MahaGanapati Mandir

MahaGanapati Mandir
महागणपती मंदिर, वाई, महाराष्ट्र.

मनातलं

ज्या यशाने उन्माद येईल असं यश मला नको. ज्या यशाने इतरांच्या त्या यशातील वाट्याबद्दल कृतज्ञता मनात दाटून येईल आणि अधिक विनम्रता येईल ते खरं यश.

Sunday, December 22, 2019

राजस्थान बॉर्डरवर डिटेक्टीव्ह चिण्णूची रबाडगिरी - 5


19 डिसेंबर, दुपारी 04.05
चीफ ’ची’चे ऑफिस

“मे आय ---” चिण्णू.
“कम इन, कमिन !” चीफ.
“‘स्स्सर!!” चिण्णूने कडक सॅल्यूट ठोकला तेव्हा दचकून चीफ आणखी ताठ झाले.
“बस चिण्णू !” चीफने चिण्णूला प्रेमाने, नावाने हाक मारली. त्याचा अर्थ यावेळची कामगिरी फार, म्हणजे फारच महत्वाची व धोकादायक असली पाहिजे हे चिण्णूने झट्कन ओळखले. एखाद्या कामगिरीत चिण्णू नक्की मरणार असे चीफला वाटत असे तेव्हाच चीफ त्याला प्रेमाने, नावाने हाक मारत असे. आत्तापर्यंतच्या अनेक अनुभवांवरुन हे चिण्णूला माहीत होते. आणि तरी चिण्णू नवीन कामगिरीसाठी आज पुन्हा इथे जिवंत हजर होता. म्हणजे तो किती ग्रेट असला पाहिजे.
“येस सर!” चिण्णू.
“तू वर्तमानपत्र वाचतोस?”
“होय सर.”
“मग सध्याची महत्त्वाची बातमी?”
“तपस्याचं ऋषिबरोबर लग्न झालं.”
“च्‌-च्‌-च्‌-च्‌ ... चिण्णू, चिण्णू ऽ, बी सीरियस.”
“पण खरंच झालं सर! ... हां ! ती पाकिस्तानच्या पंतप्रधानांची भारत भेट! ... राजस्थानात जैसलमेरजवळच्या ’लोंगेवाला’ आणि पाकिस्तानातील ’सैन वारी’ या गावांमधे 29 डिसेंबर पासून भारत-पाकिस्तान दरम्यान ‘टांगा सवारी सेवा’ सुरु होणार आहे. पाहिल्या सवारीतून पाकिस्तानचे पंतप्रधान भारताच्या पंतप्रधानांना भेटण्यासाठी भारतात ...”
“पुरे, पुरे! मग तुझा अंदाज ?”
“सर -- मी सिगारेट पेटवू? म्हणजे विचार करायला ...”
“नको ! तुला माहितीयै मला वाससुध्दा ...”
“तुम्ही तेवढा चिरूट ओढायचा. आम्हाला साधी सिगारेट सुध्दा ...”
“मी तरी कुठे ओढतोय!? सिग्रेट ओढणं प्रकृतीला ...”
“तेच म्हणतो मी. त्यापेक्षा मला द्या. मी तरी ओढतो.”
“शटाप!”
“जरा इकडे तरी धरा. तेवढाच धूर नाकात जाईल आणि अंदाज करायला मेंदू तल्लख ...”
“शटाप!”
“राहिलं! ... त्यावेळी ते आपल्याला ’लोंगेवाला युद्ध-स्मारक’दर्शन आणि रणगाडा राईडसाठी 35वा, चालू स्थितीतील, रणगाडा भेट देणार आहेत?”
“ चिण्णूऽऽऽ!!! बी सीरियस! आपलं डिपार्टमेंट कशासाठी आहे?” 
“ खून?”
“येस”
“भारताचे पंतप्राधान?”
“नो”
“पाकिस्तानचे?”
“येस! --  हुशार आहेस. त्यासाठीच तुला बोलावलं”
“म्हणजे मी करायचा?” 
“मूर्खा! आपण नाही करायचा. आपल्याला तसं कितीही वाटत असलं तरीसुध्दा!!! ... जमात-ए-अतिरेकी’  ही संघटना तो करणार.”
“अरे वा ! छानच!! ... पण का? ती तर मुस्लिम अतिरेकी संघटना आहे. 1956 साली काश्मीर बॉर्डरवर डोक्यात नारळ पडून मेलेल्या असित शेखच्या मुलानं ती चालू केली. कारण असित शेखच्या फुटलेल्या डोक्याशेजारी फुटलेल्या नारळाबरोबर बॉंबचा गंजलेला तुकडाही सापडला. तो हातात धरूनच त्यानं प्रतिज्ञा केली की ...”
“चिण्णू --”
“थोडक्यात सांगतो. मला पाठ आहे.”
“चिण्णू -- पुरे!”
“राहिलं”
“ती मुस्लिम संघटना असली तरी या पंतप्रधानांच्या विरोधी पक्षाच्या बाजूनं ती आहे. या पंतप्रधानांचं टांगा चलावू धोरण त्यांना आवडत नाही. त्यांना क्षेपणास्त्राच्या गतीनं जायचंय. आत्ताच्या पंतप्रधानांना मारल्यानं, त्यांना नको असलेले पंतप्रधान मरतील हे एक, ते भारतात मेल्यानं आळ परस्पर भारतात येईल हे दुसरं आणि भारत-पाक संबंध सुधारण्याच्या घोडदौडीला खीळ बसेल हे तिसरं. त्यामुळं भारत-पाक युद्ध सुरू होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. त्यातून पुढं कदाचित ...”
“अणु-बॉंबचा वापर, जागतिक महायुध्द ... जगाचा विनाश! वॉऽऽऽ व ! एका गोळीत तीन खून !” चिण्णूने शीळ वाजवली.
