अस्वीकृती (Disclaimer) - राजस्थान बॉर्डरवर डिटेक्टीव्ह चिण्णूची रबाडगिरी - 1
20 डिसेंबर. सकाळी 08-00
पंतप्रधानांचे निवासस्थान
पंतप्रधन व मुख्य मंत्र्यांची मीटिंग - पुढे - - -
माती व मानव मंत्री’ श्री. भुजंगजी भोमे सव्वाआठ वाजताच आले. त्यांचे
खाते कमी महत्त्वाचे असेल तरी ते पंतप्रधानांचे अगदी खास, आतल्या गोटातील, विश्वासू
व एकनिष्ठ समजले जात. ‘कोलार’ महानगरपालिकेच्या निवडणूकीत 1971 साली पंतप्रधानांचे डिपॉझिट जप्त झाले होते तेव्हा
सर्व निवडणूक खर्च व देणी भुजंगजींनी भागवली होती असे म्हणतात. तेव्हापासून ते डॉ.
अण्णास्वामींबरोबर होते.
नंतर, पावणे नऊला संरक्षणमंत्री मा. श्री. रणछोडजी छाजेड व गृहमंत्री
मा. श्री. आप्पारावजी सातपुते बरोबरच आले. गेली अनेक वर्षे ते बर्याच वेळा एकत्र दिसत
आणि त्यांच्याकडे बघताना पांढरी शेळी व गेंडा खाली मान घालून चरता चरता गवताच्या हिरवेपणाबद्दल
गहन चर्चा करत आहेत असे वाटे.
परराष्ट्रमंत्री मा. श्री. आलबेल डिमंटोंचा संबंध नेहमी परराष्ट्रांशी
येत असल्याने परराष्ट्रांना कळण्यासाठी ते सूट वापरत. पण अंतर्यामी ते गांधीजींच्या
भारताचे असल्याने सुटाचे कापड खादीचे असे. ते बरोब्बर नऊला दोन मिनिटे कमी असताना आले.
“आज उशीर?” भुजंगजींनी त्यांना उगीचच डिवचले.
पंतप्रधानांचे निकटवर्ती असल्याने असला आगाऊपणा करण्याचे धाडस ते नेहमी करत आणि हेच
डिमंटोंना आवडत नसे.
“तुमचंच घडयाळ पुढं असेल.” डिमंटो म्हणाले. तेवढ्यात
पंतप्रधान आले. “बघा. डॉ. अण्णास्वामीजींच्या आधी मी दोन मिनिटं आलो.” डिमंटो सोडले
तर इतर सगळे निकटवर्ती खाजगीत त्यांना महारेणूजी म्हणत.
महारेणूजी काळे पण अति प्रसन्न मुद्रेचे व स्वच्छ,
बुध्दिमान, हसर्या डोळ्यांचे होते. जरा स्थूलपणाकडे झुकणारे असले तरी चपळ होते. त्यामुळे
वयाच्या मानाने ते तरूण वाटत. पण त्यांना संपूर्ण टक्कल असल्याने त्यांचा चेहेरा जास्त प्रौढ वाटे.
बाहेर वावरताना डोक्यावर गांधी टोपी असल्याने ते पंचावन्नच्या आसपास वाटत. त्यांच्या
कपाळावर भस्माचे पट्टे व आडवे गंध लावले होते. पांढरी लुंगी, पांढरा सदरा व लाल काडीचे
उपरणे असा त्यांचा साधा वेश होता.
“बसा,बसा.” प्रसन्न हसत महारेणूजी म्हणाले. “आधी
थोडी कॉफी घेत घेत चर्चा करू.” पोटाची सोय झाल्याशिवाय माणूस मोकळा होत नाही असे महारेणूजींचे
आवडते तत्त्व होते. अर्थातच महारेणूजींच्या घरी मीटींग म्हणजे अस्सल दक्षिणी चवदार
पदार्थांचा भरपूर आस्वाद व नंतर उत्कृष्ट कॉफी हे सर्वांनाच माहीत होते.
“आजच्या चर्चेसाठी आपल्यापुढे तीन मुख्य मुद्दे
आहेत.” सर्वांना कॉफी दिली जात असताना डायरेक्ट मुद्दावर येत महारेणूजी म्हणाले.
“एक - प्रत्यक्ष भेटीत पाकिस्तानच्या पंतप्रधानांशी
काय बोलायचं? ...”
“आधी त्यांना काय हाक मारायची ते ठरवायला लागेल.”
रणछोडजी.
“ते कशाला?” आप्पारावजी.
“मला वाटतं, त्यांना मिस्टर सादाखान म्हणावं?”
डिमंटोजी.
“ते फार औपचारिक वाटतं. ते प्रेमानं, सदिच्छ भेटीसाठी
येणार ...” रणछोडजी.
“प्रेमानं? सदिच्छा? च्या मायला तिच्या, सॉरी,
ते तिकडं बॉंब फोडणार, अतिरेकी घुसवणार आणि हिकडं ...” आप्पारावजी.
“शांत व्हा, शांत व्हा!” महारेणूजी म्हणाले.
