19 डिसेंबर. संध्याकाळ
‘जमात-ए-अतिरेकी’चे
तात्पुरते निवासस्थान
“बॉस! काम फत्ते!!’ उत्साहाने फुरफुरत आत येत ‘टोपी’ म्हणाला.
‘जमात-ए-अतिरेकी’ मधे तो ’बॉस’च्या खालोखाल होता. बेसबॉलची टोपी
रात्रंदिवस त्याच्या डोक्यावर असल्यामुळे सगळे त्याला ‘टोपी’ म्हणत. त्याचे खरे नाव
त्याच्या आई-वडिलांनाही माहीत नव्हते असे म्हणत. कारण खरं म्हणजे त्याचे आई-वडीलच कुणाला
माहीत नव्हते. तो टोपी नेहमी उलटी घालत असे. पण तो उलट्या खोपडीचा आहे आणि उलट्या खोपडीवर
सरळ टोपी घातल्याने टोपी उलटी दिसते, असे सगळे म्हणत. तो शार्प शूटर होता. त्याला प्रत्यक्ष
शूटिंग करताना कोणी पाहिला नव्हता (कारण ते पाहायला समोरचा जिवंतच राहात नसे असे म्हणत.)
पण त्याच्या जुन्या ढगळ पॅंटच्या खिशात नेहमी दोन रिव्हॉल्वर्स लोडेड व सेफ्टी कॅच
मागे ओढून तयार असतात असेही म्हणत. एकट्याने किरकोळचोर्या करण्यापासून, पाकिटे मारण्यापासून,
जबरी दरोडा घालण्यापासून, एखाद्दा गॅंगचा तात्पुरता मेंबर होऊन गॅंगवॉरमधे भाग घेण्यापासून,
निरनिरळ्या अतिरेकी संघटनांचा (उदा. – गुजु-गीर लायन्स, बॉंगोली टॉयगोर्स, अफगाण माऊंटन
गोट्स, येलो गेंडा आर्मी, फ्री आफ्री-कन लायन्स, अरबी घरीब्ज अॅंड अमीर्स, पॅलेस्टीनी
वॉकर्स, ओल्ड अॅंग्री हंग्री ज्यूज्स, हिंदू सिंदू बंदू-दल, ब्लू मंकीज ऑफ अॅमेझॉन,
वानर्राम-सेना, वगैरे ) सच्चा आणि कट्टर अनुयायी असण्यापर्यंत तो काहीही करत असे. त्या
त्या वेळी त्या त्या अतिरेकी संघनेच्या रंगाप्रमाणे बहूधा त्याच्या मळक्या सदर्याचा
रंग असे. सध्या तो हिरवट वाटेल असा होता. एक मात्र खरे की आणि त्याने टोपी काढली असती
तर कोणीही त्याला ओळखले नसते व घाबरलेही नसते.
त्याच्या सहाय्यक ‘बंटा’ होता.
डोके चालवण्यापेक्षा पाय चालवणे आणि बंदुक चालवण्यापेक्षा बंदुकीच्या दस्त्याने समोरच्याला
ठोकणे त्याला अधिक आवडे. त्यामुळे ‘टोपी’ व ‘बंटा’ बरोबर असताना टोपीखालच्या भागाचा
वापर नाईलाजाने टोपीलाच करावा लागे.
सोपवलेली कामगिरी फत्ते केल्याच्या फुरफुरणार्या
आनंदात दोघे आत्ता बॉससमोर उभे होते. ‘बॉस,काम फत्ते!’ टोपी पुन्हा म्हणाला.
‘बॉस’ कंदिलाच्या मिणमिण प्रकाशात त्याच्या जुन्या स्टेनगनची
वाकलेली नळी हातोडीने ठोकून ठोकून सरळ करण्यात गुंतला होता. वाकलेला खिळा सरळ करण्याइतके
हे काम सोपे नव्हते.एका बाजूने ती सरळ करत आणली की दुसर्या पातळीत ती वाकडी होत होती.
जरा जोरात ठोका मारला की तिथे चेपटत होती. प्रत्येक ठोक्याला तो पाकिस्तानी पंतप्रधानांच्या
सुरक्षा दलाचा प्रमुख ’सकूर अली खान’ ऊर्फ ’शंकर अली’ला
शिव्या घालत होता.