“गोळीनं नाही -- ही फाईल वाच.”
“एवढ्यात इतकी माहिती जमवून तुम्ही फाईलसुध्दा तयार केलीत? आपलं डिपार्टमेंट इतकं कार्यक्षम कधीपासून झालं ?”
“शटाप! मी नाही. ही आजच पहाटे ई-मेलनं अतिरेक्यांनीच पाठवून दिली. म्हणून तर आपल्याला कळलं. यात, ’पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा खून – संकल्पना, उद्देश, साहित्य, मनुष्यबळ, प्रत्यक्ष कारवाई, खुनानंतरची परीस्थिती, परिणाम व फेर आढावा’ इथपर्यंत, अगदी शेवटच्या तपशीलापर्यंत, माहिती त्यांनी दिली आहे.”
“अरे वा ! अखेर इतक्या वर्षांनंतर का होईना, हे लोक सुधारायला लागले तर! पूर्वी आपल्यालाच सर्व शोधून काढायला लागायचं. पण मग -- इतकं सगळं त्यांनी ठरवलंच आहे तर माझं काय काम?”
“तू तो खून होऊ न देण्याचा प्रयत्न करायचा. आणि जमल्यास अतिरेक्यांना पकडून द्यायचंस.”
“अरेच्चा! ... खरंच की ! त्यासाठी तर आपलं डिपार्टमेंट आहे. मी समजत होतो, बरं झालं. आणि खून परस्पर होतोय हे छानच आहे.”
“येड्या ऽऽ तसं नसतं. थोडं तरी आंतरराष्ट्रीय राजकारण, इथं काम करताना, एवढ्या वर्षांत तुला समजायला हवं. ... तू ही फाईल वाच, प्लॅन नीट समजावून घे आणि तो हाणून पाडण्याचा आपला प्लॅन तयार करुन मला भेट. हीच तुझ्याकडून माझी, आपल्या पंतप्रधानांची, पाक पंतप्रधानांची व अतिरेक्यांचीही अपेक्षा आहे. दोन्ही राष्ट्रांचं, जगाचं व अतिरेक्यांचही भवितव्य आम्ही विश्वासानं तुझ्या एकट्यावर सोपवतो आहोत.”
“ठीक आहे. ... साधारण आठवडाभरात ...”
“आज तारीख कोणती?”
“19 डिसेंबर.”
“म्हणजे तू अभ्यास करून, प्लॅन आठवड्यानं तयार करणार, मग मला भेटणार, मऽऽऽग तयारी करुन प्रत्यक्ष कामाला लागेपर्यंत दहा वेळा खून होऊन गेला असेल. उशीरात उशीर 26 डिसेंबरला अतिरेकी माझ्या हातात पाहिजेत. म्हणजे पुढील --”
“त्यांनी पकडण्याचा पत्ता कळवला आहे का?”
“चिण्णू!”
“हा अन्याय आहे. टांगा सवारी सेवा चालू होणार, त्यावेळी पाक-पंतप्रधान भारतात येणार, त्यावेळी ते खून करण्याजोगे असणार, हे माहीत झाल्यापासून अतिरेक्यांना तयारीला सहा महिने तरी मिळाले आणि मला फक्त सहा दिवस ?”
“मग किती?”
“भेट पुढं ढकलायला सांगा.”  
 “पंतप्रधानांना? तू डोक्यावर पडला काय? आणि फक्त या दोन देशांचा प्रश्न नाही. ही ऐतिहासिक भेट होईल तेव्हा आकाशातून हेलिकॉप्टरमधून या दोघांवर पुष्पवृष्टी करण्यासाठी अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, रशिया व चीनचे प्रमुख येणार आहेत. आणि हा सोहळा बघण्यासाठी निरीक्षक म्हणून यूनोचे अध्यक्ष या सर्वांवरुन विमानातून आकाशात घिरट्या घालणार आहेत.”
“हे मला माहीत नव्हतं.”
“ते उद्याच्या बातम्यांत प्रसिद्ध होईल. मुद्दा तो नाही. इतक्या सगळ्या बड्या लोकांची गैरसोय करुन भेट पुढं ढकलता येणार नाही.”
“मग रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पाकिस्तानच्या पंतप्रधानांवर आणि त्यांच्या प्रेता शेजारी गुडघे टेकून बसून कपाळावर हात आपटत आक्रोश करणार्‍या भारताच्या पंतप्रधानांवर त्यांना पुष्पवृष्टी करायला सांगा.”
“चिण्णू ,चिण्ण्या, चिण्ण्ण्ण्याऽऽऽ, ...”
“जगाचं भवितव्य माझ्या एकट्यावर सोपवताना हा विचार तुम्ही करायला हवा होता. आता का माझ्यावर चिडता?”
“ठीक आहे, ठीक आहे. मी प्रयत्न करीन.”
“कसून प्रयत्न करा. मला कमीत कमी तीन आठवडे तरी ... 10 जानेवारीच्या पुढे भेट ठरवा.”
“अरे, हिंदु मुस्लिम पंचांगे बघून हा मुहूर्त काढला होता”
“खुनाचा?”
“बरं बाबा! मी करतो प्रयन. पण खात्री देत नाही. ... बेस्ट लक! ... तुला आणि मला पण”
“आता सगळ्या जगालाच लक्‌ची जरूर आहे.”
चीफना या सगळ्याचे इतके टेन्शन आले की चिण्णू जाईपर्यंतही वाट न बघता त्यांनी ड्रॉवरमधून व्हिस्कीची वाटली काढली व दोन मोठे घोट सरळ घशात ओतले.

