MahaGanapati Mandir

MahaGanapati Mandir
महागणपती मंदिर, वाई, महाराष्ट्र.

मनातलं

ज्या यशाने उन्माद येईल असं यश मला नको. ज्या यशाने इतरांच्या त्या यशातील वाट्याबद्दल कृतज्ञता मनात दाटून येईल आणि अधिक विनम्रता येईल ते खरं यश.

Sunday, October 27, 2019

राजस्थान बॉर्डरवर डिटेक्टीव्ह चिण्णूची रबाडगिरी - 1


Disclaimer: This literary work is made solely for reader’s entertainment and is a work of fiction. Names, characters, businesses, places events and incidents are either the Author’s imagination or used in a fictitious manner. Any resemblance to actual persons, living or dead, or actual events is purely coincidental.
Any written matter, dialogues, characters or events in this literary work are not intended to offend the sentiments of any individual, cast, community, race or religion or to denigrate any institution or person, living or dead. 
अस्वीकृती: ही कादंबरी म्हणजे एक काल्पनिक गोष्ट असून ती वाचकांच्या केवळ मनोरंजनासाठी लिहिली आहे. यातील नावे, पात्रे, व्यवसाय, जागा, घटना व प्रसंग लेखकाच्या कल्पनेतून निर्माण झाले आहेत किंवा काल्पनिकरीत्या वापरले आहेत. जिवंत अथवा मृत, प्रत्यक्ष व्यक्तीशी किंवा घटनांशी साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग आहे.
कोणतीही जिवंत किंवा मृत व्यक्ती, जात, समाज, जमात किंवा धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा अवमान-अनादर करण्याचा या कादंबरीतील लेखनाचा, संवादांचा, पात्रांचा किंवा घटनांचा उद्देश नाही.

भाग 1

19 डिसेंबर. दुपारी 03.30
मध्यवर्ती आंतरराष्ट्रीय राजकीय खून अन्वेषण व प्रतिबंध कार्यालय.

‘सेंट्रल इंटरनॅशनल पोलिटिकल मर्डर इन्व्हेस्टिगेशन अंड प्रिव्हेन्शन ऑफिस’ (CIPMIPO सी आय पी एमाय पी ओ – सिप्‌मिपो) अर्थात ‘मध्यवर्ती आंतरराष्ट्रीय राजकीय खून अन्वेषण व प्रतिबंध कार्यालयाच्या’ पंचवीस मजली भव्य इमारतीच्या भव्य प्रवेशद्वारासमोर चिण्णू चिणमुणकर एक क्षणभर विचारमग्न मुद्रेने उभा राहिला. तो तिथल्या ’डी-1’ (स्पेशल चीफ डिटेक्टिव) श्रेणीच्या दहा डिटेक्टिव्हांपैकी सर्वांत हुशार व कार्यंक्षम होता. परंतु या कार्यालयात येण्याची वेळ त्याच्यावर क्वचितच येत असे. आणि त्यामुळे विचारमग्न होण्याची वेळही त्याच्यावर क्वचितच येत असे. तरीसुध्दा, प्रत्येक वेळी, प्रवेशद्वारासमोरच्या पंचवीस पायर्‍यांपैकी तळाच्या या पायरीवर, या जागी, तो न चुकता थांबता असे व क्षणभर विचारमग्न होत असे. पुढच्या पंचवीस पायर्‍या चढून प्रवेशद्वारापर्यंत पोचायचे या विचारानेच त्याला दम लागत असे.
आजही याच विचारात तो क्षणभर मग्न झाला व त्याला दम लागला. मग दोन श्वास जोरात ओढून त्याने निःश्वास टाकला आणि तो नेटाने एक एक पायरी चढू लागला. बरोबर सातव्या पायरीला तो नेहमीप्रमाणेच अडखळला व तोंडघशी पडता पडता त्याने स्वतःला कसेबसे सावरले. आपल्या चिप्पुट चेहर्‍यावर घसरणारी आपली रुबाबदार हॅट त्याने सावरली व लांबट वरवंटी डोक्यावर नीट बसवली. मग जमतील तितकी रुबाबदार पावले टाकत, एका पायाने लंगड्या, पँट घातलेल्या चित्याच्या तडफेने त्याने प्रवेशद्वार गाठले.
प्रवेशद्वारासमोरच्या आरश्यापुढे त्याने आपली जीभ शक्य तितकी बाहेर काढून दाखवली. आरश्यामागील इलेक्ट्रॉनिक ग्राहकाने त्याच्या जिभेवरील सर्व सूक्ष्म खड्डे-उंचवट्यांचे स्कॅनिंग करुन ती माहिती संगणकाकडे पाठवली. संगणकाने त्याचे विश्लेषण करुन त्याची ओळख पटवेपर्यंत समोरच्या आरशात त्याने एकदा आपली रुबाबदार हॅट न्याहाळली व त्याला समाधान वाटले. हॅट इतकाच आपला चेहेराही रुबाबदार असता तर आपल्याला जास्त समाधान वाटले असते असे त्याला वाटले. पण आपल्या चिप्पुट चेहेर्‍याची कसर तो नेहमी निरनिराळ्या प्रकारच्या रुबाबदार हॅट्स वापरुन भरून काढत असे.
संगणकाला ओळख पटल्यावर प्रवेशद्वारासमोरचा हिरवा दिवा लागला व त्याने आपल्याजवळचे चुंबकीय ओळखपत्र समोरच्या फटीत सरकवताच प्रवेशद्वार आपोआप उघडले. आतील प्रशस्त हॉलच्या डाव्या बाजूच्या बोळातून यू-5 नंबरच्या फास्ट लिफ्टपाशी तो पोचेपर्यंत त्याचे इलेक्ट्रॉनिक, क्ष-किरण आणि व्हीडिओ कॅमेर्‍यांनी परीक्षण केले व निरनिराळ्या मजल्यांवरील निरनिराळ्या संबंधित कचेर्‍यांत चिण्णू चिणमुणकर येत असल्याची सूचना देणारी घंटा वाजली.

