MahaGanapati Mandir

MahaGanapati Mandir
महागणपती मंदिर, वाई, महाराष्ट्र.

मनातलं

ज्या यशाने उन्माद येईल असं यश मला नको. ज्या यशाने इतरांच्या त्या यशातील वाट्याबद्दल कृतज्ञता मनात दाटून येईल आणि अधिक विनम्रता येईल ते खरं यश.

Monday, March 30, 2020

राजस्थान बॉर्डरवर डिटेक्टीव्ह चिण्णूची रबाडगिरी - 11


20 डिसेंबर. सकाळी 09-00

प्रमुख विरोधी पक्ष नेते श्री यजुबिंदरसिंग यांचे निवासस्थान

20 डिसेंबरलाच सकाळी साडेनऊ वाजता प्रमुख विरोधी पक्ष नेते श्री यजुबिंदरसिंग यांच्या निवासस्थानी त्यांच्या ’विधर्म-पक्षी पक्षातील’ इतर नेते व इतर विरोधी पक्षांचे नेते यांची बैठक होती. इतर विरोधी पक्षांचे नेते येण्याआधी त्यांच्या पक्षातीलच श्री सत्यबिहारी वेदप्रकाश, श्री. नवराणाजी मुरलीश्वर, श्री.सैय्यद काझी व श्रीमती निर्गुणा चांगदेव या इतर नेत्यांबरोबर ते सकाळी नऊ पासूनच विचार विनिमय करत होते. सध्याच्या भारत-पाक पंतप्रधानांच्या आगामी भेटीसंदर्भात काय भूमिका घ्यावी यावर अजून एकदम होत नव्हते. ही घटना ‘चांगली’ म्हणावी तर ’आपल्या पक्षाला विरोधी पक्ष का म्हणावे? मित्रपक्षच का म्हणू नये?’ असा सत्यबिहारीजी वेदप्रकाशांचा मुद्दा होता. आणि तो खरा होता. आणि ही घटनाच अशी होती की ’तिला ’वाईट’ तर म्हणताच  येत नाही’ असे यजुबिंदरसिंगजींचे म्हणणे होते. ’आपल्या पक्षाच्या नेहमीच्या धोरणांशीही ही घटना सुसंगत असल्याने आपली पंचाईत होत आहे’ असे नवराणाजी मुरलीश्वरांना वाटत होते. आणि तेही खरे होतं. शिवाय ’काही महिन्यात सत्ताबदल झाल्यास (ती शक्यता कायमच असते) आपली आत्ताची भूमिका त्यावेळच्या भारत-पाक संबंधांच्या संदर्भात अडचणीची ठरू नये’ असेही सर्वांना वाटत होते आणि तेही खरे होते.
“खरं तर ही टांगा भेटीची मूळ कल्पना माझीच --” शेवटी लाजत लाजत यजुबिंदरसिंगजी म्हणाले.
“काय?” नवराणाजी व सत्यबिहारीजी.
“तुम्हाला म्हणून सांगतो ... आपण सगळे घरचेच आहोत म्हणून ... तुमच्याजवळच ठेवा ... काझीजींना माहिती आहे. ...”
यावर सत्यबिहारीजींनी आणि नवराणाजींनी एकमेकांकडे व नंतर सैयद काझीजींकडे पाहिले. काझीजी मान खाली घालून चुळबुळत बसून राहिले.
“तुम्ही - आत्ता - पाक पंतप्रधानांना - सांगितलंत? टांग्यातून – महारेणूजींना - भेटायला यायला?” शेवटी नवराजींनी अविश्वासाने विचारले.
“च्‍ - च्‍ - तसं नाही. ... खूऽप मागे, त्यावेळी राजारावजी पंतप्रधान होते” यजुबिंदरसिंगजी.
“हां हां !” काझीसकट सर्वांनीच सुस्कारे सोडले.
“त्यावेळी निवडणुका जवळ आल्या होत्या, विरोधकांना चेव चढला होता. ... काहीतरी नवीन शोधून काढणं भाग होतं. ... मी त्यावेळी तरुण होतो. राजकारणात शिरलो, तरी अजून स्वप्नंही पाहात होतो. ... तेव्हा मी ही कल्पना राजारावजींना सांगितली. - की तुम्ही ... थोडं माझं धाडसच ते ... की तुम्ही प्रगतीचं, भविष्याकडे नेणारं, पॉझीटीव्ह दृष्टिकोन असलेलं, ऐतिहासिक पाऊल टाकलयं, हे दाखवण्यासाठी भारत-पाकिस्तान दरम्यान बस सेवा चालू करा आणि बसमधून पाकिस्तानला जा ... एक राजकीय स्टंट, निवडणुकीसाठी. ... यावर विचार करण्याचं राजारावजींनी मला आश्वासनही दिलं होतं. पण सिक्यूरिटीवाल्यांनी माझं म्हणणं हाणून पाडलं. ... काय काझीजी?”
“अं? - हो. ... हो!” काझीजी.
“अर्थात, काही वेळा सिक्यूरिटीवाल्यांचंही बरोबर असतं. राजारावजी त्यावेळी बसमधून पाकिस्तानात गेले असते तर कदाचितकदाचित आता वाटतं, ती कल्पनाच खरोखर पोरकट होती. किती धोका! आत्ताच पाहा ना! ते इतक्या लांब उघड्या टांग्यातून येणार, हे उघड्यावर, राजस्थान बॉर्डरवर त्यांना भेटायला जाणार …”
“मग ती मूळ कल्पना तुमचीच, म्हणजे आपलीच होती असं आपण जाहीर करु या का?नवराणाजी एकदम म्हणाले. आत्ताच्या सरकारने आपली कल्पना ढापली असं म्हणूया. सगळे डीटेल्स देऊ. म्हणजे श्रेय आपल्याला मिळेल. सगळं ठरलंच होतं, पण त्याच्या आत राजारावजी मॉरिशसला गेले, तिथं त्यांच्यावर खुनी हल्ला झाला आणि मग सिक्यूरिटीचं म्हणणं त्यांना पटून त्यांनी हा बेत रद्द केला, असं जाहीर करु. नाहीतरी आता कोण राजारावजींना वर विचारायला जाणार आहे?”
“राणाजी, राणाजी --” यजुबिंदरसिंगजी त्यांच्या उत्साहाला आवर घालत म्हणाले. “’ही कल्पनाच पोरकट, अव्यवहार्य आणि धोकादायक आहे’ असं आपण जाहीर करु या, असं मला म्हणायचं होतं.”
“चालेल. ... म्हणून आम्ही ती शहाणपणानं, दूरदृष्टींनं नाकारली, असंही म्हणू या. म्हणजे सध्याचं सरकार शहाणं नाही, त्याला दूरदृष्टी नाही, असं होईल.” नवराणाजी म्हणाले.
“एवढ्या मोठ्या दोन राष्ट्रांच्या प्रमुखांनी घोडा-घोडा खेळल्यासारखे पोरकट प्रकार करावे हे शोभणारं नाही.” यजुबिंदरसिंगजी.
“या काळात घोडागाडी म्हणजे प्रतिगामी, उलटे पाऊल, एकविसाव्या शतकाकडून अठराव्या शतकाकडे वाटचाल असं पण म्हणू या का?” श्रीमती निर्गुणा चांगदेव इतक्या वेळात पहिल्यांदाच बोलल्या.
“काही हरकत नाही.” त्या मानाने तरुण आणि महिला प्रतिनिधी असल्याने त्यांना प्रोत्साहन द्यावे म्हणून सत्यबिहारजी म्हणाले.
“आणि ’जातीयवादी, धर्मांध कृत्य’ ...” काझीजी.
“ते कसं काय?”  सत्यबिहारजींनी हे जरा अतीच वाटलं.
“जातीयवादी म्हणजे बघा ... हां! घोड्याची जात. सरंजामशाहीचं प्रतीक असणारा टांगा ओढणार्‍या घोड्याच्या जातीची पिळवणूक आणि शोषण ... आणि धर्मांध म्हणजे,  धर्मांध म्हणजे, ... ” काझीजी.
“पण टांग्यातून पाक पंतप्रधान येणार. ते इतके सच्चे धार्मिक मुसलमान असताना त्यांना धर्मांध म्हणता येणार नाही. आपले पंतप्रधान ...” सत्यबिहारजी.
“ही भेट म्हणजे परकीय कटाचा भाग म्हणता येईल. नाहीतरी सगळे मुख्य परकीय पुष्पवृष्टीला येणारच आहेत. ते वर दोर्‍या घेऊन बसलेत आणि खाली भारत-पाकिस्तानच्या पंतप्रधानांना बाहुल्यांसारखं खेळवतायत असं म्हणता येईल.”  नवराणाजी.
“हे समजा खरं असलं तरी असं जाहीर बोलता येणार नाही.” यजुबिंदरसिंगजी चुचकारत म्हणाले. “तेव्हा आपलं तरी ठरलं. ’पोरकट, अव्यवहार्य, धोकादायक, आणि प्रतिगामी!’ बास्! आता इतर विरोधकांनाही बोलावलयं, ते काय म्हणताहेत ते बघू. काय?”