Sunday, November 17, 2019

राजस्थान बॉर्डरवर डिटेक्टीव्ह चिण्णूची रबाडगिरी - 4




19 डिसेंबर 2007. दुपारी 03.55
चीफ ’ची’चे ऑफिस
कु. मानवी चीफच्या केबिनमधे शिरली तेव्हा टेबलावर डोके टेकून, खुर्चीतल्या खुर्चीत घसरुन वेडेवाकडे पसरलेले चीफ तिला दिसले. ती झट्कन पुढे झाली. त्यांचे गाल टेबलावर ओघळले होते, डोळे अर्धवट उघडे होते व तोंडातून गळलेल्या लाळेचे टेबलावर छोटेसे, 3.5 x 2.5 सेंमीचे थारोळे झाले होते. (मापे बरोबर होती. कारण कु. मानवीने ती तप्तरतेने मोजली. अशा नको त्या गोष्टीत ती नेहमी अमानवी चटपटीतपणा दाखवत असे) त्यांचा डावा हात टेबलावर पसरला होता व त्यात अर्धवट उघडे डिटेक्टिव कथांचे पुस्तक धरलेले होते. उजवा हात टेबलाखाली दोन पायांमधे लोंबत होता. पोटाचा पट्टा ढिला केला होता व त्यातून पोट बाहेर पडून लोंबत होते. दोन्ही तंगड्या दोन बाजूंना ढिलेपणाने पसरलेल्या होत्या. -- एखादा अडाणी, सामान्य माणूस तिथे आला असता तर, पुस्तक वाचताना बेसावध गाठून कोणीतरी चीफना गोळी घातली आहे व ते तात्काळ मरुन तिथे तसे पडले आहेत असे त्याला वाटले असते. पण कु. मानवीला ते नेहमीचे दृश्य होते व ती सामान्य माणूस नव्हती. शिवाय एखादा अडाणी, सामान्य माणूस तिथे येण्याची शक्यताही नव्हती.
कु. मानवीने तात्काळ कोटाच्या कॉलरला धरुन चीफला मागे खेचले, त्यांच्या लोंबत्या गालांवर थपडा मारल्या व टेबलावरील ग्लासातील पाण्याचा सपकारा त्यांच्या तोंडावर मारला. 
“चीफ – चीफ -- जागे व्हा, जागे व्हा! ...”
“अं ... अं? ...”                                                           
“जागे व्हा! -- चिण्णू आलाय ...”
“कोण चिण्णू ? ...”
“आपला चिण्णू -- डी-1-डी ...” (गालांवर थपडा).
“डी-डी-डी- ... का? -- मी झोपतो ...”
“जागे व्हा.” (पाण्याचा दुसरा सपकारा.) “तुम्हीच बोलावलं होतं. उठा, उठा, (थपडा) आज काय दिवसाच घेतली काय कोण जाणे. उठा! त्यानं तुम्हाला असं पाहिलं तर काय वाटेल त्याला? -- मी आहे म्हणून, नाहीतर -- चिण्णू  आलाय!” शेवटचं वाक्य ती चीफच्या कानांत ओरडली.
“का?!”
“त्या पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा खून ...”
“झाला सुध्दा? इतक्यातच? आणि मला उठवलं नाहीस?” चीफ एकदम खडबडून जागे झाले व मानवीवर खेकसले.
“अजून नाही झाला.” बोलता बोलता मानवीने टिशू पेपरने चीफची लाळ पुसली, ओला झालेला चेहेरा पुसला व कपडे, सूट, टाय नीटनेटका केला. तोपर्यंत पोटावरचा पट्टा आवळण्याइतके चीफ जागे झाले होते. मग मानवीने टेबल साफ केले, डिटेक्टिव्ह कादंबरी ड्रॉवरमधे टाकली आणि दुसर्‍या ड्रॉवरमधला चिरुट काढून चीफसमोर ठेवला. “आत्ता फक्त प्लॅन आलाय. त्यासाठी तुम्ही चिण्णूला बोलावलं होतंत -- तो आलाय ...”
“मी चिण्णूला -- पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा खून करायला बोलावलं होतं?” चीफनी अविश्वासाने विचारले.
“असं काय करता चीफ? तुम्ही जागे झालात का नीट? हे गार पाणी घ्या. तुम्ही अन्वेषण व प्रतिबंध विभागाचे प्रमुख आहात. आता हा चिरुट पेटवा म्हणजे मी चिण्णूला बोलावते.”
“तूच दे पेटवून. मला त्याचा वाससुध्दा सहन होत नाही?”
“नुस्ता हातात तरी स्टायलीत धरा! त्याशिवाय चीफ म्हणून रुबाब कसा वाटेल?” चिरूट पेटवून मानवीने स्वतः दोन खोल झुरके घेतले आणि धूर खोलीत पसरवला. मग चिरूट चीफच्या हातात देत मानवी म्हणाली. “आणि ताठ बसा. मधेच ढेपाळू नका.”
कु. मानवी सट्कन स्प्रिंगचे दार उघडून चीफच्या केबिनमधून बाहेर आली आणि तिने चिण्णूला आत जायची खूण केली. चिण्णू तिच्या शेजारुन जाताना त्याच्या गळ्याजवळच्या फटीतून तिने झट्कन शर्टच्या आत हात घातला.
“मानवी नंतर -- नंतर -- हे बघतायत ...”
“चिण्णू --” एखाद्या खोडकर मुलाला पकडावे तशी कु. मानवी म्हणाली आणि तिने शर्टच्या आतून हात बाहेर काढला. तिच्या हातात चार सेंमी, धारदार, फोल्डिंगची कात्री होती.
“मी काही चीफचा खून करायला आलो नाही.” चिण्णू तक्रारीच्या सुरात म्हणाला. मग रुबाब न दाखवता हळूच स्प्रिंगचे दार उघडून, ते तसेच धरुन ठेवून तो आत शिरला व पूर्ण शिरल्यावरच त्याने ते हलकेच सोडून दिले.