अकराव्या मजल्यावरील सुरक्षा कक्षातील जवान तुस्त जेवण करून, पोटावरील पट्टे ढिले करून, ढेकर देत जरा आडवे होण्याचा विचार करत होते. घंटा ऐकताच शिव्या देत ते उठले व पोटावरील पट्टे आवळत लिफ्टकडे धावले. ते जेमतेम तिथे पोचेपर्यंतच लिफ्ट पोचली, तिचा दरवाजा उघडला व एकच अति रुबाबदार पाऊल पुढे टाकत चिण्णू त्यांच्यासमोर उभा राहिला. तिघा सुरक्षा जवानांनी धापा टाकतच त्याला सॅल्यूट केला. मग रीतीप्रमाणे त्यांनी त्याची संपूर्ण झडती घेतली. त्याचे सुप्रसिद्ध ‘0.9876, ’मोने-दाणी’ बनावटीचे ’TB-7-H-12’, सात राऊंड्सचे, वाकड्या नळीचे सेमी-ऑटोमॅटिक रिव्हॉल्वर’; ’सन्नाटा-5’ हे बीन नळीचे, पाच राऊंड्सचे राऊंडेड बायकी पिस्तुल; विषारी सुया सोडणारे ’मृत्युलेख’ हे बॉलपेन व काखेखालील म्यानात बंदिस्त असणारा, दुधारी, निमुळता, अरुंद पात्याचा, 21 सेंमी ’गंजटोक’ हा गंजका सुरा या वस्तू काढून त्यांनी त्या शेजारच्या टेबलावर ओळीने मांडून ठेवल्या.
“’चीफ’ बहुतेक आपली वाटच पाहात असतील, सर ! ... स्पेशल चीफ डिटेक्टिव, डी-1-डी / D-1-D, कर्नल चिण्णू चिणमुणकर, सर !!” काहीतरी बोलायचे म्हणून त्यातील एक सुरक्षा जवान म्हणाला.
चिण्णूने आपल्या गंजक्या दुधारी सुर्‍यासारखी थंड नजर सुरक्षा जवानाकडे वळवली, “नुसतं ’महान चिण्णू’ म्हणत जा.” आपले प्रसिद्ध खदीर हास्य जवानांवर फेकून चिण्णू म्हणाला. मग आपल्या कातडी पट्ट्यातून पातळ, लवलवती, झाडाच्या सालीपासून बनवलेली, 32 सेंमी, ’सटपटीत’ ही सुरी काढून त्याने टेबलावरील इतर शस्त्रांशेजारी ठेवली.
“सॉरी सर -- सॉरी सर!” दुसरा जवान पुटपुटला. चिण्णू वाकला. आपल्या डाव्या पायाच्या मोज्यातून त्याने आणखी एक 5 सेंमी ’प्लॅकू’  हा प्लॅस्टिक चाकू टेबलावर ठेवला.
“सॉरी सर -- सर, हे इलेक्ट्रॉनिक व क्ष किरण कॅमेर्‍यावर दिसलं नव्हतं, सर – सॉरी सर!” तिसरा सुरक्षा जवान सटपटून पुटपुटला.
“म्हणून तर तुम्हाला इथं झडती घेण्यासाठी नेमलं आहे. कसली कामं करता रे येड्यांनो !” ओठांना मुरड घालत खदीड हसून चिण्णू म्हणाला व ते, जेवणाने बुद्धी आणखीनच मंद झालेले सुरक्षा जवान मठ्ठ्पणे त्याच्याकडे पहात असतानाच तो जिन्याकडे वळला.‘

