MahaGanapati Mandir

MahaGanapati Mandir
महागणपती मंदिर, वाई, महाराष्ट्र.

मनातलं

ज्या यशाने उन्माद येईल असं यश मला नको. ज्या यशाने इतरांच्या त्या यशातील वाट्याबद्दल कृतज्ञता मनात दाटून येईल आणि अधिक विनम्रता येईल ते खरं यश.

Sunday, April 5, 2020

राजस्थान बॉर्डरवर डिटेक्टीव्ह चिण्णूची रबाडगिरी - 12



20 डिसेंबर. सकाळी 10-10
पंतप्रधानांचे निवासस्थान
पंतप्रधानांच्या निवासस्थानी सर्वजण इडली-सांबराचा आनंद घेण्यात मश्गूल झाले होते. पण पंतप्रधान महारेणूजींच्या घशाखाली घास  उतरत नव्हता. तिकडे पाकिस्तानी पंतप्रधानांचा खून होणार आणि इकडे आपण इडली सांबर खायचं? खून व्हायला अवकाश होता, खून होणारे पंतप्रधान शत्रू देशाचे होते, पण तरीही खून होऊ नये म्हणून महान चिण्णू प्रयत्न करणार होता. तरी पण ... शेवटी भुजंगरावांना जवळ बोलावून त्यांच्या कानात ते कुजबुजले --
“यजुबिंदरसिंगजींना फोन करा. त्यांना तासाभरात बोलावून घ्या.”
“काय सांगू?”
“सांगू नका!!!” महारेणूजी भुजंगरावजींच्या कानात ओरडले. त्याबरोबर सगळे दचकले.  “माफ करा, तुमचं चालू द्या.” मग परत ते भुजंगरावजींच्या कानात कुजबुजले, “काहीऽहीऽऽ सांगू नका. फक्त म्हणावं, महत्त्वाचं, अर्जंट काम ... जेवायलाच या.”
“आज त्यांचा उपास ...” भुजंगरावजी.
“तुम्हाला बरीच माहिती -- पलीकडच्या खोलीतून फोन करा.”
“हॅलो?” भुजंगरावजींनी पलीकडच्या खोलीतून यजुबिंदरसिंगजींच्या घरी फोन केला. “नेने का?”
“नाही . मी लेले यजुबिंदरसिंगजींचा पीए. कोण भुजंगरावजी? ... अहो, नेनेंना तुम्हीच नाही का नेलंत पंतप्रधान साहेबांचे पीए म्हणून?”
“अं... हो. ... सिंगसाहेब? ...”- भुजंगजी.
“चर्चा! इतर विरोधी नेत्यांबरोबर. दुसरं काय ...” लेले.
“अर्जंट जोडून द्या!”  भुजंगजी.
“मीटींगमधे?”  लेले.
“होय! अर्जंट ... सिंगसाहेब का? साहेब, सिंगजी, मी भुजंग बोलतोय.”