Sunday, November 10, 2019

राजस्थान बॉर्डरवर डिटेक्टीव्ह चिण्णूची रबाडगिरी - 3



19 डिसेंबर 2007. दुपारी 03.50
13वा मजला: ’चीफचा मजला’ किंवा ‘डिटेक्टिव्ह नं-1’ चा मजला
मग, आणखी वरच्या मजल्यावर जाणारा जिना चढायला चिण्णूने सुरुवात केली. त्याच्या जिना चढण्याच्या रुबाबातला एक शतांश तरी रुबाब आपल्यात यावा असा प्रयत्न करत त्याचे तिघे सहाय्यक डिटेक्टिव्ह त्याच्या मागून जिना चढू लागले. चिण्णूच्या मागे त्यांच्यापैकीच एकाची चिण्णूच्या जागी बढती होणार होती आणि त्यांच्या कामातील धोका लक्षात घेता तो दिवस फार दूर असणार नव्हता.
परदेशातील इमारतींना, विशेषत: महत्त्वाची सरकारी कार्यालये, मंत्रालये, महत्त्वाच्या व्यक्तींची निवासस्थाने असलेल्या इमारती, मोठी हॉटेले इत्यादींना 13 वा मजलाच नसतो. पण इथे भारतात, विशेषत: ‘मध्यवर्ती आंतरराष्ट्रीय राजकीय खून अन्वेष्ण कार्यालयाचा’ 13 वा मजला म्हणजे ‘चीफचा मजला’ म्हणून सर्व जगात प्रसिध्द होता. तसेच तो ‘डिटेक्टिव्ह नं-1’ चा मजला म्हणूनही प्रसिध्द होता.
या मजल्यावर लिफ्ट थांबत नसे. 12 व्या मजल्यावरुन याच एकमेव जिन्यावरुन वर यावे लागे. जिना संपताच उजवीकडे लांब पॅसेज होता आणि दुतर्फा ‘डी-1’ पदावरच्या दहा डिटेक्टिव्हांची कार्यालये होती. तिथे या डिटेक्टिव्हांच्या हाताखालचा स्टाफ असे. बहुधा डी-1 पैकी कोणीच कधी कार्यालयात सापडत नसत. कारण बाहेरचे, वरचे आणि मुख्यत: खालचे जग हेच त्यांचे खरे कार्यालय होते.
पॅसेजच्या शेवटी एकच दार होते. त्यावर सध्याच्या पंतप्रधानांचा फोटो लावलेला होता. खाली हिरव्या मखमली पाटीवर ‘चीफचे कार्यालय ’ असे पितळी अक्षरांत लिहिले होते. हे बघून एखाद्दाला चीफच पंतप्रधान आहेत असे वाटत असे तर एखायला पंतप्रधानच चीफ आहेत असे वाटत असे. अगदी अडाणी, सामान्य, आपल्यासारखा माणूस तिथे आला असता तर त्याला कदाचित तो चीफचाच फोटो वाटला असता. पण या इथे अडाणी व सामान्य माणूस येऊच शकत नसे.