एवढ्यात ‘समष्टीवादी पार्टीचे’  बोंधू जॉमूनजी बोश यांचा फोन आला. 
“ हॉं जी! हॅलो ...”  यजुबिंदरसिंगजी .
“नोमोश्कार! ऑमी जॉमून बोऽऽश ...”
“नोमोश्कार बोंधू जॉमूनजी ! बोला. येतात ना?”
“खूप मनात होतं. पण इकडे कलकत्त्यातच अडकून पडलोय. तिकडे शूटिंगची तयारी कुठपर्यंत आली?”
“काय? कसलं शूटिंग?” यजुबिंदरसिंगजी.
“हिंदी पिक्चर! यावेळी काश्मीरची आठवण काढत राजस्थानच्या लोकेशनवर ...” जॉमूनजी.
“हा: हा: हा: हा:!” यजुबिंदरसिंगजी.
“तुम्हाला बेस्टलक !” जॉमूनजी.
“का?” यजुबिंदरसिंगजी.
“तुम्ही पहिल्यांदाच व्हिलनचा रोल करणार --” जॉमूनजी.
यजुबिंदरसिंगजी एकदम गप्प झाले.
“पण व्हिलन दणक्यात झाला पाहिजे. पिक्चर संपताना लोकांना कळलं पाहिजे की व्हिलन जिंकला आणि व्हिलन, म्हणजे तुम्हीच, खरे हिरो ...” जॉमूनजी.
“तुमचं आपलं काहीतरीच. ... हातात तलवार नाही आणि तुम्ही लढायला सांगताय.” यजुबिंदरसिंगजी.
“पंतप्रधानांचा खून ...”  जॉमूनजी.
“काय?” यजुबिंदरसिंगजी एकदम ओरडले. “खरचं? कुठल्या?”
“’कुणाचाही होऊ शकतो! - होण्याची शक्यता आहे’, - असं म्हणा.”
“खरंच शक्यता आहे?”  यजुबिंदरसिंगजी.
“असं फक्त म्हणा ... असं म्हणतोय मी. कल्पना करा. किती धोका! किती गंभीर दूरगामी परिणाम! भेट ठरवून दोन्ही पंतप्रधान दोन महत्त्वाच्या राष्ट्रांच्या भवितव्यांना वेठीस धरतायत असं म्हणा.” जॉमूनजी.
“पण हे खरं का?” यजुबिंदरसिंगजी.
“असं काय करताय? ... फक्त शक्यता. किती आतंकवादी टोळ्या आणि अतिरेकी संघटना; किती विरोधी पक्ष आणि विरोधक; किती गुंतागुंतीचं आंतरराष्ट्रीय राजकारण; किती माथेफिरू; -- हे खुनाचं कुणाच्याही डोक्यात येऊं शकतं.” जॉमूनजी.
“माझ्या नाही बुवा आलं.” यजुबिंदरसिंगजी.
“सगळं जग तुमच्यासारखं सज्जन थोडंच आहे?”  जॉमूनजी.
“हंऽऽ ! पण ... मग हे तुम्हीच का म्हणत नाही.?” यजुबिंदरसिंगजी.
“तुम्ही प्रमुख विरोधी पक्ष नेते! तुमच्या म्हणण्याला किंमत आहे. तुमचं लोकांनाही पटेल. आम्ही म्हटलं तर आम्हीच खुनाचा प्लॅन केला आहे असं वाटायचं.” जॉमूनजी.
“बरं, बरं, बघतो. ...”  यजुबिंदरसिंगजी.
“बघू नका! जोरात म्हणा. तुमच्या हातात लढायला तलवार दिलीय. लढायचं का नाही, तुम्ही बघा ... अच्छा!”  फोन बंद झाला.

