होळी
सण साजरे करायला आपल्याला आवडतं. इतकं, की सण आणि धार्मिक उत्सव म्हटलं की त्याबद्दल कुणी काही बोलायचं नाही (भावना दुखावतात) असं आपण ठरवलेलं आहे. त्या दिवशी काहीही करायचा परवानाच आपल्याला मिळालेला आहे. शिवाय आपण हिंदू असल्यानं सहीष्णू आहोत आणि आपलं राष्ट्र निधर्मी आहे. त्यामुळे सर्वांचे सण आपलेच आहेत आणि आपण इतके रिकामटेकडे आहोत की रोज सण साजरे करायला मिळाले तरी आपल्याला आवडेल.
सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती हे उत्सव लोकमान्यांनी काय हेतूनं चालू केले आणि ते साजरे करण्याबद्दल त्यांच्या काय कल्पना होत्या याचं आज आपल्याला कोणालाच सोयर-सुतक उरलेलं नाही. कालमानाप्रमाणे उत्सव साजरे करण्याच्या कल्पना बदलायला ह्व्यात हे बरोबर असलं तरी त्याचा अर्थ उत्सवांचं स्वरूप जास्त-जास्त विकृत करत न्यायला हवं असा होत नाही.
आज गणेशोत्सवाचा काय आणि किती राडा झाला आहे हे वेगळं सांगायला नको. पण हेसुद्धा आपल्याला मान्य करायचं नाही. हे तर उलट आपल्या सगळ्यांना आवडतंच आहे. सगळ्यांसाठीच तर हे चाललं आहे. सगळ्यांनाच जास्त-जास्त (कान फाटेपर्यंत) कर्कश्श आवाजात गणपतीच्या नावाखाली आयटेम सॉंग्ज ऐकायची आहेत आणि त्यावर विकृत हावभाव करून नाचायचं आहे. पण शेवटी आयटेम सॉंग्ज हीही उच्च गायनकलाच आहे आणि हावभाव विकृत कुठे आहेत? (उलट काही लोकांची दृष्टी विकृत झाली आहे.) सगळ्यांनाच लोकांच्या (म्हणजे कुणाच्या?) पैशातून “प्रसाद” खायचा आहे. सगळ्यांनाच लोकांच्या पैशानं चैन करायची आहे. सगळ्यांनाच गणपतीच्या सोंडेनं दारू प्यायची आहे. सगळ्यांनाच “गणेशोत्सवाच्या माध्यमातून” समाजसेवा करायची आहे. सगळ्यांनाच एकाहून एक मोठ्ठ्या गणपतीच्या मूर्तीच्या पोटाएवढ्या पोटांत पैसे खायचे आहेत. शिवाय सगळ्यांनाच उत्सवाचे प्रायोजक होऊन जाहिराती करून दिलेल्या पैशांच्या हजारपट पैसे ओढायचे आहेत. सगळ्यांनाच मिरवणुकीत ...
हे कमीच पडतंय. म्हणून लगेच नवरात्री उत्सव आणि दांडिया!
शिवजयंतीचा प्रकार वेगळाच आहे. शिवरायांच्या जन्मतिथीबद्दल (व तारखेबद्दल) मतभेद असणं वेगळं आणि त्याचं निमित्त करून चार वेळा उत्सव करून उच्छाद मांडणं वेगळं. शिवाय कोण कशाकरता मशाली घेऊन कुठे धावतात हेच कुणालाच समजत नाही. आपल्याकडे इतकं तरुण रक्त उपलब्ध आहे म्हणून आनंद मानायचा, का ते असं महिनोन् महीने धावून रस्त्यांवर भळभळ वाहून वाया जातंय याचं दःख करायचं, हेच कळेनासं झालंय. शिवाय इतकं धावून धावून कुठल्याही मॅरॅथॉनमधे बक्षिस नाहीच!
दिवाळीमधे फटाक्यांचे आवाज आणि शोभेच्या दारूचा धूर वाढतोच आहे. फुकट मिळालेल्या मिठायांनी पोटं सुटतातच आहेत. सोन्याच्या कींमतीबरोबरच सोन्याच्या दुकानांची आणि खरेदीदारांची संख्याही वाढतेच आहे. शहरांतली रोषणाई आणि झगमगाट वाढतोच आहे. वीज-टंचाई आहेच कुठं!? दिवाळी, ख्रिसमस आणि इतर सणांची, वाढदिवसांची गिफ्ट्स, रिटर्न गिफ्ट्स आणि भेटकार्डांचं प्रस्थ वाढतंच आहे.
न्यू इयरबद्दल बोलायलाच नको. जाणार्या वर्षाचं दःख आणि येणार्या वर्षाचा आनंद यांचा एकत्र मिलाफ झाल्यावर कुणाला भान राहील? सगळे "रम"णारच!