चीफच्या ऑफिसच्या दाराबाहेर चिण्णूने ऐटीत सिगारेट शिलगावली व पेटती काडी बेफिकीरीने, स्टायलीत खालच्या मखमली कार्पेटवर उडवली. असले बेफिकीर कृत्य तो इथे करु शकत असे. कारण काडी कारपेटवर पडता पडता झडप घालून विझवण्यासाठी व कडेच्या थोटूक पात्रात टाकण्यासाठी आता त्याच्या मागे त्याचे तीन सहाय्यक उभे होते. हा प्रकार त्याने आता शिरल्यावर केला असता तर चीफच्या पर्सनल सेक्रेंटरीने त्याच्या चिप्पुट श्रीमुखातच भडकावली असती.
चीफची पर्सनल सेक्रेंटरी कु. मानवी गोचिडे हे एक प्रस्थच होते. चिण्णू आलेला आहे हे तिला घंटेच्या सूचनेमुळे समजलेच होते. घंटेची मूळ कल्पना तिचीच होती. त्यामुळे तिला तयारीला वेळ मिळत असे आणि त्यामुळे तिचे सर्व प्रकरण या सर्व एक नंबरच्या डिटेक्टिव्हांनाही कधीच कळले नाही. घंटा वाजताच ती सिगारेट विझवत असे व पंखा फुल ऑन करत असे. आपल्या टेबलवरचा सर्व प्रचंड पसारा ती झटक्यात टेबलक्लॅथसकट उचलत असे व त्याचे गाठोडे बांधून शेजारच्या प्रसाधन कक्षात भिरकावून देत असे. खोलीभर पसरलेल्या इतर सर्व सटरफटर वस्तू पायानेच ढकलून ती मोठ्या कपाटाखाली सरकवत असे. मग टेबलावर नवा टेबलक्लॉथ टाकून त्यावर हिरवा, लाल व काळा असे तीन फोन ती मांडून ठेवत असे. (त्यातील फक्त काळा फोन खरा चालू असे. इतर देखाव्याचे असत. पण हे चीफला सुध्दा माहीत नव्हते.) मग टेबलावर, ‘अति महत्त्वाचे’ असे लिहिलेल्या दोनच फायली, दोन कोरे कागद व तीन पेने (अर्थातच लाल, हिरवे व काळे) असलेला पेनस्टॅंड ती मांडत असे. एकूण फक्त एवढेच काम ती खर्‍या चटपटीतपणे करत असे. मग ड्रेस नीटनेटका करून, नाकावर चश्मा ओढून, टेबलामागे खुर्चीवर ती ताठ बसत असे, एक हात लाल फोनवर ठेवत असे ( नुकताच महत्त्वाचा फोन करुन फोन ठेवत असल्याप्रमाणे) व एका हातात लिहिण्याच्या तयारीत उघडे पेन ठेवत असे. अशा वेळी, आत येणार्‍या डिटेक्टिव्हाला ती अती कार्यक्षम, अती स्मार्ट, कामात व्यग्र, चटपटीत, करारी व कडक अशी खुर्चीवर बसून, मान उंचावलेल्या व चश्मा घातलेल्या शहामृगासारखी  दिसे.
चिण्णूने सिगारेटचा एक खोल झुरका घेतला. डाव्या हाताने स्टायलित धक्का मारुन स्प्रिंगचे दार ढकलले व त्याचे ते रुबाबदार पाऊल आत टाकले. पण तो पुरा आत जायच्या आतच स्प्रिंगचे दार मागे येऊन त्याच्या नाकावर व कपाळावर आदळले. असंख्य वेळा चीफच्या ऑफिसमधे येऊन व लाख वेळा प्रॅक्टिस करुनही हे स्प्रिंगचे दार व आपले रुबाबदार पाऊल यांच्यातले टायमिंग त्याला कधीच जमले नव्हते. आयुष्यात ही एकच गोष्ट आपल्याला कधीच नीट जमली नाही (अशाही अर्थातच अनेक गोष्टी होत्या) ही एकच खंत मरताना उरणार हे त्याला माहीत होते.
कपाळावर दार आपटल्याने नेहमीप्रमाणेच लिब्बीण चेहेर्‍याने व रुबाबदारपणे लडखडत्या दुसर्‍या पावलाने चिण्णूने आत प्रवेश केला. डोळ्यांपुढच्या काजव्यांच्या प्रकाशात त्याने कु. मानवी गोचिडेला पाहिले. तेव्हा ती नेहमीप्रमाणेच अति कार्यक्षम, अति स्मार्ट, -- , (वगैरे वगैरे), चश्मा घातलेल्या शहामृगासारखी, अशी चिण्णूला दिसली.
चिण्णूने स्वतःला सावरले व सिगारेटचा दुसरा व शेवटचा खोल झुरका घेतला.
“हाय स्वीट मानवी !” तिच्या तोंडावर सिगारेटचा धूर सोडत चिण्णू म्हणाला.
“चिण्णू ! सिगारेट विझव. नाहीतर थोबाड फोडीन. तुला माहितीयै मला सिगारेटचा वास बिल्कुल आवडत नाही.”
“अगं -- पण -- मी -- मी आत्ताच --” चिण्णूने सिगारेट विझवली.
“जरा नीट वाग. वयाबरोबर पोरकटपणाच वाढतोय तुझा.” जरा मवाळ आवाजात मानवी म्हणाली. “मी चीफला सांगून येते -- तू आलायस ते.”
ती तट्कन उठली व आतले स्प्रिंगचे दार झटक्यात उघडून ते पुन्हा मागे येण्याच्या आत चीफच्या केबिनमधे दिसेनाशी झाली. एकदा तरी स्प्रिंगचे दार आपल्यासारखेच तिच्याही थोबाडावर आदळावे म्हणून चिण्णूने कितीतरी वेळा गणपतीपुढे प्रार्थना केली होती. पण गणपतीच्या काळी असे स्प्रिंगचे दरवाजे नव्हते म्हणून प्रार्थनेचा उपयोग होत नाही अशी तो मनाची समजून करुन घेत असे. त्याची ही इच्छा आजही पुरी झाली नाही. 

Sunday, November 3, 2019

राजस्थान बॉर्डरवर डिटेक्टीव्ह चिण्णूची रबाडगिरी - 2


अस्वीकृती (Disclaimer)राजस्थान बॉर्डरवर डिटेक्टीव्ह चिण्णूची रबाडगिरी - 1 

      19 डिसेंबर 2007. दुपारी 03.40 
12वा मजला.