Tuesday, February 16, 2016

कृष्ण, अर्जुन, घोडे आणि मी

सकारात्मक विचारपद्धती - 1

कृष्ण, अर्जुन, घोडे आणि मी


महाभारतीय युद्धाच्या आधल्या दिवशी विमनस्क, ओढलेल्या आणि चिंतातूर चेहेर्‍याने कृष्ण माझ्याकडे आला. त्याचे डोळे भरून आले होते.  
“काय झालं?”
“अरे डॉ. राजन प्रभुणे, मला वाचव!”
“आधी शांत हो पाहू! आणि मला नीट सांग, काय झालंय. मग पाहूया काय करता येईल ते.”
“मी मोठ्या संकटात सापडलोय.”
“शक्य ते सगळं मी करीन. आधी कळू तर दे काय झालंय ते!”
“काय करावं, मला काहीच कळत नाहीये. सर्व दिशांनी अंधारून आलंय. काही दिसेनासं झालंय. माझे हातपाय गळून गेलेय्‌त, छातीत धडधडतंय आणि तोंडला कोरड पडलीये. प्रसंगाच्या जबाबदारीनं मी इतका दडपून गेलोय की माझं डोकंच बधीर झालंय.”  
“ही तर अर्जुनाची अवस्था असायला पाहिजे. आणि उद्या ही त्याची वाक्यं असतील.” 
“पण ते उद्या. ही माझी आत्ताची अवस्था आहे.” 
“शहाणे लोक ज्याला ’कींकर्तव्यमूढ’ म्हणतात तशी तुझी अवस्था झाली आहे. त्यालाच ’गलित गात्रे, लिब्बीण मेंदू लक्षणसमूह” किंवा थोडक्यात ’टेन्शन लक्षणसमूह’ म्हणतात.”   
“काय म्हणतात ते नको. मी आता काय करू? प्लीज मला मदत कर.” आणि कृष्ण रडायला लागला.
“शांत हो! शांत हो!! ... तू सारथी आहेस म्हणून तुला टेन्शन आलंय का?”
“अजीबात नाही. खरं तर सारथी म्हणून मला काहीच करायचं नाहीयै. अर्थात, युद्धात माझा स्वतःचा जीव वाचवण्याशिवाय. आणि युद्धनीतीप्रमाणे सारथ्याला मारणं निषिद्ध आहे. पण, तुला माहितीच आहे, हल्ली कुणाला नीतीची चाड आहे? ... पण, मला पुरेशी सुरक्षितता आहे. आणि घोडे तर उत्तमच आहेत.”
“त्यांना टेन्शन आहे का?”
“मुळीच नाही. का असेल? ते उच्च-प्रशिक्षित आणि तयारीचे आहेत. शिवाय तुझ्या ’तणाव नियंत्रण आणि नियमन प्रशिक्षण वर्गाला’ त्यांना पाठवण्याचीही खबरदारी मी घेतली होतीच. त्यातही त्यांनी उच्च प्रशिक्षण पूर्ण केलंय.”
“हंऽऽऽ! … अशी काही शक्यता, कीऽ ... तू सारथी आहेस याचं त्यांना टेन्शन आलंय?”  
“बास्‌ का, प्रभुण्या! ... पण .. ते त्यांचं काम चांगलं जाणतात. आणि कोणीही सोम्या-गोम्या सारथी असला तरी ते ते चांगलंच करतील.”
“हनुमानाला टेन्शन आहे का?”
“त्याला का?”
“तुझ्या रथ चालवण्यानं आपण झेंड्यावरून पडू ...”
“तुझं कैत्तरीच हं!”