“आप्पारावजी, तुम्ही राजकारणात इतकी वर्षं मुरलेले ...”
“माफ करा. घरी म्हणून बोलतोय. बाहेर आहेच की॓,
हॅ हॅ हॅःऽ ! जी,जीऽ, जीऽऽ !” आप्पारावजी आणि पाठोपाठ सगळेच हसले.
“मग काय, इश्तेराहीजी? सादाखानजी? का खानासाहेब
म्हणावं?” डिमंटोजी.
“त्यांना तिकडे त्यांचे निकटवर्ती काय म्हणतात?”
महारेणूजी.
“उघड, ’मियॉं इश्तेराही’ आणि मागे, ’राही मतवाले.’
आम्हाला इन्फर्मेशन आहे.” आप्पारावजी.
“ठीक आहे. आपण त्यांना इश्तेराहीजीच म्हणूया.”
महारेणूजी.
“काश्मीरप्रश्न काढायचा का नाही?” डिमंटोजी.
“मला वाटतं, सगळे वादग्रस्त प्रश्न बाजूला ठेवावे.”
रणछोडजी.
“म्हणजे अतिरेक्यांची घुसखोरी, पी.आय्.एस.एस.च्या
(P I S S - पाकिस्तान इंटेलिजन्स सीक्रेट सर्विस.) कारवाया आणि क्रिक्रेटच्या
मॅचेस सुध्दा?” डिमंटो म्हणाले. मोठे आजरपण नाही पण सतत बारीक ठणकणार्या डोक्यामुळे
अस्वस्थ व्हावे तसे या तीन गोष्टींमुळे (विशेषत: पी.आय्.एस.एस.च्या कारवाया) डिमंटोंना
झाले होते.
“ते वादग्रस्त प्रश्न असतील तर ते सुध्दा” रणछोडजी.
“ते बाजूला ठेवायचे असतील तर मग भेटायचं कशांसाठी
आणि बोलायचं काय?” आप्पारावजी.
“रणछोडजींना युध्द नको” भुजंगजी मधेच म्हणाले.
“युध्द कुणालाच नको आहे.” जरा रागावून रणछोडजी
म्हणाले. “म्हणून तर सदिच्छा भेटीसाठी येतायत.”
“मग शहाणे असतील तर त्यांनी पण हे मुद्दे काढू
नयेत?” आप्पारावजी.
“शहाण्यावरुन आठवलं, टांगा सवारी प्रमाणे राजस्थान
बॉर्डरवर उंट सवारी पण चालू करावी ...” भुजंगजी.
“ती चालूच असते.” डिमंटोजी.
“ती बेकायदेशीर. स्मगलिंग, घुसखोरी ... मी कायदेशीर
म्हणतोय.” भुजंगजी.
“चांगली कल्पना. शिवाय ही उंटसवारी शहाण्यांना
आणि आंतरदेशीय प्रेमदिवाण्यांना फुकट ठेवू या.” डिमंटोजी.
“मी सीरिअसली म्हणतोय.” भुजंगची रागावून म्हणाले.
“आधी ही भेट यशस्वी होऊन टांगा सवारी तर सुरु
होऊ दे! मग इतर खूप गोष्टी आहेत.” रणछोडजी.
“म्हणजे, गुप्त माहिती व तंत्रज्ञानाची देवाणघेवाण,
लष्करी गुपिते, कैद्दांची देवाणघेवाण, अतिरेक्यांना मुक्त करणे, रोटी-बेटी व्यवहार,
भाईचारा, आमचं ते तुमचं ...” आप्पारावजी.
“पुरे, पुरे !” महारेणूजी.
“मला वाटतं, तुम्ही इश्तेराहीजींना कडकडून मिठी
मारल्यावर त्यांना एक बॉक्स द्या. त्यात एक इडली, एक ढोकळा, एक रसगुल्ला आणि एक मुलीका
पराठा असेल. म्हणजे संपूर्ण भारत त्यांना प्रेमानं भेटायला आलाय असं होईल.” रणछोड.
“छान कल्पना. पण बॉक्स उघडून दाखवा. नाहीतर
...” भुजंगजी.
“आणि टी.व्ही.च्या कॅमेर्यांना पण नीट दिसू दे.
म्हणजे वरती हेलीकॉप्टरमधे अमेरिका, इंग्लंड, रशिया, चीन आणि फ्रान्सला पण नीट दिसेल.
आणि ...” आप्पारावजी.
“पुरे पुरे !’ महारेणूजी.
“या भेटीला आपण काय म्हणायचं? ऐतिहासिक ...” रणछोडजी.
“ऐतिहासिक भेटी आधीच खूप झाल्यायत हो !” डिमंटोजी.
“मग शिळ्या कढीला ऊत किंवा जुन्या बाटलीत नवी
...?” आप्पारावजी.
“थट्टा नको. जुन्या पर्वाचा नवा अध्याय म्हणूया?”
डिमंटोजी.
“जागतिक शांततेच्या वाटचालीतील तिसरे पाऊल म्हणू
या.” आप्पारावजी.
“तिसरे का?” रणछोडजी.