अन्वेषण व प्रतिबंध कार्यकारी विभाग ऊर्फ चीफ ’ची’च्या ऑफिसमधील स्टाफ चिण्णूच्या आगमनासाठी तयारीतच बसला होता. खालच्या, अकराव्या मजल्यावरील सुरक्षा जवानांनी झडतीत वेळ घालवल्याने या वरच्या ऑफिसमधील लोकांना तयार व्हायला नेहमीच जास्त वेळ मिळत असे. त्यामुळे सर्वजण तरतरीत होऊन, चेहेर्‍यावर उत्साह आणून, ताठ बसून, कार्यमग्न असण्याचा आव आणून, चिण्णूच्या आगमनाची वाटच पाहात होते. त्यांतील तिघी तरुणींनी तेवढ्यात पर्समधल्या आरशात पाहून मेक-अप सारखा करून घेतला. दोन प्रौढ स्त्रियांनी त्यांच्याकडे नापसंतीने पाहात आपले डाय केलेले केस नीट करुन घेतले व पदर सावरले. स्टाफपैकी इतर दहा पुरुषांना चिण्णूचा हेवा वाटला. पण त्यांचाही तो हीरो होता. जिन्यावर पावलांचा हलका दमदार आवाज आला आणि राजाच्या रुबाबात चिण्णूने प्रवेश केला.
चिण्णू -- महान चिण्णू चिणमुणकर --  सर्वांच्या ह्रदयाचे दोन ठोके जलद पडले. सर्वजण अतीव आदराने त्याच्याकडे पाहात होते. फक्त ‘चिण्णू चिणमुणकर की ऽऽ -- जय!’ हे शब्द त्यांच्या तोंडातून बाहेर पडले नाहीत, इतकेच. तो चिण्णू नावाचा, सहापूट तीन इंच उंचीचा, बारीक कमरेचा, नाकतोड्यासारख्या हातापायांचा, बहात्तर किलो वजनाचा पुरुषोत्तम! त्याचा तो चिप्पुट चेहेरा, लांबट वरवंटी डोके व ती सुप्रसिध्द रुबाबदार हॅट! शहरातील सर्वांत महागड्या व कपडे बिघडवण्यात एक्सपर्ट असणार्‍या ‘कटर्स अ‍ॅंड स्टिचर्स’ टेलरिंग फर्म मधे शिवलेला, किंचित बावळटपणा दाखवणारा त्याचा तो भारी, ढगळ सूट; गडद निळ्या रंगाचा, गळ्यात बांधलेल्या दोरीसारखा दिसणारा, अगदी अरुंद, लांब, पॅंट मधे खोचलेला टाय; लेटेस्ट फॅशनचे, एक ब्राऊन व एक ब्लॅक असे टोकदार बूट व किंचित लांडी पॅंट व बूट यांच्यामधून डोकावणारे ऑफ-व्हाईट सुती मोजे! 26 जानेवारीला बहुतेक दर वर्षी विशेष शौर्यपदक स्वीकारण्यासाठी तो येत असे तेव्हाच फक्त लोकांनी त्याला यूनिफॉर्ममधे बघितले असेल. (अर्थात तेव्हा यूनिफॉर्ममधे तो चिण्णू म्हणून ओळखूच येत नसे.)
चिण्णूने प्रवेश केला आणि ओठांच्या डाव्या कोपर्‍यातून त्याचे ते सुप्रसिध्द ’कनीस’ हास्य त्याने सर्वांवर फेकले. मग गालाची हाडे वर आलेल्या आपल्या चिप्पुट चेहेर्‍यावरील खोलगट गाल फुगवून शिट्टीवर जुनी लोकप्रिय धुन वाजवत (ही एकच धुन त्याला येत असे.) व बोटांभोवती किल्लीची साखळी फिरवत तो सर्वांमधून हॉलच्या दुसर्‍या टोकच्या दाराकडे गेला. जाता जाता त्याने इस्टेला फर्नांडिसकडे बघून डोळा मारला. त्याबरोबर तिने ओठांचा ‘ओ’ केला व तिचे डोळे पांढरे झाले. निंजुळा नवाथेकडे त्याने फ्लाईंग किस् फेकला तेव्हा त्या धक्क्याने ती खुर्चीवरुन कोलमडली. आशा खानच्या गालावर त्याने चापटी मारली तेव्हा ती बेशुध्द पडली. मग त्याने, ‘यू नॉट्टी गर्ल’ असे म्हणत मिसेस शिफा वर्मांचे नाक ओढले. त्यावर ‘निर्लज्ज मेला! चिण्णू तू अलीकडे फारच चावटपणा करतोस हं. ह्यांना समजलं तर शूट करतील तुला!’ असं त्या म्हणाल्या. तोपर्यंत, ‘हाय सेक्सी बेबी’ असे म्हणत चिण्णूने श्रीमती शायलिनीबाई संपकाळांचा गालगुच्चा घेतला. त्यांनी खांद्दावरचा पदर आणखी घट्ट आवळून घेत शालीनतेने मान झुकवली व ‘चिण्ण्ण्ण्णू!’ असा नापसंतीचा उद्गागार काढला. पण चिण्णूने ’सेक्सी’ म्हटलेले त्यांना आवडत असे व मिसेस वर्मांना ’गर्ल’ म्हटलेले आवडत असे हे सर्वांना माहीत होते. शिवाय या ऑफिसमधे त्याला सर्व गुन्हे माफ होते. उद्या कदाचित तो जिवंत दिसणार नाही आणि त्या ऑफिसच्या भिंतीवरील, देशासाठी प्राणार्पण करणार्‍या डिटेक्टिव्हांच्या फोटोंच्या रांगेत त्याचा हळद, कुंकू, गंध लावलेला व प्लॅस्टिकच्या फुलांचा हार घातलेला फोटो पाहावा लागेल हे सर्वांना माहीत होते.