20 डिसेंबर. सकाळी 10-10
प्रमुख विरोधी पक्ष नेते श्री यजुबिंदरसिंग यांचे निवासस्थान
बोंधू जॉमूनजी बोशांशी फोनवर झालेल्या बोलण्यासंबंधी यजुबिंदरसिंगजी सहकार्‍यांना माहिती देत होते. पंतप्रधानांच्या खूनाच्या शक्यतेने सगळेच हबकले होते.
“पण म्हणूनच, ही टांगाभेटीची कल्पना मूर्खपणाची आहे, असं आपण नाहीतरी ठासून सांगणारच होतो.” नवराणाजी.
“नवराणाजी, कल्पना करा, आपण ठासून सांगितलं, आणि पंतप्रधानांचा खून खरंच झाला यजुबिंदरसिंगजी.
“‘तर आपल म्हणणंच सिध्द होणार!”   नवराणाजी.
“तर आपल्याला माहिती होतं हे सिध्द होणार! ... किंवा आपणच तो घडवून आणला, राजकीय स्वार्थासाठी ...” यजुबिंदरसिंगजी.
“ऑं!? असं आहे का?”
नवराणाजी व सगळेच गप्प झाले. तेवढ्यात ‘लोकविहार दलाचे ’ श्री. कन्नूयाजी यादव आले. नमस्कार चमत्कार झाले आणि कन्नूयाजी गाल फुगवून कोपर्‍यात बसून राहिले. सगळेच पुन्हा गप्प झाले.
“काय झालं कन्नूयाजी?” सत्यबिहारीजी.
“काय झालं कन्नूयाजी?” नवराणाजी.
“काही नाही ...”  गाल फुगवून कन्नूयाजी अखेर बोलले.
“मग का गप्प गप्प ...?”  यजुबिंदरसिंगजींनी विचारले.
“आपल्या शवपेटीवर 29 डिसेंबरला आणखी एक खिळा ठोकणार ते!” एकदम उभे राहात कन्नूयाजी किंचाळले. सगळे दचकून गप्प झाले.
“ऑं? तुम्ही ख्रिश्चन कधी झाला?” ‘निद्रा जागरण मंचाचे’ श्री. तोतारामजी बिट्टा आत येता येता म्हणाले.
“काय वेळ आलीयै आपल्यावर आणि तुम्हाला विनोद सुचतोय!” हातवारे करत कन्नूयाजी म्हणाले. “तुमच्या सरणावर आणखी एक लाकूड ठेवणार ते, असं म्हणूया?”
“कोण ते? कोण आमच्या जिवावर उठलंय? त्यांना आमच्या आधी वर पोचवूनच आम्ही अजून खाली हिंडतो आहोत.” तोतारामजी आवेशाने म्हणाले.
“म्हणजे? आत्ता तुमच्याही मनात हाच विचार आहे?” एकदम घाबरुन यजुबिंदरसिंगजींनी विचारले.
“आमच्या म्हणजे? आपल्या सगळ्यांच्याच मनांत हाच विचार आहे. आणि नुसत्या विचारावर थांबणारे आम्ही नाही. ‘जगा अथवा मरा, जगण्यासाठी मारा!’ असं गीतेमधे भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला सांगितलं तेच आमचे थोर नेते ‘नितजागृतमणी’ पुंडरिपुंजयजींनी आम्हाला सांगितलं. दुसर्‍याला मारल्याशिवाय आपल्याला जगता येत नसेल तर दुसर्‍याला मारलेच पाहिज’ हा निसर्गनियम आहे. प्रत्येक सच्च्या सैनिकाचे ते कर्तव्य आहे.”
“म्हणजे? तुमच्या सगळ्यांचं ठरलंसुध्दा आहे?” यजुबिंदरसिंगजी.
“तुम्हीही आमच्याबरोबरच आहात!” तोतारामजी.
“छे,छे!! आम्ही नाही! या असल्या कामात तुम्ही आम्हाला गृहीत धरु नका.” यजुबिंदरसिंगजी घाबरुन म्हणाले.
तुम्ही नेहमीच आयत्या वेळी अशी कच खाता. आणि आम्हाला तोंडघशी पाडता.कन्नूयाजी रुसून गाल फुगवून म्हणाले.आणि मग नुसतं, ‘कॅय झॅलं कन्नूयॉजी, कॅय झॅलं कन्नूयॉजीअसं म्हणून काय उपयोग?
अहो पण ... आत्ता काही कारण नाही ... आणि एकदम असं एखाद्याच्या जिवावर उठायचं म्हणजेयजुबिंदरसिंगजी.
आता तुम्हाला माघार घेता येणार नाही. त्यांची वेळ आलीय हेच कारण. तोतारामजी आवेशानं म्हणाले.
यजुबिंदरसिंगजींनी कपाळाला हात लावला. मग सत्यबिहारीजी आणि नवराणाजींकडे हताशपणे पाहात ते म्हणाले, “तुम्ही तरी काहीतरी बोला ...
आम्ही काय बोलणार?सत्यबिहारीजी.
तुमचं कशाबद्दल चाललंय, आम्हाला समजतच नाहीयनवराणाजी.
असं काय करताय? मगाशी बोंधू जॉमूनजी फोनवर काय सांगत होते?यजुबिंदरसिंगजी.
म्हणजे पंतप्रधानांचा खून?सैय्यद काझीजी मधेच एकदम ओरडले.
ऑं? काय ...?” कन्नूयाजी आणि तोतारामजी एकदम ओरडले.
तेवढयात फोनची बेल वाजली.