“मी आपल्या सगळ्या शक्यता तपासून बघतोय.”
“तो जन्मापासून झाडाच्या फांद्यांच्या टोकावर बसत आलाय.”
“मग प्रश्न काय आहे?”
“उद्या कुरुक्षेत्रावर पोचताच अर्जुन युद्धाला सामोरा जाईल आणि तोही ’किंकर्तव्यमूढ’ किंवा तू काय म्हणालास ते, ’गलित गात्रे, लिब्बीण मेंदू लक्षणसमूहाने’ व्याकूळ होईल.”
“युद्धपरीस्थितीत सर्वच जण होतात. आणि होणारच!”
“आणि त्यात नातेवाईक आणि आपल्या माणसांबरोबर युद्ध!”
“प्रत्येक युद्ध आपल्या स्वतःबरोबर, स्वतःच्या माणसांबरोबरच असतं.”
“आत्ता तत्त्वज्ञान नकोय! सर्व प्राणिमात्रांत एकच परमात्मा, म्हणजे मी, राहातो या अर्थी मीच माझ्याबरोबर सारखा लढत असतो, जगणं हेच जगण्याबरोबरचं युद्ध आहे, जीवो जीवस्य जीवनम्‌, हे तू मला सांगू नकोस. नाही! तत्त्वज्ञान मला उद्या युद्धभूमीवर काही उपयोगाचं नाही.”
“ठीकाय्‌! पण वाईट गोष्टींची अपेक्षा का करतोस? जरा सकारात्मक विचार कर!”
“नाही.”
“का? हे शक्य आहे, की तुला वाटतं तशी अर्जुनाची प्रतिक्रिया नसेलही.”
“नाही.”
“ओह्‍! ... उद्या तो या सगळ्या ’नातेवाईक आणि आपली माणसं’, ज्यांनी त्याला नेहमी त्रासच दिला, त्याचे हक्क डावलले, द्रौपदीची विटंबना केली, त्याचं सगळ आयुष्यच दुःखमय केलं, इतकंच नव्हे तर त्याला मारण्याचा सुद्धा अनेकदा प्रयत्न केला, त्यांना समोर पाहील. आणि त्याच्या लक्षात येईल, अखेर ती वेळ आली. हीच ती शेवटची सूडाची संधी.”
“नाही.”
“त्याचा राग उफाळून येईल, ...”
“नाही.”
“त्याची छाती फुगेल, बाहू आणि मांड्या फुरफुरू लागतील, ...”
“नाही.”
“आणि तो त्याचा ’पांचजन्य’ शंख आवेशाने फुंकेल.”
“नाही, नाही.”
“होय! ... आणि त्याची समजूत काढण्याची वेळच तुझ्यावर येणार नाही.”
“नाही! नाही!! नाही!!! तो नक्कीच ’किंकर्तव्यमूढ’ होणार. मी अर्जुनाला जेवढं ओळखतो, आणि खूपच प्रदीर्घ काळ ओळखतो, त्यावरून माझी तशी खात्रीच आहे. युद्धाचा विचारही त्याला सहन होणार नाही आणि तो ’गलित गात्रे, लिब्बीण मेंदू लक्षणसमूहाने’ घायाळ होणारच.”
“का? तो सर्वोत्तम, उच्च प्रशिक्षित आणि तयारीचा नाहीयै का? तुझ्या घोड्यांप्रमाणेच?”
“होऽ! पण त्यात फरक आहे. शेवटी घोडे ते घोडे आणि माणूस तो माणूस. आणि, वाईट वाटून घेऊ नकोस, पण, असं दिसतंय की तुझं ’तणाव नियंत्रण आणि नियमन प्रशिक्षण’ घोड्यांच्या बाबतीत जितकं उपयोगी आणि प्रभावी ठरतंय तितकं माणसांच्या बाबतीत नाही.” 