“अहो,पध्दत असते! कुणीतरी आधीची दोन पावलं टाकलेलीच
असतात. आपल्याला कुठं सगळं माहीत असतं?” आप्पारावजी.
“तिसर्या संघटित शक्तीचा उदय असं पण म्हणू या.”
भुजंगजी.
“पश्चिम बॉर्डरवर उदय?” डिमंटोजी.
“अहो आपली पश्चिम असली तरी त्यांची पूर्वच आहे.”
भुजंगची.
“चौथ्या महायुध्दाची सुरुवात म्हणूया!” आप्पारावजी.
“हे मात्र अतीच अवास्तव होतंय हं !” डिमंटोजी.
“का? ’कुठलासा तह हीच खरी दुसर्या महायुध्दाची
सुरुवात’ असं इतिहासात ...” आप्पारावजी.
“पुरे,पुरे!” महारेणूजी सर्वांच्या उत्साहाला
आवर घालत म्हणाले. “ठीक तर! आणखीन काय?”
“आणखीन आपलं नेहमीचंच. तुमचं खरं, आमचंही बरोबर;
तुमचं थोडं चुकतंय, आमचंही ...” डिमंटोजी.
“हॅ, हॅ:, हॅ: ! जी,जी,जी ऽऽ !!” आप्पारावजी म्हणाले
व पुन्हा सगळे हसले.
“हे ठरलं मग.” महारेणूजी म्हणाले. “दुसरा मुद्दा
म्हणजे प्रमुख विरोधी पक्षांना काय सांगायचं?”
“त्यांना कशाला काय सांगायचं?” डिमंटोजी.
“24 डिसेंबरला लोकसभेत निवेदन करायचं आहे. त्या
आधी त्यांना भेटलं पाहिजे. त्यांना मान दिल्यासारखं होतं, विश्वास दाखवल्यासारखं होतं.
विरोधाची धार कमी होते.” महारेणूजी
“फक्त, प्रमुख विरोधी पक्ष नेते ’विधर्म-पक्षी
पक्षाचे’ यजुबिंदरसिंगजींना भेटावं, ते नंतर करतील त्यांच्या लोकांना गप्प.”
डिमंटोजी.
“खरी ही टांगाभेटीची मूळ कल्पना त्यांचीच” रणछोडजी.
“तरी म्हणलं, इतकी पोरकट कल्पना ...” आप्पारावजी.
“आप्पारावजी, आप्पारावजीऽ ... हं, तर, लोकसभेतील
निवेदनानंतर 25 डिसेंबरला रात्री नाताळाची रोशणाई करायची आहे. त्याचीही कल्पना त्यांना
द्यायला पाहिजे. नाहीतर उगीच रुसतील. रणछोडजी सर्व तयारी आहे ना?” महारेणूजी.
“26 डिसेंबरला, आपल्या वेळेप्रमाणे, पहाटे
01-15 वाजता सुधारीत प्रदीर्घ पल्ल्याच्या ‘पीसमेकर 2-C’ क्षेपणास्त्राची चाचणी होईल आणि ते अटलांटिकच्या मध्यावर तिथल्या वेळेप्रमाणे
25 डिसेंबरला संध्याकाळी 18.00 ला पडेल पश्चिमी जगाला नाताळाची भेट. अर्थात त्यावर
कोणताच बॉंब नसेल.” रणछोडजी.
“तुम्ही अशी भेट पाठवल्यावर टांगाभेटीचा सोहळा
बघायला आणि हॅलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करायला ते येतील का?” डिमंटोजी.
“मग तुम्ही कशाला आहात? तरी सुध्दा त्यांना आणायचंच,
हेच तर तुमचं काम. ...आणि ते येतील! अहो, शांतता सर्वांनाच हवी आहे आणि शांततेचा संदेश
घेऊन ‘पीसमेकर’ गेल्यावर ते नक्की येतील. फार तर त्यात टांगा-भेट सोहळ्याच्या चार
पत्रिका टाका.” आप्पारावजी.
“आणि जगाला काय सांगायचं?” डिमंटोजी.
“मी इश्तेराहीजींना प्रेमानं मिठी मारल्याचं त्यांना
दिसलं आणि त्यांनी पुष्पवृष्टी केली की तेच जगाला काय ते सांगतिल. शिवाय टी.व्ही.वर
सर्वांनी हे सर्व पाहिलंही असेल.” महारेणूजी.
“महास्वामीजी, महास्वामीजी ...” वरिष्ठ नोकर अदबीनं
महारेणूजींच्या कानाशी वाकून हळूच म्हणाला. “‘एमाई आयाई’ चे लेफ्टनंट
जनरल श्री. नानासाहेब षटकर्णी आणि ‘सीआयपी एमायपीओ’ चे चीफ मेजर
जनरल श्री. तात्यासाहेब चिमोटेंना
आपल्याला भेटायचयं.”
“अर्ध्या तासानं. महत्त्वाची बैठक सुरू आहे हे
सांगितलय ना?” आप्पारावजी.
“होय. महास्वामीजी, म्हणूनच ...”
“ठीक आहे. पाठव.” महारेणूजी.
No comments:
Post a Comment