Sunday, March 22, 2020

राजस्थान बॉर्डरवर डिटेक्टीव्ह चिण्णूची रबाडगिरी - 10


20डिसेंबर. सकाळी 08-00
पंतप्रधानांचे निवासस्थान
पंतप्रधन व मुख्य मंत्र्यांची मीटिंग - पुढे - - -


लेफ्टनंट्‍ जनरल नाना षटकर्णी आणि मेजर जनरल तात्या चिमोटे आत आले व सॅल्यूट करुन उभे राहीले.
“व्यत्यय आणल्याबद्दल माफ करा.” नाना षटकर्णी चाचरत म्हणाले. ‘टी.व्ही’ आणि वीजबोर्डामूळं व्यत्ययाची आम्हाला सवय आहे. पण व्यत्ययाचं कारण तितकचं महत्त्वाचं असू दे, हे लक्षात ठेवा.’ आप्पारावजी.
“होय, साहेबराव जी सर ..., मा. पंतप्रधानजी ...सर ...”
“बोला, बोला”  -  महारेणूजी.
“सर, ... पाकिस्तानचे पंतप्रधान टांग्यातून भारतात आल्यावर टांग्यातून उतरताच त्यांचा खून होणार आहे.” नाना षटकर्णी.
“काय? खून?” सर्वजण एकदम ओरडून म्हणाले.
“अशी इन्फर्मेशन आहे.” नाना.
“ई मेलनं त्यांच्या प्लॅनची फाईल आली. त्यांनीच पाठवली” तात्या चिमोटे.
“तुम्हाला कधी समजलं?” रणछोडजी.
“काल सकाळी” नाना.
“काय?” आप्पारावजी आणि रणछोडजी एकदमच ओरडले.
“आणि इतका वेळ?” आप्पारावजी गरजले.
“इन्फर्मेशनची खातरजमा ...” नाना.
“मग?” आप्पारावजी.
“केली. ...जी ... राव जी ...साहेब ... जी ... जी, खून होणार.” तात्या.
“काय?” सर्वजण पुन्हा दचकून एकदम ओरडले.
“नाही साहेबजी ... रावजी ... आता नाही होणार.” नाना.
“का?” आप्पारावजी.
“आपला तो चिण्णू ...” तात्या चिमोटे.
“ठीक आहे. आता मला नीट समजलं ...” आप्पारावजी सर्वांकडे पाहून म्हणाले. “तुम्ही सर्वांनी ऐकलचं खून होणार होता. पण आता होणार नाही.”
“पण का होणार नाही?” डिमंटोजी.
“मी म्हणतो, होऊ दे की! परस्पर कटकट मिटेल.” भुजंगजी मधेच म्हणाले. ते पुढेही काही म्हणणार होते,पण महारेणूजींनी त्यांच्याकडे पाहताच ते गप्प बसले.
“कटकट काय मिटेल? नवीन शंभर कटकटी चालू होतील.” महारेणूजी सर्वाकडे पाहात म्हणाले. “आपल्या देशात खून झाला की आपल्यावर शेकणार, विरोधकाचं फावणार. जगात नाचक्की होणार, इतकी वर्षं जमवत आणलेलं आंतरराष्ट्रीय राजकारण फिसकटणार ... छे,छे,छे!”
“शिवाय पाकिस्तानात नवे पंतप्रधान सत्तेवर येणार. हे निदान टांग्यातून भेटायला येत होते. ते भेटीला क्षेपणास्त्र पाठ्वतील.” रणछोडजी.
“मग आपणही पाठवू.” भुजंगजी.
“म्हणजे युध्द!!!” रणछोडजी.
“म्हणजे चौथं महायुध्द !कदाचित अणुयुध्द !!”-आप्पारावजी.       
“आपण तयार आहोत.” भुजंगजी.
“निम्मं जग बेचिराख होईल...” रणछोडजी डोक्याला हात लावुन म्हणाले.
“आपण तयार आहोत.” भुजंगजी.   
‘आणि उरलेलं तडफडत जगेल ... किंवा मरेल!” रणछोडजी कळवळुन म्हणाले .
“पण म्हणून आपण गप्प बसायचं?” भुजंगजी.
“पण मग काय करायचं?” आप्पारावजी, रणछोड्जी आणि डिमंटोजी एकदमच म्हणाले.
“आपला तो चिण्णू ...” तात्या चिमोटे मधेच म्हणाले.
“आपल्याला कसं वाचवायचं?” आप्पारावजी.
“आपला सुप्रसिध्द चिण्णू ...” तात्या.
“जगाला कसं वाचवायचं?” डिमंटोजी.
“आपला तो जगप्रसिध्द चिण्ण्णू ...” तात्या.