“हंऽऽ! ... तू पण वाईट वाटून घेऊ नकोस, पण तू सारथी आहेस म्हणून तर अर्जुनाला टेन्शन आलेलं नाहीयै ना?”
“काही कारण नाही. ... शेवटी त्यानं मला निवडलंय. माझा प्रश्न आहे, उद्याच्या त्याच्या ’किंकर्तव्यमूढ’ अवस्थेत मी त्याला काय सांगू?”
“सांग त्याला, आता हे लोक तुझ्या बाजूला उभं राहाण्याऐवजी तुझ्या समोर उभे आहेत, तेही सशस्त्र, तुझ्याशी युद्ध करण्याच्या हेतूनं, म्हणजे ते काही आता तुझे आपले लोक नाहीत. ...” 
“हं. बघतो.”
“आणि जर तू त्यांना मारलं नाहीस तर ते तुला नक्की मारतील.”
“मी प्रयत्न करतो.”
“प्रयत्न नको, सांग त्याला!”
“ओह्‍ … ! ते नाही. माझा प्रश्न आहे, मलाच तसं ... ’गलित गात्रे, लिब्बीण मेंदू’ असं वाटत असताना मी त्याला कसं आणि काय सांगू?” 
“असं काय! सकारात्मक विचार कर! सकारात्मक हो!! ... ओह्‍, पण हे सगळं मी तुला का सांगतोय? तू फक्त त्याला ’गीता’ सांग. त्यासाठीच तर तू ती निर्माण केलीयेस ना? तू ती निर्माण केलीयैस. आणि खूप कष्ट घेतलेय्‌स त्यासाठी, मला माहितीयै. आणि तू ती पाठ करून गेले काही दिवस म्हणण्याचा सराव पण करत होतास. फक्त याच दिवसासाठी. आणि तो दिवस आलाय्‌ऽऽ.”
“हो! पण हे सगळं अर्जुनाच्या बाबतीतही खरं आहे. तरीही त्याला ’गीता’ म्हणून दाखवायला माझी गरज पडतेच आहे ना!? ... ह्या प्रचंड जबाबदारीच्या ओझ्याखाली मी दडपून गेलोय. ... मी कृष्ण भगवान, विश्वनिर्माता आहे. अशा परीस्थितीतील जगातील सर्व ’किंकर्तव्यमूढ’ अर्जुनांसाठी मी ’गीता’ निर्माण केलीयै. पण माझ्यासाठी कोण ’गीता’ म्हणणार? मला स्वतःलाच पटलेलं नाही, पुरेसा विश्वास नाही आणि आत्मविश्वासही नाही. मग मी त्याला कसा आणि काय सल्ला देऊ?”
“ओऽऽऽह्‌!!! ... पण, तुला कसं वाटतंय याचा संबंध नाही. तू समुपदेशक आणि सल्लागार आहेस. तू टेबलामागे आरामात आत्मविश्वासानं बसायचं आणि तुझे थरथरणारे पाय त्याला दिसणार नाहीत याची खबरदारी घ्यायची म्हणजे झालं ... जसं मी आत्ता करतोय्‌.”
“तोच तर प्रश्न आहे ना! तिथे युद्धभूमीवर मोठ्ठा टेबलक्लॉथ घातलेलं टेबल मी कुठून आणू?.”
“हंऽऽ हा प्रश्न आहे खरा. ... मला जरा विचार करू दे. ...”
“विचार नको करूस. सांग मला.”
