अस्वीकृती (Disclaimer) - राजस्थान बॉर्डरवर डिटेक्टीव्ह चिण्णूची रबाडगिरी - 1
20डिसेंबर. सकाळी 08-00
पंतप्रधानांचे निवासस्थान
पंतप्रधन व मुख्य मंत्र्यांची मीटिंग - पुढे - - -
लेफ्टनंट् जनरल नाना षटकर्णी आणि मेजर जनरल तात्या
चिमोटे आत आले व सॅल्यूट करुन उभे राहीले.
“व्यत्यय आणल्याबद्दल माफ करा.” नाना षटकर्णी
चाचरत म्हणाले. ‘टी.व्ही’ आणि वीजबोर्डामूळं व्यत्ययाची आम्हाला सवय आहे. पण व्यत्ययाचं
कारण तितकचं महत्त्वाचं असू दे, हे लक्षात ठेवा.’ आप्पारावजी.
“होय, साहेबराव जी सर ..., मा. पंतप्रधानजी
...सर ...”
“बोला, बोला” - महारेणूजी.
“सर, ... पाकिस्तानचे पंतप्रधान टांग्यातून भारतात
आल्यावर टांग्यातून उतरताच त्यांचा खून होणार आहे.” नाना षटकर्णी.
“काय? खून?” सर्वजण एकदम ओरडून म्हणाले.
“अशी इन्फर्मेशन आहे.” नाना.
“ई मेलनं त्यांच्या प्लॅनची फाईल आली.
त्यांनीच पाठवली” तात्या चिमोटे.
“तुम्हाला कधी समजलं?” रणछोडजी.
“काल सकाळी” नाना.
“काय?” आप्पारावजी आणि रणछोडजी एकदमच ओरडले.
“आणि इतका वेळ?” आप्पारावजी गरजले.
“इन्फर्मेशनची खातरजमा ...” नाना.
“मग?” आप्पारावजी.
“केली. ...जी ... राव जी ...साहेब ... जी ...
जी, खून होणार.” तात्या.
“काय?” सर्वजण पुन्हा दचकून एकदम ओरडले.
“नाही साहेबजी ... रावजी ... आता नाही होणार.”
नाना.
“का?” आप्पारावजी.
“आपला तो चिण्णू ...” तात्या चिमोटे.
“ठीक आहे. आता मला नीट समजलं ...” आप्पारावजी
सर्वांकडे पाहून म्हणाले. “तुम्ही सर्वांनी ऐकलचं खून होणार होता. पण आता होणार नाही.”
“पण का होणार नाही?” डिमंटोजी.
“मी म्हणतो, होऊ दे की! परस्पर कटकट मिटेल.” भुजंगजी
मधेच म्हणाले. ते पुढेही काही म्हणणार होते,पण महारेणूजींनी त्यांच्याकडे पाहताच ते
गप्प बसले.
“कटकट काय मिटेल? नवीन शंभर कटकटी चालू होतील.”
महारेणूजी सर्वाकडे पाहात म्हणाले. “आपल्या देशात खून झाला की आपल्यावर शेकणार, विरोधकाचं
फावणार. जगात नाचक्की होणार, इतकी वर्षं जमवत आणलेलं आंतरराष्ट्रीय राजकारण फिसकटणार
... छे,छे,छे!”
“शिवाय पाकिस्तानात नवे पंतप्रधान सत्तेवर येणार.
हे निदान टांग्यातून भेटायला येत होते. ते भेटीला क्षेपणास्त्र पाठ्वतील.” रणछोडजी.
“मग आपणही पाठवू.” भुजंगजी.
“म्हणजे युध्द!!!” रणछोडजी.
“म्हणजे चौथं महायुध्द !कदाचित अणुयुध्द !!”-आप्पारावजी.
“आपण तयार आहोत.” भुजंगजी.
“निम्मं जग बेचिराख होईल...” रणछोडजी डोक्याला
हात लावुन म्हणाले.
“आपण तयार आहोत.” भुजंगजी.
‘आणि उरलेलं तडफडत जगेल ... किंवा मरेल!” रणछोडजी
कळवळुन म्हणाले .
“पण म्हणून आपण गप्प बसायचं?” भुजंगजी.
“पण मग काय करायचं?” आप्पारावजी, रणछोड्जी आणि
डिमंटोजी एकदमच म्हणाले.
“आपला तो चिण्णू ...” तात्या चिमोटे मधेच म्हणाले.
“आपल्याला कसं वाचवायचं?” आप्पारावजी.
“आपला सुप्रसिध्द चिण्णू ...” तात्या.
“जगाला कसं वाचवायचं?” डिमंटोजी.