“ही काय चिण्णू, चिण्ण्णू, चिण्ण्ण्णू भुणभुण लावलीय तात्या? आम्ही जगाला विनाशापासून वाचवायचा विचार करतोय, आणि तुमचं आपलं मेंदूला मुंग्या चावत असल्यासारखं सारखं चिण्णूऽ–चिण्णूऽ–चिण्णूऽऽ!” आप्पारावजी खेकसले.
“मी त्याला सांगितलयं ...” तात्या.
“काय? जगाला विनाशापासून वाचवायला? कुणाला?” आप्पारावजी.
“अं? हो! चिण्णूला ... म्हणजे  खून होऊ न द्यायला सांगितलंय.” तात्या.
“चिण्णू चिणमुणकर.” नाना.
“म्हणजे कोण?” डिमंटोजी.
“डी-1-डी.” तात्या
“पण म्हणजे कोण?” सर्व.
“जगातला सर्वात रबाड गुप्तहेर!” चीफ ‘ची’ ऊर्फ तात्या चिमोटे प्रथमच चिण्णूबद्दल इतकं बरं बोलले. “मी त्याला सांगितलंय म्हणजे ते होणारच! ... म्हणजे होणार नाही. म्हणजे खून होणार नाही आणि जग विनाशापासून वाचणार.”
“इतका विश्वास वाटतो तुम्हाला? तुमचं ऐकेल तो?” महारेणूजी.
“अर्थातच! तो माझा माणूस  आहे.” तात्या. ‘महान चिण्णू!’ ”
“या परीस्थितीतून बाहेर पडायला आपण आणखी काय करु शकतो?” महारेणूजी.
“काहीही नाही. फक्त मी त्याला आमच्या डिपार्टमेंटचा असिस्टंट देऊ शकतो.” नाना षट्कर्णी.
“मग ? ...” महारेणूजी.
“जगाचं भवितव्य आता फक्त चिण्णूच्या हाती.” तात्या.
“मग आता तुम्ही चिण्णूला सांगा.” महारेणूजी.
“मी सांगितलंय.” तात्या.
“मग आता तो काय करतोय?” महारेणूजी.
“मी इथं येण्यापूर्वी मला कळलं. तो तातडीनं मिकूट BF-33-C’, लाल गांधिलमाशीतून’ काशीला गेलाय.” तात्या.
“का?” महारेणूजी.
“तेच तर मला समजत नाहीय ...” तात्या.
“शोधा शोधा!” आप्पारावजी आणि रणछोडजी ओरडले.
“जगाचं भवितव्य त्याच्या हातात, आणि तो काशीला काय करतोय?” डिमंटोजी.
“शोधा! त्याच्या हालचाली आणि प्रयत्न आम्हाला समजले पाहिजेत. आम्हाला रिपोर्ट करा. अर्धा-अर्धा तासानं, 24 तास!” आप्पारावजी.
“24 तास?” तात्या.
‘होऽऽय! मी संडासात सुध्दा मोबाईल कानाशी धरुन बसणार आहे.” आप्पारावजी.
“येस्स्सर!” चीफ ‘ची’ तात्या.
“आम्ही सगळे नाही.” डिमंटोजी पट्कन म्हणाले. “तुम्ही ह्यांना कळवा. हे आम्हाला रोज एकदा सोयीस्कर वेळी कळवतील.”
“आता मी लगेच विरोधी पक्षनेते यजुबिंदरसिंगजींशी बोलणार आहे. ... आणि भेटीचा कार्यक्रम पार पडेपर्यंत रोज, याच वेळी, इथचं आपली मीटींग होईल.” मग महारेणूजींनी नोकरांना खूण केली तेव्हा त्यांनी ब्रेकफास्ट सर्व्ह करायला सुरुवात केली.
“पण रोज रोज नाष्ट्याला इडली नको हं!” रणछोडजी.
“इकडे आम्हाला जगाच्या विनाशाची काळजी लागलीय आणि तुम्हाला नाष्ट्याची चिंता.” डिमंटोजी.
“चिंता!! चीफ ‘ची’ चिमोटे चिण्णूला शोधा!!!” सर्वांना दिल्या जाणार्‍या इडली सांबारातून निघणार्‍या वाफांकडे आशाळभूतपणे पाहणार्‍या चीफ ‘ची’ कडे बघून महारेणूजी आयुष्यात पहिल्यांदाच किंचाळले. इतके जोरात किंचाळले की तात्यांना आणि इतरांनाही फक्त ‘ची-ची-ची-ची-ची ’ असा चित्कार ऐकू आला.

राजस्थान बॉर्डरवर डिटेक्टीव्ह चिण्णूची रबाडगिरी - 9


20 डिसेंबर. सकाळी 08-00
पंतप्रधानांचे निवासस्थान
पंतप्रधन व मुख्य मंत्र्यांची मीटिंग - पुढे - - -

