अस्वीकृती (Disclaimer) - राजस्थान बॉर्डरवर डिटेक्टीव्ह चिण्णूची रबाडगिरी - 1
20 डिसेंबर. पहाटे 02-37.
एअरफोर्स
बेस क्र. 4
पहाटे दोन वाजून सदतीस मिनिटांनी चिण्णू एअरफोर्स
बेस क्र. 4 च्या गेट क्र. 3 पाशी आला.
“मी 00.00 पासून
(रात्री 12) मरणाच्या थंडीत कुडकुडत इथं वाट बघतोय!” परवलीच्या संवादाची देवघेव जेमतेम झाल्या झाल्या
तो माणूस थडथडणार्या दातांच्या फटीतून खेरबट आवाजात चिण्णूवर खेकसला.
“आपण?” चिण्णूने शांतपणे विचारले.
“मी स्क्वाड्रन लीडर कर्नेलसिंग. आपण?”
चिण्णू कनीस हसला.
“सभ्य माणसा ऽऽ !!” अती संतापाने दडपलेल्या दडस
आवाजात कर्नेलसिंग म्हणाला. “मी ‘लाल गांधिलमाशी’ ‘मिकूट BF-33-C’ विमानाचा पायलट आहे आणि या शांततेच्या काळात, तुझ्या एकट्यासाठी, हे मॅक-4 (ध्वनीच्या चौपट वेगाने
जाणारे), जगातील सगळ्यात
वेगवान विमान काशीला न्यायला मी रात्री बारापासून थंडीत कुडकुडत इथं उभा आहे. आणि तू
मला नाव सुद्धा सांगायला तयार नाहीस?”
“सॉरी. टॉप सीक्रेट.” चिण्णू म्हणाला. “आणि सॉरी,
तुम्हाला थांबायला लागल्याबद्दल. मी खूप वेळ एअरफोर्स बेस क्र. 3 च्या गेट क्र. 4 पाशी
उभा होतो. चूक लक्षात आल्यावर तिथून इथपर्यंत चालत यायला लागलं. सॉरी!”
“तुम्ही कधी जेट विमानात बसला आहात?” कर्नेलसिंग.
“होय.” चिण्णू विनयानं म्हणाला.
“मग त्यापेक्षा हजारपट भयंकर असा हा नवीन अनुभव
असेल.” काय एक एक लोक भेटतात आणि त्यांच्यासाठी काय काय करावे लागते, असा चेहेरा करुन,
तशाच समजुतीच्या आवाजात कर्नेलसिंग म्हणाला. “आणि त्यातून जगला वाचलात तर अविस्मरणीय
अनुभव असेल.”
“प्रत्येक अनुभव नवीनच असतो आणि जीवन म्हणजे,
अशा दरवेळी नवीन, जीवघेण्या अनुभवांची मालिकाच असते.” थंडीने थडथडणार्या
दातांतून चिण्णूने मन चिण्ण्ण्ण करणारे आणि अधिक गोठवणारे तत्त्वज्ञान गोठलेल्या शब्दांत
विनाकारण फेकले आणि पायलटसारखा ड्रेस चढवला.
“ही पेटी आपल्याला नेता येणार नाही.” कर्नेलसिंग.
“त्यात धोकादायक काही नाही. आणि ती नेण्यासाठी
तर आपल्याला काशीला जायचंय.” चिण्णू म्हणाला. तरीसुध्दा पायलटाने पेटीची क्ष-किरण तपासणी
करायला लावलीच. (त्यात मांजराची हाडे कशी दिसली नाहीत किंवा दिसली असली तरी त्यांना
त्याचा संशय कसा आला नाही हे चिण्णूला न सुटलेल्या रहस्यांपैकी एक आहे.)
“तरीसुद्धा ... जायलाच पाहिजे का? तुमच्या
जीवाची मला काळजी वाटते.” कर्नेलसिंग खर्या काळजीने गंभीरपणे म्हणाला.
“मी चालवतो.” चिण्णू. “तुम्ही मागे बसा,
म्हणजे तुम्हाला टेन्शन नको.”
यावर या वेड्या माणसाशी बोलण्यात अर्थ नाही
हे कर्नेलसिंग समजून चुकला आणि विमानाकडे गेला.
पहाटे तीन वाजून दोन मिनिटांनी (03-02 वाजता)
विमानाने सरळ वर, जवळजवळ उभे उड्डाण केले व दहा सेकंदात ताशी 3000 कि.मी. वेग
गाठला. तो त्याचा फक्त पाऊण वेग होता.