हॉलच्या दुसर्‍या दाराजवळ तो पोचता पोचता त्याचे तीन ’डी-2’ श्रेणीचे सहकारी त्याच्यासमोर आले आणि त्याला सॅल्यूट करुन रांगेत उभे राहीले.
“आज काय विशेष?” चिण्णूने सहज विचारले.
“आम्हाला कसलीही कुणकुण नाही.” डी-2-ए म्हणाला.
“कसला अंदाजही बांधता येत नाही.” डी-2-बी.
“म्हणजे अतीशय गंभीर आणि गुप्त असणार !” डी-2-सी.
“हं ऽऽऽऽऽऽऽ !” चिण्णूने इतक्या खर्जातला व लांबवलेला ‘हंऽऽ’ केला की सर्वजण दचकले व यावेळचे प्रकरण फार, म्हणजे फारच, म्हणजे फारच गंभीर असणार याची सर्वांनाच खात्री पटली. 

Sunday, October 27, 2019

राजस्थान बॉर्डरवर डिटेक्टीव्ह चिण्णूची रबाडगिरी - 1


Disclaimer: This literary work is made solely for reader’s entertainment and is a work of fiction. Names, characters, businesses, places events and incidents are either the Author’s imagination or used in a fictitious manner. Any resemblance to actual persons, living or dead, or actual events is purely coincidental.
Any written matter, dialogues, characters or events in this literary work are not intended to offend the sentiments of any individual, cast, community, race or religion or to denigrate any institution or person, living or dead. 
अस्वीकृती: ही कादंबरी म्हणजे एक काल्पनिक गोष्ट असून ती वाचकांच्या केवळ मनोरंजनासाठी लिहिली आहे. यातील नावे, पात्रे, व्यवसाय, जागा, घटना व प्रसंग लेखकाच्या कल्पनेतून निर्माण झाले आहेत किंवा काल्पनिकरीत्या वापरले आहेत. जिवंत अथवा मृत, प्रत्यक्ष व्यक्तीशी किंवा घटनांशी साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग आहे.
कोणतीही जिवंत किंवा मृत व्यक्ती, जात, समाज, जमात किंवा धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा अवमान-अनादर करण्याचा या कादंबरीतील लेखनाचा, संवादांचा, पात्रांचा किंवा घटनांचा उद्देश नाही.

भाग 1

19 डिसेंबर. दुपारी 03.30
मध्यवर्ती आंतरराष्ट्रीय राजकीय खून अन्वेषण व प्रतिबंध कार्यालय.

सेंट्रल इंटरनॅशनल पोलिटिकल मर्डर इन्व्हेस्टिगेशन अंड प्रिव्हेन्शन ऑफिस (CIPMIPO सी आय पी एमाय पी ओ – सिप्‌मिपो) अर्थात मध्यवर्ती आंतरराष्ट्रीय राजकीय खून अन्वेषण व प्रतिबंध कार्यालयाच्या पंचवीस मजली भव्य इमारतीच्या भव्य प्रवेशद्वारासमोर चिण्णू चिणमुणकर एक क्षणभर विचारमग्न मुद्रेने उभा राहिला. तो तिथल्या डी-1’ (स्पेशल चीफ डिटेक्टिव) श्रेणीच्या दहा डिटेक्टिव्हांपैकी सर्वांत हुशार व कार्यंक्षम होता. परंतु या कार्यालयात येण्याची वेळ त्याच्यावर क्वचितच येत असे. आणि त्यामुळे विचारमग्न होण्याची वेळही त्याच्यावर क्वचितच येत असे. तरीसुध्दा, प्रत्येक वेळी, प्रवेशद्वारासमोरच्या पंचवीस पायर्‍यांपैकी तळाच्या या पायरीवर, या जागी, तो न चुकता थांबता असे व क्षणभर विचारमग्न होत असे. पुढच्या पंचवीस पायर्‍या चढून प्रवेशद्वारापर्यंत पोचायचे या विचारानेच त्याला दम लागत असे.
आजही याच विचारात तो क्षणभर मग्न झाला व त्याला दम लागला. मग दोन श्वास जोरात ओढून त्याने निःश्वास टाकला आणि तो नेटाने एक एक पायरी चढू लागला. बरोबर सातव्या पायरीला तो नेहमीप्रमाणेच अडखळला व तोंडघशी पडता पडता त्याने स्वतःला कसेबसे सावरले. आपल्या चिप्पुट चेहर्‍यावर घसरणारी आपली रुबाबदार हॅट त्याने सावरली व लांबट वरवंटी डोक्यावर नीट बसवली. मग जमतील तितकी रुबाबदार पावले टाकत, एका पायाने लंगड्या, पँट घातलेल्या चित्याच्या तडफेने त्याने प्रवेशद्वार गाठले.
प्रवेशद्वारासमोरच्या आरश्यापुढे त्याने आपली जीभ शक्य तितकी बाहेर काढून दाखवली. आरश्यामागील इलेक्ट्रॉनिक ग्राहकाने त्याच्या जिभेवरील सर्व सूक्ष्म खड्डे-उंचवट्यांचे स्कॅनिंग करुन ती माहिती संगणकाकडे पाठवली. संगणकाने त्याचे विश्लेषण करुन त्याची ओळख पटवेपर्यंत समोरच्या आरशात त्याने एकदा आपली रुबाबदार हॅट न्याहाळली व त्याला समाधान वाटले. हॅट इतकाच आपला चेहेराही रुबाबदार असता तर आपल्याला जास्त समाधान वाटले असते असे त्याला वाटले. पण आपल्या चिप्पुट चेहेर्‍याची कसर तो नेहमी निरनिराळ्या प्रकारच्या रुबाबदार हॅट्स वापरुन भरून काढत असे.
संगणकाला ओळख पटल्यावर प्रवेशद्वारासमोरचा हिरवा दिवा लागला व त्याने आपल्याजवळचे चुंबकीय ओळखपत्र समोरच्या फटीत सरकवताच प्रवेशद्वार आपोआप उघडले. आतील प्रशस्त हॉलच्या डाव्या बाजूच्या बोळातून यू-5 नंबरच्या फास्ट लिफ्टपाशी तो पोचेपर्यंत त्याचे इलेक्ट्रॉनिक, क्ष-किरण आणि व्हीडिओ कॅमेर्‍यांनी परीक्षण केले व निरनिराळ्या मजल्यांवरील निरनिराळ्या संबंधित कचेर्‍यांत चिण्णू चिणमुणकर येत असल्याची सूचना देणारी घंटा वाजली.