माती व मानव मंत्री’ श्री. भुजंगजी भोमे सव्वाआठ वाजताच आले. त्यांचे खाते कमी महत्त्वाचे असेल तरी ते पंतप्रधानांचे अगदी खास, आतल्या गोटातील, विश्वासू व एकनिष्ठ समजले जात. कोलारमहानगरपालिकेच्या निवडणूकीत 1971 साली पंतप्रधानांचे डिपॉझिट जप्त झाले होते तेव्हा सर्व निवडणूक खर्च व देणी भुजंगजींनी भागवली होती असे म्हणतात. तेव्हापासून ते डॉ. अण्णास्वामींबरोबर होते.
नंतर, पावणे नऊला संरक्षणमंत्री मा. श्री. रणछोडजी छाजेड व गृहमंत्री मा. श्री. आप्पारावजी सातपुते बरोबरच आले. गेली अनेक वर्षे ते बर्‍याच वेळा एकत्र दिसत आणि त्यांच्याकडे बघताना पांढरी शेळी व गेंडा खाली मान घालून चरता चरता गवताच्या हिरवेपणाबद्दल गहन चर्चा करत आहेत असे वाटे.
परराष्ट्रमंत्री मा. श्री. आलबेल डिमंटोंचा संबंध नेहमी परराष्ट्रांशी येत असल्याने परराष्ट्रांना कळण्यासाठी ते सूट वापरत. पण अंतर्यामी ते गांधीजींच्या भारताचे असल्याने सुटाचे कापड खादीचे असे. ते बरोब्बर नऊला दोन मिनिटे कमी असताना आले.
“आज उशीर?” भुजंगजींनी त्यांना उगीचच डिवचले. पंतप्रधानांचे निकटवर्ती असल्याने असला आगाऊपणा करण्याचे धाडस ते नेहमी करत आणि हेच डिमंटोंना आवडत नसे.
“तुमचंच घडयाळ पुढं असेल.” डिमंटो म्हणाले. तेवढ्यात पंतप्रधान आले. “बघा. डॉ. अण्णास्वामीजींच्या आधी मी दोन मिनिटं आलो.” डिमंटो सोडले तर इतर सगळे निकटवर्ती खाजगीत त्यांना महारेणूजी म्हणत.
महारेणूजी काळे पण अति प्रसन्न मुद्रेचे व स्वच्छ, बुध्दिमान, हसर्‍या डोळ्यांचे होते. जरा स्थूलपणाकडे झुकणारे असले तरी चपळ होते. त्यामुळे वयाच्या मानाने ते तरूण वाटत. पण त्यांना संपूर्ण  टक्कल असल्याने त्यांचा चेहेरा जास्त प्रौढ वाटे. बाहेर वावरताना डोक्यावर गांधी टोपी असल्याने ते पंचावन्नच्या आसपास वाटत. त्यांच्या कपाळावर भस्माचे पट्टे व आडवे गंध लावले होते. पांढरी लुंगी, पांढरा सदरा व लाल काडीचे उपरणे असा त्यांचा साधा वेश होता.
“बसा,बसा.” प्रसन्न हसत महारेणूजी म्हणाले. “आधी थोडी कॉफी घेत घेत चर्चा करू.” पोटाची सोय झाल्याशिवाय माणूस मोकळा होत नाही असे महारेणूजींचे आवडते तत्त्व होते. अर्थातच महारेणूजींच्या घरी मीटींग म्हणजे अस्सल दक्षिणी चवदार पदार्थांचा भरपूर आस्वाद व नंतर उत्कृष्ट कॉफी हे सर्वांनाच माहीत होते.
“आजच्या चर्चेसाठी आपल्यापुढे तीन मुख्य मुद्दे आहेत.” सर्वांना कॉफी दिली जात असताना डायरेक्ट मुद्दावर येत महारेणूजी म्हणाले.
“एक - प्रत्यक्ष भेटीत पाकिस्तानच्या पंतप्रधानांशी काय बोलायचं? ...”
“आधी त्यांना काय हाक मारायची ते ठरवायला लागेल.” रणछोडजी.
“ते कशाला?” आप्पारावजी.
“मला वाटतं, त्यांना मिस्टर सादाखान म्हणावं?” डिमंटोजी.
“ते फार औपचारिक वाटतं. ते प्रेमानं, सदिच्छ भेटीसाठी येणार ...” रणछोडजी.
“प्रेमानं? सदिच्छा? च्या मायला तिच्या, सॉरी, ते तिकडं बॉंब फोडणार, अतिरेकी घुसवणार आणि हिकडं ...” आप्पारावजी.
“शांत व्हा, शांत व्हा!” महारेणूजी म्हणाले. “आप्पारावजी, तुम्ही राजकारणात इतकी वर्षं मुरलेले ...”
“माफ करा. घरी म्हणून बोलतोय. बाहेर आहेच की॓, हॅ हॅ हॅःऽ ! जी,जीऽ, जीऽऽ !” आप्पारावजी आणि पाठोपाठ सगळेच हसले.
“मग काय, इश्तेराहीजी? सादाखानजी? का खानासाहेब म्हणावं?” डिमंटोजी.
“त्यांना तिकडे त्यांचे निकटवर्ती काय म्हणतात?” महारेणूजी.
“उघड, ’मियॉं इश्तेराही’ आणि मागे, ’राही मतवाले.’ आम्हाला इन्फर्मेशन आहे.” आप्पारावजी.
“ठीक आहे. आपण त्यांना इश्तेराहीजीच म्हणूया.” महारेणूजी.
“काश्मीरप्रश्न काढायचा का नाही?” डिमंटोजी.
“मला वाटतं, सगळे वादग्रस्त प्रश्न बाजूला ठेवावे.” रणछोडजी.
“म्हणजे अतिरेक्यांची घुसखोरी, पी.आय्‍.एस.एस.च्या (P I S S - पाकिस्तान इंटेलिजन्स सीक्रेट सर्विस.) कारवाया आणि क्रिक्रेटच्या मॅचेस सुध्दा?” डिमंटो म्हणाले. मोठे आजरपण नाही पण सतत बारीक ठणकणार्‍या डोक्यामुळे अस्वस्थ व्हावे तसे या तीन गोष्टींमुळे (विशेषत: पी.आय्‍.एस.एस.च्या कारवाया) डिमंटोंना झाले होते.
“ते वादग्रस्त प्रश्न असतील तर ते सुध्दा” रणछोडजी.
“ते बाजूला ठेवायचे असतील तर मग भेटायचं कशांसाठी आणि बोलायचं काय?” आप्पारावजी.
“रणछोडजींना युध्द नको” भुजंगजी मधेच म्हणाले.
“युध्द कुणालाच नको आहे.” जरा रागावून रणछोडजी म्हणाले. “म्हणून तर सदिच्छा भेटीसाठी येतायत.”
“मग शहाणे असतील तर त्यांनी पण हे मुद्दे काढू नयेत?” आप्पारावजी.
“शहाण्यावरुन आठवलं, टांगा सवारी प्रमाणे राजस्थान बॉर्डरवर उंट सवारी पण चालू करावी ...” भुजंगजी.
“ती चालूच असते.” डिमंटोजी.
“ती बेकायदेशीर. स्मगलिंग, घुसखोरी ... मी कायदेशीर म्हणतोय.” भुजंगजी.