हे सगळं खरंच आपल्याला सगळ्यांना हवंय, का हे काहीच हितसंबंधियांना हवंय् आणि म्हणून, "हेच आपल्याला हवं असायला पाहिजे" अशी सक्ती केली जाते आहे?
नेत्यांच्या जयंत्या आणि वाढदिवस हे नव-सण निर्माण झाले आहेत. त्यात इतर गोष्टींबरोबरच मोठे फ्लेक्स बोर्ड लावून निष्ठा दाखवण्याची स्पर्धा लागली आहे.
जत्रा म्हणजे तर देवाच्या नावाखाली, देवाच्या नावानं सोडलेल्या वळूंसारखं, दारू पिऊन, मोटारसायकलींवरून गावोगाव मटणाच्या पार्ट्या झोडत महिना-दोन महिने सुसाट उंडारायचं/ भटकायचं असंच आपण ठरवलेलं आहे.
हे पाहिल्यावर आपला देश गरीब आहे; बेकारी, भूक, रोगराई हे आपल्यापुढचे प्रश्न आहेत; साधनसंपत्ती, वीज, पाणी, अन्न या गोष्टींची आपल्या देशात कमतरता आहे असं काही लोक म्हणतात त्यावर विश्वासच बसत नाही.
स्वतःच्या बहिणीकडून राखी पौर्णिमेला राखी (दुबळ्या मनगटापेक्षा मोठी) बांधून घेतली की व्हॅलेंटाईन डेला इतरांच्या बहिणींना लाल गुलाब द्यायला आपण मोकळे. मग उरलेलं वर्षभर त्यांच्यावर (इतरांच्या बहिणी) एकतर्फी प्रेम करताना त्यांच्यावर अॅसिड ओतणे, बलात्कार करणे किंवा खून करणे अशा गोष्टी घडणारच! वर्षभराच्या या कर्तृत्वासाठी भाऊबीजेला आपण बहिणींकडून (आपल्या) पुन्हा ओवाळून घेणार.
हे सगळं आता मनात येण्याचं कारण म्हणजे आता होळी, मग धूलिवंदन आणि नंतर पाच दिवसांनी रंगपंचमी. (भारतीय एकात्मतेमुळे आता आपण तिनही दिवशी रंग खेळतो). या दिवशी आपण कोणकोणते रंग उधळणार आहोत?.
जंगलांची कत्तल आणि लाकडांची चोरी करून आणि सक्तीची वर्गणी काढून जमवलेल्या लाकडांची होळी करून लोकांच्या नावानं बोंबा मारणं ही आपली होळीसंबंधी कल्पना आहे. हे पुरेसं नाही म्हणून जंगलांना एकदमच वणवे लावून मोठ्या प्रमाणात होळी केली की एक-एक लाकडाचा तुकडा जाळण्याची कटकट नको. एप्रिल महिन्याच्या शेवटापर्यंत एकदा सगळे डोंगर जाळून झाले की आपल्या जिवाला शांती आणि गारवा मिळणार.
धूलिवंदनाचीपण आपण धुलवड करून टाकली आहे. ज्या मातीतून आपण जन्मलो तिला वंदन करून, तिचा रंग कपाळाला लावून तिच्या रंगात रंगण्याच्या ऐवजी राडा करून गाढवासारखे लोळण्यातच आपल्याला मजा वाटते. रंगपंचमीला तर तोंडाला काळे फासून भुतासारखे बोंबलत हिंडंण्यात आणि इतरांच्या अंगावर चिखल उडवण्यातच आपल्याला विकृत आनंद होतो.
रोज एक सण आहेच आणि आपण तो, सगळं जीवन पणाला लावून, तोंडाला फेस येईपर्यंत धिंगाणा घालून, साजरा करत आहोत.
एवढ्या कशाच्या उन्मादानं आपल्याला एवढी झिंग आली आहे?
असो. आपली जेवढी लायकी तसेच आपण वागणार आणि तीच आणि तशीच आपली संस्कृती. त्यात आपली संस्कृती सर्वसमावेशक असल्याने सगळी घाण आपण पोटात घेणार.
कुठल्याही सणाच्या आनंदाचं उन्मादात; उत्साहाचं चेकाळण्यात; रंगाचं बेरंगात; गाण्याचं किंचाळण्यात; नाचाचं धिंगाण्यात; सुग्रास जेवणाचं काल्यात; आनंदानं खाण्याचं आधाशीपणे तुटून पडून हादडण्यात; उल्हासाचं फाल्गुनमासात आणि संस्कृतीचं हिडीस आदिम रानटीपणात रूपांतर करायला आपण कसे आणि कधी शिकलो?
काहीही का असेना, आपण शिकतोय हे महत्त्वाचं! असंही काहींना वाटतं.
काहीही का असेना, आपण शिकतोय हे महत्त्वाचं! असंही काहींना वाटतं.