20 डिसेंबर. सकाळी 10-30
प्रमुख विरोधी पक्ष नेते श्री यजुबिंदरसिंग यांचे निवासस्थान
“हॅलो? मी भुजंग बोलतोय. सिंग साहेब का?” भुजंगजी.
“होय. नंतर भुजंगजी. मीटींग चाललीय, जरा वेळानं ...” यजुबिंदरसिंगजी.
“अर्जंट आहे. पंतप्रधानांचा खून ...”  भुजंगजी.
“काय? ... एवढयात झाला सुध्दा? अरे ...” यजुबिंदरसिंगजींनी कपाळाला हात लवला. त्यांना धसक्यानं बोलणंच सुचेना.
“होणार आहे.” भुजंगजी.
“‘तुम्ही कुठून बोलताय?”  यजुबिंदरसिंगजी.
“महारेणूजींच्याच घरातून. तुम्हाला अर्जंट बोलावलंय.” भुजंगजी.  
“काय इतक्यात ... मी तुम्हाला माझा माणूस समजत होतो.” यजुबिंदरसिंगजी.
“मी तुमचाच आहे. म्हणून तर महारेणूजींनी नको म्हटलं असतानाही मी तुम्हाला ही माहीती देतोय. म्हणजे भेटायला येताना तुम्ही तयारीत असाल.”
“आता कसली तयारी ऽऽ !? अरे,अरे...” यजुबिंदरसिंगजी.
“तुम्ही पंतप्रधान झाल्यावर मला ’मानव विकास’, निदान 'वन व प्राणी विकास खातं’तरी दिलं पाहिजे.”  भुजंगजी.
“अहो ... अहो ... हे तरी निदान तिथूनच बोलू नका.” यजुबिंदरसिंगजी.
“बारापर्यंत जेवायलाच बोलावलंय.” भुजंगजी.
“पण – मला – मी -- अशा परिस्थितीत मीच त्यांच्याबरोबर म्हणजे ... ”  यजुबिंदरसिंगजी.
“मी सांगितलंय त्यांना, तुमचा उपास असतो, म्हणून.”
फोन बंद झाला आणि यजुबिंदरसिंगजी कपाळाला हात लावून मट्कन खालीच बसले.
“काय झालं, कुणाचा फोन?”  नवराणाजी.
“पंतप्रधानांच्या घरून.” यजुबिंदरसिंगजी.
“काय” सर्वजण एकदमच ओरडले.  “त्यांना एवढयात समजलंसुध्दा?”