“चांगली कल्पना. शिवाय ही उंटसवारी शहाण्यांना आणि आंतरदेशीय प्रेमदिवाण्यांना फुकट ठेवू या.” डिमंटोजी.
“मी सीरिअसली म्हणतोय.” भुजंगची रागावून म्हणाले.
“आधी ही भेट यशस्वी होऊन टांगा सवारी तर सुरु होऊ दे! मग इतर खूप गोष्टी आहेत.” रणछोडजी.
“म्हणजे, गुप्त माहिती व तंत्रज्ञानाची देवाणघेवाण, लष्करी गुपिते, कैद्दांची देवाणघेवाण, अतिरेक्यांना मुक्त करणे, रोटी-बेटी व्यवहार, भाईचारा, आमचं ते तुमचं ...” आप्पारावजी.
“पुरे, पुरे !” महारेणूजी.
“मला वाटतं, तुम्ही इश्तेराहीजींना कडकडून मिठी मारल्यावर त्यांना एक बॉक्स द्या. त्यात एक इडली, एक ढोकळा, एक रसगुल्ला आणि एक मुलीका पराठा असेल. म्हणजे संपूर्ण भारत त्यांना प्रेमानं भेटायला आलाय असं होईल.” रणछोड.
“छान कल्पना. पण बॉक्स उघडून दाखवा. नाहीतर ...”  भुजंगजी.
“आणि टी.व्ही.च्या कॅमेर्‍यांना पण नीट दिसू दे. म्हणजे वरती हेलीकॉप्टरमधे अमेरिका, इंग्लंड, रशिया, चीन आणि फ्रान्सला पण नीट दिसेल. आणि ...” आप्पारावजी.
“पुरे पुरे !’ महारेणूजी.
“या भेटीला आपण काय म्हणायचं? ऐतिहासिक ...” रणछोडजी.
“ऐतिहासिक भेटी आधीच खूप झाल्यायत हो !” डिमंटोजी.
“मग शिळ्या कढीला ऊत किंवा जुन्या बाटलीत नवी ...?” आप्पारावजी.
“थट्टा नको. जुन्या पर्वाचा नवा अध्याय म्हणूया?” डिमंटोजी.
“जागतिक शांततेच्या वाटचालीतील तिसरे पाऊल म्हणू या.” आप्पारावजी.
“तिसरे का?” रणछोडजी.
“अहो,पध्दत असते! कुणीतरी आधीची दोन पावलं टाकलेलीच असतात. आपल्याला कुठं सगळं माहीत असतं?” आप्पारावजी.
“तिसर्‍या संघटित शक्तीचा उदय असं पण म्हणू या.” भुजंगजी.
“पश्चिम बॉर्डरवर उदय?” डिमंटोजी.
“अहो आपली पश्चिम असली तरी त्यांची पूर्वच आहे.” भुजंगची.
“चौथ्या महायुध्दाची सुरुवात म्हणूया!” आप्पारावजी.
“हे मात्र अतीच अवास्तव होतंय हं !” डिमंटोजी.
“का? ’कुठलासा तह हीच खरी दुसर्‍या महायुध्दाची सुरुवात’ असं इतिहासात ...” आप्पारावजी.
“पुरे,पुरे!” महारेणूजी सर्वांच्या उत्साहाला आवर घालत म्हणाले. “ठीक तर! आणखीन काय?”
“आणखीन आपलं नेहमीचंच. तुमचं खरं, आमचंही बरोबर; तुमचं थोडं चुकतंय, आमचंही ...” डिमंटोजी.
“हॅ, हॅ:, हॅ: ! जी,जी,जी ऽऽ !!” आप्पारावजी म्हणाले व पुन्हा सगळे हसले.
“हे ठरलं मग.” महारेणूजी म्हणाले. “दुसरा मुद्दा म्हणजे प्रमुख विरोधी पक्षांना काय सांगायचं?”
“त्यांना कशाला काय सांगायचं?” डिमंटोजी.
“24 डिसेंबरला लोकसभेत निवेदन करायचं आहे. त्या आधी त्यांना भेटलं पाहिजे. त्यांना मान दिल्यासारखं होतं, विश्वास दाखवल्यासारखं होतं. विरोधाची धार कमी होते.” महारेणूजी
“फक्त, प्रमुख विरोधी पक्ष नेते ’विधर्म-पक्षी पक्षाचे’ यजुबिंदरसिंगजींना भेटावं, ते नंतर करतील त्यांच्या लोकांना गप्प.” डिमंटोजी.
“खरी ही टांगाभेटीची मूळ कल्पना त्यांचीच” रणछोडजी.
“तरी म्हणलं, इतकी पोरकट कल्पना ...” आप्पारावजी.
“आप्पारावजी, आप्पारावजीऽ ... हं, तर, लोकसभेतील निवेदनानंतर 25 डिसेंबरला रात्री नाताळाची रोशणाई करायची आहे. त्याचीही कल्पना त्यांना द्यायला पाहिजे. नाहीतर उगीच रुसतील. रणछोडजी सर्व तयारी आहे ना?” महारेणूजी.
“26 डिसेंबरला, आपल्या वेळेप्रमाणे, पहाटे 01-15 वाजता सुधारीत प्रदीर्घ पल्ल्याच्या ‘पीसमेकर 2-C क्षेपणास्त्राची चाचणी होईल आणि ते अटलांटिकच्या मध्यावर तिथल्या वेळेप्रमाणे 25 डिसेंबरला संध्याकाळी 18.00 ला पडेल पश्चिमी जगाला नाताळाची भेट. अर्थात त्यावर कोणताच बॉंब नसेल.” रणछोडजी.
“तुम्ही अशी भेट पाठवल्यावर टांगाभेटीचा सोहळा बघायला आणि हॅलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करायला ते येतील का?” डिमंटोजी.
“मग तुम्ही कशाला आहात? तरी सुध्दा त्यांना आणायचंच, हेच तर तुमचं काम. ...आणि ते येतील! अहो, शांतता सर्वांनाच हवी आहे आणि शांततेचा संदेश घेऊन ‘पीसमेकर’ गेल्यावर ते नक्की येतील. फार तर त्यात टांगा-भेट सोहळ्याच्या चार पत्रिका टाका.” आप्पारावजी.
“आणि जगाला काय सांगायचं?” डिमंटोजी.
“मी इश्तेराहीजींना प्रेमानं मिठी मारल्याचं त्यांना दिसलं आणि त्यांनी पुष्पवृष्टी केली की तेच जगाला काय ते सांगतिल. शिवाय टी.व्ही.वर सर्वांनी हे सर्व पाहिलंही असेल.” महारेणूजी.
“महास्वामीजी, महास्वामीजी ...” वरिष्ठ नोकर अदबीनं महारेणूजींच्या कानाशी वाकून हळूच म्हणाला. “‘एमाई आयाई’ चे लेफ्टनंट जनरल श्री. नानासाहेब षटकर्णी आणि ‘सीआयपी एमायपीओ’ चे चीफ मेजर जनरल श्री.  तात्यासाहेब चिमोटेंना आपल्याला भेटायचयं.”
“अर्ध्या तासानं. महत्त्वाची बैठक सुरू आहे हे सांगितलय ना?” आप्पारावजी.
“होय. महास्वामीजी, म्हणूनच ...”
“ठीक आहे. पाठव.” महारेणूजी.

