अस्वीकृती (Disclaimer) - राजस्थान बॉर्डरवर डिटेक्टीव्ह चिण्णूची रबाडगिरी - 1
20 डिसेंबर. सकाळी 09-00
प्रमुख विरोधी पक्ष नेते श्री यजुबिंदरसिंग यांचे निवासस्थान
20 डिसेंबरलाच सकाळी साडेनऊ वाजता प्रमुख विरोधी
पक्ष नेते श्री यजुबिंदरसिंग यांच्या निवासस्थानी त्यांच्या ’विधर्म-पक्षी पक्षातील’
इतर नेते व इतर विरोधी पक्षांचे नेते यांची बैठक होती. इतर विरोधी पक्षांचे नेते येण्याआधी
त्यांच्या पक्षातीलच श्री सत्यबिहारी वेदप्रकाश, श्री. नवराणाजी मुरलीश्वर, श्री.सैय्यद
काझी व श्रीमती निर्गुणा चांगदेव या इतर नेत्यांबरोबर ते सकाळी नऊ पासूनच विचार विनिमय
करत होते. सध्याच्या भारत-पाक पंतप्रधानांच्या आगामी भेटीसंदर्भात काय भूमिका घ्यावी
यावर अजून एकदम होत नव्हते. ही घटना ‘चांगली’ म्हणावी तर ’आपल्या पक्षाला विरोधी पक्ष
का म्हणावे? मित्रपक्षच का म्हणू नये?’ असा सत्यबिहारीजी वेदप्रकाशांचा मुद्दा होता.
आणि तो खरा होता. आणि ही घटनाच अशी होती की ’तिला ’वाईट’ तर म्हणताच येत नाही’ असे यजुबिंदरसिंगजींचे म्हणणे होते. ’आपल्या
पक्षाच्या नेहमीच्या धोरणांशीही ही घटना सुसंगत असल्याने आपली पंचाईत होत आहे’ असे
नवराणाजी मुरलीश्वरांना वाटत होते. आणि तेही खरे होतं. शिवाय ’काही महिन्यात सत्ताबदल
झाल्यास (ती शक्यता कायमच असते) आपली आत्ताची भूमिका त्यावेळच्या भारत-पाक संबंधांच्या
संदर्भात अडचणीची ठरू नये’ असेही सर्वांना वाटत होते आणि तेही खरे होते.
“खरं तर ही टांगा भेटीची मूळ कल्पना माझीच
--” शेवटी लाजत लाजत यजुबिंदरसिंगजी म्हणाले.
“काय?” नवराणाजी व सत्यबिहारीजी.
“तुम्हाला म्हणून सांगतो ... आपण सगळे घरचेच आहोत
म्हणून ... तुमच्याजवळच ठेवा ... काझीजींना माहिती आहे. ...”
यावर सत्यबिहारीजींनी आणि नवराणाजींनी एकमेकांकडे
व नंतर सैयद काझीजींकडे पाहिले. काझीजी मान खाली घालून चुळबुळत बसून राहिले.
“तुम्ही - आत्ता - पाक पंतप्रधानांना - सांगितलंत?
टांग्यातून – महारेणूजींना - भेटायला यायला?” शेवटी नवराजींनी अविश्वासाने विचारले.
“च् - च् - तसं नाही. ... खूऽप मागे, त्यावेळी
राजारावजी पंतप्रधान होते” यजुबिंदरसिंगजी.
“हां हां !” काझीसकट सर्वांनीच सुस्कारे सोडले.
“त्यावेळी निवडणुका जवळ आल्या होत्या, विरोधकांना
चेव चढला होता. ... काहीतरी नवीन शोधून काढणं भाग होतं. ... मी त्यावेळी तरुण होतो.
राजकारणात शिरलो, तरी अजून स्वप्नंही पाहात होतो. ... तेव्हा मी ही कल्पना राजारावजींना
सांगितली. - की तुम्ही ... थोडं माझं धाडसच ते ... की तुम्ही प्रगतीचं, भविष्याकडे
नेणारं, पॉझीटीव्ह दृष्टिकोन असलेलं, ऐतिहासिक पाऊल टाकलयं, हे दाखवण्यासाठी भारत-पाकिस्तान
दरम्यान बस सेवा चालू करा आणि बसमधून पाकिस्तानला जा ... एक राजकीय स्टंट,
निवडणुकीसाठी. ... यावर विचार करण्याचं राजारावजींनी मला आश्वासनही दिलं होतं. पण सिक्यूरिटीवाल्यांनी
माझं म्हणणं हाणून पाडलं. ... काय काझीजी?”