“होऽऽ! ... ... तुम्ही कुरुक्षेत्राच्या विस्तीर्ण प्रदेशावर असाल. आणि दोन्ही सैन्यांच्या मधे. जवळ कोणीच नाही. तेव्हा काय चाललंय ते कुणालाच कळणार नाही. अर्जुन रथातून खाली उतरेल आणि तुझ्या पायाशी गुडघे टेकून दिनवाण्या चेहेर्‍याने बसेल. तुझ्याकडे वर बघत. तेव्हा खाली तुझे थरथरणारे पाय त्याला दिसण्याचा प्रश्नच येत नाही. आणि असंही अशा गोष्टींकडे बघण्याच्या मनःस्थितीत तो नसेलच. ... आणि तिथे टेबल नसेल, पण तुला पीतांबर नेसण्याचा फायदा मिळेल. त्यात तुझे थरथरणारे पाय झाकले जातील. ... मग तू तुझी, नंतरच्या चित्रकारांनी प्रसिद्ध करून ठेवलेली, अर्धोन्मीलित सर्वज्ञानी नेत्रांनी अर्जुनाकडे मंदस्मित करून बघणारी मुद्रा आणि चतुर्भुज, रथाशेजारी उभा, उजवी तर्जनी उंचावलेली, सुदर्शनचक्रधारी, अशी पोझ घेऊन उभा राहाशील. फक्त थोडा बदल करूया. पायांतील अवसान गेल्यामुळे पडू नये म्हणून तुझ्या तिसर्‍या आणि चौथ्या हातांनी रथ घट्ट धर. ... मग पाच वेळा दीर्घ श्वास घे आणि मग ’गीता’ म्हणायला सुरुवात कर. ...”
“हंऽऽ ... पण ... आणि जर मी ’गीताच’ विसरलो, माझ्या तोंडून शब्दच फुटेनासा झाला तर ... ?”
“ओह्‌! प्रश्न आणि प्रश्न! ... असंही तिथे तू अर्जुनाला काय सांगतोय्‌स हे ऐकायला कोणीच नसेल. तेव्हा तू काहीही बडबडायला सुरुवात कर, त्यानं तुझा आत्मविश्वास वाढेल. मग त्यावेळी तुझ्या मनात येईल ते तू सांगायला सुरुवात कर, त्यानं त्याचा आत्मविश्वास वाढेल. सांग त्याला, आता जर तू उठून लगेच युद्धाला सुरुवात केलीस तर मी तुला लॉलीपॉप देईन, किंवा ... हे आईस्क्रीम मी तुला युद्धानंतर देणाराय, युद्ध लवकर संपवून लगेच आलास तर ते वितळायच्या आत तुला खाता येईल, किंवा ... असो. नंतर, खूप नंतर – अर्थात युद्धानंतर – ’गीता’ म्हणून तुला जे तत्त्वज्ञान सांगायचं आहे त्यात तू तुला हवी तेवढी भर घालू शकतोस, दुरुस्त्या करू शकतोस, पुन्हा लिहू शकतोस किंवा संस्करण करू शकतोस. ती शेवटी छापायला जाईपर्यत.”
“ओह्‌! डॉ. प्रभुणे. तू मला आज वाचवलंस. मी तुझा - ”
“नंतर.”
“काय?”
“आभार प्रदर्शन समारंभ!”  
“ओह्‌! ठीकय. पण तरी आभार. मी तुझ्यासाठी काय करू?”
“आता नाही. नंतर. युद्धानंतर! मला फक्त ’गीतेची’ एक प्रत दे. मी ती वाचीन आणि माझ्या मेंदूतले विस्कटलेले धागे जुळवीन आणि माझ्या हृदयाची धडधड आणि पायांची थरथर शांत करण्याचा प्रयत्न करीन.”  