Sunday, March 15, 2020

राजस्थान बॉर्डरवर डिटेक्टीव्ह चिण्णूची रबाडगिरी - 8



20 डिसेंबर. पहाटे 02-37.

एअरफोर्स बेस क्र. 4
पहाटे दोन वाजून सदतीस मिनिटांनी चिण्णू एअरफोर्स बेस क्र. 4 च्या गेट क्र. 3 पाशी आला.
मी 00.00 पासून (रात्री 12) मरणाच्या थंडीत कुडकुडत इथं वाट बघतोय!परवलीच्या संवादाची देवघेव जेमतेम झाल्या झाल्या तो माणूस थडथडणार्‍या दातांच्या फटीतून खेरबट आवाजात चिण्णूवर खेकसला.
“आपण?” चिण्णूने शांतपणे विचारले.
“मी स्क्वाड्रन लीडर कर्नेलसिंग. आपण?”
चिण्णू कनीस हसला.
“सभ्य माणसा ऽऽ !!” अती संतापाने दडपलेल्या दडस आवाजात कर्नेलसिंग म्हणाला. “मी लाल गांधिलमाशी’ ‘मिकूट BF-33-C’ विमानाचा पायलट आहे आणि या शांततेच्या काळात, तुझ्या एकट्यासाठी, हे मॅक-4 (ध्वनीच्या चौपट वेगाने जाणारे), जगातील सगळ्यात वेगवान विमान काशीला न्यायला मी रात्री बारापासून थंडीत कुडकुडत इथं उभा आहे. आणि तू मला नाव सुद्धा सांगायला तयार नाहीस?”
“सॉरी. टॉप सीक्रेट.” चिण्णू म्हणाला. “आणि सॉरी, तुम्हाला थांबायला लागल्याबद्दल. मी खूप वेळ एअरफोर्स बेस क्र. 3 च्या गेट क्र. 4 पाशी उभा होतो. चूक लक्षात आल्यावर तिथून इथपर्यंत चालत यायला लागलं. सॉरी!”
“तुम्ही कधी जेट विमानात बसला आहात?” कर्नेलसिंग.
“होय.” चिण्णू विनयानं म्हणाला.
“मग त्यापेक्षा हजारपट भयंकर असा हा नवीन अनुभव असेल.” काय एक एक लोक भेटतात आणि त्यांच्यासाठी काय काय करावे लागते, असा चेहेरा करुन, तशाच समजुतीच्या आवाजात कर्नेलसिंग म्हणाला. “आणि त्यातून जगला वाचलात तर अविस्मरणीय अनुभव असेल.”
“प्रत्येक अनुभव नवीनच असतो आणि जीवन म्हणजे, अशा दरवेळी नवीन, जीवघेण्या अनुभवांची मालिकाच असते.” थंडीने थडथडणार्‍या दातांतून चिण्णूने मन चिण्ण्ण्ण करणारे आणि अधिक गोठवणारे तत्त्वज्ञान गोठलेल्या शब्दांत विनाकारण फेकले आणि पायलटसारखा ड्रेस चढवला.
“ही पेटी आपल्याला नेता येणार नाही.” कर्नेलसिंग.
“त्यात धोकादायक काही नाही. आणि ती नेण्यासाठी तर आपल्याला काशीला जायचंय.” चिण्णू म्हणाला. तरीसुध्दा पायलटाने पेटीची क्ष-किरण तपासणी करायला लावलीच. (त्यात मांजराची हाडे कशी दिसली नाहीत किंवा दिसली असली तरी त्यांना त्याचा संशय कसा आला नाही हे चिण्णूला न सुटलेल्या रहस्यांपैकी एक आहे.)
“तरीसुद्धा ... जायलाच पाहिजे का? तुमच्या जीवाची मला काळजी वाटते.” कर्नेलसिंग खर्‍या काळजीने गंभीरपणे म्हणाला.
“मी चालवतो.” चिण्णू. “तुम्ही मागे बसा, म्हणजे तुम्हाला टेन्शन नको.
यावर या वेड्या माणसाशी बोलण्यात अर्थ नाही हे कर्नेलसिंग समजून चुकला आणि विमानाकडे गेला.
पहाटे तीन वाजून दोन मिनिटांनी (03-02 वाजता) विमानाने सरळ वर, जवळजवळ उभे उड्डाण केले व दहा सेकंदात ताशी 3000 कि.मी. वेग गाठला. तो त्याचा फक्त पाऊण वेग होता.   
विमान बरोब्बर 03-19 वाजता, म्हणजे सतरा मिनिटांत, काशीच्या विमानतळावर उतरले. पेटी हातांत घट्ट धरून तिथेच चिण्णूने एक डुलकी काढली आणि सूर्य उगवायच्या आधी तो गंगेच्या काठावरील घाटावर पोचला.