विमान बरोब्बर 03-19 वाजता, म्हणजे सतरा मिनिटांत,
काशीच्या विमानतळावर उतरले. पेटी हातांत घट्ट धरून तिथेच चिण्णूने एक डुलकी काढली
आणि सूर्य उगवायच्या आधी तो गंगेच्या काठावरील घाटावर पोचला.
20डिसेंबर. सकाळी 08-00
पंतप्रधानांचे
निवासस्थान
नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनाच्या नैऋत्येला
असलेल्या ब्लॉक एफ्. मधे, निरनिराळ्या राज्यांच्या भवनांच्या आणि निरनिराळ्या
राष्ट्रांच्या वकिलातींच्या मधे, ‘5-बाबा फंदे मार्ग’ येथील वास्तू जगातील
सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राच्या सध्याच्या पंतप्रधानांचे निवासस्थान
आहे. पण ते अजून जगप्रसिध्द नाही. कारण निवासस्थानाचा घरगुतीपणा आणि खाजगीपणा टिकून
राहिला पाहिजे असे सध्याचे पंतप्रधान डॉ. महारेणूजी अण्णास्वामी यांचे मत आहे. अति
प्रशस्त पण एका साच्याचे सरकारी निवासस्थान नाकारुन त्यांनी हे निवास्थान स्वीकारले.
त्याच्या पुढच्या छोट्या बागेत रोज पहाटे सहा ते साडेसहा आणि सायंकाळी सहा ते सात ते
स्वत: राबताना दिसतात. म्हणजे जर त्या घरा भोवती दहा फूट उंचीची दगडी भिंत नसती तर
ते दिसले असते. पण त्यांनी हे घर निवडल्याबरोबर सरकारने त्यांच्या सुरक्षिततेच्या कारणासाठी
ही भिंत बांधली व बाजूला अर्धा किलोमीटर त्रिज्येच्या परिसरातील सर्व बंगले ताब्यात
घेऊन तिथे पंतप्रधानांचे सल्लागार, कार्यालयातील अधिकारी, सहाय्यक, पर्सनल सेक्रेटरी
व नोकरमंडळी यांची सोय केली. बागेत काम करताना ती उंच दगडी भिंत शेजारी बघून कितीतरी
वेळा पंतप्रधानांना आपण सक्तमजुरीचे कैदी आहोत असे वाटे. पण सध्याच्या अतिरेकी काळात
याला इलाज नाही. प्रचंड मोठ्या लोकशाही स्वतंत्र राष्ट्राचा पंतप्रधान असण्याची ती
किंमत आहे.
निवासस्थानाच्या दारावर लाकडात कोरलेली गणपतीची
सुरेख मूर्ती आहे आणि दार उघडताच प्रशस्त व्हरांड्याच्या समोरच्या भिंतीवर सहा फूट
बाय चार फूट फ्रेममधे सुंदर देखाव्याचे चित्र आहे. ते त्यांच्या, कोलार सुवर्ण
क्षेत्राजवळील ‘पातालकनकेश्वरम्’ या मूळ गावाजवळच्या वनराईतील
‘कनकेश्वराच्या’ जुन्या मंदिराचे आहे. कर्नाटक, आंध्र आणि तमिळनाडूच्या
सीमेवरील हे मध्यवर्ती गाव असल्याने सध्याचे पंतप्रधान सर्व दक्षिण भारताचेच प्रतिनिधित्व
करतात असे म्हटले तरी चालेल. अर्थात आता ते सर्व भारताचेच प्रतिनिधित्व करतात.
आतील प्रशस्त हॉलमधे साधे पण उपयुक्त, शिसवी लाकडी
फर्निचर व बैठी आरामशीर बैठकीची व्यवस्था आहे. हॉलच्या लेमन - ऑफ व्हाईट रंगाला साजेसे
मंद हिरवट पिवळट प्रसन्न रंगसंगतीचे पडदे व कुशनकव्हर्स आहेत. एका बाजूला भिंतभर कपाटात
अनेक विषयांवरची अनेक पुस्तके आहेत. ती नुसती शोभेची नाहीत. कपाट उघडून ती बघितली तर
ती अनेक वेळा वाचलेली आढळतील. पण आपण कशाला तिथे ते कपाट उघडून बघायला जाणार? आणि आपल्याला
जाऊ तरी कोण देणार?
आज 20 डिसेंबरच्या सकाळी 8 वाजता तिथे नोकरांची
गडबड चालू होती. कारण 9 वाजता पार्टीतील प्रमुख व विश्वासू नेत्यांबरोबर पंतप्रधानांची,
29 डिसेंबरच्या पाकीस्तानच्या पंतप्रधानांच्या भेटीसंदर्भात, महत्त्वाची बैठक होती.
No comments:
Post a Comment