अकराव्या मजल्यावरील सुरक्षा कक्षातील जवान तुस्त जेवण करून, पोटावरील पट्टे ढिले करून, ढेकर देत जरा आडवे होण्याचा विचार करत होते. घंटा ऐकताच शिव्या देत ते उठले व पोटावरील पट्टे आवळत लिफ्टकडे धावले. ते जेमतेम तिथे पोचेपर्यंतच लिफ्ट पोचली, तिचा दरवाजा उघडला व एकच अति रुबाबदार पाऊल पुढे टाकत चिण्णू त्यांच्यासमोर उभा राहिला. तिघा सुरक्षा जवानांनी धापा टाकतच त्याला सॅल्यूट केला. मग रीतीप्रमाणे त्यांनी त्याची संपूर्ण झडती घेतली. त्याचे सुप्रसिद्ध 0.9876, ’मोने-दाणी’ बनावटीचे TB-7-H-12, सात राऊंड्सचे, वाकड्या नळीचे सेमी-ऑटोमॅटिक रिव्हॉल्वर’; सन्नाटा-5’ हे बीन नळीचे, पाच राऊंड्सचे राऊंडेड बायकी पिस्तुल; विषारी सुया सोडणारे मृत्युलेख’ हे बॉलपेन व काखेखालील म्यानात बंदिस्त असणारा, दुधारी, निमुळता, अरुंद पात्याचा, 21 सेंमी ’गंजटोक’ हा गंजका सुरा या वस्तू काढून त्यांनी त्या शेजारच्या टेबलावर ओळीने मांडून ठेवल्या.
“’चीफ’ बहुतेक आपली वाटच पाहात असतील, सर ! ... स्पेशल चीफ डिटेक्टिव, डी-1-डी / D-1-D, कर्नल चिण्णू चिणमुणकर, सर !!” काहीतरी बोलायचे म्हणून त्यातील एक सुरक्षा जवान म्हणाला.
चिण्णूने आपल्या गंजक्या दुधारी सुर्‍यासारखी थंड नजर सुरक्षा जवानाकडे वळवली, “नुसतं ’महान चिण्णू’ म्हणत जा.” आपले प्रसिद्ध खदीर हास्य जवानांवर फेकून चिण्णू म्हणाला. मग आपल्या कातडी पट्ट्यातून पातळ, लवलवती, झाडाच्या सालीपासून बनवलेली, 32 सेंमी, ’सटपटीत’ ही सुरी काढून त्याने टेबलावरील इतर शस्त्रांशेजारी ठेवली.
“सॉरी सर -- सॉरी सर!” दुसरा जवान पुटपुटला. चिण्णू वाकला. आपल्या डाव्या पायाच्या मोज्यातून त्याने आणखी एक 5 सेंमी ’प्लॅकू’  हा प्लॅस्टिक चाकू टेबलावर ठेवला.
“सॉरी सर -- सर, हे इलेक्ट्रॉनिक व क्ष किरण कॅमेर्‍यावर दिसलं नव्हतं, सर – सॉरी सर!” तिसरा सुरक्षा जवान सटपटून पुटपुटला.
“म्हणून तर तुम्हाला इथं झडती घेण्यासाठी नेमलं आहे. कसली कामं करता रे येड्यांनो !” ओठांना मुरड घालत खदीड हसून चिण्णू म्हणाला व ते, जेवणाने बुद्धी आणखीनच मंद झालेले सुरक्षा जवान मठ्ठ्पणे त्याच्याकडे पहात असतानाच तो जिन्याकडे वळला.