20डिसेंबर. सकाळी 08-00
पंतप्रधानांचे निवासस्थान
नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनाच्या नैऋत्येला असलेल्या ब्लॉक एफ्. मधे, निरनिराळ्या राज्यांच्या भवनांच्या आणि निरनिराळ्या राष्ट्रांच्या वकिलातींच्या मधे, ‘5-बाबा फंदे मार्ग’ येथील वास्तू जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राच्या सध्याच्या पंतप्रधानांचे निवासस्थान आहे. पण ते अजून जगप्रसिध्द नाही. कारण निवासस्थानाचा घरगुतीपणा आणि खाजगीपणा टिकून राहिला पाहिजे असे सध्याचे पंतप्रधान डॉ. महारेणूजी अण्णास्वामी यांचे मत आहे. अति प्रशस्त पण एका साच्याचे सरकारी निवासस्थान नाकारुन त्यांनी हे निवास्थान स्वीकारले. त्याच्या पुढच्या छोट्या बागेत रोज पहाटे सहा ते साडेसहा आणि सायंकाळी सहा ते सात ते स्वत: राबताना दिसतात. म्हणजे जर त्या घरा भोवती दहा फूट उंचीची दगडी भिंत नसती तर ते दिसले असते. पण त्यांनी हे घर निवडल्याबरोबर सरकारने त्यांच्या सुरक्षिततेच्या कारणासाठी ही भिंत बांधली व बाजूला अर्धा किलोमीटर त्रिज्येच्या परिसरातील सर्व बंगले ताब्यात घेऊन तिथे पंतप्रधानांचे सल्लागार, कार्यालयातील अधिकारी, सहाय्यक, पर्सनल सेक्रेटरी व नोकरमंडळी यांची सोय केली. बागेत काम करताना ती उंच दगडी भिंत शेजारी बघून कितीतरी वेळा पंतप्रधानांना आपण सक्तमजुरीचे कैदी आहोत असे वाटे. पण सध्याच्या अतिरेकी काळात याला इलाज नाही. प्रचंड मोठ्या लोकशाही स्वतंत्र राष्ट्राचा पंतप्रधान असण्याची ती किंमत आहे.
निवासस्थानाच्या दारावर लाकडात कोरलेली गणपतीची सुरेख मूर्ती आहे आणि दार उघडताच प्रशस्त व्हरांड्याच्या समोरच्या भिंतीवर सहा फूट बाय चार फूट फ्रेममधे सुंदर देखाव्याचे चित्र आहे. ते त्यांच्या, कोलार सुवर्ण क्षेत्राजवळील ‘पातालकनकेश्वरम्‌’ या मूळ गावाजवळच्या वनराईतील कनकेश्वराच्या जुन्या मंदिराचे आहे. कर्नाटक, आंध्र आणि तमिळनाडूच्या सीमेवरील हे मध्यवर्ती गाव असल्याने सध्याचे पंतप्रधान सर्व दक्षिण भारताचेच प्रतिनिधित्व करतात असे म्हटले तरी चालेल. अर्थात आता ते सर्व भारताचेच प्रतिनिधित्व करतात.
आतील प्रशस्त हॉलमधे साधे पण उपयुक्त, शिसवी लाकडी फर्निचर व बैठी आरामशीर बैठकीची व्यवस्था आहे. हॉलच्या लेमन - ऑफ व्हाईट रंगाला साजेसे मंद हिरवट पिवळट प्रसन्न रंगसंगतीचे पडदे व कुशनकव्हर्स आहेत. एका बाजूला भिंतभर कपाटात अनेक विषयांवरची अनेक पुस्तके आहेत. ती नुसती शोभेची नाहीत. कपाट उघडून ती बघितली तर ती अनेक वेळा वाचलेली आढळतील. पण आपण कशाला तिथे ते कपाट उघडून बघायला जाणार? आणि आपल्याला जाऊ तरी कोण देणार?
आज 20 डिसेंबरच्या सकाळी 8 वाजता तिथे नोकरांची गडबड चालू होती. कारण 9 वाजता पार्टीतील प्रमुख व विश्वासू नेत्यांबरोबर पंतप्रधानांची, 29 डिसेंबरच्या पाकीस्तानच्या पंतप्रधानांच्या भेटीसंदर्भात, महत्त्वाची बैठक होती.