आज 19 डिसेंबर. खुनाचा प्लॅन तयार होता. प्लॅन
प्रमाणे शंकर अली प्लॅनचा सूत्रधार ऊर्फ ’नं-1’ होता. प्लॅन प्रमाणे
तो प्लॅन ‘सी आय पी एम आय पी ओ’ कडे पाठवल्यावर प्लॅन उलथवण्यासाठी डी-1-डी
चिण्णू चिणमुणकर एव्हाना त्यांच्या मागावर सुटलाही असणार. प्लॅनप्रमाणे खुनाचा दिवस
10 दिवसांवर येऊन ठेपला होता. पण प्लॅन प्रमाणे व कबूल केल्याप्रमाणे ‘नं 1’ शंकर अलीने नवी शस्त्रास्त्रे, दारुगोळा व आर. डी. एक्स. पाठवले नव्हते. एवढी मोठी
राजकीय हत्या, सबंध जगातल्या प्रमुख नेत्यांच्या साक्षीने करायची, ती काय जुन्या, चपट्या
नळीच्या स्टेनगनने? का गंजक्या सुर्या आणि सुरुंगाच्या दारुने? चिडून दात ओठ खात बॉसने
हातोडीचा ठोका जोरात मारला, तो घाव त्याच्या डाव्या अंगाठ्यावर बसला. कळवळून ‘हंऽऽ!’
असा दबका उद्गार काढून बॉसने अंगठा तोंडात घातला.
“चिण्णूच्या दारापुढे मांजर आडवी ठेवून आम्ही
तिच्या ...” टोपी.
“ए ती काय ? तो बोका होता बॉस, ‘चंद्रू’!” – बंटा.
“आणि तिच्या उजव्या हातात खरमरीत चिठ्ठी लिहिली.”-
टोपी
“चिण्णूचा चंद्रू ! तो मेला होता बॉस” बंटा.
“चिठ्ठी वाचून चिण्णू जाम टरकला असेल. सारखा संडासात
ये जा करत असेल. हंहः, हंहः, हंहः, हंहः!” हुंदके दिल्यासारखा हसत टोपी म्हणाला.
“बॉस, चंद्रू आधीच मेला होता. मला मारायलाच मिळालं
नाही.” बंटा.
“महानगरपालिकेनंच आपलं काम सोपं केलं. कुत्रे
मारण्याचं औषध खाऊन मेली ती.” टोपी
“कुत्र्यांनो, तुम्ही का नाही मेलात?” बॉस.
(इथे कुत्र्यांचा अपमान करण्याचा हेतू नाही. फक्त बॉस काय म्हणाला ते लिहिले आहे.).
“महानगरपालिका सुध्दा तुमच्यापेक्षा जास्त चांगलं काम करते.”
“आम्हाला काय माहीत !?” टोपी वरमून म्हणाला.
“आणि मांजराचं काय मधे मधे, तुम्ही चिण्णूला मारणार
होतात ...” बॉस.
“चिण्णूच्या घराचं दारच आम्हाला उघडलं नाही. मग
आम्ही आत दबा धरुन कसे बसणार? किंवा त्याच्या फ्रीजमधे स्फोटकं कशी भरणार?” टोपी. “पण
असा जाम टरकवलाय त्याला ...”
“फुटा आता!” बॉस.
अशा परिस्थितीत डोक्यावर ताबा तरी कसा ठेवायचा?
संतापाने डोकं फुटत असतानाच बॉसने तो अगदी गुप्त, फक्त इमर्जन्सीच्याच वेळी वापरायचा
मोबाईल नंबर फिरवला.
“हॅलो ? नंबर वन ?” बॉस.
“बॉस, बॉस, ...” टोपी.
“हॅलो, शंकर अली खान?” बॉस.
“बॉस, शंकरअली म्हणजे ते प्रसिद्ध पिपाणी वादक...?”
भलत्या वेळी भलतीकडेच डोकं चालवत बंटा म्हणाला.
“अरे! तुम्ही अजून इथंच? गेट आऊट!! मी इतका महत्त्वाचा
गुप्त फोन करतोय, आणि तुम्ही -- गेट आऊट!” बॉस.