Thursday, December 8, 2011

Why this, मी का वाया घालवतोय?


 Why this, मी का ... ... वाया घालवतोय? अर्थात, मेंदू पोखरणारा भुंगा.


Hi, boys and girls,
I ‘m singing a song,
                                                            (दुसरा काही उद्योग नाही काय रे?)
Why this, Why this, Why I’m listening Dis?
Why this, Why this, Why I’m listening Dis?
                                                            (Rhythm correct?)
                              (Correct. But is this a song?)
Poem-u lyric-u trash-u trash-u
Music-u bad-u bad-u … … …
(really bad music yaar)
Then Why this, …
                                                (Maintain this bad music)
Drilling-u hammering-u मेरा head-di

Tune-u ghissi – a – pitti – a tune-u
Theme-u ol’ .. n Song-u Flopp-u
                                                            (as it is said, and rightly said)
Why this, Why mere नशिबात देवा Dis?    

Brain-u smashing – a – mashing – a – frying  
फिर भी listening-u torture-u – self-u
            Why --- --- why --- --- why --- Daka Dhaka Dhis!

Ka Ka Ku Koooo, Ki Kee Ke Kaeeee,
त्याने काऽऽस्वाशी पैज लाविलीऽऽ
Ko Kau Kam Kaha, Ko Kau Kam काऽ ही
शर्यत रे ऽऽ अपुली ऽऽ  --- --- --- हा हा हा हा!
Why this, why … … … --- --- --- … … … ing this?

But why I’m writing-u this-u this-u
Wasting-u time-u time-u … … …
Why this, Why this, Why I’m listening Dis?
Why this, Why this, Why people r listening this?

Friday, July 1, 2011

“अमिताभ-आजोबा” या सुलभाच्या लेखाच्या निमित्ताने –


तुझा राग योग्यच आहे आणि या लेखात तो चांगलाच व्यक्त झाला आहे.
हे वाचताना मला मला “प्रहार” सिनेमाची आठवण झाली. “अगर ये तुम्हारा बच्चा होता तो? वो देखो, तुम्हारा बच्चा सडकपर पैदा हुवा और पैदा होतेही मर गया” असं काहीतरी नाना रागाने म्हणतो, त्या प्रकाराने तुझाही राग व्यक्त झाला आहे.
अमिताभला सगळे ओळखतात, त्याच्यावर सगळे प्रेम करतात. तो जणू आपल्या कुटुंबाचाच भाग आहे असं सगळ्यांना वाटतं. (म्हणून तर आपण त्याला, नानाला, प्रेमाने अरे-तुरे म्हणतो.) याची जाणीव ठेऊन त्यानं आपली खाजगी गोष्ट आपल्याला सांगितली. स्वतःचा आनंद आपल्याबरोबर वाटला. या बातमीचं स्वागत आपणही चांगल्या प्रकारे करू, आपल्यालाही त्याच्याइतकाच आनंद होईल असं त्याला वाटलं असणार. तो स्वतः अत्यंत सुसंस्कृत असल्यानं याच सुसंस्कृतपणाची अपेक्षा त्यानं आपल्याकडून ठेवली असणार.
दुर्दैवानं आपण इतके सुसंस्कृत नाही, इतकेच नव्हे तर अशा गोष्टीवर सट्टा लावण्याइतके विकृत आहोत, हेच आपण दाखवून दिले. पाच हजार वर्षांच्या हिंदु संस्कृतीचा अभिमान सांगणारे आपण दुसर्‍याच्या आनंदात आनंद मानण्याइतकासुद्धा सुसंस्कृतपणा दाखवू शकत नाही.
सट्टा चालवणार्‍यांच्याबद्दल आपल्या काही अपेक्षा नाहीत व त्यांच्याबद्दल आपल्याला काही बोलायचेही नाही. पण लोक खेळत नसतील तर अशा गोष्टींवर कोण सट्टा चालवू शकेल?
अशा गोष्टींवर थोड्या पैशांसाठी सट्टा खेळणारे लाखो-करोडो विकृत लोक ज्या समाजात आहेत त्या समाजाबद्दल काय बोलायचे? आणि मुलगा-मुलगी बघून मुलींना गर्भावस्थेतच मारायचं या सार्वत्रिक महा-विकृत मानसिकतेपेक्षा व खुनी कृतीपेक्षा सट्टा खेळणं ही किरकोळ बाब आहे.
अशा समाजात, अशा काळात अमिताभला राहावे लागते व त्याच्या नातीला/नातवाला जन्म घ्यावा लागतो हे त्यांचं दुर्दैव.