“अं? - हो. ... हो!” काझीजी.
“अर्थात, काही वेळा सिक्यूरिटीवाल्यांचंही बरोबर
असतं. राजारावजी त्यावेळी बसमधून पाकिस्तानात गेले असते तर कदाचित … कदाचित … आता वाटतं, ती कल्पनाच खरोखर पोरकट होती. किती धोका! आत्ताच पाहा ना! ते इतक्या लांब उघड्या
टांग्यातून येणार, हे उघड्यावर, राजस्थान बॉर्डरवर त्यांना भेटायला जाणार …”
“मग ती मूळ कल्पना तुमचीच, म्हणजे आपलीच होती
असं आपण जाहीर करु या का?” नवराणाजी एकदम म्हणाले. “आत्ताच्या सरकारने आपली कल्पना ढापली असं म्हणूया. सगळे डीटेल्स देऊ. म्हणजे श्रेय
आपल्याला मिळेल. सगळं ठरलंच होतं, पण त्याच्या आत राजारावजी मॉरिशसला गेले, तिथं त्यांच्यावर
खुनी हल्ला झाला आणि मग सिक्यूरिटीचं म्हणणं त्यांना पटून त्यांनी हा बेत रद्द केला,
असं जाहीर करु. नाहीतरी आता कोण राजारावजींना वर विचारायला जाणार आहे?”
“राणाजी, राणाजी --” यजुबिंदरसिंगजी त्यांच्या
उत्साहाला आवर घालत म्हणाले. “’ही कल्पनाच पोरकट, अव्यवहार्य आणि धोकादायक आहे’ असं
आपण जाहीर करु या, असं मला म्हणायचं होतं.”
“चालेल. ... म्हणून आम्ही ती शहाणपणानं, दूरदृष्टींनं
नाकारली, असंही म्हणू या. म्हणजे सध्याचं सरकार शहाणं नाही, त्याला दूरदृष्टी नाही,
असं होईल.” नवराणाजी म्हणाले.
“एवढ्या मोठ्या दोन राष्ट्रांच्या प्रमुखांनी
घोडा-घोडा खेळल्यासारखे पोरकट प्रकार करावे हे शोभणारं नाही.” यजुबिंदरसिंगजी.
“या काळात घोडागाडी म्हणजे प्रतिगामी, उलटे पाऊल,
एकविसाव्या शतकाकडून अठराव्या शतकाकडे वाटचाल असं पण म्हणू या का?” श्रीमती निर्गुणा
चांगदेव इतक्या वेळात पहिल्यांदाच बोलल्या.
“काही हरकत नाही.” त्या मानाने तरुण आणि महिला
प्रतिनिधी असल्याने त्यांना प्रोत्साहन द्यावे म्हणून सत्यबिहारजी म्हणाले.
“आणि ’जातीयवादी, धर्मांध कृत्य’ ...”
काझीजी.
“ते कसं काय?” सत्यबिहारजींनी हे जरा अतीच वाटलं.
“जातीयवादी म्हणजे बघा ... हां! घोड्याची जात.
सरंजामशाहीचं प्रतीक असणारा टांगा ओढणार्या घोड्याच्या जातीची पिळवणूक आणि शोषण
... आणि धर्मांध म्हणजे, धर्मांध म्हणजे,
... ” काझीजी.
“पण टांग्यातून पाक पंतप्रधान येणार. ते इतके
सच्चे धार्मिक मुसलमान असताना त्यांना धर्मांध म्हणता येणार नाही. आपले पंतप्रधान ...”
सत्यबिहारजी.
“ही भेट म्हणजे परकीय कटाचा भाग म्हणता येईल.
नाहीतरी सगळे मुख्य परकीय पुष्पवृष्टीला येणारच आहेत. ते वर दोर्या घेऊन बसलेत आणि
खाली भारत-पाकिस्तानच्या पंतप्रधानांना बाहुल्यांसारखं खेळवतायत असं म्हणता येईल.”