“बॉस, आता पुढची कामगिरी ...” टोपी.
“हॅलो? ... च्यायला, (पुढे चार अस्सल शिल्या)
काय कटकट आहे. जा, गंजक्या चाकूनं मारामारीची प्राक्टिस करा, जाऽऽऽ ! ... हॅलो ! शंकर
अली नंबर वन? ...” बॉस.
“बॉस नंबर वन पण पिपाणी वाजवतात?” बंटा.
“गेट आऊट !!!” बॉस किंचाळला.
“मूर्खा! मला फोन करतोस आणि ‘गेट आऊट’ म्हणतोस?” फोनवर शंकर अली.
“हॅलो! शंकर अली? सॉरी, तुम्हाला नाही -- हॅलो !” बॉस.
“मूर्खा! या नंबरवर का फोन केलास? मी सांगितलं
होतं ना ...” शंकर अली.
“इमर्जन्सीच आहे! आज 19 तारीख आणि अजून स्टेनगन्स,
ए के बी-57, रिव्हॉल्वर्स, आरडी एक्स तुम्ही पाठवणार होता, त्याचा पत्ता नाही ...” बॉस.
“मूर्खा, हरामखोरा, -- (दबक्या आवाजात) ही फोनवर
बोलण्याची गोष्ट आहे का? मी इथं त्यांची सुरक्षा व्यवस्था पाहातोथ आणि तू, त्यांच्या
खुनाची हत्यारं का पाठवली नाहीत, म्हणून फोनवर विचारतोस?” शंकर अली.
“कुणाचा फोन आहे. कुणाचा खून?” पाक पंतप्रधानांचा
फोनवर लांबून आवाज आला.
“अं? मुलाचा फोन. तो, अं ऽ, टीव्ही गेममधलं विचारतोयं”
शंकर अली.
“ते तुमच्या मुलाचं तुम्ही पाहा. इथं टीव्ही गेम
चालू नाही. मला उद्याच्या उद्या शस्त्रास्त्रं हवीत ! तो चिण्ण्याही माझ्या मागे सुटलाय.”
बॉस.
“तो आपल्या प्लॅनचाच भाग आहे.” शंकर अली.
“पण 19 तारखेल शस्त्रं पाठवायची असं पण प्लॅनमधे
आहे.” बॉस. “उद्याच्या उद्या तरी शस्त्र पोचलीच पाहिजेत.”
“शस्त्र म्हणजे काय खेळणी आहेत? म्हणे उद्याच्या
उद्या! आणि तुझी ती सुप्रसिध्द स्टेनगन कुठाय?” शंकर अली.
“घह हं घह् घं हंघ् ...” हुंदका देताना नरंड
दाबल्यावर येतो तसा आवाज बॉसच्या घशातून आला.
“... उद्दा करतो व्यवस्था.” शंकर अली म्हणाला
आणि फोन बंद झाला.
मगाशी हातोडीचा घाव अंगठयावर बसल्याने बॉसच्या
मनाच्या जुन्या जखमेची खपली उचकटलीच होती, ती आता पुरी सुटून त्याच्या मनातून भळभळ
रक्त वाहू लागले. सहा महिन्यांपूर्वी बांडुगच्या महाराजाच्या मुलाला किडनॅप करताना
त्याने ती स्टेशगन वापरली होती. तेव्हा त्याच्या व्रात्य मुलाने त्याची नजर चुकवून,
ती हस्तगत करुन, तिची नळी दराच्या फटीत घाल-घालून,
जमिनीवर आपटून, दहा ठिकाणी ती वाकवली होती. शेवटी बांडुगच्या महाराजांनीच दया येऊन,
25 कमांडोजचे पथक पाठवून, त्याचीच त्या पोराच्या तावडीतून सुटका केली होती. दु:ख, चीड,
हताशपणामुळे बॉस रडकुंडीला आला. काय साली ही अवस्था! इथे खरे अतिरेकी आपण आहोत पण सगळे
जगच आपल्याविरुद्ध अतिरेकी कारस्थाने करते आहे, असे त्याला वाटले.
No comments:
Post a Comment