“आपला तो जगप्रसिध्द चिण्ण्णू ...” तात्या.
“ही काय चिण्णू, चिण्ण्णू, चिण्ण्ण्णू भुणभुण
लावलीय तात्या? आम्ही जगाला विनाशापासून वाचवायचा विचार करतोय, आणि तुमचं आपलं मेंदूला
मुंग्या चावत असल्यासारखं सारखं चिण्णूऽ–चिण्णूऽ–चिण्णूऽऽ!” आप्पारावजी खेकसले.
“मी त्याला सांगितलयं ...” तात्या.
“काय? जगाला विनाशापासून वाचवायला? कुणाला?” आप्पारावजी.
“अं? हो! चिण्णूला ... म्हणजे खून होऊ न द्यायला सांगितलंय.” तात्या.
“चिण्णू चिणमुणकर.” नाना.
“म्हणजे कोण?” डिमंटोजी.
“डी-1-डी.” तात्या
“पण म्हणजे कोण?” सर्व.
“जगातला सर्वात रबाड गुप्तहेर!” चीफ ‘ची’ ऊर्फ
तात्या चिमोटे प्रथमच चिण्णूबद्दल इतकं बरं बोलले. “मी त्याला सांगितलंय म्हणजे ते
होणारच! ... म्हणजे होणार नाही. म्हणजे खून होणार नाही आणि जग विनाशापासून वाचणार.”
“इतका विश्वास वाटतो तुम्हाला? तुमचं ऐकेल
तो?” महारेणूजी.
“अर्थातच! तो माझा माणूस आहे.” तात्या. ‘महान चिण्णू!’ ”
“या परीस्थितीतून बाहेर पडायला आपण आणखी काय करु
शकतो?” महारेणूजी.
“काहीही नाही. फक्त मी त्याला आमच्या डिपार्टमेंटचा असिस्टंट देऊ शकतो.” नाना षट्कर्णी.
“मग ? ...” महारेणूजी.
“जगाचं भवितव्य आता फक्त चिण्णूच्या हाती.” तात्या.
“मग आता तुम्ही चिण्णूला सांगा.” महारेणूजी.
“मी सांगितलंय.” तात्या.
“मग आता तो काय करतोय?” महारेणूजी.
“मी इथं येण्यापूर्वी मला कळलं. तो तातडीनं ‘मिकूट BF-33-C’, ‘लाल गांधिलमाशीतून’ काशीला गेलाय.” तात्या.
“का?” महारेणूजी.
“तेच तर मला समजत नाहीय ...” तात्या.
“शोधा शोधा!” आप्पारावजी आणि रणछोडजी ओरडले.
“जगाचं भवितव्य त्याच्या हातात, आणि तो काशीला
काय करतोय?” डिमंटोजी.
“शोधा! त्याच्या हालचाली आणि प्रयत्न आम्हाला
समजले पाहिजेत. आम्हाला रिपोर्ट करा. अर्धा-अर्धा तासानं, 24 तास!” आप्पारावजी.
“24 तास?” तात्या.
‘होऽऽय! मी संडासात सुध्दा मोबाईल कानाशी धरुन
बसणार आहे.” आप्पारावजी.
“येस्स्सर!” चीफ ‘ची’ तात्या.
“आम्ही सगळे नाही.” डिमंटोजी पट्कन म्हणाले.
“तुम्ही ह्यांना कळवा. हे आम्हाला रोज एकदा सोयीस्कर वेळी कळवतील.”
“आता मी लगेच विरोधी पक्षनेते यजुबिंदरसिंगजींशी
बोलणार आहे. ... आणि भेटीचा कार्यक्रम पार पडेपर्यंत रोज, याच वेळी, इथचं आपली मीटींग
होईल.” मग महारेणूजींनी नोकरांना खूण केली तेव्हा त्यांनी ब्रेकफास्ट सर्व्ह करायला
सुरुवात केली.
“पण रोज रोज नाष्ट्याला इडली नको हं!” रणछोडजी.
“इकडे आम्हाला जगाच्या विनाशाची काळजी लागलीय
आणि तुम्हाला नाष्ट्याची चिंता.” डिमंटोजी.
“चिंता!! चीफ ‘ची’ चिमोटे चिण्णूला शोधा!!!” सर्वांना
दिल्या जाणार्या इडली सांबारातून निघणार्या वाफांकडे आशाळभूतपणे पाहणार्या चीफ ‘ची’
कडे बघून महारेणूजी आयुष्यात पहिल्यांदाच किंचाळले. इतके जोरात किंचाळले की तात्यांना
आणि इतरांनाही फक्त ‘ची-ची-ची-ची-ची ’ असा चित्कार ऐकू आला.
No comments:
Post a Comment