नवराणाजी.
“हे समजा खरं असलं तरी असं जाहीर बोलता येणार
नाही.” यजुबिंदरसिंगजी चुचकारत म्हणाले. “तेव्हा आपलं तरी ठरलं. ’पोरकट, अव्यवहार्य,
धोकादायक, आणि प्रतिगामी!’ बास्! आता इतर विरोधकांनाही बोलावलयं, ते काय म्हणताहेत
ते बघू. काय?”
एवढ्यात ‘समष्टीवादी पार्टीचे’ बोंधू जॉमूनजी बोश यांचा फोन आला.
“ हॉं जी! हॅलो ...” यजुबिंदरसिंगजी .
“नोमोश्कार! ऑमी जॉमून बोऽऽश ...”
“नोमोश्कार बोंधू जॉमूनजी ! बोला. येतात ना?”
“खूप मनात होतं. पण इकडे कलकत्त्यातच अडकून पडलोय.
तिकडे शूटिंगची तयारी कुठपर्यंत आली?”
“काय? कसलं शूटिंग?” यजुबिंदरसिंगजी.
“हिंदी पिक्चर! यावेळी काश्मीरची आठवण काढत राजस्थानच्या
लोकेशनवर ...” जॉमूनजी.
“हा: हा: हा: हा:!” यजुबिंदरसिंगजी.
“तुम्हाला बेस्टलक !” जॉमूनजी.
“का?” यजुबिंदरसिंगजी.
“तुम्ही पहिल्यांदाच व्हिलनचा रोल करणार --” जॉमूनजी.
यजुबिंदरसिंगजी एकदम गप्प झाले.
“पण व्हिलन दणक्यात झाला पाहिजे. पिक्चर संपताना
लोकांना कळलं पाहिजे की व्हिलन जिंकला आणि व्हिलन, म्हणजे तुम्हीच, खरे हिरो ...” जॉमूनजी.
“तुमचं आपलं काहीतरीच. ... हातात तलवार नाही आणि
तुम्ही लढायला सांगताय.” यजुबिंदरसिंगजी.
“पंतप्रधानांचा खून ...” जॉमूनजी.
“काय?” यजुबिंदरसिंगजी एकदम ओरडले. “खरचं? कुठल्या?”
“’कुणाचाही होऊ शकतो! - होण्याची शक्यता आहे’,
- असं म्हणा.”
“खरंच शक्यता आहे?” यजुबिंदरसिंगजी.
“असं फक्त म्हणा ... असं म्हणतोय मी. कल्पना करा.
किती धोका! किती गंभीर दूरगामी परिणाम! भेट ठरवून दोन्ही पंतप्रधान दोन महत्त्वाच्या
राष्ट्रांच्या भवितव्यांना वेठीस धरतायत असं म्हणा.” जॉमूनजी.
“पण हे खरं का?” यजुबिंदरसिंगजी.
“असं काय करताय? ... फक्त शक्यता. किती आतंकवादी
टोळ्या आणि अतिरेकी संघटना; किती विरोधी पक्ष आणि विरोधक; किती गुंतागुंतीचं आंतरराष्ट्रीय
राजकारण; किती माथेफिरू; -- हे खुनाचं कुणाच्याही डोक्यात येऊं शकतं.” जॉमूनजी.
“माझ्या नाही बुवा आलं.” यजुबिंदरसिंगजी.
“सगळं जग तुमच्यासारखं सज्जन थोडंच आहे?” जॉमूनजी.
“हंऽऽ ! पण ... मग हे तुम्हीच का म्हणत नाही.?”
यजुबिंदरसिंगजी.
“तुम्ही प्रमुख विरोधी पक्ष नेते! तुमच्या म्हणण्याला
किंमत आहे. तुमचं लोकांनाही पटेल. आम्ही म्हटलं तर आम्हीच खुनाचा प्लॅन केला आहे असं
वाटायचं.” जॉमूनजी.
“बरं, बरं, बघतो. ...” यजुबिंदरसिंगजी.
“बघू नका! जोरात म्हणा. तुमच्या हातात लढायला
तलवार दिलीय. लढायचं का नाही, तुम्ही बघा ... अच्छा!” फोन बंद झाला.
No comments:
Post a Comment