20 डिसेंबर. सकाळी 10-45
पंतप्रधानांचे निवासस्थान
यजुबिंदरसिंगजींना फोन करुन भुजंगरावजी वळताहेत तोच फोनची बेल वाजली. आपण फोन उचलावा का नाही असा विचार करत त्यांनी फोन उचललाच.
“हॅलो?”  भुजंगरावजी.
“हॅलो ऽऽ ” फोनवर नाजूक, स्टायलीत लांबवलेला, कमावलेला गोड आवाज आला आणि भुजंगरावजी एकदम सावध झाले. आवाज ‘हट्टपूर्तीकरा पार्टीच्या’ जयजगदीश्वरी देवींचा होता. आवाजाबरोबर इंपोर्टेड सेंटचा मादक भपकारा आल्याचाही त्यांना भास झाला आणि त्यांच्या अंगावर शहारा आला. ते काही बोलणार इतक्यात पलीकडच्या बैठकीच्या खोलीतून महारेणूजींनीही फोन घेतला.
“हॅलो? कोण बोलतोय?”  महारेणूजी.
“हॅलो मी ईऽश्वरीऽऽ जयजगदीश्वरीदेवी. महारेणूजी, आवाज ओळखला नाही?”
“हं.”  पट्कन तोडत महारेणूजी म्हणाले. “‘मी आतून फोन घेतो.”
भुजंगरावजींना काय करावे समजेना. इतक्यात महारेणूजी आत आले तेव्हा पट्कन भुजंगरावजींनी फोन त्यांच्यापुढे केला.
“हं, नेहमीप्रमाणे चोरुन ऐकत होता वाटतं?” फोनवर हात ठेवून महारेणूजींनी हसत विचारले. भुजंरावजींनी मनातल्या मनात दात ओठ खाल्ले.
“छे,छे! यजुबिंदरसिंगजींना फोन केला. तेवढ्यात पुन्हा बेल वाजली म्हणून फोन उचलला तोच तुम्ही ... ”  भुजंगरावजी.
“मग काय म्हणाले?” महारेणूजी.
“अं? कोण? -- हां हां, यजुबिंदरसिंगजी! येतायत.” भुजंगरावजी म्हणाले आणि पट्कन बाहेर पडले.
हॅलो? आवाज ओळखला तर! तुमचा आवाज एकदा ऐकल्यावर कोण विसरेल? महारेणूजी फोनवर म्हणाले.
पण तुम्ही मात्र सारखे विसरता, बाई जयजगदीश्वरीदेवी.
“तुम्ही मीटींगला आला नाहीत.”
“फार वाट पाहिलीत?” जयजगदीश्वरीदेवी.
“तुम्ही आमच्या मैत्रिण पक्ष. शिवाय ...”  महारेणूजी.
“मैत्रीण पक्ष म्हणता आणि आम्हाला विसरता. बरोबर नेत नाही.”
“कुठं?”  महारेणूजी.
“टांग्यातून टांगाभेटीला” जयजगदीश्वरीदेवी.
“टांग्यातून ते येणार. आपण फक्त स्वागत करायचं आणि भेटायचं. तुम्ही पण या ...” महारेणूजी.                                                                          
“इश्श्श्श्श!! मला नाही हं जमणार पाकिस्तानच्या पंतप्रधानांना मिठी मारुन भेटायला ...”  जयजगदीश्वरीदेवी. “आपण असं करु या का? आपण त्यांना भेटायला बग्गीतून जाऊ.”  
“अहो पण ...” महारेणूजी.
“एवढ्या मोठ्या देशाचे तुम्ही पंतप्रधान. ते टांग्यातून, तर मोठेपणा दाखवण्यासाठी तुम्ही बग्गीतूनच जायला पहिजे बाई!” जयजगदीश्वरीदेवी.
“पण ...”  महारेणूजी.
“शिवाय बग्गीत मला पण तुमच्या शेजारी बसता येईल.” जयजगदीश्वरीदेवी.
“पण बग्गीत ...”  महारेणूजी.
“तुमच्या मिसेस ना? त्या एका बाजूला बसतील, मी एका बाजूला बसेन. म्हणजे कौटुंबिक टच आला आणि मित्रपक्षांना बरोबर नेल्यासारखंही झालं. फार तर समोरच्या बाकावर यजुबिंदरसिंगजींना बसवा. ते आपल्याबरोबर आले आणि मी समोर असले की त्यांच्या विरोधाची धार पण कमी होईल.”  जयजगदीश्वरीदेवी.
“पण ... अहो ते ...”  महारेणूजी.
“मी त्यांना फोन केला म्हणजे लग्गेच ऐकतील ते!” जयजगदीश्वरीदेवी. आता पण बीण काही नाही. बग्गी आणि तुमच्या शेजारी मी, एवढं तर नक्की!”  
“पण ...”  महारेणूजी.
“मैत्रीण पक्ष म्हणता आणि ... एवढा हट्ट पुरवाच! नाहीतरी आमच्या पक्षाचं नावाच ’हट्टपूर्तीकरा पार्टी’ आहे !”  जयजगदीश्वरीदेवी म्हणाल्या आणि त्यावर महारेणूजी काही बोलण्याच्या आतच फोन बंद झाला. महारेणूजी अवाक होऊन बंद फोनकडे नुसते पाहात तसेच उभे राहिले.

No comments:

Post a Comment