
“मी त्यांना फोन केला म्हणजे लग्गेच ऐकतील ते!” जयजगदीश्वरीदेवी. आता पण बीण काही नाही. बग्गी आणि तुमच्या शेजारी मी, एवढं तर नक्की!”  
“पण ...”  महारेणूजी.
“मैत्रीण पक्ष म्हणता आणि ... एवढा हट्ट पुरवाच! नाहीतरी आमच्या पक्षाचं नावाच ’हट्टपूर्तीकरा पार्टी’ आहे !”  जयजगदीश्वरीदेवी म्हणाल्या आणि त्यावर महारेणूजी काही बोलण्याच्या आतच फोन बंद झाला. महारेणूजी अवाक होऊन बंद फोनकडे नुसते पाहात तसेच उभे राहिले.